– पराग सुधीर चावरे, पुणे
————————
आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
Happy Birthday Lyricist Gulzar
‘तुमने इक मोड पर अचानक जब, ‘गुलजार’ कहे दी आवाज
इक सीपी से खुल गयी मोती, मुझको इक मानी मिल गया जैसे’
अगदी साध्या शब्दांत ‘गुलजार’ बोलू लागतो आणि त्याची कविता होते –
‘शाम से आँख मे नमीसी है, आज फिर आपकी कमीसी है ।’
म्हणणारा गुलजार थेट काळजाला हात घालतो. मनात जपलेल्या असंख्य आठवणी अशा ओळींनी पुन्हा जाग्या होतात. डोळ्यांसमोरून क्षणार्धात गेलेल्या दिवसांचे चित्र सर्रकन सरकून जाते. आयुष्यातल्या कित्येक प्रसंगांशी गुलजारने त्याच्या गाण्यातून आपले नाते घट्ट केलेले होतच ते अशावेळी अधिकच जाणवायला लागते.
‘गुलजार’ (Lyricist Gulzar) नावाची पहिली ओळख 60 च्या दशकातली बिमल रॉयच्या काबुली वालातली. ‘ऐ मेरे प्यारे वतन…’ ही मन्नाच्या आवाजातली जीवघेणी तान गुलजार नावाच्या एका असिस्टंट डायरेक्टरच्या लेखणीतून उतरली आहे हे कळालं तेव्हाच आम्ही मनोमन त्याला सलाम केला. ‘गंगा आए कहाँ से…’ हे गाणं लिहिणारा हा माणूस नक्की कोणीतरी मोठा होणार अशी खात्री होती. पुढे त्रेसष्ठला बिमलदांच्याच ‘बंदिनी’त त्याची दोन गाणी होती. ‘जोगी जबसे तू आया मेरे द्वारे’ व ‘मेरा गोरा अंग लैले’ एस. डी. च्या संगीतातल्या आणि लताच्या आवाजातल्या या गाण्यांनी ‘गुलजार’ला आमच्या अधिक जवळ आणलं. त्यानं मनात घर केलं.
सहासष्टचा ‘बीवी और मकान’ केवळ त्याच्या गाण्यांसाठी पाहिला, ‘नही ऐसे दातों में उँगली दबाओ नहीं’ व ‘दबे दबे लबों से कभी जो कई सलाम लेले’ ही हेमंतदांच्या आवाजातली आणि संगीतबद्ध केलेली गाणी पळत जाऊन कुणाला तरी दाखवावीशी वाटली होती. ‘दो दुनी चार’ खरं तर या गणिताचा लहानपणापासून कंटाळा होता; पण अडुसष्टच्या उन्हाळ्यात त्याच नावाचा चित्रपट लागला आणि गुलजारची गाणी म्हटल्यावर आम्ही पळत थिएटर गाठलं. हेमंतदांच्या संगीतातलं आणि किशोरच्या आवाजातलं ‘हवाओ पे लिख दो हवाओं के नाम’ने आम्हा सगळ्या मित्रांना वेड लावलं होतं. गुलजार हळूहळू उलगडत होता. त्यांच्याच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत होत्या. त्याची गाणी आहेत म्हणून आम्ही चित्रपट पाहत असू. एकोणसत्तरचा ‘राहगीर’ पाहता आला नाही; पण त्यातलं ‘पंछी रे उडे गगन’ हे मन्ना, हेमंतदा आणि सुलक्षणाच्या आवाजातलं गाणं पुसटसं आठवतंय.
सत्तरला कॉलेजात जायला लागल्यावर प्रेम, इश्क, मुहब्बत असल्या शब्दांशी ओळख झाली. एखादा सुंदर चेहरा पाहिल्यावर उरात उगाचच धडधड व्हायची. एक दिवस कॅन्टिनला बसल्या बसल्या राजेश, धर्मेंद्र आणि वहिदाचा ‘खामोशी’ लागल्याचं कुणीतरी सांगितलं आणि सांगितलेला चहा कॅन्सल करून आम्ही थिएटर गाठलं. ‘खामोशी’! चित्रपट संपेपर्यंत अनिमिष डोळ्यांनी पडद्याकडे पाहत होतो. कानात प्राण ओतून एक-एक शब्द साठवत होतो.
‘होठों पे लिए हुए, दिलकी बात हम, जागते रहेंगे और कितनी रात हम
मुख्तसर सी बात है, तुमसे प्यार है, तुम्हारा इन्तजार है।’
सगळी रात्र त्या गाण्यानं जागवलं, दुसऱ्या दिवशी परत ‘खामोशी’.
होस्टेलवर परतलो ते एक नशा घेऊनच ‘वो शाम कुछ अजीब थी’ गुलजारनं मनावर गारूड केले. ‘सिर्फ एहसास है रुह से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो’ इतक्या उंचीवर जाऊन प्रेमाचा विचार कधी केलाच नव्हता. गुलजारने प्रेम म्हणजे काय ते शिकवलं. इराण्याकडच्या ज्यूक बॉक्सवर ‘हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू’ वारंवार ऐकून लिहून घेतलं होतं. आम्ही तो कागद जपून ठेवलाय. थरथरल्या हातांनी त्यावरची पुसटशी अक्षर वाचताना मन थेट त्या काळात जातं. सदुसष्टाचा ‘आशीर्वाद’ भावला; पण तो त्यातील अभिनयामुळे. लताचे ‘एक था बचपन’ हे वसंत देसार्इंचे गाणे पुसटस आठवतय.
मध्ये दोन वर्षे गुलजार कुठेतरी हरवला होता. आम्ही गुलजार वेडे त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. अखेर एकाहत्तरला ‘गुड्डी’ आला. जयाचा अप्रतिम अभिनय आणि गुलजारची गाणी. पिक्चर तुफान चालला. ‘हमको मन की शक्ती देना’ आणि ‘बोले रे पपीहरा’ ही लता व वसंत देसार्इंची गाणी आजही तितकीच ताजी टवटवीत वाटतात. त्याच वर्षी गुलजारनं दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आला होता ‘मेरे अपने’. गीतकारही तोच. संगीतकार सलील चौधरी. आम्हा एकट्या जिवाच्या दु:खाला किशोरने आपल्या दर्दभऱ्या सुरात आणि गुलजारच्या मखमली शब्दांत मांडले होते. ‘कोई होता जिसे हम अपना, अपना कहलेते यारो’
गुलजार एवढा मित्र झाला होता. त्या काळात त्याच्या नावाचा ‘बाग’ असा अर्थ कळाला. रेकॉर्ड प्लेअर घ्यायची ऐपत नव्हती. गाण्यांचे वेड तर स्वस्थ बसू देत नव्हतं. पेरूगेट जवळच्या फ्रेंडस्मध्ये चकरा सुरू झाल्या. चार आणे एक गाणं, गाणं की चहा? असा चार आणे खिशात असल्यानंतरचा प्रश्न मला कधीच पडला नाही. गुलजारच्या गाण्यापुढं सारं जग तुच्छ होतं. त्यावर वर्षीचा गुलजारचा शेवटचा चित्रपट ‘सीमा’ त्यात रफीच्या आवाजात त्याचं एकच गाण होत, ‘जब भी यह दिल उदास होता है’ संगीत शंकर जयकिशनचे होते.
