-©पी. विनिता

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering the Urdu Poet and the Lyricist Shakeel Badayuni. ‘नगरी नगरी द्वारे द्बारे…’ मदर इंडियातले हे गाणे ऐकले की आठवतात गीतकार शकील बदायुनी. (जन्म ३/८/१९१६). उत्तर प्रदेशातल्या बादौन गावात शकील यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांची महंमद जमाल अहमद काद्री यांची इच्छा होती आपल्या मुलाने खूप शिक्षण घेतले पाहिजे. या साठी अरेबिक, उर्दू ,पर्शियन आणि हिंदी भाषा यांची शिकवणी घरीच लावली. घरात कोणालाही शेरो शायरीची आवड नव्हती. पण त्यांचे लांबचे नातेवाईक झिया उर काद्री बदायुनी धार्मिक वृत्तीचे शायर होते. शकील मसुदी यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव पडला. यातूनच त्यांना कविता करायची गोडी लागली.

१९३६ मध्ये अलिगड मुस्लिम युनिवर्सिटीमध्ये प्रवेश घेतल्यावर आंतर काॅलेज आणि आंतर महाविद्यालयीन मुशायर्‍यांमध्ये त्यांनी सतत भाग घ्यायला सुरुवात केली. १९४० मध्ये त्यांच्याच धराजवळ रहाणार्‍या आणि दूरची नातेवाईक असलेल्या सलमा बरोबर त्यांचा निकाह झाला. बी.ए.पास झाल्यावर दिल्लीला ते पुरवठा अधिकारी  म्हणून काम करु लागले पण देशभरातल्या मुशायर्‍यांमध्ये सातत्याने भाग घेत राहिले. यामुळे शकील यांचे देशभर नाव झाले. त्या कालखंडातली शेरो शायरी समाजातल्या दुःखांवर, परिस्थितीवर आधारलेली असायची. मात्र शकील या पेक्षा वेगळी शायरी करत. त्यांची शायरी शृंगारीक आणि मनाला भिडणारी असे. शकील म्हणत, ‘मै शकील दिल का  हूं, तर्जूमान के मोहोब्बत का हूं, राझदान मुझे फक्र है, मेरी शायरी मेरी जिंदगी से जुदा नही’. अलिगड ला असताना हकिम अब्दुल वाहिद अश्क बिजनोरी यांच्याकडून ते उर्दू शायरी शिकले.

१९४४ ला सिनेमात गाणी लिहीण्यासाठी ते मुंबईत आले. निर्माते अब्दुल रशिद करदार यांना भेटले, तिथेच त्यांची ओळख संगीतकार नौशाद यांच्याशी झाली. तिथून सुरु झालेली या दोघांची मैत्री शकील यांच्या मृत्यु पर्यंत कायम राहिली. पहिल्याच भेटीत नौशादनी विचारले आपले कौशल्य मला दाखवाल का?? शकील नी लगेच ओळी लिहील्या.. ‘हम दर्द का अफसाना दुनिया को सुना देंगे हर दिल मे मोहोब्बत की आग लगा देंगे’. नौशाद नी लगेचच कारदार यांना सांगून शकील यांना दर्द सिनेमाची गाणी लिहायला सांगितले. दर्द ची गाणी खूप गाजली. यातले उमादेवी उर्फ टूनटुन ने गायलेले अफसाना लिख रही हूं आजही लोकप्रिय आहे. शकील हे असे भाग्यवान की त्यांनी लिहिलेल्या पहिल्याच सिनेमाच्या गाण्याला खूप लोकप्रियता लाभली. दर्द (१९४७) सिनेमापासून सुरु झालेला त्यांचा गीतलेखनाचा प्रवास अनेक वर्षे सुरु राहिला.

नौशाद आणि शकील या जोडीने अनेक अजरामर अप्रतिम गाणी रसिकांना दिली. १९५१ चा दीदार, १९५२ चा बैजू वावरा, १९५७ चा मदर इंडिया आणि १९६० चा मुगले आझम यातली गाणी शकील यांच्या प्रभावी लेखणीची साक्ष देतात. या शिवाय नौशाद शकील जोडीने दुलारी (१९४९), शबाब (१९५४), गंगा जमना (१९६१) आणि मेरे मेहबूब या सिनेमात दिलेली गाणी रसिकांना लुभावून गेली. शकील यांनी जास्तीत जास्त वेळा नौशाद यांच्या बरोबर गीतलेखन केले तरीही रवि, हेमंतकुमार यांच्या साठी पण गीतलेखन केले. त्यांनी रवि यांच्यासाठी लिहीलेल्या हुस्नवाले तेरा जवाब नही या घराना सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांना व रवि यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. रवि आणि शकील जोडीचा आणखी एक उत्कृष्ट सिनेमा होता चौदवीका चांद (१९६०). चौदवीका चांद सिनेमातल्या शीर्षक गीतासाठी शकील ना १९६१ साली फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या नंतर गुरुदत्त यांनी साहिब बीबी और गुलामसाठी संगीतकार हेमंतकुमार आणि गीतकार शकील यांची निवड केली आणि अतिशय अप्रतिम गाणी या दोघांनी लिहीली.

आपल्या कारकीर्दीत शकील नी ८९ सिनेमासाठी गाणी लिहीली. या शिवाय अनेक लोकप्रिय गझला लिहिल्या ज्या बेगम अख्तर पंकज उजास आणि इतर अनेकांनी गायल्या. भारत सरकारने त्यांना गीतकार ए आझम सन्मानाने गौरवले. शकील यांची नौशाद, रवि आणि गुलाम महंमद यांच्याबरोबर मैत्री कायम राहिली. नौशाद व शकील सतत २४ वर्षे एकत्र राहीले. बैजू बावरा सिनेमाच्या वेळी दिग्दर्शक विजय भट्ट यांची इच्छा होती की सिनेमाची गाणी कवि प्रदिप यांच्याकडून लिहून घ्यावी. नौशाद नी त्यांना विनंती केली की शकील यांनी लिहीलेली गाणी एकदा वाचा. विजय भट्टनी गाणी वाचली आणि कवि प्रदिप यांना घेण्याचा हट्ट सोडला. बैजु बावरा ने इतिहास घडवला.

शकील एकदा क्षयरोगाने आजारी होते. या साठी त्यांना महाबळेश्वर च्या सॅनिटोरीयम ला ठेवले. नौशाद नी तीन सिनेमांची गाणी तिथे जाऊन लिहून घेतली आणि दहापट पैसे शकील ना दिले.

संगीतकार रवि यांच्याबरोबर शकील यांनी चौदवी का चांद (१९६०), घराना (१९६१), घूंघट, गृहस्थी, नर्तकी (१९६३) फूल और पत्थर आणि दो बदन (१९६६) या सिनेमांसाठी गाणी लिहीली.

हेमंतकुमारां बरोबर बीस साल बाद (१९६२), साहिब बीबी और गुलाम (१९६२) आणि बीन बादल बरसात सिनेमासाठी गाणी लिहीली.

बर्मनदां बरोबर कैसे कहु आणि बेनझीर सिनेमांसाठी, सी.रामचंद्र यांच्या बरोबर झिंदगी और मौत आणि वतन के लोग तसेच रोशन यांच्या बरोबर बेदाग आणि नूरजहां सिनेमांसाठी गाणी लिहीली ती पण खूप गाजली.

शकील यांना बॅडमिंग्टन खेळायचा, पतंग उडवण्याचा आणि शिकारीचा खूप नाद होता. दिलिपकुमार , लेखक वजाजत मिर्झा आणि जाॅनी वाॅकर यांच्या सोबत अनेकदा पतंग उडवताना त्यांना वांद्रे येथल्या समुद्र किनारी अनेकांनी पाहिले होते.

मधुमेहाने त्रस्त झालेले शकील यांचे २० एप्रिल १९७० ला मुंबईच्या बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांना दोन मुलगे आणि दोन मुली होत्या. ते गेल्यावर काही कालांतलाने त्यांची मुलगी नझमा चे निधन झाले. त्यांचा मोठा मुलगा जावेद आणि नातू झिसन ट्रॅवल आणि टूरिझम च्या धंद्यात आहेत. शकील यांचे मित्र अहमद झाकरी आणि फिरोज रंगूनवाला यांनी याद ए शकील नावाचा ट्रस्ट काढला आहे यातूनच त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळत असते. सुवर्णकाळातील या गीतकाराला मानाचा मुजरा. 

हिंदी चित्रपट संगीतावर आधारित इतर दर्जेदार लेखांसाठी क्लिक करा

P. Vinita
+ posts

Leave a comment