ऋशिदांचा ’बावर्ची’ पन्नाशीत पोचला!

-धनंजय कुलकर्णी

सत्तरच्या दशकात ऋशिकेश मुखर्जी (Director Hrishikesh Mukherjee), बासु चटर्जी यांनी आघाडीच्या कलावंताना घेवून कमी बजेट मध्ये आशयघन सिनेमे दिले. मानवी नातेसंबंध, मध्यमवर्गीय़ांना मूल्य जोपासण्याकरीता करावी लागणारी धडपड, नागरीकरणाचा कुटुंबव्यस्थेवर येणारा ताण, परंपरा व आधुनिकता यांचा सनातन संघर्ष या सर्व अवघड प्रश्नांना अगदी सहज सुलभ भाषेतून त्यांनी आपल्या कलाकृतीतून उत्तरे दिली. सिनेमाचे कथा मूल्य सशक्त हवे यावर ऋशिदांचा जोर असायचा. १९७२ साली त्यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला होता ’बावर्ची’ (Bawarchi 1972 Film). ७ जुलै १९७२ ला प्रदर्शित झालेला हा सिनेमा आज पन्नाशीत प्रवेश करतो आहे. त्या निमित्ताने  या चित्रपटाच्या काही आठवणी! (Revisiting the Evergreen Hindi Film Bawarchi entering in its 50th year of release)

या सिनेमातून ऋषिकेश मुखर्जी यांनी एकत्र कुटुंबपध्दतीतील नात्यानात्यातील सुप्त संघर्ष दाखविताना , त्याची कारणे किती लहान आहेत आणि सामोपचाराने जर प्रश्नाची हाताळनी केली की कसे चुटकी सारखे प्रश्न सुटले जातात हे त्यांच्या खास शैलीत दाखवून दिले. त्यांचे कौतुक या करीता देखील करायला हवे की राजेश खन्ना त्या वेळी सुपरस्टार होता , जया भादुरी आघाडीची नायिका होती असे असताना देखील त्यांनी या दोघांना अतिशय अनग्लॅमरस अशा भूमिका देवून सिनेमा हिट करून दाखविला. राजेश खन्ना यांनी एका मासिकाच्या मुलाखतीत असं सांगितलं होतं की “ऋषिकेश मुखर्जी यांच्या या तीन चित्रपटात मी काम केले. आनंद, बावर्ची  आणि नमक हराम! आनंद आणि नमक हराम या  चित्रपटात ऋषिकेश मुखर्जी यांनी माझ्याकडून त्यांच्या पध्दतीने काम करवून घेतले पण बावर्ची  सिनेमाच्या वेळी त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य देऊन तू तुझ्या पद्धतीने बावर्चीची भूमिका कर असे सांगितले. त्यामुळे या चित्रपटातील माझी भूमिका करताना मला खूपच मजा आली!” या  सिनेमा ची संकल्पना १९३६ साली आलेल्या ’माय मॅन गॉड्फ्रे’ या इंग्रजी सिनेमावर बेतली असली तर त्याची भारतीयकरण फार सुंदर वठले होते. १९६६ साली याच कथानकावर तपन सिन्हा यांनी बंगालीत “गोलपा होलीयो सत्यी” हा सिनेमा बनविला होता. हिंदीत सिनेमाची पटकथा व संवाद गुलजार यांचे होते. गाणी कैफी आजमी यांची तर संगीत मदनमोहन यांनी दिले होते.

सिनेमातील कथानकात एका मोठ्या कुटुंबात ज्यात तीन भाऊ त्यांच्या बायका, मुले , मुली असा मोठा गोतावळा आहे. पण क्षुल्लक कारणावरून आणि क्षुद्र अहंकारामुळे त्यांच्या अनबन निर्माण होत असते. त्या कुटुंबाला एक स्वैपाकी (बावर्ची ) मिळतो तो या कुटुंबातील समस्यांचे सारे मळभ दूर करतो, नात्यातील संबंधात आलेला पीळ कमी करतो वातावरण स्वच्छ करतो. व निघून जातो. तो तसा बावर्ची नसतोच तो तत्वज्ञानाचा प्राध्यापक असतो. बारीक सारीक कुरूबुरीतून कुटुंब उध्वस्त व्हायला नको म्हणून ते सांधण्याचे त्याने व्रत घेतलेले असते. हे करताना त्याने वापरलेल्या युक्त्या, मूल्यांची शिकवण देणारे त्याचे भाष्य  रसिकांना खूष करून गेले. ऋशिदांनी हा सिनेमा अतिशय साधेपणाच्या शेड मध्ये चित्रीत केला त्या मुळेच तो प्रत्येकाला आपलासा वाटला. यातील काही संवाद आजही रसिंकाच्या लक्षात आहेत यात एका प्रसंगात राजेश खन्ना म्हणतो ’It is so simple to be happy … but it is so difficult to be simple’. आयुष्याचे सार खूप छोट्या आणि मार्मिक शब्दात या सिनेमात अनेकदा सांगितले आहे. ‘किसी भी बडी खुशी के इंतजार में हम ये छोटे-छोटे खुशियो के मौके खो देते है’, ‘इस दुनिया मे जब तक भलाई रुपये और पैसो मे तोली न जाये तब तक वो भलाई नही कहलाती’, ‘लोग जिन्दगी का सबसे छोटा सबसे किमती लब्ज भूल गये है… प्यार’, ‘जिसमे इंसान की भलाई हो व काम कभी बुरा नही हो सकता’, ‘राजा की पूजा सिर्फ उसके देश मे होती है और विद्वान की पूजा तो पूरी दुनिया में होती है, ‘खुशी के गाने तो बिल्कुल फुलझडी की तरह होते है जलते है और बुझ जाते है.. लेकिन उदासी के गाने अगरबत्ती की तरह देर तक जलते है और बुझने के बाद भी महकते रहते है’,

यातली राजेश खन्ना, जया भादुरी  यांची अदाकारी अप्रतिम झाली होती. राजेश खन्ना ने रंगवलेला बावर्ची  खरोखरच अप्रतिम होता. कारण या सिनेमाच्या वेळी तो प्रस्थापित सुपरस्टार झाला होता. पण यातील त्याची नॉन ग्लॅमरस भूमिका त्यांनी अतिशय सुरेखपणे साकारली होती. एरवी आपल्या ‘स्टाईल’ कडे कायम लक्ष देणारा राजेश खन्ना या संपूर्ण चित्रपट खाकी हाफ पॅन्ट आणि खाकी शर्ट या पेहरावात वावरला होता. जया भादुरी ची या चित्रपटातील भूमिका एका अनाथ मुलीची होती. त्यामुळे संपूर्ण  तिचा वावर एका दबलेल्या व्यक्तिरेखेचा होता. इतर भूमिकांमध्ये हरींद्रनाथ चटोपाध्याय,ए के हंगल, दुर्गा खोटे, काली बॅनर्जी , उषा किरण ,असरानी, पेंटल आणि  मास्तर राजू होते. चित्रपटात जया भादुरी च्या नायकाचे पात्र छोटे आहे. (ती भूमिका सूरज नावाच्या कलाकाराने केली होती.) या सिनेमाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमात टायटल दाखवले नाहीत. अमिताभ बच्चन सूत्रधाराच्या भूमिकेत येतो आणि पडद्यामागून सर्व कलाकारांची नावे सांगतो!  चित्रपटातील गाणी किशोर कुमार, मन्ना डे, निर्मलादेवी (अभिनेता गोविंदा ची आई) लक्ष्मी शंकर, हरींद्रनाथ चटोपाध्याय, मन्ना डे आणि फय्याज यांनी गायली होती. गाणी कैफी आजमी यांची होती तर सुरेल संगीत मदन मोहन यांचे होते. मदन मोहन यांचे संगीत खरोखरच अतिशय अप्रतिम होते पण दुर्लक्षित राहिले. इतका सुंदर चित्रपट पुरस्कारापासून देखील वंचित राहिला. पेंटल ला उत्कृष्ट विनोदावीराचे फिल्म फेयर मिळाले.

’तुम बिन जीवन कैसा जीवन’(मन्नाडे), मोरे नैना बहाये नीर(लता), भोर आयी गया अंधियारा (किशोर, मन्नाडे), मस्त पवन डोले रे (लता) या गीतांनी सिनेमाची कथा आणखी सुरीली केली. चित्रपटाच्या सुरूवातीला संस्कृत नाटकाच्या सूत्रधाराप्रमाणे अमिताभच्या आवाजात कथेचे सार व्यक्त केले गेले आणि शेवटी  ’रघू किसी नये घर की तलाश में जा रहा है. आशा है वो घर आपका नही हो’. ७ जुलै १९७२ रोजी हा सिनेमा झळकला आणि त्याच्यातील वेगळत्वाने अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला. छोट्या कथेतून सोप्या भाषेत मोठा संदेश देण्याचे हृषिदांचे कर्तृत्व अफाट होते!

आज ७ जुलै ला हा सिनेमा पन्नासाव्या वर्षात प्रवेश करतो आहे त्या साठी त्याची खास आठवण!

हेही वाचा- ४१ वर्षांनंतरही आनंदाने हफ्ते फेडावे वाटतात असे कर्ज

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment