स्मृतिदिन विशेष-आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर

-पी. विनीता

निसर्गाने दुर्लक्षित राहिलेल्या माणदेशात माडगूळ या जुन्या औंध संस्थानातल्या छोट्याशा गावात महाकवि माडगुळकरांचे पूर्वज कुलकर्णी वतन संभाळत राहिले. दिगंबरपंत कुलकर्णींचे मोठे सुपुत्र गजाननरावांचे बालपण ओढग्रस्तीतच गेलै. पण वडिलांचे लाडाचे शब्द आणि आईच्या तोंडून निघणारी गाणी ऐकतच ग.दि.मा.वाढले. तसा साहित्याचा या घराशी फारसा संबंध नव्हता  पण परंपरेने आलेली गाणी आई म्हणायची. गावच्या देवळात होणारी भजने किर्तने यांचेही संस्कार न कळत होत असत. यातून झालेली श्रध्दा ग.दि.मा.नीं आयुष्यभर जपली. अगदी लहान असतानाच ग.दि.मा.नी आईसाठी अंबाबाई ची स्तुती लिहीली. ग.दि.मा. पुढच्या शिक्षणासाठी औंधला गेले. औंध च्या संस्थानी थाटात ग.दि.मा.चें शालेय शिक्षण सुरू झाले.

 

 हलाखीची परिस्थिती असल्याने न्हाव्याकडे केस कापायला जायचे कसे हा प्रश्न असायचा. एकदा मनात आले की पैसे नाहीत असे केस कापल्यावर सांगू. हा न्हावी तोतरा होता. न्हाव्याच्या दुकानात गेले. खुर्चीवर बसले. तेव्हढ्यात न्हाव्याने सांगितले पैसे आणले नसशील तर चालता हो. निमूटपणे ग.दि.मा.बाहेर पडले. त्या महिन्यात शाळेचे स्नेहसंमेलन होते आणि त्यात या गेंगाण्या न्हाव्याची ग.दि.मा.नीं केलेली नक्कल पाहुन समारंभाचे प्रमुख पाहुणे औंध चे राजे खुश हझाले. ग.दि.मा.नां दहा रुपये बक्षीस दिले. त्यांनी सल्ला दिला बाळ तो मोठा कलावंत होशील. गावचे नाव उज्वल करशील. तू टॉकीत (सिनेमात ) जा. हेडमास्तर काळे यांनी ग.दि.मा.ना पाठवले आचार्य अत्र्यांकडे. अत्र्यांनी ग.दि.मा.नां पाठवले कोल्हापूर ला मास्टर विनायकांकडे पाठवले. कोल्हापूर त्या वेळचे मराठी चित्रपट निर्मिती चे केंद्र होते. ग.दि.मा.ची महत्वाकांक्षा होती अभिनेता बनायची. एक्स्ट्रा नट म्हणून ते मास्टर विनायकांच्या कंपनीत आले. फक्त जेवणखाण मिळे. पगार नव्हताच. ब्रम्हचारी सिनेमात जवळ जवळ दहा वेगळ्या भुमिकेत ग.दि.मा. पहिल्यांदा पडद्यावर दिसले.

