सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस् ७ फेब्रुवारीपासून कलर्स मराठीवर !

“कोरोनो” नामक वादळाने गेलं वर्षभर जगाला हादरवून सोडलं… गेल्या वर्षभरात कित्येकांना अनेक ताणतणावांना सामोरं जावं लागलं तर कित्येकांच्या चेहऱ्यावरचं हास्यही निमालं… पण आता निराशेची ही सगळी मरगळ झटकून नव्या वर्षात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायला सज्ज झालाय… महाराष्ट्राचा सुपरस्टार सुमीत राघवन!! आणि रसिकांची टेन्शन्स दूर करण्यासाठी हास्याचा ‘अनलॅाक’ करत कॅामेडीची सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार आहे, कलर्स मराठीवर!!  ७ फेब्रुवारीपासून दर रविवारी संध्या ७.०० वा. 

या “सुपरफास्ट कॅामेडी एक्सप्रेस्” ची सूत्रं सांभाळणार आहे, रसिकांचा लाडका, अष्टपैलू अभिनेता सुमीत राघवन! हिंदी चित्रपट, मालिका तसंच नाटकाच्या मंचावरून आजवर सुमीतने रसिकांची मनं काबीज केलीयत. यापूर्वी मराठी टेलिव्हिजन वर सोहळ्यांचा सूत्रसंचालक म्हणूनही तो रसिकांच्या भेटीला आला होता. मात्र एखाद्या मराठी शो चा सलग सूत्रसंचालक म्हणून या शो द्वारे कार्यक्रमाची एकहाती धुरा सुमीत पहिल्यांदाच सांभाळणार असून त्याच्यातील संवेदनशील, गुणी, हजरजबाबी कलावंताचे विविध पैलू या शोमधून उलगडले जाणार आहेत.

कॅामेडीच्या या सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये मराठी रंगभूमी गाजवणारे अनेक दमदार अवलिया कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावतील. आपल्या धमाल अभिनयाने हास्याची धुंवाधार आतषबाजी करण्याची … तर कधीकधी हसतांहसतां प्रेक्षकांच्या मनाला पाझर फोडण्याची ताकद या कलावंतांच्या अभिनयात आहे. प्रेक्षकांचे लाडके विनोदवीर म्हणजेच नंदकिशोर चौघुले, माधवी जुवेकर, रोहित माने, पूजा ठोंबरे, अभिजीत चव्हाण, शशिकांत केरकर, रोहित माने, पूजा ठोंबरे, प्रथमेश शिवलकर, शर्मेश बेतकर, “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेमधील तात्या अर्थात अक्षय टांक, मंदार मांडवकर, दिशा दानडे यांच्या सारख्या एकापेक्षा एक सरस आणि दमदार विनोदनिर्मिती करणाऱ्या नामांकित हास्यसम्राटांबरोबरच तितक्याच दमदार विनोदी संहिता लेखकांची दमदार खेळी रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमाची निर्मिती संहिता क्रिएशन्स करत असून आशिष पाथरे सारखा हरहुन्नरी कलावंत, रंगभूमीवर वावरणारा रंगकर्मी या शोचं लेखन, दिग्दर्शन सांभाळणार आहे.

या कार्यक्रमाविषयी बोलताना प्रमुख – मराठी टेलिव्हिजन, वायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “जगात अत्यंत दुर्मिळ गोष्ट म्हणजे आनंद. मध्यमवर्गीय माणसाला हसायला लावणं म्हणजे पुण्याचं काम आणि हसण्या हसवण्यांच्या ह्या खेळातले अत्यंत तरबेज खेळाडू घेऊन आम्ही येत आहोत, जे संपूर्ण महाराष्ट्राला खुमासदार विनोदाची मेजवानी देणार आहेत. “सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस” या कार्यक्रमाचा आधारस्तंभ आहे तो म्हणजे हरहुन्नरी अभिनेता सुमीत राघवन. सुमीत राघवनबद्दल बोलायचं झालं तर तो एक उत्तम, दर्जेदार कलावंत आहे. त्याचं या कार्यक्रमात असणं म्हणजेच प्रेक्षकांना मनोरंजनाची हमी देणं आहे. सुमीतमधील महत्त्वाचा गुण म्हणजे तो खूप चोखंदळ आहे. फार निवडकच कामं तो करतो आणि जी करतो त्यात तो हमखास प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडतो. आम्हाला खात्री आहे की, हा कार्यक्रमदेखील त्याला अपवाद असणार नाही. हा कार्यक्रम प्रेक्षकांना त्यांच्या रोजच्या ताणतणावातून घडीभर का होईना बाजूला करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल, याची खात्री आहे!”

कार्यक्रमाविषयी बोलताना सुमीत राघवन म्हणाला की, “मी आणि माझ्याबरोबर काही खास अतरंगी कलाकार सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस घेऊन येत आहोत. खूप उत्सुकता आहे मला कार्यक्रमाबद्दल, कारण याआधी मी काही पुरस्कार सोहळे वगळता मराठी टेलिव्हिजनवर तसं विशेष काम मी केलेलं नाही. हा माझा मराठीतला पहिलाच शो आहे… आशिष पाथरे जो या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा आहे त्याने मला कार्यक्रमाची संकल्पना ऐकवली आणि मला ती फार आवडली… कुणाच्याही अभिनयाचे परीक्षण मला करायचे नाहीय… मला फक्त हरहुन्नरी विनोदवीरांच्या मैफलीत धम्माल करायची आहे, त्यांच्या हास्याच्या वारीत सामील व्हायचेय. मनोरंजनाची ही वारी रसिकांसाठीही तितकीच आनंदवारी करण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न असणार आहे!!

मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक आशिष पाथरे म्हणाले, “सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस म्हणजे सर्व प्रकारच्या विनोदाची आणि मनोरंजनाची रेलचेल असणारी सुसाट एक्सप्रेस… लेखन दिग्दर्शनासोबत निर्माता म्हणून या कार्यक्रमाची धुरा सांभाळताना जितकी जबाबदारी वाढलीय तितकीच मौजही येतेय. मराठीतले नामवंत विनोदवीर आणि त्यांच्या जोडीला नव्या दमाचे अफलातून कुशल कलाकार… थोडक्यात नवं नाणं आणि जुनं सोनं घेऊन आम्ही येतोय. या सगळ्यांची मोट बांधून त्यांच्या सोबत विविधरंगी धुमशान घालण्यासाठी आपला आवडता सुपरस्टार सुमीत राघवन आहे. लेखकांची दमदार फौज आहे. उत्तम तंत्रज्ञ आहेत. वाहिनीचा पाठिंबा आहे. आम्ही सज्ज आहोत ! आता प्रतीक्षा आहे, ती रसिकप्रेमाची. त्यासाठी ७ फेब्रुवारीला ही “सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस्” कलर्स मराठीवर भरधाव सुटणार आहे”.

Website | + posts

Leave a comment