दिसायला ऊंचं पुरं, दाढीतलं आकर्षक व तितकच रांगडं व्यक्तिमत्व ..सोबतीला भारदस्त पहाडी आवाज, भेदक नजर आणि अभिनयाची जाण असं जादुई रसायन म्हणजे आपला मराठमोळा ‘मिलिंद गुणाजी’. मॉडेलिंग क्षेत्रातून मिलिंदला आज चित्रपट व टीव्ही क्षेत्रात येऊन ३० वर्षे झाली आहेत. वयाच्या साठीच्या जवळ जरी पोहोचला असला तरीही मिलिंद अजून तितकाच फ्रेश व तरुण वाटतो. गड किल्ल्यांविषयी असलेले प्रचंड प्रेम, निसर्गाच्या सानिध्यात सतत राहण्याची, पर्वतारोहणाची व भटकंतीची आवड यामुळे मिलिंदच्या चेहऱ्यावरील तारुण्य अजूनही टिकून आहे.

मिलिंदच्या या निसर्ग प्रेमामुळेच त्याने झी मराठी ची डिस्कव्हर महाराष्ट्र व भटकंती या मालिकेत व नंतर स्टार प्लस च्या एव्हरेस्ट मालिकेत काम केले. प्रेक्षकांना या दोन्ही मालिका प्रचंड आवडल्या. एवढंच कशाला महाराष्ट्र सरकारच्या फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ साठी व महाबळेश्वर या पर्यटन स्थळासाठी त्याने ब्रँड अँबेसेडर म्हणूनही काम पाहिले आहे. मिलिंदचा जन्म २३ जुलै १९६१ साली मुंबईत झाला. गोविंद निहलानींचा ‘द्रोह काल’ हा खरंतर मिलिंदला ऑफर झालेला पहिला चित्रपट पण ‘पपीहा’ या १९९३ सालच्या, सई परांजपे दिग्दर्शित चित्रपटाने मिलिंद पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकला. योगायोग असा कि यातील त्याची पहिली भूमिकाही एका फॉरेस्ट ऑफिसरचीच होती आणि कथेची पार्श्वभूमी सुद्धा जंगल, आदिवासींचे रक्षण अशीच होती.

मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही खलनायक म्हणून मिलिंद चांगलाच गाजला. विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘फरेब’ चित्रपटातील त्याची इन्स्पेक्टर इंद्रजित सक्सेना या गाजलेल्या खलनायकी भूमिकेने त्याची बॉलीवूडला ओळख झाली. “ये तेरी आँखें झुकी झुकी, ये तेरा चेहरा खिला खिला” या गाण्यातला चित्रपटाची नायिका सुमन रंगनाथन च्या प्रेमात वेडा झालेला मिलिंद आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. यानंतर विरासत, जोर, देवदास, गॉडमदर, हजार चौरासी कि माँ आदी बऱ्याच चित्रपटातील त्याचे खलनायकी रूप प्रेक्षकांना आवडले. फरेब आणि विरासत यातील खलनायकी भूमिकेसाठी मिलिंदला फिल्मफेअरचे नामांकनही मिळाले होते. बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटातही त्याने खलनायक साकारला आहे. याच दरम्यान मिलिंदने टेलिव्हिजन माध्यमात मालिकांमधूनही अभिनय केला. ब्योमकेश बक्षी, पृथ्वीराज चौहान, हम ने ली है शपथ इत्यादी मालिकांमधून.

सोबत मॉडेलिंगही चालूच होते. गायिका वैशाली सामंत हिच्या ‘ऐका दाजीबा’ या प्रसिद्ध गाण्यातला मिलिंदचा फेट्यातला रांगडा लूक तर खासच होता. पर्यटन, फोटोग्राफी व साहसी खेळ या आपल्या आवडीच्या विषयावर मिलिंद ने सातत्याने प्रचंड लिखाणही केले आहे. त्याच्या लोकप्रभा मासिकातील सदरातील लेखांचे एकत्र पुस्तक ‘माझी मुलुखगिरी’ प्रकाशित झाले आहे. स्वतःच्या व्यस्ततेतून पत्नी राणी गुणाजी व मुलगा अभिषेक यांना घरातही जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न मिलिंद करत असतो.

— टीम नवरंग रुपेरी

 

Website | + posts

Leave a comment