– अजिंक्य उजळंबकर 

एखाद्या चित्रपटातील गाणी अथवा संवाद पाठ असणे इथपर्यंत ठीक असते, पण तुम्हाला किती सिनेमांमधील दृष्यांच्या वेळी चालू असलेले बॅकग्राउंड म्युझिक अर्थात पार्श्वसंगीत पाठ आहे? डोक्याला फार ताण दिल्यावरही बोटावर मोजता येतील इतकीच नावे आठवतील. डॉन (Don 1978 film)बाबत किती जणांना असा अनुभव आहे याची कल्पना नाही पण मला डॉनचे चित्रपटभर चालू असणारे पार्श्वसंगीत अक्षरशः पाठ आहे. डॉन मला प्रचंड आवडतो व त्याची जवळपास शोले इतकीच पारायणे झाली असल्याचे पहिले कारण जरी अमिताभ असला तरी दुसरे कारण आहे त्याचे इलेक्ट्रीफाईंग बॅकग्राउंड स्कोर/म्युझिक. काही जणांना हे थोडे विचित्र वाटेल पण डॉन च्या यशात सलीम जावेद या जोडीचा कथा/पटकथा व संवाद लेखक म्हणून सिंहाचा वाटा आहेच पण या प्रचंड वेगाने पळणाऱ्या या कथेच्या सिंहासोबत, चित्याच्या गतीने पळणारे पार्श्व संगीत प्रत्येक दृष्याचा परिणाम दुप्पट करते यात काहीच शंका नाही. असल्यास याची खात्री करून घेण्यास डॉन परत एकवार बघा. आजच्या दिवशी ४३ वर्षांपूर्वी (१२ मे १९७८) डॉन प्रदर्शित झाला होता. तोही फारश्या प्रसिद्धी शिवाय. असे कसे? कारण प्रसिद्धीचे पैसे द्यायलाही हातात पैसे नव्हते. निर्मितीसाठी जवळपास ७० लाख खर्च झाले होते. १९७८ चे ७० लाख ही फार मोठी रक्कम होती. तेही आधीच कर्जबाजारी झालेल्या निर्मात्याने या रकमेचा जुगार खेळला होता. तो कसा? (This Day That Year…43 Years of Evergreen Movie Don)

डॉन च्या जन्माची कहाणी चित्रपटाप्रमाणेच खूप रंजक आहे. डॉन चे निर्माते नरिमन इराणी हे त्याकाळी हिंदी सिनेमातील प्रसिद्ध छायाचित्रकार होते. नरिमन यांना ‘सरस्वती चंद्र’ (१९६८) सिनेमासाठी उत्कृष्ट छायाचित्रणाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. झाले असे की सुनील दत्त-वहिदा रहेमान जोडीला घेऊन नरिमन इराणी यांनी १९७२ साली ‘जिंदगी जिंदगी’ सिनेमाची निर्मिती केली. सिनेमा फ्लॉप झाला आणि नरिमन यांच्यावर जवळपास १२ ते १५ लाखांच्या कर्जाचे ओझे वाढले. ‘डॉन’ चे दिग्दर्शक होण्याच्या आधी चंद्रा बारोट हे मनोज कुमार यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक होते. १९७४ साली मनोज कुमार यांच्या ‘रोटी कपडा और मकान’ सिनेमाच्या छायाचित्रणाचे काम नरिमन बघत होते तर चंद्रा बारोट सहाय्यक दिग्दर्शक होते. याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नरिमन यांचे अमिताभ बच्चन, झीनत अमान व चंद्रा बारोट यांच्याशी अतिशय सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले.

