आधी कॉलेजला… मग नाट्यगृहाला..! ऋतुजा बागवे बद्दल आपणास हे माहीत आहे का?

कुठल्याही कलाकाराला त्याच्या कलेविषयी नितांत आदर असतो हे तर आपण नेहमीच पाहतो. असं म्हटलं जातं की, कलाकार त्याची कला आधी स्वतःसाठी जगत असतो, त्या पुढे नतमस्तक होत असतो आणि मग म्हणूनच त्याचा आनंद रसिकांना तितक्याच चांगल्या प्रकारे देऊ शकतो. शास्त्रीय गायक त्याच्या गुरुचे नाव घेताना नम्रतेने आणि आदराने घेतो. रंगकर्मी कोणत्याही व्यासपीठावर पाऊल ठेवण्यापूर्वी त्या पायरीशी हात लावून नतमस्तक होत असतो.

हे फक्त बोलायचे वाक्य नाही तर खरंच आजही अनेक कलाकार हे त्यांच्या कलेला आणि कलेला वाव देणाऱ्या मंचाला नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाहीत. एकांकिका, नाटक या माध्यमातून जिने अभिनयाची कारकीर्द घडवली आणि आज एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे ती ऋतुजा बागवे आजही कोणत्याही नाटकाच्या प्रयोगासाठी जाताना आधी थेट पोहोचते ती तिच्या कॉलेजमधल्या सभागृहाच्या पायरीजवळ. तिच्या महाविद्यालयीन जीवनात तिला अभिनयाची नस सापडली. महाविद्यालयांमध्ये तिने अनेक एकांकिका गाजवल्या. ज्या सभागृहात तिने पहिल्यांदा तिच्या आयुष्यात नाटकातील संवाद म्हटला कॉलेजमधल्या सभागृहात या पायरीला नमस्कार करून आजही तिच्या नाटकाच्या प्रयोगाला पोहोचते. नुकतीच ही आठवण ऋतुजा बागवे हिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Rutuja Bagwe in Marathi TV Serial Nanda Saukhya Bhare

ऋतुजाचे टिव्हीवर आगमन झालं ते ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून. या मालिकेतील कथानकासाठी लागणारा एक सोज्वळ चेहरा ऋतुजाचा रूपाने टीव्ही इंडस्ट्रीला मिळाला. चिन्मय उदगीरकर सोबत या मालिकेतील तिची जोडी तिच्या चाहत्यांना खूप आवडली. त्यानंतर रंगमंचावर आलेल्या ‘अनन्या’ या नाटकाने तिला घराघरात पोहोचवलं. या नाटकातील तिच्या अभिनयासाठी तिला विविध पुरस्कार देखील मिळाले. सध्या, ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत ऋतुजा सुबोध भावेची नायिका म्हणून दिसत आहे. स्वाती आणि अप्रत्यक्षरीत्या सुमन या भूमिका ऋतुजा साकारत असून तिच्या या नव्या व्यक्तिरेखेला देखील तिच्या चाहत्यांकडून चांगली दाद मिळत आहे. सध्या ऋतुजा मालिकांमधून दिसत असली तरी ऋतुजाचा पिंड हा नाटकाचा आहे. त्यामुळे नाटकाविषयी तिला विशेष आत्मीयता आहे.

Rutuja Bagwe with Subodh Bhave in TV Serial Chandra Aahe Sakshila

ती सांगते, अभिनयासाठी वेगवेगळी माध्यम आहेत. अर्थात या प्रत्येक माध्यमाचे वेगळे महत्त्व आणि वेगळे स्थान आहे हे मान्य. पण मला नाटक करताना एक आव्हान वाटतं. तो जिवंत अनुभव असल्यामुळे तिथे रिटेक नसतो, त्यामुळे तुम्ही जे कराल ते फायनल. माझ्या अभिनयाची सुरुवात देखील नाटकामुळे झाली. त्याकाळी कॉलेजमध्ये असताना खूप एकांकिका केल्या आणि त्यातूनच माझा अभिनय सुधारत गेला. कॉलेज हेच माझ्या अभिनयाची पहिली शाळा होती आणि म्हणूनच आज कुठेही नाटकाच्या प्रयोगासाठी जाताना माझी गाडी मी आधी माझ्या कॉलेज कडे वळवते. तिथल्या नाट्य सभागृहाला वंदन करूनच मी माझ्या व्यावसायिक नाटकाला सुरुवात करते. यातून मला खूप वेगळा आनंद मिळतो. पहिल्यावहिल्या प्रयोगांनी मला घडवलं त्याविषयीची आठवण देखील माझ्या मनात ताजी राहते.

Rutuja Bagwe in Ananya

ऋतुजा बागवे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय आहे. अलीकडेच तिने तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ऋतुजाने परळच्या महर्षी दयानंद महाविद्यलयात पदवी शिक्षण पूर्ण केलं. महर्षी दयानंद महाविद्यालय म्हणजे एम.डी. कॉलेज या नावाने सर्वश्रुत आहे. नॉट फॉर सेल, समथिंग क्रिएटिव्ह, स्मशानातील गुलमोहर, गेट सेट गो, उभे आडवे धागे, श्री तशी सौ, दादर व्हाया गिरगाव, थरारली वीट, कुंकू टिकल टॅटू, आयसीयू, सायलेंट स्क्रीम, जिलेबी या आणि अशा अनेक एकांकिका आम्ही गाजवल्या असे ऋतुजाने सांगितले. ‘नॉट फॉर सेल’ मधील तिच्या भाईच्या भूमिकेला आयुष्यातला सर्वात पहिलावहिला अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

लालबागमधील दत्त बोर्डिग आणि क्षीरसागर हॉटेलमध्ये कोंबडी वडे खायला आम्ही अधूनमधून जायचो. सोलकढी पैज लावून प्यायचो ती आठवणही तिने सांगितली. आजही नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला किंवा नवीन प्रोजेक्टच्या पहिल्या दिवशी मी कॉलेजला जाते. वास्तूला नमस्कार करते, मग कामाला सुरुवात करते असे तिने सांगितले.

Anuradha Kadam
+ posts

Leave a comment