-© नयना पिकळे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

काहीजण जन्माला आल्यावर एखादी आवडीची कला शिकतात …..त्यात प्राविण्य , यश , प्रसिद्धी मिळवतात तर काहीजण कला घेऊनच जन्माला येतात ….त्यांच्या चालण्या-बोलण्यात वागण्या-हसण्यात आणि रडण्यातही कलाच असते ….आणि अशी माणसंच असतात खरी जातिवंत कलाकार ….आभास कुमार गांगुली म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता किशोर कुमार (Singer Kishore Kumar) तसाच होता …. अवलिया ….. कलंदर …..पडद्यावरची त्यांची प्रतिमा कायमच मनमौजी मस्त कलंदरचीच होती…..(Remembering Kishore Kumar the Legendary Singer of Hindi Cinema)

उत्तम अभिनयाचं अंग, हजरजबाबीपणा, उमदं व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट आवाज ह्या सर्व गोष्टींबरोबरच एक उत्तम दिग्दर्शक, संगीतकार आणि गीतकार ह्या भूमिका देखील किशोरदांनी समर्थपणे पेलल्या ….१९७०-८५ ही जवळ जवळ १५ वर्ष किशोरदा संगीताचा अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरले. हा काळ तर असा होता की गायक म्हणून किशोर कुमारला पर्यायच नव्हता. त्या काळच्या प्रत्येक संगीतकार आणि नायका साठी किशोर कुमार गायला ….नव्हे फक्त किशोर किशोर आणि किशोरच गायला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही .

ह्या काळात एकूण ८ वेळा किशोरदा एकूण १९ गाण्यांसाठी नॉमिनेट झाले . त्यापैकी एकूण ८ वेळा सर्वोत्कृष्ट गायक म्हणून फिल्मफेयर पुरस्कार मिळवणारे किशोरदा हिंदी सिनेसृष्टीतील एकमेव गायक कलाकार आहेत. या काळात किशोरदांनी विनोदी, रोमॅन्टीक, दर्दभरी, धीर गंभीर, शास्त्रीय गाणी तर गायलीच पण,

भजन – आओ कान्हाई मेरे धाम ( मेरे जीवन साथी – १९७२ )

देशप्रेम – देखो वीर जवानो ( आक्रमण – १९७५ )

बालगीत – लूक चूप लूक छुप जाओ ना ( दो अनजाने – १९७६ )

अंगाईगीत – ओ री हवा धीरे से चल ( श्रीमान श्रीमती – १९८२ )

गझल – ऐसी हसीन चांदनी पहले कभी न थी ( दर्द – १९८१ )

डिस्को – डिस्को ८४ ( इन्क़लाब – १९८४ )

असे एकूण एक प्रकारचे गाणे त्यांनी गायले …..गाण्याचा कोणताही प्रकार म्हणून शिल्लक ठेवला नसेल ….संगीत क्षेत्राशी संबंधित एखादी गोष्ट किशोर कुमारने केलेली नाही असे नाही ….

किशोरदांनी फक्त हिंदीच नाही तर बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मलयालम, ओडिया आणि उर्दू भाषेत सुद्धा गाणी म्हटली आहेत ….किशोरदांचं एक अनरिलीज्ड गाणं काही वर्षांपूर्वीच २०१२ साली सुमारे १५.६ लाखांना दिल्ली येथे झालेल्या Osian’s Cinefan Auction मध्ये विकलं गेल .

हिन्दी सिनेसृष्टीत याॅडलींग सर्वप्रथम आणायचं श्रेय देखील किशोरदांनाच जातं ……असं म्हणतात की महाभारतात ज्या गोष्टीचा उल्लेख नाही ती गोष्ट अन्य कुठल्याही विश्वसाहित्यात नाही …..म्हणूनच ‘व्यासोच्छीष्टम् जगत् सर्वम्’ असे म्हटले जाते. किशोरदांना देखील त्या अर्थी हिन्दी संगीतसृष्टीतील व्यास म्हटले तर वावगे ठरू नये ….©

इतकं अष्टपैलू आॅलराऊंडर व्यक्तिमत्त्व असूनही किशोर कुमार सारख्या गायकाच्या बाबतीत अनेक गंमतीशीर गोष्टी झालेल्या आहेत …..त्याकाळी नट नट्यांना त्यांच्या भूमिकेनुसार गायक गायिकांचे आवाज दिले जायचे म्हणजे दिलीपकुमार साठी कधी रफीने, कधी तलतने तर कधी मुकेशने आवाज दिला आहे पण स्वतः गाणारे कलावंत मात्र सहसा आपल्याच आवाजात गायचे …. म्हणजे असं की सुरैय्याला कधी गीताच्या आवाजात किंवा नूरजहाँला कधी शमशादच्या आवाजात गाताना आपण ऐकलं नाहिये …

किशोरदांच्या बाबतीत मात्र इथेही जरा वेगळंच झालय …. स्वतः एक उत्कृष्ट गायक असूनही त्यांना अनेकांनी रफी, मन्नाडे, हेमंत दा, यांच्या आवाजात गायला लावलेलं आहे ……“रागिनी” चित्रपटात ” मन मोरा बावरा ” या गाण्यासाठी आपल्याला शास्त्रीय जाण असलेला गायक हवा आहे असं कारण देऊन ओ पी नय्यरनी किशोरदांना रफीच्या आवाजात गायला लावलंय.

किशोरदांनी रफीच्या आवाजात कमीत कमी ६ तरी गाणी गायली आहेत. रफींनी किशोरदांसाठी गायलेलं “शरारत” चित्रपटातलं “अजब है दास्ताँ तेरी ऐ जिंदगी” … हे सर्वाधिक लोकप्रिय गाणं. “भागम भाग” या सिनेमात किशोरदा आणि भगवान वर चित्रित झालेल्या एका गाण्यात तर एक वेगळीच धमाल आहे ….

“आँखों को मिला यार से

जीने का मजा ले “

या गीतात किशोरदा आणि भगवान दादा आहेत. त्यामुळे गायकही दोन आहेत. पण आपल्याला किशोरदा कधी रफी तर कधी एस डी बातीश यांच्या आवाजात गायलेले दिसतात ….. अर्थात ही चित्रीकरणावेळची चूक आहे. पण ह्या चुकीमुळे एक आगळं वेगळं गीत आपल्याला मिळालं.

“करोडपती” मध्ये “आप हुए मेरे बालम” ह्या गाण्यात किशोरदांसाठी मन्नाडेंचा आवाज घेतलेला आहे.

हेमंतदांनी सुद्धा “दुष्टु प्रोजापती” या बंगाली चित्रपटात किशोरदां साठी आपला आवाज दिला आहे.

आहे की नाही हे मजेशीर ? पण खरी गंमत तर पुढेच आहे….

विनोदाचं अप्रतिम अंग असल्यामुळे अनेक विनोदी भूमिका किशोरदांच्या वाट्याला आल्या आणि सर्वात गमतीशीर गोष्ट म्हणजे अशाच एका सिनेमात आशा भोसलेने पण किशोरदांना आपला आवाज दिला आहे “बाप रे बाप” मधले हे विनोदी गीत तर अगदीच कहर आहे ….

“जाने भी दे छोड ये बहाना ,

तेरे लिये जिया है दिवाना

ऋत है जवा प्यार कर ले ,

यही तो है प्यार का जमाना “

या उलट दुसरा किस्सा म्हणजे संगीतकार सलील चौधरीनी हाफ तिकीट (१९६२) मध्ये किशोरदां कडून एक भन्नाट गाणं गाऊन घेतलं आहे.

“आके सिधी लगी दिल पे”

ह्या गाण्यात पडद्यावर प्राण आणि किशोरदा आहेत. गाणं लता मंगेशकर आणि किशोरदांच्या आवाजात रेकोर्ड होणारं होत पण ऐनवेळी लतादीदींना शक्य झालं नाही आणि किशोरदांनीच स्त्री पुरुष अशा दोन्ही आवाजात गाणं गाऊन ते अजरामर केलं .

तर अशा ह्या कलंदर माणसाचं सगळंच जगावेगळं होतं हेच खरं ….

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

Leave a comment

Instagram

This error message is only visible to WordPress admins

Error: No connected account.

Please go to the Instagram Feed settings page to connect an account.

Facebook

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2021. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2021. All rights reserved.