अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

 ‘हरिकिशन गोस्वामी’ यांच्या वयाची तब्बल ८४ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि हरिकिशन गोस्वामी हुन अभिनेता, नायक, निर्माता, दिग्दर्शक मनोज कुमार (Actor Director Manoj Kumar) या नावाला आज ६४ वर्षे पूर्ण झाली आहेत. २४ जुलै १९३७ साली अबोटाबाद, (सध्याचे पाकिस्तान) येथे जन्मलेल्या हरिकिशन ने वयाच्या २० व्या वर्षी म्हणजे १९५७ साली आपल्या ‘फॅशन’ या पहिल्या चित्रपटासाठी म्हणून मनोज कुमार हे स्क्रीन नेम धारण केले आणि तेच नाव त्यांची ओळख बनले. त्यांच्या ऑन-स्क्रीन देशभक्तीने त्यांना ‘भारत कुमार’ या नावाने सुद्धा संबोधले जाते.  (Icon of Patriotism in Hindi cinema Actor Manoj Kumar)

स्वतंत्र भारताच्या आजपर्यंतच्या चित्रपट इतिहासात मनोज कुमार यांच्याशिवाय दुसरा एकही अभिनेता अथवा निर्माता-दिग्दर्शक त्याच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखला जात नाही. हरिकिशन हा बालक १० वर्षांचा होता जेंव्हा देश स्वतंत्र झाला व फाळणीनंतर गोस्वामी कुटुंब पाकिस्तानातून दिल्लीत स्थलांतरित झाले. सुरुवातीचे काही दिवस या कुटुंबाने रेफ्युजी कॅम्प मध्ये काढली. १९४४ साली दिलीप कुमार नावाच्या झंझावाताचे आगमन हिंदी सिनेसृष्टीत झाले होते. त्यांच्या काही वर्षे आधी आलेले अशोक कुमार व दिलीप कुमार यांच्या सिनेमांचा प्रचंड प्रभाव छोट्या हरिकिशन वर होत होता. नायकांमध्ये दिलीप कुमार तर नायिकांमध्ये हरिकिशनला कामिनी कौशल आवडायची. हरिकिशन जेंव्हा १२ वर्षांचा होता तेंव्हा म्हणजे १९४९ साली दिलीप कुमार व कामिनी कौशल यांचा ‘शबनम’ नावाचा प्रदर्शित झाला ज्यात दिलीप कुमार यांच्या पात्राचे नाव होते मनोज कुमार. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलेल्या हरिकिशन ने मग जेंव्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा हेच नाव धारण करण्याचे ठरवले. अशा रीतीने अभिनेते मनोज कुमार यांचा जन्म झाला. ©

सुरुवातीचे काही सिनेमे केल्यावर १९६२ साली आलेल्या माला सिन्हा सोबतच्या म्युझिकल हिट ‘हरियाली और रास्ता’ने मनोज कुमार यांना ओळख व पहिले मोठे यश मिळवून दिले. अभिनयावर अर्थातच दिलीप कुमार यांचा स्पष्ट प्रभाव होता. ‘गृहस्थी’, ‘वो कौन थी’ च्या यशानंतर आलेले १९६५ हे वर्ष मनोज कुमार यांच्यासाठी महत्वाचे ठरले. ‘गुमनाम’ व ‘हिमालय की गोद में’ सोबतच या वर्षी आलेला भगत सिंगांच्या आयुष्यावर आधारित ‘शहीद’ हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर १९६५ साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धाने देशभरात देशभक्तीची प्रचंड लाट उसळलेली होती. याच वर्षी ‘शहीद’ सुपरहिट झाला. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ चा नारा दिलेला होता. शास्त्रीजींना ‘शहीद’ सिनेमा व त्यातले मनोज कुमार यांचे काम खूपच आवडले होते. तो पाहूनच शास्त्रीजींनी मनोज कुमार यांना ‘भारताचा वीर जवान व मेहनती किसान यांच्या आयुष्यावर आधारित एखादा सिनेमा काढा’ अशी विनंती केली.

