– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘An Action Hero’ Movie Review. बॉलिवूडमधील मुख्य प्रवाहातील कलाकार ज्या ऑफबीट नायकाची भूमिका साकारण्यासाठी सहसा कचरतात अशा भूमिका तितक्याच जलदतेने स्वीकारणारा आणि सहजतेने साकारणारा हिरो अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे आयुषमान खुराणा. कुठल्याही साचेबध्दतेत अथवा चौकटीत न अडकणारा आयुषमान पहिल्यांदाच एका रेग्युलर अथवा टिपिकल बॉलिवूड हिरो च्या भूमिकेत कसा काय येतोय याचे मला आज प्रदर्शित ‘ऍन ऍक्शन हिरो’ या सिनेमाचे ट्रेलर बघून आश्चर्य वाटले होते. पण तरीही आयुषमान असल्याने सिनेमात नक्की काहीतरी वेगळेपण असेल या आशेने सिनेमागृहात गेलो खरा पण ….

कथानक थोडक्यात-

‘ऍन ऍक्शन हिरो’  एका फिल्म स्टारची कथा आहे. मानव (आयुष्मान खुराना) हा एक लोकप्रिय बॉलीवूड चित्रपट स्टार आहे, जो अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो हरियाणातील मंदोठी गावात जातो. विकी सोलंकी (सुमित सिंग) हा त्या परिसरातील एक स्थानिक राजकारणी आहे जो मानवला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत एक फोटो क्लिक करण्याच्या आशेने आपल्या मित्रांसोबत शूटिंगच्या सेटवर आला आहे पण मानव मात्र त्याला वाट बघायला लावतो. बऱ्याच वेळानंतर, मानव त्याला भेटायला जेंव्हा तयार होतो तेंव्हाच त्याचा व्यवस्थापक रोशन (हर्ष छाया) त्याला येऊन सांगतो की मानव ज्या कारची खूप दिवसांपासून वाट बघतोय ती मस्टँग कार आली आहे. मानव इतका उत्साहित होतो की तो विकीला विसरतो आणि त्याच्या नवीन कारमध्ये फिरायला जातो. रागावलेला विकी त्याच्या एसयूव्हीमध्ये त्याचा पाठलाग करतो. एका निर्जन रस्त्यावर, विकी आणि मानवचा सामना होतो. दोघांच्या धक्काबुकी मध्ये मानव त्याला दूर ढकलतो ज्याने विकीचे डोके दगडावर आदळते आणि विकीचा तत्काळ मृत्यू होतो. घाबरलेला मानव तेथून पळ काढतो पण विकीने तोडलेला मानवाच्या कार चा साईड मिरर घटनास्थळी पोलिसांना सापडतो आणि मानवाचा शोध सुरु होतो. दरम्यान, मानव लगेच हॉटेलमधून चेक आऊट करून मुंबईला पोहोचतो. मुंबई विमानतळाबाहेर थांबलेला मीडिया बघून बाहेर न येता तिथून तो त्वरित लंडन गाठतो. आता इकडे, मंडोठीमध्ये, विकीचा मोठा भाऊ भूरा सोलंकी (जयदीप अहलावत), जो एक दबंग असा गुंड राजकारणी आहे, त्याला आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे व त्यासाठी त्याला मानवला मारायचे आहे, तो देखील लंडनला पोहोचतो. दोघेही आमनेसामने येतात आणि पुढे सुरु होतो एकमेकांचा पाठलाग.

 

अनिरुद्ध ऐय्यर लिखित कथेला पटकथेत रूपांतरित केले आहे नीरज यादव यांनी. वरवर मनोरंजक वाटणारी कथा, पटकथेत बसवतांना मात्र तितकीशी रंजक राहिलेली नाही. कथेचा नायक घटनास्थळावरून (अपघाती झालेल्या मृत्यूच्या) पळ काढतो मुळात हेच मनाला पटत नाही. नायक लंडनला पोहोचल्यानंतर चा घटनाक्रम उगाच वाहवत गेल्यासारखा वाटतो. त्यात पटकथेत आलेले ट्विस्ट सुद्धा निव्वळ चित्रपटाची लांबी वाढवायची आहे या हेतूने टाकल्यासारखे आहेत. कथेत नायक पुढे पळतोय आणि त्याच्यामागे भुरा, लंडन पोलीस आणि काही स्थानिक गुंड लागले आहेत या एकाच ट्रॅक वर चालणारी कथा मध्यंतरानंतर कंटाळवाणी होते. अखेरच्या भागात नायक अंडरवर्ल्ड डॉनला भेटतो या ठिकाणी कथेला वळण देण्याचा प्रयत्न सुद्धा तितकासा परिणामकारक झालेला नाही.

अशा प्रकारच्या सिनेमांमध्ये नायकासोबत, ग्लॅमरस नायिका असणे अपेक्षित आहे पण यात तेही नाही. सव्वा दोन तासांची माफक लांबी असूनही चित्रपट कुठेच पकड घेत नाही हे विशेष. गीत-संगीत याबाबतीत सुद्धा निराशाच हाती लागते. केवळ जुन्या गाण्यांना रिमिक्स करण्याचे काम याहीवेळी तनिष्क बागची याने केले आहे. ‘जेदाह नशा’ हे यु-ट्यूब वरील टॉप ट्रेंडिंग गाणे चित्रपटाच्या शेवटी येणाऱ्या टायटल्स च्या वेळी वापरून वाया घालवले आहे.  कौशल शाह यांचे छायांकन आणि सनी एम आर यांचे पार्श्वसंगीत सुद्धा ठीकच आहे असे म्हणावे लागेल. विशेष नाही. जी एक गोष्ट छान जमली आहे ती आहे सिनेमाचे रॉ फाईट सीन्स.

आता अभिनयाच्या बाबतीत. आयुष्मान च्या नेहमीच्या ऑफबीट पठडीत न बसणारा रोल असूनही त्याने उत्तम काम केले आहे. त्याच्या फॅन्सला मात्र त्याने हा रोल का स्वीकारला याचे उत्तर मिळेल असे वाटत नाही. या रोलसाठी आयुष्मान पेक्षा  ऍक्शन हिरो  इमेज असलेला हिरो का घेतला नाही याचे मला तरी उत्तर सापडले नाही. भुरा च्या भूमिकेत जयदीप अहलावात ने मात्र कमाल काम केले आहे. या दोघांशिवाय उल्लेख करावी अशी इतर कोणाचीही भूमिका नाही.

‘बाला’ च्या यशानंतर हिट सिनेमा देण्यात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या आयुष्मानला हा ‘ऍक्शन हिरो’ सुद्धा काही मदत करू शकेल अशी शक्यता अजिबात नाही.

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment