-© विवेक पुणतांबेकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘मेरी याद मे तुम ना आंसू बहाना…’ तलतच्या मखमली आवाजातले हे गाणे लागले की सुरांचे जादूगार मदन मोहन (Music Director Madan Mohan) आठवतात. अवघे एक्कावन वर्षे आयुष्य लाभलेल्या या रसिल्या संगीतकाराने चाहत्यांच्या मनात अढळपद मिळवले आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा 

२५ जून १९२४ साली मदन मोहन यांचा जन्म बगदाद येथे झाला. त्यांचे वडिल रायबहादुर चुनिलाल १९२० च्या दशकात इराक च्या पोलीस विभागात अकाउंटंट जनरल म्हणून काम करत होते.घरात सुबत्ता होती. दोन वर्षाचे असल्यापासून मदन मोहनना गाण्याचे वेड लागले होते. पाहुणे आले की घरातल्या फोनोग्राफवर रेकाॅर्ड लावायला वडिल सांगायचे. पाहुण्यांना आश्चर्य वाटायचे की लहानगे मदन मोहन बरोबर हवी ती रेकाॅर्ड लावायचे. दुसर्‍या वाढदिवसाला मदन मोहन ना एक छोटा ढोल बक्षिस मिळाला. एके दिवशी इराकी पोलीसांचा बॅन्ड रस्त्याने चालला होता. मदन मोहन आपला ढोल घेऊन बॅन्ड पथकात सामील झाले. मदन मोहन दिसत नाहीत म्हणून घाबरलेल्या आई वडिलांनी शोध घ्यायला सुरुवात केली. दोन तासानंतर स्वारी सापडली पोलीस मुख्यालयात. त्या कालखंडात इराक ब्रिटीश राजवटीतून मुक्त होणार होता. साहजिकच रायबहादुर चुनिलाल ना दोन पर्याय दिले गेले. एक तर इराकी नागरिकत्व घ्या किंवा इराक सोडून जा. चुनिलाल रायबहादुरांनी इराक सोडायचा निर्णय घेतला आणि पंजाब च्या झेलम जिल्हातल्या चकवाल गावात परतले. ( हे गाव फाळणीनंतर पाकिस्तानात गेले ) मदन मोहन यांचे आजोबा योगराज प्रसिध्द हकीम होते. योग आश्रम नावाने त्यांचा बंगला होता. नोकरीच्या निमित्ताने रायबहादुर चकवाल सोडून बाहेर पडले. त्या वेळी मदन मोहन फक्त पाच वर्षाचे होते. मदन मोहन यांची आई कवयित्री होती तसेच संगीताची तिला फार आवड होती. संगीताचा वारसा मदन मोहन ना त्यांच्या आईकडून मिळाला. चुनिलाल रायबहादुर ना संगीताची आवड अजिबात नव्हती पण मदन मोहन चे आजोबा आणि काका संगीत जाणणारे होते. घरात दोघेही संगीतावर चर्चा करत. त्यांचेही संस्कार न कळत मदन मोहन वर झाले. वयाच्या सातव्या वर्षापासून मदन मोहन गायला लागले आणि सगळ्या गावात लोकप्रिय झाले. गावात पुढील शिक्षणाची सोय नव्हती या मुळे सारे कोहली कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. तो पर्यत रायबहादुर हिमांशु राॅय यांच्या बाॅम्बे टाॅकीज मध्ये नोकरीला लागले. मुंबईत आल्यावर एक छोटा रेडिओ मदन मोहन ना रायबहादुरांनी घेऊन दिला. त्यावर शास्रीय संगीत ऐकत मदन मोहन रागांचे ज्ञान मिळवू लागले.