त्याच्याच पुढच्या वर्षी त्याने दिग्दर्शित केलेला आणि आर. डी. ने संगीत दिलेला त्याचा पहिला चित्रपट आला ‘परिचय.’ मूळ इंग्लिश कथेवरून घेतलेल्या या चित्रपटाचे गुलजारने अस्सल भारतीयकरण केले. आर. डी. ने ‘मुसाफिर हूँ यारों’, ‘बीती ना बिताये रैना’, ‘सारे के सारे’ अशी गाणी देऊन कान तृप्त केले. दिग्दर्शक म्हणून गुलजार नावारूपाला आला. आर. डी. आणि गुलजार म्हटलं की, एकेक सुंदर गाणं ऐकायला मिळणार असं समीकरण मनात सुरू झालं.
1972 ‘आनंद’ हृषीदा, गुलजार आणि राजेश खन्नानं बॉक्स ऑफिसवर कहर केला. दे मार चित्रपटाच्या गर्दीत या त्रिकुटाने लाखो लोकांना आपलसे केले. राजेश, अमिताभचा अवर्णनीय अभिनय, हृषीदांचे दिग्दर्शन आणि गुलजारचे संवाद या साऱ्यांनी ‘आनंद’ चिरस्मरणीय केला. लक्षात राहण्यासारखं ‘आनंद’मध्ये सर्व काही होतं. सलील चौधरीच्या संगीतातली मुकेशच्या आवाजातली ‘मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने’ आणि ‘कही दूर जब दिन ढल जाए’ मन्नाचे ‘जिंदगी कैसी है पहेली हाये’ चटकन ओठांवर येतात. ‘आनंद’साठी गुलजारला त्यावर्षीचं सर्वोत्कृष्ट संवादाचं फिल्मेअर ॲवॉर्ड मिळालं. ‘आनंद’ सर्व दृष्टीनं एक मास्टरपीस होता. ‘आनंद’पासून आम्हा गुलजार पंढरीच्या वारकऱ्यांमध्ये खूप भर पडली. मध्ये ‘दुसरी सीता’ आणि ‘शक’ हे त्याची गाणी असलेले चित्रपट येऊन गेले; पण फारसे लक्षात राहिले नाहीत.
पंच्याहत्तर साल संपूर्णपणे गुलजारचं. कनु रॉयच्या संगीतानं सजलेला ‘अनुभव’ आणि ‘माईलस्टोन’, ‘मौसम’ त्याच वर्षाचे. ‘अनुभव’मधलं ‘मुझे जान कहो मेरी जान’ आणि ‘मेरा दिल जो मेरा होता’ ही गाणी आम्ही कायम गुणगुणत असू. ‘कश्मीर की कली’ शर्मिला टागोर आमच्यापैकी अनेकांच्या दिलांची धडकन होती. तिच्या गालावरची गोड खळी पाहण्यासाठी केवळ आम्ही थिएटरवर रांगा लावत असू. शर्मिला अभिनेत्री म्हणून समोर आली ती गुलजारच्या ‘मौसम’ पासून. मदनमोहनच्या शेवटच्या एक-दोन चित्रपटांपैकी हा एक. गुलजारचं दिग्दर्शन, शर्मिला आणि मदन मोहननं वेड लावलं. ‘दिल ढुंढता है’, ‘रुके रुके से कदम’ आणि ‘छडी रे छडी’ कैसी गले में पडी’ने वेड लावले. ‘गालिब’चा मिसरा घेऊन गुलजारनं लिहिलेलं ‘दिल ढुंढता है’ हे भूपेन्द्रच्या आवाजातलं गाणी ‘तसव्वुरे जाँना’सारखे शब्द न कळणाऱ्यांनाही खूप भावतं.
‘मौसम’चा हँगओव्हर संपतो न संपतो तोच ‘खुशबू’ला आसला. आर. डी., किशोर आणि गुलजार. संगीत वेड्यांना पुन्हा एक पर्वणी. त्यातली किशोरची ‘ओ माँझी रे’ व ‘बेचारा दिल क्या करे’ कित्येक दिवस सायकलवर जाऊन फ्रेंडस्मध्ये ऐकत होतो. या सर्वांवरचा कळस म्हणजे त्या वर्षीचा ‘आँधी’, ‘नटराज’ला पाहिलेला फर्स्ट डे फर्स्ट शोचा पहिला आणि शेवटचा चित्रपट. ‘आनंद’नंतर लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार सबकुछ ‘गुलजार’चं नाव अजरामर करणारा हा चित्रपट. त्याच्या सुरांच्या ‘आँधी’त आम्ही कितीतरी दिवस वहात होतो. लता-किशोरच्या ‘इस मोड से जाते हो’, ‘तुम आ गये हो’ आणि ‘तेरे बिना जिन्दगी से कोई शिकवा तो नही’ने अनेक दिलांना घायाळ केले. गुलजारच्या लेखणीचे सामर्थ्य पुन्हा एकदा सिद्ध झाले. समीक्षकांचे सर्वोत्तम सिनेमाचे ॲवॉर्ड गुलजारला मिळाले.
पुन्हा दोन वर्षे गुलजार नावही ऐकायला मिळालं नाही. अखेर 77 च्या शेवटी त्यांचा ‘घर’ आला. आमचे पाय आपसूकच थिएटरकडे वळले. अगदी वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट लक्षात राहिला तो गुलजारच्या गाण्यांमुळेच. ‘आजकल पाँच जमीं पर नहीं पडते मेरे’ नवविवाहितेची नेमकी अवस्था गुलजारने टिपलीय. ‘आपकी आँखों मे कुछ’, ‘फिर वही रात है’ आणि ‘तेरे बीना जिया जाये ना’ ही आर. डी. गुलजारची मास्टरपिसेस आजही मनावर मोरपीस फिरवून जातात. त्याच वर्षीचा ‘खट्टा-मीठा’ विनोदप्रधान चित्रपट. तिथेही गुलजार ठळकपणे जाणवला. ‘थोडा है थोडे की जरूरत है’ पुन्हा किशोर-लता गुलजारसाठी एकत्र गायले. यावेळी मात्र संगीतकार ‘रोशन’ होता. हलक्या-फुलक्या ‘खट्टा-मीठा’सोबत गंभीर वळणाचा ‘किनारा’ही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. आर. डी. च्या सुरात भिजलेली भूपेंद्र-लताची ‘नाम गुम जाएगा’ व ‘इक ही ख्वाब कई बार देखा है मैने’ ही अविस्मरणीय गीते ठरली. त्याच वर्षीचा आणखी एक गुलजार हीट म्हणजे ‘पलको की छाँव में’ राजेश-हेमाचा हा चित्रपट. लक्ष्मीकांत-प्यारेलाल बरोबर गुलजारचा पहिला चित्रपट. त्यातली ‘डाकिया डाक लाया’ आणि ‘मेघा रे मेघा रे’ आजही टीव्हीवर वाजवतात.
अठ्ठ्याहत्तर सालही गुलजारचंच होतं. ‘घरोंदा’साठी जयदेवकडे त्याने दोन गाणी लिहिली. भूपेन्द्रच्या आवाजातली ती अवीट गोडीची गाणी म्हणजे ‘दो दिवाने शहर में’ व ‘इक अकेला इस शहर में’. ‘दो दिवाने’साठी त्याला त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट गीतकाराचं पारितोषिकही मिळालं. त्याच्या पुढच्या वर्षी गुलजार टॉपवर राहिला तो ‘गोलमाल’मुळे. उत्पल दत्त आणि अमोल पालेकरचा ‘हलका-फुलका’ विनोद, आर. डी. चं संगीत, गुलजारची गाणसी आणि किशोरचा आवाज या सगळ्यांनी तो चित्रपट गाजला. ‘गोलमाल’मधल्या ‘आनेवाला पल’ने त्याला सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकाराचं पारितोषिक मिळवून दिलं.
