– अजिंक्य उजळंबकर
————————
आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
Gandhi Godse – Ek Yudh Movie Review
काल्पनिक कथानक थोडक्यात – देशाची फाळणी आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीत हिंदूंच्या झालेल्या हत्या यासाठी नथुराम गोडसे महात्मा गांधींना जबाबदार धरतो आणि ३० जानेवारी १९४८ रोजी तो गांधींवर गोळ्या चालवून त्यांच्या हत्येचा प्रयत्न करतो पण गांधी चमत्कारिकरित्या त्यातून वाचतात. त्यासाठी ते नथुरामला माफही करतात. माझी हत्या का करावी वाटली हे विचारण्यासाठी गांधी गोडसेची तुरुंगात जाऊन भेटही घेतात. काँग्रेसचे विसर्जन करा हा गांधींचा सल्ला ना ऐकल्याने गांधी काँग्रेसशी संबंध तोडल्यानंतर, आता बिहारमधील एका खेड्यात जाऊन ग्रामस्वराज चळवळ सुरू करतात. ग्रामस्वराज चळवळ राबवितांना गांधी देशातील धार्मिक, जातीय भेदभाव तसेच गावातील गरीब शेतकरी आणि कामगार वर्गाची सवर्णांकडून आणि व्यापारी वर्गाकडून होणारे शोषण, पिळवणूक थांबविण्यासाठी सरकार आणि असामाजिक तत्वांविरुद्ध उभे राहतात ज्यामुळे त्यांना अटक होते. याच असामाजिक तत्वांकडून गांधी यांच्या हत्येचा कट पुन्हा एकवार आखला जातो. अटक झाल्यानंतर गांधी यांच्या आग्रहामुळे त्यांना नथुराम सोबत त्याच जेलमध्ये ठेवण्यात येते . इथे नथुराम आणि गांधी यांच्यात अनेक वैचारिक संघर्ष, वादविवाद आणि युक्तिवाद होतात. ज्यात दोन्ही बाजूने अनेक प्रश्नांची उत्तरे समोर येतात आणि काही प्रश्ने अखेरपर्यंत अनुत्तरितच राहतात.
काय विशेष?- गांधीवाद आणि गोडसेवाद हा गेल्या ७५ वर्षांपासून चालत आलेला वैचारिक संघर्ष हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्याचा असा प्रयत्न यापूर्वी झालेला नाही. हा प्रयत्न केल्याबद्दल सर्वप्रथम दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचे अभिनंदन. गांधींच्या भूमिकेत दीपक अंतानी आणि गोडसेच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर यांनी आपापल्या भूमिका सुरेख साकारल्या आहेत. या सिनेमाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणारी दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची कन्या तनिषा संतोषी चा अभिनय सुद्धा कौतुकास्पद आहे. कोण चूक, कोण बरोबर याचे उत्तर न देता अथवा कुठलीही एक बाजू न घेता, दोन्ही बाजू समान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी केला आहे. खरंतर एखाद्या नाटकाला साजेसा असा हा विषय आणि त्याची मांडणी आहे.
नावीन्य काय?- गांधी योग्य होते की गोडसे या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यामागे असलेली वैचारिक भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करणारा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे. छायांकन आणि पार्श्वसंगीत प्रभावी आहे. १९४७ सालच्या आसपासचा माहोल कला दिग्दर्शकाने चांगला साकारला आहे.
कुठे कमी पडतो? – पटकथेत संवादांवर जास्त भर आहे आणि नाट्यमय दृश्यांची रेलचेल अजिबातच नाही. त्यामुळे अखेरपर्यंत केवळ दोन्ही बाजूने युक्तिवादच समोर येतात. मध्यंतरापर्यंत फारसे विशेष असे काही घडत नाही. मध्यंतरानंतरही प्रेक्षकांची करमणूक करेल अशा दृश्यांची संख्या नगण्य आहे. आहे ते केवळ वैचारिक युद्ध. कथानक काल्पनिक आहे हे चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगण्यात येते अशावेळी खरंतर पटकथा लिहितांना ते कसे जास्तीच जास्त नाट्यमय आणि प्रभावी होईल यासाठी लेखकाला स्वातंत्र्य असूनही त्यात तो खूपच कमी पडला आहे. राजकुमार संतोषी सारख्या दिग्गज दिग्दर्शकाकडून यापेक्षा कितीतरी जास्त दर्जेदार चित्रपटाची अपेक्षा असते परंतु पदरी निराशा पडते. ए आर रहेमान सारखा संगीतकार हाताशी असूनही त्याचा काहीच वापर दिग्दर्शकाला करून घेता येऊ नये याचेही आश्चर्य वाटते. श्रेया घोषाल हिच्या आवाजातील ‘वैष्णव जन तो’ हे भजन तेवढे छान जमले आहे.
पहावा का?- थिएटरमध्ये अजिबात नाही. ओटीटी अथवा टेलिव्हिजनच्या माध्यमातून समोर आल्यास अशा प्रकारच्या वैचारिक संघर्षात ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी एकदा बघण्यास हरकत नाही. केवळ त्यांनीच.
स्टार रेटींग – २ स्टार.
इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा
