– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Mili Movie Review. एखाद्या सुंदर दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक करतांना बॉलिवुडवाले सिनेमाच्या कास्टिंग मध्ये म्हणजेच कलाकारांच्या निवडीत चुकतात हे अशात बऱ्याचदा दिसून आले आहे. चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार, कथेच्या मागणीनुसार अत्यंत साधारण अशा लुक्सचा हवा असेल तर तिथे रुबाबदार आणि वलयांकित कलाकाराला घेण्याची बॉलीवूडला वाईट सवय आहे. ‘विक्रम वेधा’ हे त्याचे अशातले उदाहरण. मूळ ‘विक्रम वेधा’ मधील विजय सेतुपती हा त्याच्या साधारण दिसण्यामुळे प्रेक्षकांशी लगेच कनेक्ट होतो पण इथे ह्रितिक त्याचा लाजवाब अभिनय असूनही आपल्यातला नाही वाटला. याला कारण कथेची मागणी ही आपल्यातल्या दिसणाऱ्या कलाकाराची होती. ह्रितिक एक वलयांकित असा स्वप्नातील राजकुमार लूक असलेला कलाकार आहे. २०१९ साली एका मल्याळम चित्रपटाने प्रेक्षक, समीक्षक आणि नंतर साऱ्या देशाचे लक्ष वेधले. तो होता ‘हेलन’. आधी प्रेक्षक-समीक्षकांना आवडला आणि नंतर २ राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर त्याचे देशभरात नाव झाले. यात प्रमुख नायिकेची भूमिका साकारली होती ऍना बेन या अभिनेत्रीने. कथेतील मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातील पात्रानुसार ऍना, हेलन या पात्रात  फीट बसली  आणि त्यामुळेच प्रेक्षकांना आपलीशी वाटली. याच हेलन सिनेमाचा अधिकृत रिमेक आज प्रदर्शित झालाय ‘मिली’ या नावाने. ज्यात ऍना ला रिप्लेस केले आहे जान्हवी कपूर या अभिनेत्रीने. ‘विक्रम वेधा’ तील ह्रितिक प्रमाणेच जान्हवीने इथे अत्यंत सुंदर काम केले आहे पण तरीही आडवे येते ते तिचे सामान्य न दिसणे.

कथा थोडक्यात. मिली (जान्हवी कपूर) ही डेहराडून स्थित मध्यमवर्गीय तरुणी आहे. वडील (मनोज पहावा) सोबत राहत असलेल्या मिलीच्या आईचे तिच्या लहानपणीच निधन झाले आहे.  मिली ला वैद्यकीय शिक्षणासाठी कॅनडाला जायचे आहे. त्यासाठी आवश्यक शिक्षण पूर्ण करीत असतांनाच ती शहरातील एका मॉल मध्ये असलेल्या रेस्टोरंट मध्ये नौकरी करीत असते. मिली आणि समीर (सनी कौशल) चे एकमेकांवर प्रेम आहे पण समीर ला कुठे नौकरी नसल्याने  याबद्दल मिलीने वडिलांना सांगितलेले नसते. एका रात्री उशिरा नौकरीहून समीर सोबत घरी परत येत असतांना या दोघांना पोलीस थांबवितात आणि या घटनेमुळे मिलीच्या वडिलांना या दोघांबद्दल कळते. कळल्यावर मिली आणि तिच्या वडिलांमध्ये काही दिवस बोलणे बंद होते. मिली ला याबद्दल अपराधीपणाची भावना असते. दुसरीकडे मिली समीर चे फोन घेणेही बंद करते. हा सर्व घटनाक्रम चालू असतांनाच मिली एका मोठ्या संकटात अडकते. संकट जीवघेणे असते. मिली चे वडील, समीर आणि इतर मित्र, सहकारी सर्व जण तिचा शोध घेतात पण मिली कुठे आहे आणि नेमक्या कुठल्या संकटात अडकली आहे याचा पत्ता कोणालाच नसतो. ते संकट कोणते आणि मिली यातून कशी बाहेर येते हे सर्व इथे विस्ताराने सांगणे अयोग्य ठरेल. ज्या प्रेक्षकांनी ओरिजिनल हेलन हा मल्याळम सिनेमा ओटीटी वर पाहिला आहे त्यांना हे संकट कोणते आणि त्यातून कथेची नायिका कशी सुटका करून घेते याची माहिती असेलच.

विक्रम वेधा प्रमाणेच मिली चे दिग्दर्शनही त्याच्या मूळ सिनेमाच्या दिग्दर्शकानेच केले आहे. मथुकुट्टी झेव्हियर हे त्यांचे नाव. हिंदीत रूपांतर करतांना पटकथा लिहिली आहे रितेश शहा यांनी. हिंदी प्रेक्षकांना अनुसरून पटकथेत आवश्यक तेवढेच बदल करण्यात आले आहेत बाकी मिली ही हिंदी आवृत्ती बऱ्यापैकी मल्याळम सिनेमा सारखीच आहे. पटकथेची लांबी कमी असल्याने चित्रपट २ तासातच संपतो हि जमेची बाजू. मध्यंतरापूर्वीचे काही सीन्स वगळता चित्रपट फारसा रेंगाळत नाही. कथेत मिली, तिचे वडील आणि मिलीचा प्रियकर समीर हे तीनच प्रमुख पात्र आहेत आणि एका सत्यघटनेवर आधारित चित्रपटाची कथा आहे. कथेतील मुख्य स्त्री पात्र तिच्यावर अचानकपणे येणाऱ्या संकटाला कसे सामोरे जाते आणि त्यावर आधारित घटनाक्रम मध्यंतरानंतर गुंतवून ठेवतो. एका अचानक समोर आलेल्या संकटाला धीराने तोंड देणारी नायिका हा कथाभाग दिग्दर्शक झेव्हियर यांनी उत्तमरीत्या सादर केला आहे परंतु मिली आणि तिचे वडील आणि मिली आणि तिचा प्रियकर या दोन नात्यांमधील ओलावा दाखविण्यात इथे दिग्दर्शक कमी पडला आहे. त्यामुळे मिली ला वाचविण्यासाठी दोघे करत असलेली धडपड म्हणावी तितकी हृदयाला येऊन भिडत नाही. सुरुवातील उल्लेख केल्याप्रमाणे मिली या पात्राला न्याय देण्यात जान्हवी कमी पडली आहे असे जरी नसले तरी जान्हवी चे लुक्स एखाद्या साधारण दिसणाऱ्या मध्यमवर्गीय तरुणीचे नाहीत त्यामुळे तिची निवड खटकतेच. जावेद अख्तर यांच्या अर्थपूर्ण गीतांना असलेले ए आर रहेमान यांचे संगीत मात्र अत्यंत निराशाजनक. 

अभिनयाच्या बाबतीत जान्हवी चा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहे. खरंतर मिली ची निर्मिती निर्माते बोनी कपूर यांनी केवळ जान्हवी कपूर साठीच केली आहे. ओरिजिनल मल्याळम सिनेमा हेलन ला अनके नामांकनं आणि राष्ट्रीय पुरस्कारासह इतर असे  १० च्या वर पुरस्कार मिळाले आहेत हे बघूनच हा रोल जान्हवी ला करता यावा आणि तिच्यातील अभिनेत्री प्रेक्षकांना दिसावी या एकमेव उद्देशाने बोनी यांनी मिली ची निर्मिती केली आहे त्यामुळे या चित्रपट जान्हवी का हा प्रश्न निरर्थक ठरतो. चित्रपट सुरु झाल्यावर ते तिच्यावर आलेल्या संकटापर्यंत जे काही सीन्स आहेत त्यात जान्हवी फारसा प्रभाव टाकू शकलेली नाही. मनोज पहावा नेहमीप्रमाणे आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला पूर्ण न्याय देतांना दिसतात. समीर च्या भूमिकेत सनी कौशल ही सुद्धा चुकलेली निवड आहे असे वाटते.

ज्यांनी मूळ सिनेमा हेलन पाहिलाय त्यांना मिली काहीसा कमी पडलाय असे निश्चित वाटणार पण थेट मिली बघणाऱ्यांना हा प्रयत्न बरा वाटू शकतो. थिएटरमध्येच बघा असं काही नाही.. नंतर घरी बसल्या समोर आला तर एकदा बघावा असा.

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment