जिच्याविना वैकुंठाचा कारभार चालंना, एकल्या विठुरायला संसार पेलंना !!! जिथे देवसुध्दा त्याचा संसार एकटा सांभाळू शकत नाही तिथे आपल्यासारख्या सामान्य माणसांचे काय! पण दुर्दैवाने प्रत्यक्षात असं चित्र फार कमी ठिकाणी बघायला मिळतं… कुटुंबात अधिकार पुरुषाचाच अशी आपली पारंपरिक विचारसरणी. खरंतर संसाररथाचा तोल सावरला जातो तो स्त्रीमुळेच… प्रत्येक कुटुंबाला पूर्णत्त्व येतं ते स्त्रीच्या अस्तित्त्वामुळे… घराला घरपण हे तिच्यामुळेच असते…पण तरीदेखील डावललं जातं तिलाच… सासरच्यांना सून अशी हवी असते जी घरातल्या चौकटीत बसेल आणि नवर्याला अशी बायको हवी जी त्याच्या अपेक्षांना पूर्ण करेल… याच धाग्याला घेऊन कलर्स मराठी (Colors Marathi) घेऊन येत आहे नवी मालिका ‘बायको अशी हव्वी’ (Bayko Ashi Havvi) १७ मेपासून सोम ते शनि रात्री ८.३० वा. ! मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्सने केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
भय्यासाहेब राजेशिर्के हे खूप मोठं प्रस्थ मानलं जातं… त्यांचा मुलगा विभास ज्याच्या खांद्यावर घराची, व्यवसायाची जबाबदारी आहे… बाहेरून बघता राजेशिर्के एक आदर्श कुटुंब आहे… पण घरातलं आतलं चित्र मात्र या विरुध्द आहे… पुरूषांचे वर्चस्व घरामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आले आहे… घरातील स्त्रियांच्या म्हणण्याला काडीमात्र महत्त्व दिले जात नाही, त्यांची इच्छा जाणून घेतली जात नाही आणि यामध्ये बायकांची घुसमट होत आहे. याउलट एका छोट्या गावातील मध्यमवर्गीय कुटुंब जे स्त्री – पुरुष असा भेदभाव अजिबात मानत नाही…अशा घरात वाढलेली आजच्या विचारांची मुलगी जान्हवी जेव्हा पुरुषप्रधान संस्कृती रुजलेल्या घरामध्ये लग्न होऊन येते तेव्हा काय घडतं? हा प्रवास पाहणं रंजक असणार आहे.
नाती तोडणं सोपं पण जोडणं कठीण…आणि नाती जोडण्याचं काम बायकोलाच जमतं… हो ना? पाहा नवी गोष्ट #BaykoAshiHavvi 17 मेपासून रात्री 8.30 वा. #ColorsMarathi वर.#VikasPatil #GauriDeshpande pic.twitter.com/rleKuKWIwy
— Colors Marathi (@ColorsMarathi) May 10, 2021
मालिकेबद्दल बोलताना प्रमुख – मराठी टेलिव्हीजन, वायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “आपल्याकडे अनेक वर्षांपासून लग्न म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे, कुटुंबाचा सांभाळ तुलाच करायचा आहे असं मुलींना सांगितल जातं. खरंतर संसार दोघांचा असतो. पण अपेक्षा मात्र फक्त मुलीकडून असतात… या सगळ्यामध्ये मुलीला गृहित धरलं जातं, पुरुषांनी आखून दिलेल्या कुंपणात तिला जगावं लागतं… जुन्या विचारांचं कुंपण तोडून, खर्या अर्थाने जोडीदारासोबत संसाराचं नवं चित्र उभ्या करू पाहणार्या एका मनस्वी नायिकेची कथा म्हणजे आमची नवी मालिका “बायको अशी हव्वी”.
मालिकेचे लेखक – दिग्दर्शक विरेन प्रधान म्हणाले, “शेंदूराचे लेप खरवडले की आत मूर्तीऐवजी दगड सापडतो, तसंच आधुनिकतेचा, संमजसपणाचा लेप खरवडला की बहुसंख्य पुरुषांचा स्त्रियांकडे बघण्याचा जुनाट दृष्टिकोन आजही तसाच आहे हे जाणवतं…लग्न करताना मुलगी बायको मटेरिअल पाहिजे म्हणजे स्वयंपाकपाणी करणारी, घर सांभाळणारी असावी आणि ते तिचं मुख्य ध्येय असावं हे पाहिलं जातं.. हे ध्येय नवरा आणि बायको दोघे मिळून निभावू शकतात याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं जातं. अजूनही बाईची कर्तव्य आणि पुरुषाची कर्तव्य अशी लेबलं लावूनच बायकांकडे पाहिलं जातं.. या मुखवटयाचं.. मुखवटयांआड घुसमटणा-या स्त्रियांची, आणि ते मुखवटे फाडून नवं, ख-या सहजीवनाचं चित्र उभं करणा-या नायिकेची ही गोष्ट आहे”.
‘बायको अशी हव्वी’ १७ मेपासून सोम ते शनि रात्री ८.३० वा कलर्स मराठीवर.