कोहली कुटुंब मरिन ड्राईव्ह ला रहात होते. बाजूच्या चाटू मरिन बिल्डिंगमध्ये नर्गिस ची आई जद्दनबाई आणि तिचे कुटुंबीय रहात होते. शास्रीय संगीताच्या मैफिली तिच्याकडे सतत होत असत. या मैफिली रात्रभर चालायच्या आणि त्या ऐकायला मदन मोहन घरच्यांच्या नकळत जायचे आणि मध्यरात्री हळूच घरात परतायचे. शाळेत असताना मदन मोहन रेडिओवर लहान मुलांच्या कार्यक्रमात भाग घेत. एकदा एक गोरापान गब्दुल मुलगा पण त्यांच्याबरोबर सामिल झाला. हे होते लहानगे राज कपूर. इथेच दोघांची मैत्री जमली. याच कार्यक्रमात एक लहान मुलगी गायला आली. वातावरण पाहून इतकी घाबरली की तिला गाणे सुचेना. मदन मोहन नी तिला धीर दिल्यानंतर ती एकदम जोशात गायली. ही होती सुरैय्या.

सेंट मेरी हायस्कूल मधून सिनीयर केंब्रिज परिक्षा पास झाल्यावर मदन मोहन डेहराडून च्या मिलिटरी स्कूल मध्ये दाखल झाले. खडतर प्रशिक्षण घेऊन १९४३ साली कमिशन मिळवून सैन्यात गेले. सेकंड लेफ्टनंट म्हणून बंगलोर ला त्यांची नियुक्ती झाली. सेन्यात मदन मोहन चे मन अजिबात रमेना. मुंबईच्या सिनेविश्वाची त्यांना ओढ लागली होती. एकदा बंगलोर हून येताना ते पुण्यात उतरले. प्रभात स्टुडिओत जाऊन संगीतकार हुसनलाल भगतराम ना भेटले. त्यांना स्वप्ने दिसायला लागली आपण संगीतकार बनल्याची. प्रभात स्टुडिओच्या या भेटीने मदन मोहन यांचे आयुष्य बदलून गेले. दुसरे महायुध्द संपल्यावर मदन मोहन नी सैन्यदलाला रामराम ठोकला आणि लखनौ रेडिओ स्टेशनवर कार्यक्रम सहाय्यक बनले.

 

इथे अली अकबर खान, पंडित रामनारायण, विलायत खान, तलत मेहमूद, बेगम अख्तर, फैयाज खान, रोशन आरा बेगम या सारखे दिग्गज कलावंत नोकरी करत होते. या सगळ्यांचे संस्कार नकळत मदन मोहन वर झाले. यामुळेच कुठेही शास्रीय संगीत न शिकलेले मदन मोहन नंतर भविष्यात शास्रीय संगीतावर आधारित अनेक फिल्मी गाण्यांना संगीत देऊ शकले. नंतर दिल्ली आकाशवाणीवर बदली झाली पण इथे संगीतबध्द करण्यापेक्षा कारकुनी कामेच जास्त होती. त्यांचे मन रमेना. अभिनेति शेखर आणि राज मेहरा यांच्या दोस्तीतूनच मदन मोहन नी नोकरी सोडली आणि या तिघांनी मुंबईचा रस्ता पकडला.

तो पर्यंत चुनिलाल मुंबइच्या सिनेविश्वात स्थिरावले होते. त्यांना जेव्हा समजले मदन मोहन नी आकाशवाणी ची नोकरी सोडली आणि ते मुंबईला परत आले आहेत, तेव्हा चुनिलाल अतिशय संतप्त झाले. त्यांनी मदन मोहन ना आपल्या घराचे दरवाजे बंद केले. त्याच वेळी प्रितम बरोबर चुनिलाल नी दुसरे लग्न केले होते. पुढची तीन वर्षे मदन मोहन ना अतिशय खडतर गेली. वडिलांचा उपयोग न करता सिनेविश्वात शिरायचे होते. अनेकदा फूटपाथवर झोपायला लागायचे. सिनेमात अभिनेता होण्यासाठी मदन मोहन मुंबईत आले होते. त्यांना कुंदललाल सैगल सारखे गायक नट बनायचे होते. पण सतत अपयश येत होते. त्यांनी गायलेल्या काही गझलांच्या रेकाॅर्डस एच.एम.व्ही.ने काढल्या होत्या. फिल्मिस्तान च्या शहीद सिनेमात संगीतकार गुलाम हैदर यांनी लता बरोबर एक युगल गीत गायची संधी मदन मोहन ना दिली पण काही कारणाने ते गाणे सिनेमातून कापले गेले. इतकेच नाही तर याची रेकाॅर्ड पण निघाली नाही. लताच्या आवाजाने भारलेल्या मदन मोहन नी लताच्या आवाजाचा पुरेपूर उपयोग करायचा निश्चय केला.

