आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
Third Eye Asian Film Festival starts from January 12
महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा २० वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १२ जानेवारी ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले चित्रपट सिटीलाइट सिनेमा, माहिम आणि कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्समध्ये दाखवले जातील.
थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या २० व्या आवृत्तीत, आशियाई स्पेक्ट्रम विभागात इंडोनेशिया, इजिप्त, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंका येथील बारा चित्रपटांचा समावेश आहे आणि इराणमधील सात चित्रपट कंट्री फोकस विभागात दाखवले जातील. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.
भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी, मराठी भाषांमधील बारा चित्रपटांचा समावेश आहे. यात फॅमिली, डीप फ्रीझ, बिजया पोरे, या गोष्टीला नावच नाही, आत्मपॅम्पलेट, हाऊस ऑफ कार्डस, एपिसोड १३, सेयुज सनधन, आरोह एक प्रितिभी, मिनी, विस्पर्स ऑफ फायर अँड वॉटर, गोराई पाखरी या १२ चित्रपटांचा समावेश आहे.
मराठी स्पर्धा विभागात स्थळ (दिग्द. जयंत सोमाळकर), रघुवीर (दिग्द . निलेश कुंजीर), महाराष्ट्र शाहीर, (दिग्द. केदार शिंदे), स ला ते स ला ना ते (दिग्द. संतोष कोल्हे), जित्राब (दिग्द. तानाजी गाडगे), गिरकी (दिग्द. कविता दातीर, अमित सोनावणे), गाभ (दिग्द. अनुप जत्राटकर), टेरिटरी (दिग्द. सचिन श्रीराम), मदार (दिग्द. मंगेश बदार) या ९ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.
सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या जन्मशताब्दी निमित्त या महोत्सवात त्यांच्या चित्रपटांचा सिंहावलोकन विभाग असणार आहे. कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महोत्सवादरम्यान चित्रपट प्रदर्शनासोबतच मान्यवर ज्युरी सदस्यां बरोबर ओपन फोरम, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसह मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी ५ जानेवारीपासून सुरू होत असून www.thirdeyeasianfilmfestival.com या वेबसाइटवरूनही नोंदणी करता येईल.