— © नयना पिकळे

 

लाखो करोडोत एखाद्याच व्यक्तिमत्त्वाला एकाच वेळी पराकोटीचं प्रेम आणि तितक्याच टोकाचा द्वेष सहन करावा लागतो . स्वर्गीय सृष्टीराज कपूर म्हणजेच , रणधीर पृथ्वीराज कपूर म्हणजेच आपल्या सर्वांच्या पूर्ण परिचयाचा राज कपूर हे असच एक विलक्षण व्यक्तिमत्त्व.
एकीकडे आपल्या बहुतेक चित्रपटांतून राजने समाजाविषयी कळवळा असणारा, अन्यायाला त्रासलेला, आपल्यातलाच वाटावा असा आदर्शवादी सामान्य नायक रंगवला. तर दुसरीकडे त्याने आपल्या प्रत्येक चित्रपटात आपल्या नायिकेला देहप्रदर्शन करायला लावलं. पण त्यातही एक कलात्मकता होती. त्याच्या कोणत्याही चित्रपटात वासनेच बिभत्स दर्शन कधीच झाल नाही हे कोणीही नाकारू शकत नाही. ©

क्लॅपर बॉय म्हणून केदार शर्माच्या हाताखाली कारकिर्दीची सुरूवात करणारा, एकदा कामात हयगय झाली म्हणून थोबाडीत खाणारा, केदार शर्माच्याच “नीलकमल” चित्रपटात वयाच्या २३व्या वर्षी मधुबाला बरोबर नायक म्हणून प्रथमच पदार्पण करणारा आणि लगेच वयाच्या २४व्या वर्षी आपला “आग (१९४८)” हा पहिला चित्रपट दिग्दर्शित क़रणारा राज कपूर.

“ आवारा हूँ , आवारा हूँ
या गर्दिश में हूँ आसमान का तारा हूँ
आवारा हूँ …..

अशी अगदी साधी भोळी, लाजरी बुजरी प्रतिमा जाणीवपूर्वक बनवणारा, ती जपण्यासाठी आयुष्यभर काळजीपूर्वक प्रयत्न करणारा राज कपूर .
अगदी “आवारा” पासून “श्री ४२०”, “परवरीश”, “जागते रहो”, “जिस देश में गंगा बेह्ती है”, “छलिया” आणि “मेरा नाम जोकर” पर्यंत बहुतेक चित्रपटात हीच सामन्यातील सामान्य व्यक्तीला स्वतःशी relate करता येणारी आणि म्हणूनच पूर्णपणे आपलीच वाटणारी अशी प्रतिमा राजने कसोशीने पाळली. पण सफरचंदासारखे लालसर गोरे गोबरे गाल असलेला, करोडोंच्या दिलाची धडकन असलेला , राजबिंडे रूप लाभलेला राज प्रत्यक्षात कोणत्याही angle ने कधीच सामान्य वाटला नाही हेच खरं. ©

“ घर-बार नहीं, संसार नहीं
मुझसे किसी को प्यार नहीं
मुझसे किसी को प्यार नहीं ” …..

प्रत्यक्षात मात्र घराला घरपण देणारी कृष्णा कपूर सारखी अत्यंत देखणी सुलक्षणी पत्नी , रणधीर , ऋषी , राजीव ही ३ मुलं आणि रितू, रीमा नावाच्या २ गोड मुली असा भरल्या गोकुळासारखा त्याचा संसार होता.
त्याचा फिल्मी परिवार देखील हेवा वाटावा असाच होता. गीतकार शैलेंद्र , हसरत जयपुरी , संगीतकार शंकर जयकिशन , लता मंगेशकर , मुकेश आणि नर्गिस हा होता राजचा फिल्मी परिवार . या सर्वांच्या साथीने राज कपूरने “बरसात”, “आह”, “आवारा”, “चोरी चोरी”, “श्री ४२०” अशा अनेक चित्रपटात सिनेरसिकांवर संगीताची बरसात करून आपल्या अभिनयाची मोहिनी घातली. ©

“ उस पार किसी से मिलने का इकरार नहीं
मुझसे किसी को प्यार नहीं (२)
सुनसान नगर अनजान डगर का प्यारा हूँ ” …….

पण ह्याच आपल्या फिल्मी परिवारातील एखाद दुसरी व्यक्ती नसताना राज मात्र कधीच डगमगला नाही. कधी शंकर जयकिशनच्या संगीताचे कोंदण नसलेली गाणी राज तितक्याच तन्मयतेने गायला तर कधी नर्गिस शिवाय “संगम”, “मेरा नाम जोकर” सारखे all time classic चित्रपट दिले.
इतर दिग्दर्शकांच्या बॅनरखाली “बाँवरे नैन”, “परवरीश”, “अनारी”, “तिसरी कसम”, “जिस देश में गंगा बहती है” अशा चित्रपटात सुद्धा तितकच समरसून काम केलं. आपल्या फिल्मी परिवारातील एक एक सदस्य विखुरल्या नंतरच्या काळातले “बॉबी”, “सत्यम शिवम सुंदरम, “प्रेम रोग” आणि “राम तेरी गंगा मैली” हे चित्रपट देखील राज कपूरने केवळ आपल्या जोरावर बॉक्स ऑफिस वर तुफान यशस्वी करून हेच सिद्ध केलं कि Raj Kapoor was and will always remain “The Greatest Showman Of The Indian Cinema” .
पण ……
पण तरीही एका खऱ्या सिनेरसिकाला हे नंतरचे चित्रपट कुठेतरी अपूर्ण अधुरे वाटत राहतात हे सत्य काही नाकारता येत नाही . माझ्या मते तरी राज कपूरने आपल्या संपूर्ण फिल्मी परिवारासह जे चित्रपट केले तीच त्याची खरी पुंजी , खरी ओळख आहे. अनेक नवोदित नायिकांना राजने घडवलं . पण नर्गिसनंतर त्याच्या चित्रपटातला चार्म गेला तो गेलाच.
कदाचित त्याच सुमारास समाज , संस्कृती आणि सामाजिक मूल्ये देखील बदलू लागली होती. मला तरी राज कपूरचे “संगम” पर्यंतचेच चित्रपट खर्‍या अर्थाने आवडतात. संगम नंतर आलेल्या चित्रपटांची पातळी हळुहळु घसरत गेलेली जाणवते. नंतरच्या चित्रपटात कितीही Glamour Quotient किंवा उच्च कलात्मकता असली तरी ती आधीची मजा नाही ती नाहीच. ©

“ आबाद नहीं, बरबाद सही
गाता हूँ खुशी के गीत मगर (२)
ज़ख्मों से भरा सीना है मेरा
हँसती है मगर ये मस्त नज़र
दुनिया SS , दुनिया मैं तेरे तीर का
या तकदीर का मारा हूँ ” ….

कोणतंही काम करताना त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देणं हीच खऱ्या कलावंताची ओळख. म्हणूनच बहुतेक मनस्वी कलावंतांच्या नशिबात बरबाद होणं असतं . या बाबतीत राज मात्र exception होता असं म्हणायला हरकत नाही. आपल्या कामात तो कुठेही कधीही कमी पडला नाही. पण आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या अभिनेत्रीत भावनिक रित्या गुंतूनही (?) तिच्यापासून पूर्णपणे अलिप्त राहायची कला त्याला साधली होती हेच खरं. आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि पडद्डवरच्या आयुष्यात कायम एक सीमारेषा आखून राजने ती शेवटपर्यंत पाळली. ©

त्याच्यावर प्रेम करणारे त्याचे Die hard fans असोत किंवा त्याच्या प्रत्येक कृतीवर हिरीरीने टीका करणारे टीकाकार , राज कपूर हा एकमेव कलाकार “ The greatest showman of the Indian Cinema” , “Charlie Chaplin of Indian Cinema” म्हणूनच ओळखला जातो आणि यापुढेही ओळखला जाईल कोणीही नाकारू शकत नाही. ©

 

 

Nayana Pikale
+ posts

Leave a comment