ga di madgulkar

इथेच सिनेमाचे तंत्र ग.दि.मा.शिकले. सुंदर अक्षर असल्याने ते वि.स.खांडेकरांचे लेखक बनले. पिराजीराव सरनाईक यांच्यासाठी त्यांनी पोवाडे लिहिले. एच.एम.व्ही.च्या रेकॉर्डिंग च्या वेळी कवी माधवराव पातकर यांची ओळख झाली. त्यांच्या घरीच त्यांची गाठ पडली सुधीर फडके शी. इथली त्यांची मैत्री माडगुळकर हयात असे पर्यंत टिकली. पातकरांच्या घराजवळच्या गाण्याच्या क्लासवर माडगुळकर येत. तिथेच त्यांना आपल्या भावी जिवनसाथी मंदा पाटणकर भेटल्या. ११ मे १९४१ ला ग.दि.मा.आणि मंदा पाटणकरांचा विवाह झाला. कोल्हापूरात मिस्त्रींच्या वाड्यात खालच्या मजल्यावर मंगेशकर कुटुंब रहात असे आणि वरच्या मजल्यावर नवपरिणीत माडगुळकर जोडपे रहात असे. इथेच शेजारी कलामहर्षी बाबूराव पेंटर रहायचे. त्यांनी ग.दि.मा.चे गुण हेरले आणि ग.दि.मा.नां मुंबईला व्ही.शांताराम यांच्याकडे नेले. रामजोशी नावाने ग.दि.मा.नी लिहिलेले नाटक शांतारामबापूंना आवडले आणि त्याच नाटकावर रामजोशी सिनेमा काढायचा त्यांनी निर्णय घेतला. रामजोशी ची पटकथा , सवाद आणि गीते ग.दि.मा.चीं होती. रामजोशी च्या तोडीच्या त्यांनी लिहिलेल्या लावण्या अतिशय लोकप्रिय झाल्या. शिवाय यात एक भुमिका पण त्यांनी केली. यानंतर राम गबाले निर्मित वंदेमातरम ची गाणी लिहायला सुधीर फडकेंनी त्यांना बोलावले. प्रमुख भुमिकेत होते. पु.ल.देशपांडे.वंदेमातरम ची गाणी खूप गाजली . सुधीर फडके यांच्या पाठोपाठ माडगुळकर पुण्याला स्थायिक झाले. निर्माते वामनराव कुलकर्णी यांच्या अनेक सिनेमांसाठी गीते आणि पटकथा माडगुळकर लिहू लागले. माडगुळकर आणि फडके ही जोडी अत्यंत लोकप्रिय झाली. देव पावला,बोलाविता धनी, मोठी माणसं, जोहार मायबाप जोहार हे त्या काळातले गाजलेले सिनेमे. याच काळात दिग्दर्शक राजा परांजपे , सुधीर फडके आणि ग.दि.मा.असे त्रिकूट जमले. पुढचं पाऊल, देवबाप्पा अश्या अप्रतिम सिनेमाच्या पटकथा आणि गाणी ग.दि.मा.नी लिहून दाखवून दिले की सिनेमा माध्यमावर त्यांची विलक्षण हुकुमत चालतात.  ग.दि.मा.पु ण्यात पंचवटी बंगल्यात रहायला गेले. इथेच इतिहास घडायचा होता.

ga di madgulkar

आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली. सिताकांत लाड हे रसिक , अभ्यासू केंद्र संचालक झाले. माडगुळकर आणि लाड यांची खास मैत्री होती. लाडांनी मांडलेल्या कल्पनेतून साकारले गीत रामायण.  झटपट संगीत करणारे म्हणून सुधीर फडकेंना निवडले. अतिशय अप्रतिम गाणी लिहीताना ग.दि.मा.वाल्मिकी रामायण उघडून संदर्भ पहात आणि एखादा प्रसंग आवडला की कुठेही खाडाखोड न करता एकटाकी आठ कडव्यांचे गीत लिहीत. काही गीते तर १२ कडव्यांची आहेत. पहिले गाणे रेकॉर्ड करायचे होते. मूळ गाणे हरवले. वादावादी झाली. संतप्त ग.दि.मा.नी परत गाणे लिहायला नकार दिला. शेवटी नाईलाजाने सिताकांत लाडांनी त्यांना एका खोलीत कोंडले आणि दुसरे गाणे लिहायला सागितले. दहा मिनीटातच दुसरे गीत लिहीले गेले ज्याने गीतरामायणाची सुरुवात झाली. वर्षभर दर आठवडे सादर होत असलेल्या या कार्यक्रमाने इतिहास घडवला.लोक कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी रेडियोला हार घालत. ग.दि.मा.आणि सुधीर फडके सांगत. गीत रामायण आम्ही केलेले नाही तर ते वरुनच आमच्याकडून करुन घेतले होते. परत करायला सांगितले तर आमच्या हातून होणार नाही. महाकवी वाल्मिकी ही पदवी ग.दि.मा.नां गीत रामायण नंतर मिळाली. यानंतर माडगुळकर परत सिनेमाकडे वळले. लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर सारख्या अनेक सिनेमातून सुधीर फडके आणि ग.दि.मा.रसिकांच्या मनावर राज्य करू लागले. लाखाची गोष्ट आर्थिक अडचणी मुळे बंद पडला होता. अश्या वेळी महाराष्ट्र बँंकेचे संचालक पटवर्धन या त्रिकुटाच्या मागे उभे राहिले. यांच्या बहुतेक सिनेमांना बँंकेने अर्थसहाय्य दिल्याने सुंदर सिनेमे तयार होऊ शकले. औध जवळच्या स्वतंत्र पुर गावात खुल्या तरूंगाचा प्रयोग स्वातंत्र्य पुर्व काळात झाला होता. त्या सत्य घटनेवर लिहीलेल्या पटकथेवर शांतारामबापूनीं दो आंखे बारा हाथ सिनेमा काढला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक बक्षिसे या सिनेमाने मिळवली. यानंतर शांतारामबापू नी काढलेल्या नवरंग, तुफान और दिया सिनेमाच्या कथा , पटकथा ग.दि.मा.च्याच होत्या. स्थैर्य आल्यावर ग.दि.मा.नीं गावी शेतात एक घर बांधले . त्याला गावकरी बामणाचा पत्रा म्हणायच. दरवर्षी जानेवारी महिन्यात ग.दि.मा.येथे मुक्कामाला येत. साहित्यिक लिखाण आणि कमीत कमी एका चित्रपटाची कथा, पटकथा लिहीत. सकाळी लवकर उठून अकरा वाजेपर्यंत लिखाण करीत. तो पर्यंत गावकरी अंगणात गपचुप बसलेले असत. लिखाण संपले की मग गावकरी आणि ग.दि.मा. मनमुराद गप्पा चालत. दुपारी जेवण मग छोटीसी डुलकी . संध्याकाळी गावात फेरफटका, सगळ्यांची विचारपूस असा दिनक्रम असे. इथेच जोगिया सारखा कविता संग्रह, तीळ आणि तांदूळ हे आत्मचरित्र, गीत गोपाल हे खंडकाव्य त्यांनी लिहीले. उत्तरायुष्यात अनेक मानसन्मान त्यांना लाभलेच आणि विधान परिषदेवर आमदारकी सुध्दा मिळाली.

ga di madgulkar with sulochana

ते शीघ्रकोपी होते. पण लगेच शांत होत. अतिशय साघ्या सोप्या शब्दांत मांडलेल्या त्यांच्या शेकडो रचना अजरामर झाल्या. लेखणीला तत्वज्ञानाची जोड,शीघ्र कवित्व हे त्यांचे वैशिष्ट्य. अनेकांची त्यांची मैत्री असेच पण पु.भा. भावेंबरोबर त्यांचे सूर नेहमीच जुळत. भावे त्यांना डेंगरू, वुल्फ ऑफ माडगूळ असे थट्टेत म्हणत. ते पण भावेंना फॉक्स म्हणत. एकदा दोघे सकाळी फिरायला गेले. रस्त्यावर चे दिवे बंद झाले. ग.दि.मा.म्हणले रत्नदिप विझले नगरात जागे व्हा यदुनाथ. एका सुरेख गीताचा असा जन्म. पाहू रे किती वाट मधले आधी लिहीलेले गीत सिच्युएशन ला बरोबर नाही असे डावजेकरांनी सांगितल्यावर संतप्त झालेल्या ग.दि.मांनी पाच मिनिटात आठ कडव्यांचे गाणे लिहिले सैनिक हो तुमच्यासाठी. छोटा जवान च्या वेळी एका गाण्यावरून वसंत देसाईं बरोबर वाद झाला. गाणी लिहून का युद्ध जिंकता येतात असे ओरडून बाहेर पडले. पुण्याला जायला निघाले . हळूहळू राग शांत झाला गाणे स्फुरले पोस्ट कार्डावर गाणे लिहिले आणि लोणावळा येथे उतरून पेटीत पत्र टाकले. वसंत देसाईंना पत्रात लिहीलेले गाणे होते. जिंकू किंवा मरु. अशा असंख्य आठवणी आहेत. फार कमी लोकांना माहित आहे की गुरूदत्त चा प्यासा ग.दि.मा.च्या चोरबाजार कथेवर आधारलेला होता. ग.दि.मांची तुलना हिंदीतल्या कविवर्य शैलेंद्र बरोबर करता येईल. शैलेंद्र पण साध्या सोप्या शब्दांत रचना करत. हिंदीतले जनकवी शैलेंद्र होते तर मराठीतले ग.दि.मा.शैलेंद्र नी सिनेमात आल्यावर साहित्याशी फारकत घेतली. ग.दि.मा.मात्र सिनेमात आल्यावर पण साहित्याची आराधना करतच होते. गीत रामायणासारखे महाकाव्य लिहून पण आपल्याला लोक गीतकार म्हणून ओळखतात याची खंत ग.दि.मा.नां आयुष्यभर वाटत राहिली.

योगायोग म्हणजे शैलेंद्र च्या पुण्यतिथी दिवशी म्हणजे १४ डिसेंबर ला ग.दि.मा.आपल्यातून गेले. आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगुळकर यांना आदरांजली. 

P. Vinita
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.