दूरदर्शनच्या सुरुवातीच्या दशकात म्हणजेच १९८० च्या दशकात अत्यंत लोकप्रिय ठरलेली व आजही रसिकांच्या स्मरणात असलेली मालिका ‘वागले की दुनिया’ आजपासून एका नव्या रूपात पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. कौटुंबिक मनोरंजनासाठी ओळखले जाणारे चॅनेल सोनी सब टीव्ही वर आजपासून ‘वागले की दुनिया – नयी पीढी, नये किस्से’ नावाने सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता ही मालिका प्रसारित होईल. 

still from 80s wagle ki duniya
Anjan Shrivastav and Bharti Achrekar from 80s Wagle ki Duniya

आर के लक्ष्मण यांच्या ‘सामान्य माणसाच्या’ म्हणजेच ‘कॉमन मॅन’ च्या कथांची जादू पुन्हा जिवंत करण्याचे शो मध्ये आश्वासन देण्यात आले आहे. पिढीत बदल झाल्यावर, नवीन मालिकेतील नायकाला नविन दुविधांचा सामना यात करावा लागणार आहे असे दिसते. ८० च्या दशकातील मालिकेप्रमाणेच यातही ‘आजच्या’ मध्यमवर्गीय सामान्य माणसाची झलक बघायला मिळणार आहे. मिस्टर आणि मिसेस वागले यांच्या भूमिकेत अंजन श्रीवास्तव व भारती आचरेकर हे यातही कायम असतीलच शिवाय आता त्यांची पुढची पिढी यात सोबत असणार आहे. पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व सुमीत राघवन या प्रतिभाशाली कलाकाराने केले आहे. 

Wagle ki Duniya on SAB TV

‘वागले की दुनिया – नयी पीढी, नये किस्से’ हा एक स्लाईस ऑफ लाइफ शो आहे जो एका साध्या कुटुंबातील ‘राजेश वागले’ नावाच्या व्यक्तीच्या आयुष्याभोवती फिरतो, ज्याची स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबासाठी एक चांगली जीवनशैली मिळविण्याची अपेक्षा असते, पण त्यासाठी तो कुठलाही धोका पत्करण्यास किंवा काळाबरोबर वाटचाल करण्यास मात्र संकोच करीत असतो. पूर्वीच्या मालिकेप्रमाणेच यातही आजच्या मध्यमवर्गाची स्वतःचे आदर्श व  त्यांचे दैनंदिन जीवन आणि समस्या यात बॅलेन्स साधण्यात कशी त्रेधा तिरपीट उडते हे या शो मध्ये बघायला मिळणार आहे. 

सुविख्यात कार्टूनिस्ट आर.के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन वर आधारलेली, दूरदर्शनवरील ‘वागले की दुनिया’ मालिकेचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक कुंदन शाह व रवी ओझा यांनी केले होते. चालू वर्ष हे आर.के. लक्ष्मण यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने ही एकप्रकारे त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे असे मालिकेचे निर्माते जे.डी. मजेठिया यांचे म्हणणे आहे. आतिष कपाडिया यांनी मालिकेचे लेखक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. 

Website | + posts

Leave a comment