काही दिवसांपूर्वी श्रीहरी स्टुडिओ प्रस्तुत ‘हरीओम’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. ज्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता. मात्र त्यावेळी या पोस्टरमधील पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या दोन तरुणांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी या चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले. तेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पण त्यातही या चेहऱ्यांवर पडदा असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली. अखेर या कलाकारांवरील पडदा आता उठला असून या दोन्ही कलाकारांची नावे आता समोर आली आहेत. हरीओम घाडगे आणि गौरव कदम हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत. 

हरिओम घाडगे यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली असून, ते या सिनेमात मोठ्या भावाची म्हणजेच हरीची भूमिका साकारणार आहेत. तर ओमची भूमिका गौरव कदम साकारणार आहे. गौरव यांचा हा पहिलाच सिनेमा असला तरी त्यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना शरीरयष्टी घडवण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे.

हरिओम आणि गौरव यांचा हा पहिलाच सिनेमा असल्याने त्यांनी या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटात दोघे भावंडांची भूमिका साकारत असल्याने, त्यांच्यातील केमेस्ट्री खरी वाटावी, यासाठी शूटिंगच्या आधी काही महिने ते एकत्र राहिले. या दरम्यान त्यांनी तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या शिवकालीन मैदानी खेळाचे प्रशिक्षण घेतले. तसेच त्यांच्या डाएटवर, व्यायामावरही लक्ष केंद्रित केले इतकेच नाही तर दोघांनी एकत्र स्वयंपाकही केला. बराच काळ एकत्र व्यतीत केल्यामुळे त्यांच्यात भावनिक नाते तयार झाले आणि या नात्याचेच प्रतिबिंब प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Director Aashish Newalkar and Producer Hariom Ghadge
Director Aashish Newalkar and Producer Hariom Ghadge

या चित्रपटाचे निर्माता आणि अभिनेता हरिओम घाडगे त्यांच्या एकंदर अनुभवाबद्दल सांगतात, “मी या क्षेत्रात पूर्णपणे नवखा आहे. मुळात मी एक व्यावसायिक आहे. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि व्यायामाची प्रचंड आवड असल्याने आणि बंधू प्रेमाचे, मित्र प्रेमाचे महत्व या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने मी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्त्वांवर चालणारे नवीन युगाचे मावळे ‘हरीओम’मध्ये दाखवण्यात आले आहेत. माझा हा पहिलाच सिनेमा असल्याने मी सुरुवातीला खूप नर्व्हस होतो. अनेक जणांशी संपर्क केल्यावर मला हवी तशी स्क्रिप्ट मिळाली. मी बऱ्याच दिग्दर्शकांशी चर्चा केली. त्यानंतर मला माझे मित्र आशिष नेवाळकर यांनी एक फायनल स्क्रिप्ट बनवून दिली. ते या स्क्रिप्टमधे खूपच एकरूप झाले होते. ते पाहून मी त्यांना या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची ऑफर दिली आणि त्यांनी ती स्वीकारली. सोबतच त्यांनी मला आणि गौरवला अभिनयाचे अनेक बारकावे सांगितले, ज्याचा आम्हाला अभिनयासाठी फायदा झाला.”

या सिनेमातील ‘ओम’ ही भूमिका साकारणारे गौरव कदम आपल्या भूमिकेविषयी म्हणाले, “हा माझा पहिलाच चित्रपट आहे. त्यासाठी मी फिटनेसकडे खूप लक्ष दिले. जवळपास वर्षभर मी आणि हरिदादाने फिटनेसकडे लक्ष दिले. फिटनेस संदर्भातील अनेक गोष्टी मला आधीपासूनच माहित आहेत. कराटे, कमांडो ट्रेनिंग, किक बॉक्सिंग, जिमनॅस्टिक यांसारख्या अनेक प्रकारांमध्ये मी प्रशिक्षित असल्याने ही भूमिका साकारताना आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. शिवाय आशिष सरांनीही अभिनयाचे धडे दिल्याने ‘ओम’ची भूमिका साकारणे मला सोपे झाले.”

आशिष नेवाळकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी हा चित्रपट साधारण मेपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Website | + posts

Leave a comment