आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

One of India’s most popular television and radio voices, interviewer and talk show host, Tabassum Govil passed away today in Mumbai. भारतातील सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन आणि रेडिओ आवाजांपैकी एक, मुलाखतकार, अभिनेत्री आणि टॉक शो होस्ट, तबस्सुम गोविल यांचे आज वयाच्या ७८ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या स्मरणार्थ २१ नोव्हेंबरला प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तबस्सुम यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. दूरदर्शनवरील तब्बल २१ वर्षे चाललेला फुल खिले हैं गुलशन गुलशन हा त्यांचा सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय शो होता जिथे त्या सेलिब्रिटींशी संवाद साधत असत. त्यांच्या या कार्यक्रमातील असंख्य मुलाखती म्हणजे सादरीकरणाचा आदर्श नमुना म्हणून बघितल्या जातात. त्यांचा मृदू आवाज, मनमोकळा आणि कायम हसमुख स्वभाव, शायराना अंदाज आणि भाषेवरील प्रभुत्व यामुळे हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता.

तबस्सुमचे लग्न लोकप्रिय टीव्ही स्टार अरुण गोविल यांचे भाऊ विजय गोविल यांच्याशी झाले होते. तबस्सुम यांचा  जन्म ९ जुलै १९४४ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील अयोध्यानाथ सचदेव हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांची आई असगरी बेगम लेखिका आणि पत्रकार होत्या. १९४७ मध्ये फक्त तीन वर्षांच्या असतांना तबस्सुम यांनी बालकलाकार म्हणून नर्गिस (1947) त्यानंतर मेरा सुहाग (1947), मंझधर (1947) आणि बारी बहन (1949) या चित्रपटातून पदार्पण केले. नंतर नितीन बोस दिग्दर्शित दीदार (1951) मध्ये त्यांनी नर्गिसच्या बालपणीची भूमिका केली; लता मंगेशकर आणि शमशाद बेगम यांनी गायलेले बच्पन के दिन भुला ना देना हे हिट गाणे त्यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. त्यानंतर त्या विजय भट्ट दिग्दर्शित आणखी एक महत्त्वाचा चित्रपट बैजू बावरा (1952) मध्ये दिसल्या, जिथे त्या मीना कुमारीच्या बालपणीच्या भूमिकेत दिसल्या. त्यांनी जॉय मुखर्जी आणि आशा पारेख अभिनीत फिर वही दिल लाया हूं या लोकप्रिय चित्रपटातही काम केले होते. तबस्सुम यांनी आपले शालेय शिक्षण अंजुमान ईस्लाम गर्ल हायस्कूल मधून पूर्ण केले व अलीगड विद्यापीठातून बीए पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करतानाच तबस्सुम यांनी गुरु कृष्णा कुट्टी यांच्या कडून ‘भरत नाट्यम’ व ‘कथकली’ चे प्रशिक्षण घेतले होते. 

त्यांनी  ‘अजी किबला मोहतरमा’ या सुंदर गाण्यातही काम केले आहे. त्यांनी भारतीय टेलिव्हिजनचा पहिला टॉक शो, फूल खिले हैं गुलशन गुलशन होस्ट केला, जो 1972 ते 1993 पर्यंत 21 वर्षे चालला. या कार्यक्रमासाठी त्यांना सुरुवातीला एका भागासाठी ७० रुपये मिळत असत. दूरदर्शन केंद्र मुंबई द्वारा निर्मित, हा चित्रपट सेलिब्रिटींच्या मुलाखतींवर आधारित होता आणि प्रचंड लोकप्रिय झाला. ‘फूल खिल है गुलशन-गुलशन’हा तबस्सुम यांचा शो त्या वेळी इतका लोकप्रिय झाला होता की, प्रत्येक आठवड्यात लोक त्यांचा कार्यक्रम टीव्हीवर येण्यापूर्वी तयार होऊन बसायचे. त्या गृहलक्ष्मी या हिंदी महिला मासिकाच्या 15 वर्षे संपादक होत्या आणि त्यांनी अनेक विनोदी पुस्तके लिहिली. त्यांनी ११ पुस्तके लिहीली होती. यात काही उर्दु शायरी आहेत तर काही जोक्सची पुस्तके आहेत. 1985 मध्ये, त्यांनी  तुम पर हम कुर्बान हा त्यांचा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. गेल्या काही वर्षांपासून त्या टीव्ही एशिया यूएसए आणि कॅनडावर हिंदी चित्रपटाच्या सुवर्ण युगावर आधारित ‘अभी तो मैं जवान हूं’ शीर्षकाचा टीव्ही कार्यक्रम सादर करीत होत्या. त्यांनी यु-ट्यूब वर “तबस्सुम टॉकीज” नावाने स्वतःचे चॅनल सुरू केले आहे, ज्यामध्ये नॉस्टॅल्जिक चर्चा, सेलिब्रिटींच्या मुलाखती, शायरी, विनोद आणि बरेच काही असे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment