आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Veteran actor Vikram Gokhale passed away at the age of 77. हिंदी आणि मराठी सिने आणि नाट्य जगताने आज एक दिग्गज आणि प्रतिष्ठित अभिनेता गमावला आहे! पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते  विक्रम गोखले यांचे आज वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले.

आज सकाळपासूनच विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांना १५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विक्रम गोखले पुण्यात एक अभिनय प्रशिक्षण अकादमी चालवत होते, जिथे ते गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या पत्नीसह राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली गोखले व दोन मुली असा परिवार आहे. विक्रम गोखले हे अभिनेत्यांच्या कुटुंबातील होते. त्यांची आजी अभिनेत्री होती, तर वडील चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपट आणि रंगमंच कलाकार होते.

विक्रम गोखले यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही मनोरंजनाच्या क्षेत्रात त्यांच्या अभिनयानं वर्चस्व केलं आहे. त्यांनी आता पर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. तर 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.  रंगभूमीचा एक मोठा काळ त्यांनी गाजवला. सध्या विक्रम गोखले तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. काही वर्षांपूर्वी अग्निहोत्री मालिकेतून विक्रम गोखले प्रेक्षकांसमोर आले. या हे मालिकेतील पात्रही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ (१९९९) मध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांच्या भूमिकेत त्यांनी प्रभावी कामगिरी केली. विक्रम गोखले यांनी ‘हे राम’, ‘तुम बिन’, ‘भूल भुलैया’, ‘हिचकी’ आणि ‘मिशन मंगल’ यांसारख्या बॉलीवूड हिट चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यांचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ‘निकम्मा’ (२०२२) होता, ज्यात अभिमन्यू दासानी, शर्ली सेटिया आणि शिल्पा शेट्टी सह-अभिनेत्री होते.

दरम्यान, फक्त विक्रम गोखले नाही तर त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. 1913 साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी देखील 70 हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. विक्रम गोखले हे  सक्रिय सामाजिक कार्यकर्ते देखील होते. त्यांच्या कुटुंबाचे चॅरिटेबल फाउंडेशन अपंग सैनिक, कुष्ठरोग्यांची मुले आणि अनाथ मुलांचे शिक्षण यासाठी आर्थिक मदत करीत असते.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment