एकसाथ तीन वादळांसमोर न डगमगलेला … तुम बिन

– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

महिनाभर आधी प्रदर्शित झालेले ‘लगान’ आणि ‘गदर’ अजूनही थिएटर्स मध्ये प्रचंड गर्दी ओढत होते. त्यात भर म्हणून की काय १३ जुलै २००१ रोजीच बीग बी अमिताभ बच्चनचा ‘अक्स’ नावाचा सिनेमाही प्रदर्शित होणार होता. टी-सिरीज कंपनीचे मालक व निर्माता भूषण कुमार यांना भारतभरातील सर्व वितरकांनी समजावून सांगितले, “तुमच्या सिनेमात सर्व नवीन कलाकार आहेत व दिग्दर्शकही नवीन आहे. गाणी जरी चांगली असली तरी ‘लगान’ आणि ‘गदर’ ची जादू काही ओसरलेली नाही. त्यात आमच्यासमोर अमिताभचा ‘अक्स’ चा पर्याय असतांना, तुम्ही तुमच्या सिनेमाची तारीख पुढे का ढकलत नाही?” भूषण कुमार मात्र ठाम होते. म्हणाले ” नाही! मी माझा सिनेमा पुढे  ढकलणार नाही. मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे” परिणाम असा झाला की भूषण कुमार यांना कमी दर्जाच्या सिनेमागृहात समाधान मानावे लागले. २० वर्षांपूर्वी मल्टीप्लेक्स संस्कृती एवढी रुळली नव्हती त्यामुळे सिंगल स्क्रीन्स चे महत्व कायम होते. अखेर १३ जुलै २००१ रोजी म्हणजेच २० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सर्व नवख्या कलाकारांना घेऊन काढलेला ‘तुम बिन’ (2001 Hindi film Tum Bin) नावाचा सिनेमा अमिताभ च्या ‘अक्स’ समोर रिलीज झाला. (Evergreen Cult Classic Musical Hindi film of 2001 Tum Bin)

निखिल कामथ आणि विनय तिवारी या जोडीचा शोध गायिका अनुराधा पौडवाल यांनी लावला होता व त्यांना टी-सिरीज कॅसेट कंपनीत प्रवेश मिळवून दिला होता. ज्या ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’  गाण्याच्या लोकप्रियतेने  १९९५ साली इतिहास घडविला होता त्या ‘बेवफा सनम’ चित्रपटाचे संगीतकार म्हणजे निखिल-विनय. ‘बेवफा सनम’ नंतर ‘तुम बिन’ पर्यंत आणि ‘तुम बिन’ नंतर आजपर्यंत या जोडीने बऱ्याच चित्रपटांना संगीत दिले परंतु जी लोकप्रियता आणि जे यश या एका अल्बमला मिळाले त्याची पुनरावृत्ती या जोडीला कधीही करता आली नाही.

‘तुम बिन’चे दिग्दर्शन केले होते अनुभव सिन्हा यांनी जो त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न होता. त्यात सिनेमातील तीनही नायक म्हणजे प्रियांशु चॅटर्जी, राकेश बापट, हिमांशू मलिक आणि एक नायिका संदाली सिन्हा या सर्वांचाही हा पहिलाच सिनेमा होता. अपघातात मरण पावलेल्या आपल्या प्रियकराचा कॅनडा स्थित उद्योग व्यवसाय पुढे नेण्याचे स्वप्न असलेल्या नायिकेभोवती ‘तुम बिन’ची कथा गुंफण्यात आलेली होती. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला मदत करणारे कथेतील दोन नायक तिला पुन्हा एकवार प्रेमाची साद घालतात असा हा प्रेमाचा त्रिकोण होता.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी यातील गाण्यांनी तरुणाईला भुरळ घातली होती. परंतु समोर अमिताभचा अक्स उभा होता आणि लगान आणि गदर ची गर्दी पण काही कमी होत नव्हती. बंदा ये बिन्दास्त है व ये रात ही अक्स  मधील दोन गाणी प्रेक्षकांना आवडली होती परंतु सिनेमा मात्र काही प्रेक्षकांना आवडला नाही त्यामुळे पहिल्या तीन दिवसांच्या नंतर अक्स ची गर्दी ओसरू लागली होती. तुम बिन चे संवाद, नवोदित असूनही सर्व कलाकारांचा अभिनय, कथानक, दिग्दर्शन व आधीच लोकप्रिय झालेल्या गाण्यांमुळे मग हळूहळू तुम बिनने गर्दी खेचायला सुरुवात केली. 

