स्मृतिदिन विशेष-मराठी लोकसंगीताचे अनभिषिक्त सम्राट..राम कदम

-मधू पोतदार

 

रामचंद्र वासुदेव कदम हे राम कदम यांचे पूर्ण नाव. त्यांचे मूळ गाव मिरज होते. बालपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. मिरजेत त्यांच्या वडिलांची खानावळ होती. राम यांनी मिरजच्या महाराष्ट्र विद्यालयात तिसरीपर्यंत शिक्षण घेतले. लहानपणीच ते मिरजच्या अपान्ना गंगावणे यांच्या मेळ्यात बुलबुल तरंग वाजवत व गाणीही म्हणत. हाच मेळा पुढे करमरकरांचा मेळा म्हणून प्रसिद्धीला आला. छोट्या वयातच राम यांना या मेळ्यात खूप संधी मिळाल्यामुळे लहानवयातच बक्षिसाबरोबर त्यांचे कौतुकही खूप झाले. 

राम कदम यांना लहान वयातच संत गाडगेबाबांबरोबर राहायला मिळाले. त्यांच्या भजनात राम कदम बुलबुल तरंगाची साथ करीत. त्यांच्या वडिलांचे हॉटेल फारसे चालत नसे. गरिबीमुळे राम कदम यांनी मिरजेच्या जनरल ब्रास बँड मध्ये नौकरी केली. सुरुवातीला हरकाम्या म्हणून ते कार्यक्रमा मधील वाद्ये पुसत. तिथे त्यांनी एकदा क्लॅरियोनेट वाजवून पाहिले. म्हणून वादकांनी त्यांच्या थोबाडीत मारली. त्या तिरमिरीत ‘मी स्वतःचे क्लॅरियोनेट घेऊनच परत येईल’ अशी प्रतिज्ञा करून ते घराबाहेर पडले. दुसऱ्या गावी जाऊन स्वतःच्या कमाईतून क्लॅरियोनेट घेऊनच मिरजेला परतले.  मिरजेचे बँड मास्तर चांद लाल यांनी राम कदम यांना क्लॅरियोनेट वादनामध्ये तयार केले. मधल्या काळात त्यांना खांसाहेब अब्दुल करीम खान यांच्याकडे गाणे शिकण्याची संधी मिळाली. 

पुढे चांद लाल यांनीच कदम यांना पुण्याच्या प्रभात मध्ये काम करण्यासाठी पाठवले. प्रभात मध्ये मिरजेचे ई. मोहम्मद हे छायाचित्रकार म्हणून उमेदवारी करत होते. त्यांनीच रामची प्रभातमध्ये वर्णी लावली. कदम सुरुवातीला गड्याचे काम करीत, पण आवडक म्हणून त्यांची लवकरच बढती झाली. प्रभात मध्ये केशवराव भोळे व माननीय कृष्णराव अशा दिग्गज संगीतकारांच्या हाताखाली त्यांना शिकायला मिळाले. शिवाय नवयुग व शालिमार स्टुडिओत ते क्लॅरियोनेट वाजवायला जात. तिथे अनेक संगीतकारांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला. त्यातून त्यांच्या मधला संगीतकार तयार होत गेला. सुधीर फडके व वसंत पवार यांचे सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले. 

kela ishara jata jata movie poster

१९५१ साली गावगुंड या चित्रपटापासून  कदम यांची कारकीर्द सुरु झाली. १९६५ पर्यंत म्हणजेच सुमारे २५ चित्रपट होईपर्यंत त्यांना सूर सापडत नव्हता. ‘केला इशारा जाता जाता’ या चित्रपटापासून मात्र त्यांची घोडदौड सुरु झाली. याच सुमारास संगीतकार व लावणी सम्राट वसंत पवार यांचे निधन झाले. मग लावणीचे शिवधनुष्य या रामने यशस्वीरीत्या पेलले. 

लावणी व्यतिरिक्त लोकसंगीतातील झगडा, भूपाळी, विराणी, गवळण, भारूड, पोतराज, वासुदेव, नागोबाची, हळदीची गाणी, धनगर गीते, कोळी गीते, मोटेवरची गाणी, गौरी हादगा-मंगळागौरीची स्त्री गीते असे सर्व प्रकार त्यांनी मराठी रसिकांना दिले. पिंजरा या शांताराम बापूंच्या चित्रपटामुळे कदम यांनी कर्तृत्वाचे यशाचे शिखर गाठले. ४५ वर्षांच्या सांगीतिक कारकिर्दीत ११३ मराठी, ३ हिंदी, १ तेलगू चित्रपट व २५ नाटके या साऱ्यातून दिलेल्या लोकसंगीतातून अस्सल मराठी मातीचे संगीत देतांना त्यांनी प्रभात मधील अभिजात संगीताचे संस्कार तर जल्पेच शिवाय मराठी लावणीचे लावण्याही खुलवले. 

sugandhi katta film poster

राम कदम हे मराठी लोकसंगीताचे अनभिषिक्त सम्राट होते. सूर सिंगारचे बृहस्पती अवॉर्ड व स्वामी हरिदास पुरस्कार याशिवाय एकटा जीव सदाशिव (१९७४), सुगंधी कट्टा (१९७६), पैज (१९८०) व साईबाबा (१९९५) या चित्रपटांना उत्कृष्ट संगीताचे राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. ‘संगीतकार राम कदम’ हे मधू पोतदार लिखित चरित्र प्रकशित झाले आहे. राम कदम यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या नावाने संगीतातील मान्यवर व्यक्तींना दरवर्षी २ पुरस्कार दिले जातात. 

 
(‘संगीतकार राम कदम’ या मधू पोतदार लिखित चरित्रातून व ‘विवेक शिल्पकार चरित्रकोश’ यातून साभार) 

Madhu Potdar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.