– अशोक उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

आज प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक प्रकाश मेहरा (Producer Director Prakash Mehra) यांचा जन्मदिन. ७० व ८० चे दशक ज्यांनी गाजवले व हिंदी सिनेसृष्टीला ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ ज्यांच्यामुळे मिळाला असे प्रकाशजी २००९ साली हे जग सोडून गेले. नवरंग रुपेरीचे संस्थापक-संपादक व ज्येष्ठ सिनेसमीक्षक अशोक उजळंबकर यांच्या “लाईट्स कॅमेरा ऍक्शन” पुस्तकातील प्रकाश मेहरा यांच्यावरील लेखाचा संपादित अंश आज त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने खास. (Prakash Mehra Successful Director of Hindi Cinema from 1970s decade)

———————————————————

१३ हा आकडा बरीच लोकं अशुभ मानतात परंतु अनेकांच्या बाबतीत तो शुभ समजला गेला आहे. प्रकाश मेहरा हे १३ या आकड्याला कधीच अशुभ मानत नसत. अमावस्या हा दिवस काम सुरू करण्यास चांगला असं त्यांचं म्हणणं होतं. १३ हा आकडा त्यांच्याकरिता नेहमीच शुभ ठरला आहे. ते मुंबईत दाखल झाले तेव्हा त्यांच्याजवळ केवळ १३ रुपये होते. त्यांचा जन्म १३ जुलै १९३९ रोजी झाला. १९३९ मधील ३९ हा आकडा १३ ने भाग जाणारा आहे. प्रकाश मेहरा यांचा विवाह १३ रोजीच (वर्ष माहीत नाही) झाला तर त्यांचा सुपरहिट चित्रपट जंजीर प्रदर्शित झाला होता १३ जुलै १९७३ मध्ये. वयाच्या चौथ्या वर्षी आई वडिलांचे छत्र हरवले व नातेवाईकाकडे राहून त्यांनी एसएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व मुंबई गाठली. कवी म्हणून फिल्मी दुनियेत दाखल होण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु रूपतारा स्टुडिओत दाखल होत असतानाच बाहेर उभ्या असलेल्या पठाणाने त्यांना धक्के मारून हाकलून दिले होते. त्यानंतर काही वर्षांनी याच रूपतारामध्ये त्यांना सन्मानपूर्वक प्रवेश मिळाला. ३० ते ४० रुपये रोजंदारी प्रमाणे त्यांनी फिल्मी स्टुडिओत काम केले व यश मिळवले.

मुंबईत दाखल झाल्यानंतर फिल्मी दुनियेत नाव काढावं असंच त्यांना वाटत होतं; परंतु नायक होण्याइतका देखना चेहरा नव्हता वशिला नव्हता, त्यामुळे सहाय्यक म्हणूनच काम करावे लागले. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अनेक नामवंत दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केले व शेवटी १९६८ मध्ये त्यांना दिग्दर्शक म्हणून संधी मिळाली. मंगतराम फिल्मच्या ‘हसीना मान जाएगी’ चे दिग्दर्शन यांनी केले. शशी कपूर बबीता ही जोडी त्यात होती. या जोडीला खरा ब्रेक देणारा हा सिनेमा म्हणावा लागेल. कल्याणजी-आनंदजी यांनी ‘हसीना मान जाएगी’ ला संगीत दिले होते. लता रफी ची २ द्वंद्व गीते चांगलीच गाजली होती. त्यापैकी एक ‘दिलबर दिलबर कहते कहते हुआ दीवाना’ हे क्लब सॉंग होते, तर ‘बेखुदी में सनम उठ गये जो कदम आ गये पास हम’ हे आजही चटकन ओठावर येते. १९६८ साली महाविद्यालयीन तरुण तरुणीचा हा आवडता चित्रपट ठरला होता. बबीता खूपच टवटवीत वाटत होती. त्याकाळी या चित्रपटाने ५० लाखांचा धंदा केला होता व सुपरहीट ठरला होता. ‘हसीना मान जाएगी’ मुळे प्रकाश मेहरा दिग्दर्शक म्हणून चांगलेच नावारूपास आले.

पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे मेहरा खुश होते निर्माते मंडळीचे त्यांच्याकडे लक्ष जाणे स्वाभाविक होते व त्याचाच परिणाम म्हणून ‘मेला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांच्याकडे आले. मुमताज, संजय व फिरोज खान यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. मेलाचे कथानक फारसे नाविन्यपूर्ण नव्हते; परंतु प्रकाश मेहरा यांनी मांडणी सुरेख केली होती. चित्रपट कुठेही कंटाळवाणा होऊ दिला नव्हता. राहुल देव बर्मन यांचं कर्णमधुर संगीत देखील सहाय्यक ठरलं होतं. मजरूह सुलतानपुरी यांची लता-रफी ची ३ द्वंद्व गीत आकर्षण ठरली व मेला म्युझिकल हिट ठरला. १. गोरी के हाथ मे चांदी का छल्ला, २. एक बार रख दे कदम जरा झुमके, ३. रूत है मिलन कि साथी मेरे आरे ही तीन गाणी. त्यापैकी ‘गोरी के हात मे चांदी का छल्ला, ऐसी हो किस्मत मेरी भी अल्ला’ हे गाणं खूप हिट झालं होतं. हसीना मान जाएगी चे यश कथा लेखक एम अब्बास यांनी घेतलं तर मेला चे यश लेखक कौशल भारती यांना दिलं गेलं; परंतु जेव्हा पुढचा चित्रपट ‘आन बान’ सुपर फ्लॉप ठरला तो हा त्याचा दोष प्रकाश मेहरा यांच्या माथी लागला. त्यानंतरचा ‘एक हसीना दो दिवाने’ हा चित्रपट जेंव्हा आपटला तेव्हा मात्र पटकथा लेखक एस. एम. अब्बास यांच्यावर ठपका ठेवला गेला. चित्रपटाची कथाच पकड घेणारी नव्हती.

‘समाधी’ हा चित्रपट १९७१ साली त्यांनी दिग्दर्शित केला व हिट ठरला. धर्मेंद्र, आशा पारेख व जया भादुरी यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. तीन ते चार चित्रपटाचे यशस्वी दिग्दर्शन केल्यानंतर निर्माता म्हणून दाखल होण्याची आपली इच्छा त्यांनी लगेच पूर्ण केली व प्रकाश मेहरा प्रोडक्शन ची स्थापना करून ‘जंजिर’ सेटवर नेला. अमिताभ बच्चन हे नाव तेव्हा फिल्मी वर्तुळात चर्चिले जात होते. ‘या चित्रपटाकरिता प्रकाश मेहरा यांना अमिताभ बच्चनला नायक म्हणून संधी द्या’ असे मीच सांगितले असे अनेक जण म्हणतात; परंतु प्राणचा मुलगा टोनी याने प्रकाश मेहरा यांना अमिताभला घेण्याविषयी सांगितले होते. टोनी व अमिताभ जवळचे मित्र होते व अमिताभ ही भूमिका चांगली पार पाडेल असा त्यांना विश्वास होता. ‘जंजीर’ ला मिळालेल्या यशात अमिताभ, प्राण, कल्याणजी-आनंदजी, प्रकाश मेहरा यांचा समसमान वाटा होता. ‘जंजीर’ हे टीम वर्क होते हे प्रकाश मेहरा आजही कबूल करतात. ‘जंजीर’ मुळे भारतीय चित्रपट सृष्टीला एक नवीन वळण लागले. अमिताभची ‘अँग्री यंग मॅन’ ही इमेज जंजीरपासूनच झाली; परंतु हाच अमिताभ ‘हेराफेरी’ मध्ये कॉमेडी मस्त करून गेला तर ‘मुकद्दर का सिकंदर’ मध्ये त्याने सोशिक प्रेमी चांगला वठवला होता. अमिताभ बच्चनचे करिअर घडविण्यात प्रकाश मेहरा यांचा महत्त्वाचा सहभाग होता. अमिताभ बच्चन च्या सिने कारकिर्दीला ‘जंजीर’ मुळे एक वेगळे वळण मिळाले. प्राण ‘उपकार’ नंतर या चित्रपटात खरा उठून दिसला होता, तर अजितचा खलनायक जबरदस्त वाटला. बिंदू व ज्या भादुरी यांची कामे देखील उत्कृष्ट झाली होती. ‘यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी’ हे मन्ना डे यांच्या आवाजातील गाणं खास जमलं होतं.

‘जंजीर’ नंतर ‘मुकद्दर का सिकंदर’ प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला होता. दिलीप कुमार, अशोक कुमार यांचा ‘दीदार’ व दिलीप कुमारचा ‘देवदास’ याचे मिक्स कथानक ‘मुकद्दर का सिकंदर’ मध्ये पहायला मिळाले. ॲक्शन नंतर एक प्रेमी युवक म्हणून अमिताभ यात पाहायला मिळाला. विनोद खन्ना, राखी, रेखा यांच्या भूमिका सर्वांनाच आवडल्या होत्या. या चित्रपटाच्या वेळी अमिताभला काविळ झाला होता व प्रकाश मेहरा यांना याचे चित्रीकरण बराच काळ लांबणीवर टाकावे लागले होते. अमिताभची या चित्रपटातील भूमिका संस्मरणीय ठरली. नायकाचा मृत्यु दाखविणे चुकीचे होईल असा सल्ला अनेकांनी प्रकाश मेहरा यांना दिला, परंतु त्यांनी बदल करायचे नाकारले. बॉक्स ऑफिस खिडकीवर मुकद्दर ला जबरदस्त यश मिळाले. प्रकाश मेहरा यांच्या मताप्रमाणे त्यांचा सर्वात चांगला चित्रपट हात होता.