ऐंशीच्या ‘थोडीसी बेवफाई’ने हॅटट्रीक साधली. सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकाराची माळ गुलजारच्या गळ्यात पडत होती. यावेळी संगीतकार खय्याम होते. आवाज तोच ऐंशीच्या अनभिषिक्त सम्राट किशोरचा. गाणे होते ‘हजार राहे मुडके देखी’, ऐंशी साल आम्हा गुलजार वेड्यांची दिवाळी होती. ‘अंगूर’, ‘पूर्णिमा’, ‘देवता’, ‘खुबसुरत’ गुलजारचे तब्बल पाच चित्रपट त्यावर्षी आले. एकूण एक हिट. ‘देवता’तलं ‘चाँद चुराके लाया हूँ’, ‘पूर्णिमा’तलं ‘हमसफर मेरे हमसफर’, ‘खुबसुरत’मधलं ‘सुन सुन सुन दिदी तेरे लिए इक रिश्ता आया है’ अशी कितीतरी गाणी पटकन आठवतात.
सतत वेगळ्या विषयावर काहीतरी देत रहायचं हा नियम गुलजारनं पुढे चालू ठेवला तो 1981 च्या ‘मासूम’मधून. त्यातलं ‘लकडी पे काठी’ हे हिंदी चित्रपटातलं सर्वोत्कृष्ट बालगीतांपैकी एक म्हणून गणलं जातं. त्यातल्याचं अनुप घोशाल आणि लताच्या आवाजातल्या ‘तुझसे नाराज नहीं जिन्दगी’ने गुलजारला पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट गीतकाराचं पारितोषित मिळवून दिलं. मध्ये तीन-चार वर्षे एक ‘सदमा’ सोडला तर गुलजार फार चर्चेत नव्हता. तरीही ‘सदमा’तली इलायराजची ‘सुरमई आँखियों में’ हे गाणं खूप गाजलं. पुन्हा गुलजारची वाट पाहणे; पण खूप दिवसांनी आल्यानंतर तो काहीतरी सॉलिड घेऊन येतो हे ठाऊक होतं. म्हणून पेशन्स ठेवून होतो. अखेर 87 ला ‘इजाजत’ आला.
रेखा, नासिर आणि अनुराधा पटेल. ‘इजाजत’ही सबकुछ गुलजार होता. गुलजारच्या चित्रपटांमुळे आम्ही सारे एकत्र यायचो. ‘इजाजत’ने आम्हाला पुन्हा ‘खामोशी’चे दिवस आठवले. ‘मेरा कुछ सामान तुहारे पास पडा है’ ही गुलजारची मुक्त छंदातली कविता. आर. डी. कडे ती गेल्यावर तो प्रचंड संतापला. ‘गुलजार, तुला काय वेड लागलय. उद्या वर्तमानपत्रातला अग्रलेख घेऊन येशील आणि म्हणशील चाल लाव. मी काय तेच करू का?’ अखेर आशाने तो कागद उचलला आणि थोडेसे गुणगुणून पाहिलं. पंचमला तेवढसे पुरेसे होते. त्याने पुढची चाल लावली. ‘मेरा कुछ’बरोबर आशाची ‘कतरा कतरा’ आणि ‘खाली हाथ शाम आयी है’ ही गीतेदेखील तेवढीच अवीट गोडीची होती. त्यावर्षीची सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार एकाच गाण्याला मिळाला. गाणे अर्थातच ‘मेरा कुछ सामान’ एकाच गाण्याला तिन्ही पुरस्कार मिळण्याचा चित्रपट इतिहासातला पहिलाच प्रसंग होता.
एव्हाना पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. ‘बंदिनी’ ते ‘इजाजत’ आम्ही खूप बदललो होतो. आवर्जून पहावेत असे चित्रपट फार कमी येत होते. आमचीही पैसे वाचवून चित्रपट पहायची क्रेझ कमी झाली होती. गुलजारनं परत आम्हाला ‘लेकीन’मुळे थिएटरवर ओढून नेलं. हृदयनाथ, लता, गुलजार तीन उत्तुंग प्रतिमेची माणसं एकत्र आल्यावर काय होते ते या चित्रपटाने दाखवून दिले. ‘यारा सिली सिली बिरहा की रात का जलना’ने काळजाला घरे पडली. ‘केसरिया बालमा’ ऐकून नाराज झालेल्या आम्हा गुलजार भक्तांची छाती पुन्हा अभिमानाने भरून आली.
नव्वदनंतर गुलजार क्वचितच भेटू लागला. त्याच्या आठवणींनी अस्वस्थ झाल्यावर आम्ही उगाचच ‘दिल पडोसी है’ ऐकू लागलो. रावीपार, धुआँ, दस्तखतसारख्े कथासंग्रह वाचू लागायचो. ‘पुखराज’ वाचताना गुलजार जवळचा वाटायचा. ‘रुदाली’तले ‘दिल हुम हुम करे’ टीव्हीवर ऐकले. खूप बरे वाटले. घरातल्या टेपरेकॉर्डवर कायम गुलजार बोलू लागला. ‘मिर्झा गालिब’च्या कॅसेटवरची त्याची गालिबची ओळख. ‘वो जो शायर था’ ही भूपेन्द्र मितालीची कॅसेट ऐकताना मन भरून येते. अठ्ठ्याण्णवच्या गणपतीत आजूबाजूच्या पोरांबरोब ‘माचिस’मधल्या त्याच्या ‘चप्पा चप्पा चरखा’बरोबर थोडासा नाचलो देखील. ‘गुलजार’ नावाची नशा पुढच्या पिढीतही उतरत आहे, असे वाटायला लागलं.
पंच्याण्णवनंतर मात्र ‘गुलजार’ हरवला. ‘गोली मार भेजे में’, ‘सपनों में मिलती है’, ‘छई छप्पा छई’ अशी गाणी ऐकून हाच का तो ‘हाथ से छुकर रिश्तों का इल्जाम न दो’ म्हणणारा गुलजार असा प्रश्न पडला. मध्येच कुणीतरी ‘गोली मार भेजे में’ ऐकून ‘क्या सही गाने लिखता है बाप’ म्हटलेले ऐकलं त्यावेळी त्याला ओरडून सांगावसे वाटले. बेटा तू ‘तुम पुकारलो, कोई होता, हमने देखी है’सारखी गाणी ऐक म्हणजे गुलजार नावाची ताकद कळेल.
मध्ये ‘दिलसे’त ‘अजनबी’तून थोडासा गुलजार भेटला; पण तोही तो नव्हता. काळाने गुलजारला नमवलें. असे वाटायचे पण दुसरीकडे मुलीने नकार दिल्यावर तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकणारे, तिचा खून करणारे आजचे तरुण ‘प्यार इक खामोशी है सुनती है कहा करती है’ हे ऐकतील? असा प्रश्न पडतो. हे सर्व असूनही आमची गुलजार भक्ती तसूभरही कमी झाली नाही. प्रत्येक वेळेला भक्तांची इच्छा पूर्ण करावी असे परमेश्वरावर थोडेच बंधन असते. जगजीत व त्याची ‘मरासिम’ ऐकून थोडसे समाधान करून घेतो, तरीही त्याला ‘आज फिर आपकी कमी सी है’ असे ओरडून सांगावसे वाटतयं. ‘लाल सलाम’च्या निमित्ताने पुन्हा दीदी, हृदयनाथ आणि गुलजार एकत्र येताहेत असे ऐकले. आम्ही त्याच्याकडे डोळे लावून बसलोय. कदाचित हरवलेला ‘गुलजार’ इथे सापडेल! पुन्हा तरल, मखमली, गीतांचा दौर सुरू होईल नाहीतर परत आपली ‘इजाजत’ची रेकॉर्ड छातीला कवटाळून ते दिवस आठवत राहायचे, ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’!
हिंदी चित्रपट संगीतावर आधारित इतर दर्जेदार लेखांसाठी क्लिक करा