नरिमन यांच्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी म्हणून या सर्व टीमने नरिमन यांना आणखी एका चित्रपटाची निर्मिती करण्याची विनंती केली ज्यात अमिताभ झीनत जोडी असेल (अर्थातच किमान मानधन घेऊन) व चंद्रा बारोट दिग्दर्शन करेल. कथेसाठी सलीम-जावेद यांना पाचारण करण्यात आले. सलीम-जावेद यांनी लिहिलेली डॉन ची कथा बऱ्याच निर्मात्यांनी त्यावेळी नाकारली होती. नरिमन तेंव्हा ‘छैला बाबू’ या जॉय मुखर्जी दिग्दर्शित व राजेश खन्ना अभिनीत सिनेमाचे छायाचित्रण करीत होते. डॉन च्या कथेमधील काही भाग ‘छैला बाबू’  मधून घेण्यात आला व नंतर सलीम-जावेद जोडीने फायनल टच देऊन दिग्दर्शक चंद्रा बारोट यांच्याकडे पटकथा सोपवली. नरीमन यांच्यावर असलेल्या कर्जाच्या दबावामुळे सुरुवातीला निर्मिती मध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या ज्याचा परिणाम चित्रपट पूर्ण होण्यास अडीच-तीन वर्षांचा काळ गेला. एकीकडे ‘डॉन’ चे शूटिंग सुरु असतांना नरीमन यांना दुसऱ्या एका सिनेमाच्या सेट वर छायाचित्रणाचे काम करीत असताना गंभीर अपघात झाला व १० डिसेंबर १९७७ रोजी त्यांचे निधन झाले. नरीमन यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून मग डॉन च्या टीमने आणखी मेहनत घेतली. चार महिन्यांनी चित्रपट पूर्ण झाला. चंद्रा बारोट यांनी आपले गुरु मनोज कुमार यांना सिनेमा दाखविला. मनोज कुमार यांच्या सल्ल्याने ‘खैके पान बनारस वाला’ गाण्याला सिनेमात घेण्यात आले. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी हे गाणे देव आनंद यांच्या ‘बनारसी बाबू’ साठी तयार केले होते परंतु देव साहेबांना आवश्यकता वाटली नाही म्हणून गाणे चित्रपटात वापरण्यात आले नव्हते. ‘खैके पान बनारस वाला’ च्या अफाट लोकप्रियतेने ‘डॉन’ च्या यशात प्रचंड मोठी भर पडली. दुसऱ्याच आठवड्यात ‘डॉन’ ला ब्लॉकबस्टर म्हणून घोषित करण्यात आले. ७० लाखात बनलेल्या डॉन ने नंतर ७ कोटी पर्यंत कमाई केल्याची नोंद आहे. चित्रपटाची कमाई नरिमन यांच्या विधवा पत्नीला देण्यात आली ज्यातून नरीमन यांच्यावरील  कर्जाचे ओझे संपले. दुर्दैव हे यश बघण्यासाठी नरीमन मात्र नव्हते. 

डॉन ची गणना हिंदी सिनेमाच्या एव्हरग्रीन कल्ट क्लासिक सिनेमात होते. आज यु-ट्यूब वर उपलब्ध असलेल्या सिनेमाला ४.५ कोटी लोकांनी पहिले आहे. तेही पाच वर्षात. कारण शेमारू कंपनीने केवळ पाच वर्षांपूर्वी हा सिनेमा अधिकृतपणे उपलब्ध केला आहे. बाकी विविध चॅनेल्सवर, सिनेमागृहात रिपीट रन मध्ये रसिकांनी याची किती पारायणे केली आहेत याची गणना करणे शक्य नाही. ‘डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्क कि पुलिस कर रही है, लेकिन सोनिया डॉन को पकडना मुश्किल ही नही नामूमकिन है!’ सारख्या कितीतरी संवादांचे गारुडआज ४३ वर्षांनंतरही रसिकांवर कायम आहे. अमिताभ यांच्या चित्रपट करिअर मधील अत्यंत महत्वाचा हा सिनेमा. अंडरवर्ल्ड डॉन व रस्त्यावर गाणी म्हणणारा विजय या दोन्ही भूमिकांचे अमिताभ यांनी सोने केले होते. खासकरून विजय याची पान खाऊन बोलण्याची स्पेशल स्टाईल. उत्कृष्ट अभिनेता म्हणून ‘अमर अकबर ऍंथोनी’ नंतर सलग दुसऱ्या वर्षी बीग बी अमिताभ यांनी ‘डॉन’ साठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता. किशोर कुमार यांना ‘खैके पान’ साठी तर आशा भोसले यांना ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ साठी उत्कृष्ट गायनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 

आधी सांगितल्याप्रमाणे डॉन परत परत बघण्याची अनेक कारणे आहेत. सिनेमाची गती हे त्यामागचे प्रमुख कारण आहे पण त्या गतीला सुद्धा मागे टाकणारे आहे त्याचे पार्श्वसंगीत. जर त्याकडे फारसे लक्ष गेले नसेल तर त्यासाठी डॉन पुन्हा एकदा बघण्यास हरकत नाही. कल्याणजी आनंदजी यांना या इलेक्ट्रीफाईंग पार्श्व संगीतासाठी जस्ट हॅट्स ऑफ! 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.