मेहरा फिल्म्सच्या बॅनरखाली प्रकाश मेहरा यांनी १९७७ साली ‘खून पसीना’ या चित्रपटाची निर्मिती केली व त्याचे दिग्दर्शन त्यांचा सहाय्यक राकेश कुमार यांच्याकडे सोपवले. अमिताभ, विनोद खन्ना, रेखा यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या व अमिताभ ची चढती कमान असल्यामुळे हा चित्रपटदेखील सुपरहिट ठरला. ‘खून पसीना’ चे कथानक ग्रामीण होते तरीदेखील त्याला यश मिळाले. संगीत देखील चांगले होते. ‘देशद्रोही’ सायराबानू, नवीन निश्चल यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला होता. ‘देशद्रोही’ चे कथानक ठिसूळ होते व कलावंतांची निवड चुकीची ठरली होती. चित्रपट सेटवर गेल्यानंतर खूप उशिरा प्रदर्शित झाला होता व गॅप नंतर येणारा हा चित्रपट यशस्वी ठरू शकला नाही. ‘ज्वालामुखी’ ही मेहरा कंपनीची निर्मिती होती. वहिदा रहमान, शत्रुघ्न सिन्हा, रीना राय यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. हा ज्वालामुखी मेहरा यांच्या अंदाजा इतका पेट घेऊ शकला नाही. ‘ज्वालामुखी’ मध्ये कथेची मांडणी नीट झाली नव्हती व संगीत अजिबात चांगले नव्हते. प्रकाश मेहरा यांच्या खात्यात एक अपयशी चित्रपटाची भर या चित्रपटाने झाली इतकेच. ‘ज्वालामुखी’ नंतर ‘लावारिस’ मात्र कमालीचा यशस्वी ठरला. अमिताभची मध्यवर्ती टायटल भूमिका व जबरदस्त संवाद, हिट गाणी हे सर्व ‘लावारीस’ चे यश होते. ‘लावारिस’ मधील ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणे अमिताभने स्वतः गायिले होते. एका लावारिस मुलाची कथा प्रकाश मेहरा यांनी आपल्या कुशल दिग्दर्शन कौशल्यामुळे योग्यरीत्या हाताळली होती. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘लावारिस’ या चित्रपटास सुवर्णमहोत्सवी यश मिळाले. प्रकाश मेहरा यांना दिग्दर्शनाचे पारितोषक मिळाले होते.

प्रामाणिकपणा म्हणजे काय आपण जर एखाद्या घराण्याशी इमानदारी दाखवली तर त्याचे काय बक्षीस मिळते याची एक कथा निर्माते सत्यपाल यांच्याकडे होती. त्यांनी या कथानकावर ‘नमक हलाल’ या चित्रपटाची निर्मिती चालवली होती व दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी प्रकाश मेहरा यांच्यावर सोपवली होती. ‘ पग घुंगरू बांध मीरा नाची थी’ हे किशोर कुमार यांच्या आवाजातील ‘नमक हलाल’ मधील गाणं हायलाईट होते तर अमिताभचा अभिनय देखील लाजवाब झाला होता. वहिदा रहमान, शशि कपूर, परवीन बाबी, स्मिता पाटील यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. ‘नमक हलाल’ ला बप्पी लहरी यांचे संगीत होते. ‘नमक हलाल’ या चित्रपटाला मिळालेले यश पाहून निर्माते सत्यपाल यांनी आपल्या आगामी ‘शराबी’ ची जबाबदारी प्रकाश मेहरा यांच्यावर सोपवली. १९८४ साली ‘शराबी’ प्रदर्शित झाला होता. याला देखील बप्पी लहरी यांचे संगीत होते. ‘शराबी’ हा अमिताभचा ‘वन मॅन शो’ होता, म्हणजेच संपूर्ण चित्रपटाचे कथानक केवळ त्याच्या भोवती फिरत होते. जयाप्रदा ही त्यांची नायिका होती. एकेकाळचा गाजलेला चरित्र अभिनेता ओम प्रकाश यांची यातील दद्दू ही भूमिका खूपच छान जमली होती. अमिताभच्या वडिलांच्या भूमिकेत प्राण ची कामगिरी प्रभावी होती. ‘शराबी’ नंतर मात्र प्रकाश मेहरा यांना भरघोस यश मिळाले नाही.

हेही वाचा – प्रकाश मेहराःसुपरहिट चित्रपटांचा बादशहा

प्रकाश मेहरा यांच्या संपूर्ण दिग्दर्शन कामगिरीचे अवलोकन केले तर त्यांनी आपल्या परीने चांगली कामगिरी केली होती व दिग्दर्शक म्हणून वेगवेगळे कथानक त्यांनी यशस्वीरित्या हाताळले होते, हे दिसून येते.

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment