– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Dasvi Movie Review ल्युडो, बीग बुल आणि बॉब बिस्वास या सलग तीन चित्रपटांमध्ये अभिषेक बच्चन ला गवसलेला फॉर्म बघून आणि अभिनयाचा तोच फॉर्म दसवी च्या ट्रेलरमध्ये सुद्धा जाणवल्यामुळे, फारशा नसल्या तरी थोड्याफार अपेक्षा घेऊन मी आज नेटफ्लिक्स वर प्रदर्शित अभिषेक चा दसवी हातात घेतला. दोनच तासांचा आहे…त्यातही तीनदा ब्रेक, दोनदा डुलकी घेऊनही हा काही संपायला तयार नाही हे लक्षात येताच माझे लक्ष मग त्या १०-१० सेकंदाने फास्ट फॉरवर्ड करायच्या बटणाकडे आकर्षित झाले. त्याचा जमेल तिथे वापर करूनही झाले. तरीही दिग्दर्शकाला म्हणायचे काय आहे हेच समजेना. मग ते समजावून घेणे दिले सोडून. त्यानंतर शेवटपर्यंत जो पहिला तो केवळ अभिषेक वर असलेल्या प्रेमापोटी आणि आपल्याला यावर लिहायचे आहे या कर्तव्यापोटी. 

कथा आहे गंगाराम चौधरी (अभिषेक बच्चन) नामक एका आठवी पास भ्रष्ट मुख्यमंत्र्याची. चित्रपटाच्या सुरुवातीलाच एका घोटाळ्यात आरोपी असलेल्या गंगारामची रवानगी जेलमध्ये होते. जेलमधून परत येईपर्यंत गंगाराम त्याची पत्नी बिमला देवी (निम्रत कौर) हिला मुख्यमंत्री पदी बसवतो. ज्या जेलमध्ये गंगाराम आहे त्याची अधीक्षक आहे ज्योती देसवाल (यामी गौतम). अत्यंत प्रामाणिक आणि कडक शिस्तीची अशी ओळख असलेल्या ज्योती ची ट्रान्स्फर या जेलच्या अधीक्षकपदी ठिकाणी गंगाराम नेच केलेली असते. शिक्षा भोगत असतांना आठवी पास गंगाराम च्या डोक्यातील सत्तेची हवा कमी करण्यात ज्योती ची महत्वाची भूमिका असते. दुसरीकडे गंगाराम ची पत्नी मुख्यमंत्री पदी बसल्यापासून गंगाराम लाच डबल क्रॉस करत असते. एके दिवशी अचानकपणे गंगाराम ला आपण शिकले पाहिजे असा काहीतरी साक्षात्कार होतो आणि तो दहावी ची परीक्षा देण्याचा निर्णय घेतो. जर दहावी पास होऊ शकलो नाही तर पुन्हा मुख्यमंत्री पदी बसणार नाही याचीही तो घोषणा करतो. दसवी पास होण्याचे आपले ध्येय तो कसे गाठतो हा पुढील कथाभाग. 

तकलादू आणि आऊटडेटेड कथानक, एकाही प्रमुख व्यक्तिरेखेला डिफाइन न करणारी अशी  भरकटलेली पटकथा, निरस आणि कंटाळवाणे दिग्दर्शन यात पहिल्या ते शेवटच्या फ्रेमपर्यंत अडकलेल्या चित्रपटाचे उत्तम उदाहरण म्हणजे दसवी असे म्हणता येईल. याचा सर्वस्वी दोष दिग्दर्शक तुषार जलोटा यांचा आहे. राजकीय व्यवस्थेत नेत्यांच्या शिक्षणाच्या महत्वाच्या मुद्द्याला कथानकात हाताळण्यात आले आहे. पण ही हाताळणी अगदीच बाळबोध आहे… अपरिपक्व आहे. सुरेश नायर आणि रितेश शाह यांच्या कथानकात असाही फारसा दम नाही त्यात भर घातली आहे तुषार जलोटा या नवख्या दिग्दर्शकाच्या अत्यंत निरस अशा दिग्दर्शनाने. संवाद तर त्याहून अधिक प्रभावहीन. एखादे गीत वगळता संगीतकार सचिन-जिगर यांचे संगीतही चित्रपटाला यातून कुठे वाचविताना दिसत नाहीत. 

अभिषेक बच्चन ने रंगविलेला गंगाराम चौधरी तसा बऱ्यापैकी जमलाय पण अशा प्रकारच्या म्हणजे एक टिपिकल उत्तर भारतीय प्रदेशाच्या अडाणी मुख्यमंत्र्याच्या व्यक्तिरेखेच्या तोंडी अपेक्षित विनोदी संवाद नसल्याने हिरमोड होतो. यामी गौतम आणि निम्रत कौर या दोघींनी आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिका व्यवस्थित केल्या आहेत. छायांकन आणि इतर तांत्रिक निर्मिती मूल्यात चित्रपट लो-बजेट असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. 

सिनेमा माध्यमावर प्रेम असणारे अगदी शाळकरी दशेतले विद्यार्थी सुद्धा हा दसवी चा क्लास सहन करतील असे वाटत नाही. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment