बच्चे कंपनीची धम्माल मस्ती.. ३० वर्षे हम है राही प्यार के ची!

– ©अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

30 Years of Evergreen Superhit film ‘Hum Hain Rahi Pyar Ke’

राहुल (आमिर खान) – “अरे मिश्रा ये तीन तो मेरे बच्चे है और वो तो..?”

मिश्रा (मुश्ताक खान)- “यही तो है नंबर फोर …“

राहुल- ”कौन हो तुम, और यहाँ क्या कर रही हो..? और मेरे कपडे!? तुमने मेरे कपडे क्यों पहने है? क्या हो रहा है ये सब? कहाँ से आयी तुम?

वैजयंती (जूही चावला )–“ये तीन लाये थे मुझे…मेलेसे ..!”

राहुल- “मेलेसे? क्या आज कल मेले में लडकियां बिकती है?”

सनी (मास्टर कुणाल खेमू) –“बिकती नहीं मामाजी, फ़ोकट में लाये है!”

१९९३ साली अवघ्या १० वर्षाच्या सनीच्या या वाक्याने ‘सिंगल स्क्रीन’ सिनेमा हॉल्समध्ये हास्याचा प्रचंड स्फोट व्हायचा. ९२ च्या अखेर झी-टीव्हीचे आगमन झाले होते.  हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध दृष्यांचा, अर्चना पुरण सिंग यांचा ‘वाह! क्या सीन है’ नामक सुप्रसिद्ध कार्यक्रम झी-टीव्हीवर प्रसारित व्हायचा.  वरील सीन इतका गाजला की त्या कार्यक्रमात नेहमी दाखवला जायचा. दूरदर्शनच्या चित्रहार/छायागीतला टक्कर देणारा परंतु सर्व नव्या गीतांचा एक कार्यक्रम तेंव्हा झी-टीव्हीवर प्रचंड गाजत होता.  ‘फिलिप्स टॉप टेन’. वरील दृश्यातील नायक-नायिका राहुल व वैजयंती यांचे एक रोमँटिक गीत कित्येक आठवडे या ‘फिलिप्स टॉप टेन’ मध्ये नंबर  १ वर होते.  “घूँघट की आड़से दिलबरका दीदार अधूरा रहता है…” ९३ साली आमची नववी संपवून दहावी सुरु झाली होती  जेंव्हा जुलै महिन्यात आम्हा शाळकरी मुलांसाठी विशेष आकर्षण असलेला महेश भट्ट दिग्दर्शित सिनेमा प्रदर्शित झाला….”हम है राही प्यार के”. ज्याला प्रदर्शित होऊन आज ३० वर्षे झाली. (Revisiting the Evergreen Hindi film Hum Hain Rahi Pyar Ke)

९३ च्याच मार्च-एप्रिल महिन्यात प्रदर्शित होऊन सुपरहिट झालेले दोन सिनेमे अजूनही थिएटरमध्ये राज्य करत होते. वेंकटेश-करिष्मा कपूर यांचा ‘अनाडी’ व गोविंदा-चंकी पांडे जोडीचा ‘आँखें’.  त्या काळात सिंगल स्क्रिन  थिएटरच होते त्यामुळे एखादा सुपरहिट सिनेमा एकापेक्षा जास्त थिएटरात लागायचा व त्यातच दुसरा मोठा सिनेमा आला तर त्याला चांगले थिएटर मिळायचे नाही.  ‘महेश भट्ट’ या नावाचा तेंव्हा चांगलाच दबदबा होता. ९० चा ‘आशिकी’, ९१ चा ‘दिल है के मानता नही’ व ‘साथी’  या सिनेमांमुळे म्युझिकल हिट्स सिनेमे देणाऱ्या दिग्दर्शकांच्या पंक्तीत महेश भट्ट जाऊन बसले होते.  कथानकांची उचलेगिरी करण्याचा आरोप मात्र त्यांच्यावर नेहमी व्हायचा.  ९३ जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ‘हम है राही..’ प्रदर्शित झाला. याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महेश भट्ट यांच्या करिअरमधील  एक महत्वाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तो म्हणजे ‘सर’. ज्याला समीक्षकांच्या कौतुकासोबतच  व्यवसायिक यश पण मिळाले. महेश भट्ट एकाच वेळी अनेक प्रोजेक्टस वर काम करण्यासाठी प्रसिद्ध होते. ९३ साली तर भट्टसाहेबांचे  ‘हम है राही..’ मिळून तब्बल सहा सिनेमे प्रदर्शित झाले होते.  परिणाम त्यांना ‘हम है राही..’ साठी म्हणावा तसा वेळ देता येत नव्हता. त्यामुळे आमिर खान या ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चे ज्याने ‘हम है राही..’ची पटकथा स्वतःच लिहिली होती, फावले.  वडील ताहीर हुसेन निर्माता होते. त्यामुळे सेटवर नायक, निर्माता व पार्ट-टाइम दिग्दर्शक अशा ट्रिपल रोलमध्ये आमिरचा मुक्त संचार असायचा. परिणाम ‘हम है राही..’ सुपरहिट झाला.