“कोई फरियाद तेरे दिलमें दबी हो जैसे, तुने आँखों से कोई बात कही हो” जैसे या जगजीत सिंग यांनी गायलेल्या गजलने रसिक श्रोत्यांना भुरळ घालायला सुरुवात केली होती. सोबतीला अनुराधा पौडवाल व सोनू निगम यांचे ड्युएट “छोटी छोटी रातें लंबी हो जाती है, जाब किसीको किसीसे प्यार होता है”, सोनू निगम व शैलजा सुब्रमण्यम यांच्या आवाजातील “मेरे दुनिया में आके मत जा, मत जा, कहीं मत जा”, अनुराधा पौडवाल-अभिजीत यांच्या आवाजातील “देखते ही देखते दिल खो गया”, अभिजीत व चित्रा यांच्या आवाजातील “प्यार हमको होने लगा, खोना था दिल खो गया”, उदित नारायण व अनुराधा पौडवाल यांचे ड्युएट “तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे, के जब तक जियेंगे मोहब्बत करेंगे” व चित्रा यांच्या आवाजातील शीर्षक गीत तुम बिन जिया जाये कैसे, कैसे जिया जाये तुम बिन” अशा एकाहून एक कर्णमधुर गाण्यांची बरसात सिनेमामध्ये होती.

२० वर्षांपूर्वी जो प्रेक्षक त्याच्या अगदी ऐन तारुण्यात होता त्याच्या आयुष्यातील तुम बिन हा एक अविस्मरणीय अल्बम आहे. आजही. कथेतील कित्येक भावनाप्रधान दृश्य बघतांना व ही अवीट गोडी असलेली गाणी ऐकतांना तरुणाई सिनेमागृहात अक्षरशः आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची. गीतकार फैज अन्वर यांनी अतिशय सुंदर गीते लिहिली होती ज्याला निखिल-विनय जोडीने अतिशय मेहनतीने संगीतबद्ध केले होते. टी-सिरीजचे भूषण कुमार यांना या मेहनतीवर विश्वास होता व त्यामुळेच कोणी काहीही सांगितले तरी त्यांनी सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलले नाही. त्यांचा विश्वास खरा ठरला व तुम बिन ने बॉक्स ऑफिसवर १२ कोटींच्या वर कमाई चा रेकॉर्ड केला. टी-सिरीज कंपनीच्या कॅसेट आणि सीडी विक्रीच्या इतिहासात  ९० च्या आशिकी नंतर काही मोजक्या अल्बम्सनीच एवढे मोठे यश मिळवले होते. बॉक्स ऑफिस इंडिया या सिनेमाच्या व्यापाराची नोंद ठेवणाऱ्या नियतकालिकानुसार तुम बिन चे २० लाखांहून अधिक अल्बम्स विकले गेल्याची नोंद आहे. 

सिनेमातील सर्वच प्रमुख कलाकारांना सिनेमाच्या या व्यवसायिक यशाचा मात्र त्यांच्या पुढील करिअरमध्ये काही उपयोग झाला नाही. दिग्दर्शक अनुभव सिन्हा मात्र आज बॉलिवूडमधील प्रथितयश दिग्दर्शकांपैकी एक गणले जातात. त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या परंतु बॉक्स ऑफिसवर साफ कोसळलेल्या अक्स ने पण बॉलीवूडला नवीन दिग्दर्शक दिला ज्याचे नाव आहे राकेश ओमप्रकाश मेहरा. रंग दे बसंती, भाग मिल्खा भाग सारखे सिनेमे ज्यांच्या नावावर जमा आहेत. 

 

आज तुम बिन हा हिंदी सिनेमाच्या एव्हरग्रीन कल्ट क्लासिक सिनेमामध्ये गणला जातो ज्याने अमिताभ बच्चन (अक्स), आमिर खान (लगान) व सनी देओल (गदर) सारख्या वादळांशी दोन हात .. नव्हे तीन हात केले होते…सुमधुर संगीताच्या जोरावर. 

 हेही वाचा –ऋशिदांचा ’बावर्ची’ पन्नाशीत पोचला!

Ajinkya Ujlambkar
+ posts

1 Comment

  • Saurabh Sadawarte
    On July 13, 2021 9:24 pm 0Likes

    Best Ajinkya ….Good to read your articles always

Leave a comment