मनोज कुमार यांनी त्वरीत त्यावर काम सुरु केले. स्वतः लेखणी हातात घेतली. कथालेखन पूर्ण झाल्यावर स्वतःच दिग्दर्शन करण्याचे ठरवले व अशा रीतीने १९६७ साली जवान व किसान अशा दोन्ही रूपात ‘भारत’ हे नाव पहिल्यांदा घेऊन, दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्याच प्रयत्नात मनोज कुमार यांचा ‘उपकार’ प्रदर्शित झाला. “मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे मोती ने” देशभरात अगोदरच वाहत असलेल्या देशभक्तीच्या लाटेला, जनतेच्या मनातली भावनांना वाट मोकळी करून दिली व ‘उपकार’ गोल्डन ज्युबिली हिट झाला. मनोज कुमार हे हिंदी सिनेमातील देशभक्तीचे आयकॉन बनले. जनतेने तेंव्हापासूनच त्यांना भारत नावाने संबोधण्यास सुरुवात केली. दुर्दैव एवढेच कि ज्या शास्त्रीजींच्या विनंतीवर मनोज कुमार यांनी चित्रपट बनवला तो पाहण्यास तेच जीवित नव्हते. ११ जानेवारी १९६६ सालीच शास्त्रीजी हे जग सोडून गेले. ‘उपकार’ ला यश तर मोठे मिळालेच पण सोबत असंख्य सन्मान व पुरस्कारही!

२ राष्ट्रीय सन्मानसोबतच फिल्मफेअरचे ३ नामांकन व ६ पुरस्कार मिळवत ‘उपकार’ ने मनोज कुमार हा देशभक्तीचा नवा ब्रँड निर्माण केला. या दरम्यान मनोज कुमारांचे ‘नील कमल’, ‘दो बदन’, ‘पत्थर के सनम’, ‘आदमी’, ‘अनिता’ हे चित्रपटही हिट झाले होते ज्यामुळे मनोज कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीचे आघाडीचे स्टार झाले होते. ©

पण मनोज कुमार यांनी मात्र स्वतःच्या दिग्दर्शनावर व भारत या नव्या ओळखीवर काम करायचे ठरवले होते. ‘पूरब और पश्चिम’ (१९७०), ‘शो’र (१९७२), ‘रोटी कपडा और मकान’ (१९७४), ‘क्रान्ती’ (१९८१) व ‘क्लर्क’ (१९८९) पर्यंत त्यांच्या प्रत्येक दिग्दर्शनात सामाजिक विषय व त्याला देशभक्तीची किनार हाच फॉर्म्युला दिसला. यापैकी शोर व रोटी कपडा और मकान यांना बऱ्यापैकी पुरस्कारही मिळाले. यादरम्यान मनोज कुमार यांनी इतर निर्मिती संस्थात काम केलेले व यशस्वी झालेले चित्रपट होते बे-इमान (फिल्मफेअर पुरस्कार) दस नंबरी व संन्यासी (फिल्मफेअर नामांकन). क्रांतीनंतर मात्र त्यांचे करिअर उतरणीला लागले. १९९२ साली पद्मश्री, १९९९ साली फिल्मफेअर लाइफटाईम अवॉर्ड व २०१५ साली सिनेमातील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके ने मनोज कुमार यांना सन्मानित करण्यात आले.

आज मनोज कुमार ८४ वर्षांचे झालेत. स्वस्थ आहेत. मनोज कुमार यांनी आपली तोंडावर हात ठेऊन बोलायची ट्रॅजिक स्टाईल त्यांनी आपले अभिनयातले गुरु, आदर्श ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांच्याकडूनच घेतली आहे. हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात अजूनही मनोज कुमार यांच्याप्रमाणे देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळख निर्माण करू शकलेला एकही अभिनेता अथवा दिग्दर्शक होऊ शकला नाही हेही तितकेच खरे. त्याबद्दल मनोज कुमार यांना मनापासून हॅट्स ऑफ! 

हेही वाचा – राज कपूरची सावली…मुकेश!

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.