कथानक अतिशय सिम्पल. सनी, विकी व मुन्नी या तीन भावंडांचे आई-वडील अपघातात मरण पावलेले असतात. तिघांच्या नावावर एक घर व वडिलांची गारमेंट फॅक्टरी असते.  मुले लहान असल्याने या मुलांची व फॅक्टरीची जबाबदारी मुलांचा मामा राहुल (आमिर खान) वर येते. बिजलानी (दिलीप ताहिल)  याची एक लाख शर्टची ऑर्डर या फॅक्टरीवर पेंडिंग असते.  ती ऑर्डर वेळेत पूर्ण झाली नाही तर घर आणि फॅक्टरीची निलामी होणार असते. एका जत्रेत सनी, विकी व मुन्नी यांची भेट वैजयंतीशी (जुही चावला) होते जी एक मोठ्या साऊथ इंडियन बिझनेस-मॅनची मुलगी आहे.  वैजयंतीचे वडील तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावणार असल्याने ती घर सोडून आलेली असते.  सुरुवातीला लपून या मुलांसोबत घरी आलेल्या वैजयंतीला राहुल नंतर त्यांची केअर-टेकर म्हणून घरात आश्रय देतो.  बिजलानीची एक लाडाची मुलगी असते माया (नवनीत निशान) जिला राहुल आवडत असतो.  मुलीच्या प्रेमाखातर मग बिजलानी राहुलसमोर मायाशी लग्नाचा प्रस्ताव ठेवतो व बदल्यात फॅक्टरीची निलामी थांबविण्याचे आश्वासनही देतो. राहुल-वैजयंतीचे मात्र एकमेकांवर प्रेम असते.  मुलांच्या मदतीने मग पुढे वैजयंती हा गुंता कसा सोडवते हा पुढील कथा भाग.

९३ साली नव्याने सुरु झालेली ‘तारा’ नावाची मालिका झी-टीव्हीवर प्रचंड गाजत होती.  ताराची प्रमुख भूमिका केलेली नवनीत निशान म्हणजे ‘हम है राही..’ मधील माया.  हा रोल ‘मैने प्यार किया’ मधील मोहनीश बहलची बहीण असलेली अभिनेत्री परवीन दस्तूर साकारणार होती परंतु नंतर ‘तारा’च्या यशामुळे नवनीतला घेण्यात आले. थेट नसला तरी झी-टीव्हीशी निगडित व सिनेमाशी संबंधित आणखी एक मजेदार किस्सा मध्यंतरी कुणाल खेमू याने आपल्या एका मुलाखतीत सांगितला होता. झी-ग्रुपचे  ‘एस्सेल वर्ल्ड’ हे गेमिंग पार्क तेंव्हा मुंबईत नव्याने सुरु झाले होते.  कुणालच्या शाळेची सहल एस्सेल वर्ल्डला जाणार होती पण कुणालचे शुटिंग शेड्युल त्याच दरम्यान होते.  कुणालला कुठल्याही परिस्थितीत मित्रांसोबत सहलीला जायचे होते व घरच्यांचे तो काही केल्या ऐकत नव्हता. ‘एस्सेल वर्ल्ड मे रहुंगा मै शूटिंग को नही जाऊंगा मै’ अशी घोषणा कुणालने केलेली. मग अखेर महेश भट्ट यांना मध्ये पडावे लागले. बरीच आमिषे दाखवूनपण  कुणाल ऐकेना म्हणून मग अखेर भट्ट साहेबांनी नव्या कोऱ्या व्हिडीओ गेम आणून देण्याचे आश्वासन कुणालला दिले तेंव्हा कुठे हा बेरक्या शूटिंगला यायला तयार झाला.

कुणालमध्ये लपलेल्या भविष्यातल्या अभिनेत्याची झलक ‘हम है राही..’ मध्येच स्पष्ट दिसली होती.  सनी, विकी व मुन्नी या तिघांमंध्ये लक्षात राहिला तो कुणालने रंगविलेला छोटा खोडकर सनी.  वर उल्लेख केल्याप्रमाणे उचलेगिरीसाठी भट्टसाहेब तेंव्हा कुप्रसिद्ध होते.  बॉलिवूडमध्ये या उचलेगिरीला ‘इन्स्पायर होणे’ हा एक सभ्य शब्द आहे. ‘हाऊसबोट’ नामक इंग्रजी चित्रपटावरून ‘इन्स्पायर’ होत रॉबिन भट्ट यांनी कथानक लिहिले होते. आमिर खान-जुही चावला या जोडीचे  ‘कयामत से कयामत तक’ नंतर ‘लव्ह लव्ह लव्ह’, ‘दौलत कि जंग’ व ‘तुम मेरे हो’ हे तिन्ही सिनेमे दारुण अपयशी झाले होते. पण ‘हम है राही..’ मध्ये या जोडीची केमिस्ट्री मस्तच जमली होती. दोघांच्याही अभिनयाचे कौतुक झाले.  जुहीला तर थेट फिल्मफेअर अवॉर्डच! जुहीचा अभिनय छान होता पण स्पष्ट बोलायचे झाल्यास अगदी फिल्मफेअरच्या ताकदीचा नक्कीच नव्हता अन तेही जेंव्हा समोर ‘दामिनी’ साठी मीनाक्षी शेषाद्री,  ‘गुमराह’ साठी श्रीदेवी, ‘खलनायक’ साठी माधुरी दीक्षित व ‘डर’साठी स्वतः जुही चावला  सारखे तगडे ऑप्शन्स असतांना. असो. पण जुही ९३ सालची बॉक्स ऑफिस क्वीन होती हेही तितकेच खरे.  कारण याच वर्षी ‘डर’ ने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे उचांक प्रस्थापित केले होते.  ‘जुहीला फिल्मफेअर मिळाले व मला नाही’ या घटनेने व्यथित झालेल्या आमिरने यावर्षीनंतर फिल्मफेअर वर  नेहमीसाठीच थेट बहिष्कार घातला. जुहीसोबत ‘बेस्ट फिल्म’ व ‘बेस्ट लिरिक्स’ (समीर-‘घुंघट कि आडसे’) हे दोन फिल्मफेअर पण ‘हम है राही..’ला मिळाले.

‘हम है राही..’ चा आत्मा होते नदीम श्रवण जोडीचे सुमधुर संगीत.  फिल्मफेअरसाठी नामांकन पण मिळाले होते पण पुरस्कार पटकाविला ‘बाझीगर’साठी अन्नू मलिक यांनी. गायिका अलका याग्निक हिने तर ‘घुंघट कि आडसे’ साठी उत्कृष्ट गायिकेचा थेट राष्ट्रीय पुरस्काराच पटकाविला.  शिवाय महेश भट्ट यांना राष्ट्रीय पुरस्कारात ‘स्पेशल ज्युरी अवॉर्डने’ सन्मानित करण्यात आले. ‘घुंघट कि आडसे’  सोबतच ‘मुझसे मोहब्बत का इजहार करता, काश कोई लडका मुझे प्यार करता’,  ‘युंही कट जायेगा सफर साथ चलनेसे’, ‘वो मेरी नींद मेरा चैन मुझे लौटा दो’ व ‘बम्बईसे गई पूना’ या मेलडीयस गीतांमुळे चित्रपटाच्या ऑडिओ कॅसेट्सचा विक्रमी खप झाला होता.

तर असा होता ‘हम है राही प्यार के’. एव्हरग्रीन सिनेमा.  आजच्या शालेय शिक्षण घेत असलेल्या पिढीने बघितला नसेल तर त्यांनाही जरूर दाखवावा असा क्लीन व निरागस कथानक असलेला. आँखें,  खलनायक, बाझीगर, डर, दामिनी अशा बिग स्टार्स  व बिग बजेट चित्रपटांसमोर अतिशय साधे कथानक असूनही ‘हम है राही..’ सुपरहिट ठरला. गर्दीश, अनाडी, दलाल सारख्या टिपिकल सिंगल स्क्रीन मासेस  प्रेक्षकांसाठी बनलेल्या चित्रपटांसमोर टिकून घरातील बाळगोपाळांसहित  फॅमिली प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणले ते ‘हम है राही..’ नेच.

थँक्स महेश भट्ट. थँक्स आमीर खान. थँक्स नदीम श्रवण.

हेही वाचा – एकसाथ तीन वादळांसमोर न डगमगलेला … तुम बिन

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment