-हर्षवर्धन दीक्षित;

स्केच सौजन्य- श्रीकांत धोंगडे 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

Tribute to Bharat Ratna Lata Mangeshkar

दिदी,

तुम्ही अनंताच्या प्रवासाला निघून गेलात. तुमच्या अखेरच्या यात्रेची तयारी पहात पहात, श्रोत्यांसाठी तुमच्या काही आठवणी ओंजळीत गोळा करत होतो. अचानक एका सहकाऱ्याने विचारलं, की तुम्ही दिदींना कधी भेटला होतात का? त्यावेळी पहिल्यांदा जाणवलं की आपण प्रत्यक्ष कधी भेटलोच नाही. पण मला त्याची कधीही उणीव भासली नाही. तुम्ही सतत अवतीभवतीच तर होतात, आजही आहात. तुम्ही गायलेली गाणी आजही माझ्याभोवती फेर धरून रुंजी घालत आहेत.

या निराकार रुपात तुम्ही आमच्या सोबत असलात तरीही तुमच्या सगुण रुपाचं दर्शन पुन्हा होणार नाही, याची जाणीव होऊन काळजात वेदना होते. तुमचा आवाज तर येतोय, वाद्यांचे आवाजही येतायत, पण तुमच्या दर्शनाशिवाय, या वाद्यांच्या गुंजारवातही एकटं झाल्यासारखं वाटतंय. तुमच्या गाण्यातल्या या ओळी एवढ्या खऱ्या ठरतील, असं वाटलं नव्हतं…

“तुम न जाने किस जहां में खो गये
हम भरी दुनिया में तनहा हो गये..”

सुखदु:खाचे अनेक क्षण तुमच्या सुरांनीच सहज केले. प्रत्येक वेळी तुमचा आश्वस्त स्वर आमच्या सोबत होता. तुमच्या आवाजाची मला जवळून ओळख झाली, तेव्हा तुम्ही सत्तरीत होतात. ज्ञानोबा तुकोबांसोबतच गुलजार आणि साहिरच्या रचनाही ऐकवत होतात. तुम्ही आहात, गात आहात.., हे अत्यंत आश्वासक होतं. तुमचा स्वर संजीवक होता. आणि अचानक तुम्ही निघून गेलात. अनंतात विलीन झालात. आजचा सूर्य उगवला…पक्षी येऊन दाणापाणी टिपून गेले…झाड वाऱ्यावर डोलत राहिली.. पण ते सगळे दिवसभर तुमच्या गाण्याच्या या ओळी गुणगुणत होते..

“कल भी सुरज निकलेगा.. कल भी पंछी गायेंगे
सब तुझको दिखायी देंगे.. पर हम ना नजर आयेंगे”

तुम्ही फार लांब निघून गेलात. दिसेनाशा झालात. तुमच्या नसण्याचं दु:ख करावं की तुमच्या युगात जन्माला आलो, तुमच्या गाण्यांच्या साथीनं वाढलो, जगलो… यात सुख शोधावं.. काही उमजत नाहीये. शरीर काम करतंय. पण ना मनावर.. ना डोळ्यांवर..दोन्हीवर ताबा राहिलेला नाही. उमाळे दाटून येतात. डोळे वाहू लागतात. तुम्ही म्हणाला होतात..

“मैं अगर बिछड़ भी जाऊँ, कभी मेरा ग़म न करना
मेरा प्यार याद करके, कभी आँख नम न करना”

दिदी, तुम्ही हे गाऊन गेलात, आम्हीही तुमच्यासोबत गुणगुणत होतो. पण प्रत्यक्षात असा संयम ठेवणं फार फार कठीण होतंय. तुम्ही प्रचंड मोठा ठेवा मागे सोडून गेलात. त्या अमूर्त ठेव्यासोबत तुमची प्रसन्न मूर्ती आम्हाला कायमस्वरूपी सोबत हवी होती. मर्त्य जगात असं होणं शक्य नाही, हे कळतंय. जो आला, तो जाणार, हे ही माहितीये. तुम्हीच तर गायला होतात ना…

“एक पल है हँसना एक पल है रोना
कैसा है जीवन का खेला
एक पल है मिलना एक पल बिछड़ना
दुनिया है दो दिन का मेला”

दोन दिवसांच्या या दुनियेच्या धबडग्यात असे नियम आमच्यासाठी असणं ठीक आहे हो. पण या नियमाला तुम्ही अपवाद ठराव्यात, अशी कोटी कोटी चाहत्यांची इच्छा होती. गेल्या काही वर्षात तुम्ही सार्वजनिक रित्या गाणं थांबवलं होतं. नवीन गाणं नसाल गायलं तुम्ही अशात.. पण तुमचं असणंही किती दिलासा देणारं होतं. तुम्ही एका गाण्यातन म्हटलं होतं की..

“है तेरी रौशनी में जो दम
तू अमावास को कर दे पूनम”

तुमच्या गाण्यात एवढं बळ होतं दिदी, की तुम्ही आमच्या अंधारल्या रात्रीच नव्हे तरं अख्खं आयुष्य उजळून टाकलंत हो. असे अनेक प्रसंग आले आयुष्यात.. माझ्याच नव्हे तर अनेकांच्या.. तेव्हा असं जाणवलं की आधाराचा हात सुटून एका अंधाऱ्या दरीत खोलवर भिरभिरत चाललोय.. तेव्हा तुमच्या सुरांनीच हात देऊन वर ओढून घेतलं. धीर दिला. पुन्हा उभं राहण्याचं बळ दिलं. तुम्ही तुमच्या रेशमी स्वरांच्या धाग्यात आम्हाला बांधून ठेवलेलंय. आणि आम्ही जरा कुठे भरकटलो की तुमचे हे रेशमाचे बंध आम्हाला ओढून घेत. अगदी हे असंच..

“इक डोर खींचे दुजा दौडा चला आये
कच्चे धागे में बंधा चला आये..”

आज हृदयातून प्राणस्वर हरवून गेलाय. हे हृदयही शरीरातून बाहेर पडू पाहतंय. पण तुमच्या रेशमी स्वरधाग्यांचा हृदयाभोवती पीळ पडलाय. त्यामुळे हे हृदय शरीरात तर आहे, पण ते जणू सजीव समाधी झालंय. आता त्यातून फक्त प्रतिध्वनी ऐकू येतोय… तुमचा प्रतिध्वनी.. असं होणार हे तुम्हीच सांगून गेलात…

“सुनाएगी ये दास्तां, शमा मेरे मज़ार की
ख़िज़ां में भी खिली रही ये कली अनार की”

तुमच्या गाण्यांनी या काळजावर तुमची प्रतिमा कोरून ठेवलीये. कितीही दूर गेलात ना, तरी आमच्या हृदयातली तुमची छबी कायम राहणार आहे. ती अमर्त्य आहे. चिरंजीव आहे. अहो पापण्या मिटायचा अवकाश.. की तुमचा प्रसन्न हसरा चेहरा नजरेसमोर येतो. म्हणून तर तुमच्याच गाण्यातल्या ओळींनी तुमचा हा भक्त तुम्हालाच आव्हान देतोय दिदी…

“निगाहों से छुपकर दिखाओ तो जानें
ख़यालों में भी तुम न आओ तो जानें
अजी लाख परदे में छुप जाइयेगा
नज़र आइयेगा नज़र आइयेगा”

तुम्ही इथेच आहात हो..आमच्यातच आहात. आधी फक्त प्रभुकुंजमध्ये होतात, मनामनाच्या गाभाऱ्यात होतात. पण आता हवेची प्रत्येक झुळुक, कोवळ्या उन्हाची तिरीप, मोगऱ्याचा दरवळ, बरसणारा घननीळ आणि उलगडणाऱ्या प्रत्येक पिसाऱ्यात तुम्ही असणार आहात. तुमच्या गाण्यातल्या या ओळी सुद्धा हेच सांगतायत..

“मुझे प्यार करने वाले
तू जहाँ है मैं वहाँ हूँ”

तुमच्यावर जीवापाड प्रेम केलंय. त्यामुळे तुम्ही इथे असणारच आहात. आमच्या भोवतीच आहात. पण आम्ही जेव्हा जेव्हा आवाज देऊ, तेव्हा याल ना ..गाण्याच्या रुपात.., सुरांच्या रुपात… मनात येऊन नुसतं गुणगुणलंत ना तरी पुरेय. तुम्ही तसं वचन दिलं होतं..

“ये माना हमें जाँ से जाना पड़ेगा…
पर ये समझ लो तुमने जब भी पुकारा हमको आना पड़ेगा
जो वादा किया वो निभाना पडेगा”

हे वचन पाळावंच लागेलच दिदी. या वचनातून सुटका नाही. ना तुमची ना आमची…

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

Harshvardhan Dixit
Harshvardhan Dixit
+ posts

हर्षवर्धन दीक्षित
संपादकीय सहायक
वृत्तविभाग, आकाशवाणी औरंगाबाद

गेल्या १७ वर्षांपासून आकाशवाणीसह पत्रकारितेत कार्यरत;
अनेक वृत्तपत्रातून विविध विषयांवर लेख/कविता प्रसिद्ध;
पाऊस कविता, शहिदांची पत्रे, आदी कार्यक्रमांचे गेल्या दशकभरापासून सादरीकरण.

Leave a comment