आंखे, शाबिस्तान, धून आणि फिफ्टी फिफ्टी सिनेमात गाऊन पण गायक म्हणून मदन मोहन ना यश लाभले नाही. परदा, आंसू , मुनीमजी सिनेमात मदन मोहन नी अभिनय केला. फिल्मिस्तान मध्ये संगीतकार एस.डी. बर्मन बरोबर झालेल्या मैत्रीने मदन मोहन यांच्या आयुष्याला वेगळे वळण लावले. ‘दो भाई’ सिनेमात एस.डी. बर्मन चे सहाय्यक होते मदन मोहन.  निर्दोष सिनेमाच्या वेळी ते संगीतकार शाम सुंदर यांचे सहाय्यक होते. संगीतकार म्हणून मदन मोहन यांचा पहिला सिनेमा होता आंखे. ( याच आंखे सिनेमात दिग्दर्शक राज खोसला यांनी पण एक गाणे गायले होते.) दिग्दर्शक देवेंद्र गोयल यांचाही पहिला सिनेमा होता ‘आंखे’. सगळ्यात आधी मुकेश च्या आवाजात गाणे रेकाॅर्ड केल्यावर लता मंगेशकरांना गायला बोलवायचे मदन मोहन यांचे प्रयत्न निष्फळ झाले. कदाचित मदन मोहन चांगले संगीत दैऊ शकत नाहीत अरा लता दिदींचा गैरसमज झाला होता. पण नंतर ‘मदहोश’ सिनेमासाठी लता दिदी मदन मोहनकडे गायल्या. त्या इतक्या खुश झाल्या की ‘आंखे’ साठी गायला नकार दिल्याबद्दल मदन मोहन ची माफी त्यांनी मागितली. तेव्हापासून त्या मदन मोहन ना भाऊ मानायला लागल्या.

दरवर्षी मदन मोहन ना त्या आवर्जून राखी बांधत. ‘मदहोश’ च्या ट्रायल शो ला रायबहादुर चुनिलाल आवर्जून आले. सिनेमा संपल्यावर त्यांचे डोळे भरुन आले. तू संगीतकार बनल्याचा मला अभिमान वाटतो. माझी खात्री आहे भविष्यात तू उत्तमोत्तम संगीत देशील असा आशिर्वाद त्यांनी मदनमोहन ना दिला. बाप लेकांचे संबंध पुन्हा जुळून आले पण दोनच महिन्यात चुनिलाल रायबहादुर यांचे निधन झाले. त्यांचा आशिर्वाद खरा झाला. अखेर पर्यंत मदन मोहन सरस संगीत रचना देत राहिले.

१५ जानेवारी १९५३ ला शैला धिंग्रा बरोबर मदन मोहन यांचा विवाह झाला. मदन मोहन कुटुंब वत्सल होते. आपल्या कुटुंबासाठी ते फार धडपडत. अनेकदा सहलीला नेत. खेळाची अत्यंत आवड होती. उत्कृष्ट स्वयंपाक करत. संगीत रक्तात भिनलेले असल्याने कधीतरी मध्यरात्री उठून ते हार्मोनियमवर बोटे फिरवू लागत. अनेकदा गाडी चालवता चालवता त्यांना चाल सुचायची. कधी कधी जेवणाच्या टेबलावर तंद्री लागायची. त्यांच्या कित्येक संगीत रचनांच्या पहिल्या श्रोत्या बनायचे भाग्य त्यांच्या पत्नीला शैला ला लाभले होते. ‘मदहोश’ सिनेमात राजा मेहंदी अली खान आणि मदन मोहन एकत्र आले. या जोडीने कितीतरी अमर रचना रसिकांना दिल्या. तलत मेहमूद च्या सर्वोकृष्ट गाण्यांमधल्या मेरी याद मे तुम ना आंसु बहाना ची चाल फक्त पाच मिनीटात मदन मोहन नी तयार केली होती.

या नंतर आशियाना सिनेमातल्या मै पागल मेरा मनवा पागल गाण्याची चाल सुचायला एक महिना लागला. कारण या कालखंडात त्यांच्या धाकट्या भावाचे प्रकाश चे एका दुर्धटनेत निधन झाले होते. एका वेड्याने प्रकाश यांच्यावर गोळी झाडली आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला. प्रकाश उत्तम गायक आणि तबलापटू होते. लंडन ला जाऊन टेक्निकलर फोटोग्राफी शिकले होते. रामानंद सागर यांच्या मेहमान सिनेमाची फोटोग्राफी प्रकाश ने केली होती. या दुर्धटनेमुळे शैलाचा गर्भपात झाला. यातून सावरायला मदन मोहन ना एक महिना लागला. राज कपूर अभिनित आशियाना अपयशी झाला पण त्याचे संगीत गाजले. या नंतर निर्मोही, बागी, मस्ताना, रेल्वे प्लॅटफाॅर्म, फिफ्टी फिफ्टी, पाॅकेटमार, भाई भाई अशा सिनेमांना मदन मोहन यांचे दर्जेदार संगीत लाभले.

मदन मोहन ना सतार, व्हायोलिन, सारंगीवर ची सुरावट फार आवडायची. यमन, भैरव, झिंझोटी, दरबारी, नंद, आणि खमाज त्यांचे आवडते राग होते. वर्षातून फक्त तीन सिनेमांना ते संगीत देत. अनेक गीतकारां बरोबर काम केल्यावर त्यांचे सूर जुळले ते गीतकार राजेंद्रकृष्ण यांच्या बरोबर. त्यांची मैत्री अखेर पर्यंत टिकली. या जोडीने अनेक अविस्मरणीय रचना दिल्या. अमिया चक्रवर्ती यांच्या देख कबिरा रोया मधली मदन मोहन नी संगीतबध्द केलेली सर्व गाणी अविस्मरणीय होती. हळूहळू त्यांचे संगीत एका खास ढंगाने ओळखले जाऊ लागले. या नंतर आला Gateway of India . यात मदन मोहन नी अनोख्या ढंगाची गाणी दिली. १९५८ सालचा अदालत सिनेमा त्यांच्या संगीतातला माईलस्टोन समजला जातो. जाना था हम से दूर, यूं हसरतो के दाग, उन को ये शिकायत है, जा जा रे जा साजना, अश्या अप्रतिम गझला मदन मोहन नी दिल्या. अदालत नंतर ते गझल सम्राट म्हणून ओळखले गेले.

साठ च्या दशकाच्या सुरुवातीला सबंध चित्रपट संगीतावर शंकर जयकिशन आणि ओ.पी.नय्यर यांचा प्रभाव होता. अनेक निर्मात्यांना या संगीतकारांचे मानघन देणे परवडत नसे. ते बाकीच्या संगीतकारांवर या दोघांप्रमाणे संगीत देण्याचा दबाव टाकायचे. अशा दबावाखाली मदन मोहन ना पण बळी पडावे लागले. ओ.पी.स्टाईल संगीत नाइट क्लब, खजांची आणि खोटा पैसा या सिनेमांना दिल्यावर संजोग सिनेमापासून मदन मोहन आपल्या स्टाईलवर वळले. संजोग पासून त्यांचा वाद्यवृंद आणि संगीत संयोजन जास्त आकर्षक बनले. याचे उदाहरण म्हणजे अनपढ, मनमौजी, आप की परछाईंया आणि गझल सिनेमांचे संगीत. त्या काळी नायिका प्रधान सिनेमे तयार होत साहजिकच मदन मोहन नी स्री गायिकांकडून जास्त गाणी गाऊन घेतली. ६० नंतर सिनेमाचा ट्रेंड बदलला. तरी पण त्यांना नशिबाने असे सिनेमे मिळाले की त्यात स्री गायिकांची गाणी जास्त होती.

१९६४ सालचा हकीकत हा माईलस्टोन सिनेमा त्यांना मिळाला. यातली सगळी गाणी उत्तम होती. पण सगळ्यात अप्रतिम होते अब तुम्हारे हवाले वतन साथियो. चेतन आनंदनी यात अभिनय करायला मदन मोहन ना बोलावले. अनेक वर्षानी अभिनय आणि तो सुध्दा सेनाधिकारी माणसाचा या कल्पनेने ते भारावून गेले. पण श्रीनगर विमानतळावर झालेल्या जबरदस्त बर्फवृष्टीमुळे शूटिंग रद्द करावे लागले. १९६४ साली जहांआरा, पूजा के फूल, सुहागन आणि वह कौन थी हे मदन मोहन यांच्या अविस्मरणीय संगीताने गाजलेले सिनेमे रिलीज झाले. यानंतर रिश्ते नाते, दुल्हन एक रात की, मेरा साया आणि नौनिहाल सिनेमातून मदन मोहन आपल्याला सुरेख रचना देत राहिले. नौनिहाल चा शेवट पंडित नेहरुंच्या अंत्ययात्रेने होतो. त्या वेळी पार्श्वसंगीतातले रफि यांच्या आवाजातले मेरी आवाज सुनो ऐकताना इंदिरा गांधी यांना अश्रू अनावर झाले. १९७० साली त्यांनी संगीतबध्द केलेल्या दस्तक सिनेमाला सर्वोकृष्ट संगीताचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. हा त्यांना मिळालेला एकमेव सन्मान.

हीर रांझा, हसते जख्म, मौसम, लैला मजनू, हिंदुस्तान की कसम सिनेमे संगीतबध्द केल्यावर त्यांना सिनेविश्वातल्या हीन राजकारणाचा फटका बसला. मुंबईतले चार रेकाॅर्डिंग स्टुडिओ वर्षभर मुद्दाम अडकवून ठेवले जात. कारण इतर कोणाला रेकाॅर्डिंग करता येऊ नये. तसेच इतर संगीतकारांच्या रेकाॅर्डस बाजारात आल्यावर सगळा लाॅट विकत घेऊन समुद्रात फेकून देणे, रेडिओवर इतर संगीतकारांची गाणी लागणार नाहीत या साठी कारस्थाने करणे असे प्रकार सुरु झाले. यासाठी एका प्रथितयश संगीतकार जोडीचा फार मोठा वाटा होता. याचा जबरदस्त फटका मदन मोहन ना बसला. शिवाय सिनेमाचे ट्रेंड बदलले. यातून मदन मोहन नैराश्यात गेले. राज कपूर नी त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी बाॅबी चे संगीत त्यांना द्यायचा विचार केला. पण त्यावेळी ही दबाव आणून त्यांना हा सिनेमा मिळू दिला नाही. घरचे वातावरण फार बिघडले. यातून त्यांचे मद्यपान अतोनात वाढले. १४ जुलै १९७५ ला हे सुरांचे जादूगार आपल्यातून गेले. त्यांच्या अविस्मरणीय संगीताचा ठेवा मात्र रसिकांच्या मनात कायम राहील.

हेही वाचा – अगर मुझसे मोहब्बत है… मदन मोहन

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

1 Comment

  • Sunil madhekar
    On July 14, 2021 3:03 pm 0Likes

    Very nice collection with time & facts which will take us in that eraof music & situation,
    thank youso much sir

Leave a comment