प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात कधी आनंदी – सुखकर असतात, आल्हाददायक असतात तर कधी प्रेमाला रांगडा बाज असतो कारण ते पहिल्या नजरेत जुळलेलं किंवा फुलू लागलेलं प्रेम असेलच असं नाही. काहीवेळा प्रेमाची परिभाषा कळायला काही काळ जावा लागतो. ज्या व्यक्तीसोबत आपले विचार जुळत नाहीत, भांडणं होतात त्या व्यक्तीवर प्रेम जडू शकत नाही असं काही नसतं, त्या प्रेमाची जाणीव मात्र जरा उशिरा होते. हाच अबोल प्रेमाचा रांगडा बाज घेऊन येत आहेत अंतरा आणि मल्हार. जी व्यक्ती समोर आली तरी नकोशी वाटते, जिच्याबद्दल मनामध्ये पराकोटीचा तिरस्कार आहे तिच्यासोबतच साता जन्माच्या गाठी जुळल्या तर ? या कथेची निर्मिती टेल-अ-टेल मिडीयाने केली आहे. ‘जीव माझा गुंतला‘ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे २१ जूनपासून रात्री ९.३० वा. कलर्स मराठी वाहिनीवर. (Jeev Majha Guntala on Colors Marathi Channel from 21st June)
इतरांना वेळोवळी मदत करणं याची अंतराला आहे जाण आणि वेळ वाया न घालवणं हे मल्हारचं तत्वज्ञान. कशी जुळतील यांची मतं? पाहा नवी गोष्ट #JeevMajhaGuntala 21 जूनपासून सोम-शनि. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.#YogitaChavan @mesaorabh pic.twitter.com/rEkiHBvlPL
— Colors Marathi (@ColorsMarathi) June 14, 2021
मालिकेबद्दल बोलताना, मराठी टेलिविजन प्रमुख, (वायाकॉम18) दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “आपण सगळे जवळपास दीड वर्ष भीषण अशा महामारीशी लढतो आहे. ह्या संकटकाळी खरी परीक्षा आहे ती आपल्यातील नाते संबंधांची. नात्यांची विविध रूपं या काळात आपण अनुभवली. अशा वेळी आमची जबाबदारी विशेष वाढते. कारण मनोरंजन हे अत्यंत सशक्त माध्यम आहे. काही क्षणांचा विरंगुळा मनाला उभारी देतो. नात्यांच्या विविध पैलूंवर विचार करून आणि नात्यातील अनोखी बाजू मनोरंजनातून आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतोच. ग्रामीण महाराष्ट्राच्या पाश्वर्भूमीवर आधारित ‘जीव माझा गुंतला‘ मालिका एका सुंदर नात्याची वीण घालणार आहे.”.
मालिकेचे लेखक जिंतेंद्र गुप्ता म्हणाले, “जगाभरातली कोणतीही लोकप्रिय कथा असो मग ते महाभारत असो किंवा कोणत्याही स्वरूपात लिहिली गेलेली कथा. प्रत्येक कथेला वेगळेपण त्या कथेतली पात्रं देतात. त्या पात्रांमुळे ती गोष्ट लोकांच्या स्मरणात राहते. कथेपेक्षा त्या कथेतील पात्रं लोकांच्या मनात घर निर्माण करतात. ‘जीव माझा गुंतला‘ ही अशीच दोन वैशिष्ट्यपूर्ण, महत्त्वाकांक्षी व्यक्तींची गोष्ट आहे. जे महत्वाकांक्षी तर आहेतच पण त्यासोबत आपल्या आसपासचे वाटावेत असे आहेत. ”.