मी आणि मकरंद

– प्रेषित रुद्रावर (आर जे प्रेषित), औरंगाबाद

शीर्षकावरून थोडेसे जरा एकदमच अरेच्या असे होऊ शकते पण मी अभिनयाच्या क्षेत्रात नाही जाऊ इच्छित मग मी आणि मकरंद कश्यामुळे ?? प्रश्न तसा सोपा आहे पण मजेदार आहे ..तो माझा सिनियर, मी त्याला पहिल्यांदा माझ्या हॉस्टेल च्या सिनियर च्या खोलीमध्ये भरलेल्या गाण्याच्या मैफिलीत भेटलो म्हणजे बघितले एक जण ” ग्रेस ” यांचे हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेले “ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता” हे स्वच्छ उच्चारांमध्ये अर्थासह गात होता ..स्वर हालत नव्हते, आवाज फार ग्रेट नव्हता पण भावत होते गाणे, मैफिल संपली आणि सिनियर ने ओळख करून दिली, हा फर्स्ट इअर चा आहे पण नाट्यशास्त्र शिकायला आला आहे ” प्रेषित ” आणि हा कॉलेज चा बेस्ट अभिनेता “मकरंद अनासपुरे” त्याने गोड हसून अभिवादन केले आणि मला पहिल्या भेटीत तो आपला वाटला .. आज त्याचा वाढदिवस आहे

खरे म्हणजे दरवर्षी आम्ही या दिवशी भेटतोच पण यावर्षी जरा “करो ना मुळे हुंगले ..मी त्याच्या अभिनयावर नाही बोलणार कारण तो खूप मोठा अभिनेता आहे, त्याचे रंगा पतंगा, गोष्ट छोटी डोंगराएवढी, त्याच्याच दिग्दर्शनाखाली त्याने अभिनय केलेला ‘डँबीस’ किंव्हा पारध, सुंबरान अशी काही नावे वानगी दाखल देता येईल .. मला तो जास्त भावतो मित्र म्हणून ..भेटतो तेव्हा त्या जगाचे सगळे पाश गुंडाळून तो मित्र म्हणून आलेला असतो. एकदम जुना त्याच्या घरी महालक्ष्मी चे जेवण करण्यासाठी नेणारा, हे पुस्तक वाचच रुद्र्या असे ठणकावून सांगणारा, कोविड आहे सगळ्यांना सांग ” वाफ घ्या ” असे आवर्जून सांगणारा ..खूप आहेत गोष्टी अश्या ..तो मुंबईला गेला स्ट्रगल साठी तेव्हा पासून शिल्पा सोबत लग्न झाले ” इंद्रायणी आणि आमचा ताल सम्राट केशव ” मोठे होई पर्यंत घरी गेलोच नव्हतो .. पण मग एकदा ठरवून गेलो मुंबईला आणि त्याचा भली मोठी सदनिका बघितली आणि टचकन डोळ्यात पाणी आले, खूप वेळ गप्पा मारून निघालो आणि मकरंद ने हातात पुस्तक ठेवले …भेट म्हणून .. आता तो मोठा झालाय खूप मोठा पण अजून तो तसाच आहे ..आज जी आठवण सांगतोय ती खूपदा त्याने सांगितली आहे पण त्या आठवणीच्या आधीची एक आठवण आहे माझ्याकडे, तो आणि मंगेश देसाई दोघे मिळून नाट्यदर्पण साठी दासू वैद्य यांची एकांकिका करत होते “देता आधार की करू अंधार” आणि संगीत करण्यासाठी कोणी नव्हते तर दिलीप घारे सर म्हणाले ‘हा करेल’ म्हणजे मी, आणि मी झालो टीम चा हिस्सा .. मुंबई ला प्रयोग, आम्ही लुंगी मधे स्पीकर बांधून घेऊन गेलो, डब्बा पण नेला होता, नाना पाटेकर यांनी आम्हालाच विचारले झाली का रे औरंगाबाद ची एकांकिका, आम्ही मोहरुन गेलो होतो, त्या भल्या मोठ्या रंगमंचावर नेहरू सेंटर च्या ..सुरू झाली एकांकिका, खूप प्रतिसाद मिळत होता, शेवट आला एकांकिकेचा आणि मकरंद बोलता बोलता मंगेश च्या खांद्यावर हात ठेवतो आणि “बिछडे सभी बारी बारी ” चा आलाप मी सुरू केला आणि मी बघितला की मकरंद विंगेत माझ्याकडे बघत होता, मी डोळे पुसत होतो तो उत्कट क्षण बघून ..आणि मकरंद माझ्याकडे बघून तसाच रडत होता ..पडदा पडला आणि आम्ही तिघांनी मिठी मारली एकमेकांना .. एकांकिका संपली होती आणि एक नवीन प्रवास सुरू झाला होता, मकरंद चा the मकरंद अनासपुरे होण्याचा आणि आमचा घट्ट मैत्रीचा ..

खूप मोठा होणार आहे आमचा मित्र आणि आम्ही डोळे भरून बघणार आणि एन्जॉय करणार त्याचे यश …पहिल्या यशवंत या चित्रपटाच्या वेळी होती त्याच उत्सुकतेने बघणार त्याला पडद्यावर प्रत्येक वेळी ..जिवेत शरद: शतम ..मकरंद आणि आमची मैत्री..

 

 

Preshit Rudrawar
+ posts

Leave a comment