काही चेहरे सातत्याने आपल्या समोर येत असतात पण त्यांच्याबद्दल फारसे कुठे वाचण्यात येत नाही. इन्स्पेक्टर अभिजीत उर्फ आदित्य श्रीवास्तव हे त्यापैकीच एक नाव. अर्थात आदित्य श्रीवास्तव ही जरी त्याची खरी ओळख असली तरी रसिक प्रेक्षक त्यास इन्स्पेक्टर अभिजीत नावानेच ओळखतात. याला कारण असते त्या अभिनेत्याची प्रतिभा व त्याने घेतलेली मेहनत.

आदित्य दिल्लीहून मुंबईत आला ते साल होते १९९५. त्याआधी तो दिल्लीत होता. तसा आदित्य मूळचा अलाहाबादचा. सामान्य मध्यमवर्गीय घरातला. वडील बँकेत नौकरीला. आदित्यने अलाहाबादेत पदवीचे शिक्षण घेत असताना, हिंदी रंगमंचावर बरेच काम केले पण अभिनयाच्या वेडाने त्याला दिल्लीत आणले. तिथे दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या नजरेस पडला व त्यांनी आदित्यला ‘बँडीट क्वीन’ सिनेमात रोल ऑफर केला. आदित्यने त्यात फुलन देवीच्या नवऱ्याचा रोल केला होता. या सिनेमानंतर आदित्य मुंबईत नशीब आजमाविण्यासाठी आला आणि तो मग इथलाच झाला. १९९५ ते ९७ या काळात त्याने जाहिरातीसाठी डबिंग आर्टिस्ट व बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका केल्या. ९७ साली मात्र सिनेमासाठी म्हणून आदित्यने टेलिव्हिजन वरून ब्रेक घेतला.

या ब्रेकचा फायदा असा झाला कि रामगोपाल वर्मा च्या ‘सत्या’ मध्ये आदित्यला ‘इन्स्पेक्टर खंडिलकर’ ही लक्षवेधी भूमिका मिळाली व याच भूमिकेची नोंद घेऊन आदित्यला संधी मिळाली सीआयडी मालिकेत ‘इन्स्पेक्टर अभिजीत’ म्हणून! मालिकेचे निर्माते बी.पी. सिंग यांना आदित्यने ‘सत्या’ मध्ये रंगविलेला इन्स्पेक्टर खूपच आवडला होता. व अशा रीतीने आदित्य भारताच्या सर्वात जास्त काळ चाललेल्या व बरेच रेकॉर्ड मोडीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या मालिकेचा अविभाज्य घटक बनला. दिल से, दिल पे मत ले यार, साथिया, लक्ष्य, दिवार, गुलाल, दंश, मातृभूमी, ब्लॅक फ्रायडे, सुपर ३० आदी काही या सिनेमांमधून आदित्यने लक्षात राहतील अशा भूमिका साकारल्या आहेत. सोबतच काही दाक्षिणात्य चित्रपटातही आदित्यने काम केलंय.

सिनेमा क्षेत्रातील करिअर सुरु करण्यापूर्वी हिंदी रंगभूमीवर केलेल्या कामाचा आदित्यला पुढे खूप फायदा झाला. आदित्यचा भारदस्त आवाज व नजरेतील भेदकता हा त्याचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे.

– टीम नवरंग रुपेरी

Website | + posts

Leave a comment