– अजिंक्य उजळंबकर
मुव्ही रिव्युह- दिल बेचारा
———————————————————————————-
काही चित्रपट यश अपयश याच्या पलीकडचे असतात. असे चित्रपट किती लोकांनी पहिले अथवा बॉक्स ऑफिसवर त्यांनी किती व्यवसाय केला या गणितात त्यांन बसवायचे नसते. कारण अशा काही चित्रपटांशी रसिकांचे भावनिक नाते जुळलेले असते. बॉलिवूडमध्ये रसिकांचे आवडते कलाकार अकाली जग सोडून गेल्यावर त्यांची अखेरची कलाकृती त्यांच्या मृत्यू नंतर जेंव्हा प्रदर्शित होते तेंव्हा असे प्रसंग उद्भवतात. भूतकाळात मधुबाला, मीना कुमारी, स्मिता पाटील, संजीव कुमार ते अगदी ९० च्या दशकातील दिव्या भारती पर्यंत असे बरेच उदाहरणं आहेत. गेल्या महिन्यात ज्याच्या आत्महत्येने सारे रसिक हळहळले तो सुशांत सिंग राजपूत आता याच यादीत येऊन बसला आहे. त्याचा शेवटचा चित्रपट ठरलेला ‘दिल बेचारा’ काल डिस्ने-हॉटस्टार वर प्रदर्शित झाला. चित्रपटाचे ट्रेलर जेंव्हा आले तेंव्हा त्या ट्रेलरने यु-ट्यूब च्या जगताचे कमी वेळात जास्तीत जास्त प्रेक्षकांचे सारे विक्रम मोडीत काढले होते व आता काल जेंव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेंव्हा रात्री उशिरा ओव्हर लोड झाल्याने डिस्ने-हॉटस्टार ची वेबसाईटच क्रॅश झाल्याच्या बातम्या येत होत्या. याला म्हणतात रसिकांचे अपार प्रेम. असो.
दिल बेचारा हा सिनेमा दि फॉल्ट इन आवर स्टार्स या २०१२ सालच्या जॉन ग्रीन लिखीत साहित्यकृतीवर आधारित सिनेमा आहे. याच साहित्यावर अमेरिकेत २०१४ साली याच नावाने सिनेमा निघाला होता ज्याचे दिग्दर्शन केले होते जॉश बून यांनी. सिनेमा समीक्षक व प्रेक्षक दोघांनाही आवडला होता व बॉक्स ऑफिसवर त्याने बक्कळ कमाई सुद्धा केली होती. असे झाल्यावर आपले बॉलिवूड वाले इन्स्पायर न झाले तर नवलच! २०१७ साली नवोदित मुकेश छाबडा यांनी दिल बेचारा ची घोषणा केली. त्यावेळी कोणालाही असे वाटले नव्हते कि दुर्दैवाने हा सिनेमा सुशांतचा अखेरचा सिनेमा ठरेल. ‘किझी और मॅनी’ हे या चित्रपटाचे नाव फायनल झाले होते जे नंतर बदलून ‘दिल बेचारा’ करण्यात आले. विशेष म्हणजे मुकेश छाबडा दिग्दर्शनात येण्या आधी कास्टिंग डायरेक्टर होते, ज्यांना बऱ्याच नवोदितांना संधी देण्याचे श्रेय जाते, ज्यात स्वतः सुशांत सिंग राजपूत पण आहे ज्याचे कास्टिंग ‘काय पो छे’ साठी मुकेश यांनी फायनल केले होते.
सिनेमाच्या कथानकाबाबत थोडक्यात सांगायचे झाल्यास नायक नायिका दोघेही कँसर या आजाराने ग्रस्त आहेत. योगायोगाने त्यांची ओळख होते, मैत्री होते, नंतर दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम बसते. सुरुवातीला नायिकेचा कँसर शेवटच्या स्टेज ला असल्याने नैराश्यात असलेल्या नायिकेच्या आयुष्यात नायक प्रेमाचे सुखद क्षण आणतो, तिच्या आवडीच्या लोकांना भेटवण्यासाठी प्रयत्न करतो पण या दरम्यान अचानकपणे नायकाचा कँसर वाढतो व तो हे जग तिच्या आधीच सोडून जातो. दिल बेचारात नायक आहे मॅनी (सुशांत) तर नायिका आहे किझी (संजना संघी).
‘दि फॉल्ट इन आवर स्टार्स’ या कादंबरीतील हे कथानक अतिशय भावस्पर्शी आहे. प्रेमकथेला दुःखाची झालर आहे. सोबतच जीवन जगण्याचे तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न यात केला गेलाय. थोडक्यात एक अतिशय गंभीर व भावनाप्रधान विषय, तितक्याच जबाबदारीने हाताळणे इथे अपेक्षित आहे. माझ्या सुदैवाने कालच मी दि फॉल्ट इन आवर स्टार्स हा इंग्रजी सिनेमा ठरवून दिल बेचारा च्या आधी पहिला. त्याचे दिग्दर्शक जॉश बून यांनी ज्या गांभीर्याने हा विषय हाताळला आहे त्याच्या ५०% गांभीर्य सुद्धा मुकेश छाबडा दाखवू शकले नाहीत हे दुर्दैव आहे. चित्रपटाची लांबी नको इतकी कमी (१ तास ४० मिनिट) असल्याने नायक-नायिके मधले प्रेम खुलविण्यात, त्यांच्यात निर्माण होणारे घट्ट भावनिक नाते दाखविण्यात, कँसर सारख्या आजाराशी लढत असताना निर्माण झालेली भावनिक गुंतागुंत दाखविण्यास अजिबातच वेळ देण्यात आलेला नाही.
पटकथा कार (सुशांत खेतान, सुप्रोतिम सेनगुप्ता) यांनी व दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी मूळ इंग्रजी सिनेमातील बरेचसे प्रसंग, संवाद अगदी जसेच्या तस्से घेतले आहेत पण तरीही ते पाहताना त्या सिनेमा प्रमाणे इथे ते कुठेच हृदयस्पर्शी न होता उलट घाईघाईने उरकल्या सारखे ड्राय वाटतात. हा दिल बेचारा चा मोठ्ठा मायनस पॉईंट आहे. या कारणाने पाहणारा प्रेक्षक कुठेच कथेशी एकरूप ना होता सुरुवातीपासूनच डिटॅच होऊन जातो. ए.आर. रहेमान सारख्या संगीतकाराने दिल बेचाराला खरेच संगीत दिले आहे का एवढी शंका यावी म्हणजे अतीच झाले नाही? गाणे तर सोडा, एखादी ट्यून तरी लक्षात रहावी?!! सुश्राव्य संगीत हे बॉलिवूडच्या प्रेमकथांची सपोर्ट सिस्टीम असते. पण इथे तर तीही नाही. सुशांत साठी म्हणून प्रेक्षक शेवटपर्यंत स्क्रीन समोर बसतो इतकेच. कथानकात इतके कच्चे दुवे आहेत पण सुशांतचा अखेरचा चित्रपट म्हणून त्याबाबत इथे बोलायलाही नको वाटते.
अभिनयाच्या बाबतीत सुशांत व संजना दोघेही ओके. ओके यासाठी कि सुशांत यापेक्षाही अवघड भूमिका सहजतेने साकारू शकतो पण इथे नवोदित दिग्दर्शक असल्याने सुशांत चे फुल्ल पोटेन्शिअल वापरण्यात आलेले नाही. पहिल्या चित्रपटाच्या मानाने संजनाने छान काम केले आहे.
मुकेश छाबडा या नवोदित दिग्दर्शकाच्या हातात गेल्याने माझ्यासहित सुशांतच्या करोडो फॅन्स साठी त्याचा शेवटचा सिनेमा त्याच्या जाण्याइतकाच निराशाजनक ठरला हेही तितकेच दुर्दैवी.
वुई विल मिस यु डिअर सुशांत. लव्ह यु. सेरी. सेरी.