मेजर संदीप उन्नीकृष्णनच्या भूमिकेच्या प्रवासाच्या आठवणी सांगणारा भावनिक व्हिडिओ अभिनेता आदिवि शेषने शेअर केला आहे. 

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या पुण्यतिथीनिमित्त २७ नोव्हेंबर रोजी मेजरच्या टीमने या सिनेमाची सुरुवात कशी झाली याची कहाणी या व्हिडिओद्वारे सांगत संदीपला श्रद्धांजली वाहिली आहे. शशी किरण टिक्का दिग्दर्शित आगामी ‘मेजर’ चित्रपटात अभिनेता आदिवी शेष संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या आठवणी सांगतांना, आदिवींनी मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आई-वडिलांना भेटण्यापासून ते चित्रपट पूर्ण करण्यापर्यंतचा प्रवास कसा भावनिक होता याबद्दल सांगितले आहे. 

संदीप उन्नीकृष्णन यांची पहिली आठवण सांगताना आदिवी सांगतात, “मी फक्त इतकेच म्हणू शकतो की संदीपने माझ्या आयुष्यावर पहिल्या क्षणापासूनच प्रभाव टाकला आहे.  २००८ सालापासून चॅनेलवर त्याचे पहिले पासपोर्ट चित्र पाहूनच मला त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. त्याच्या चेहऱ्यावरील पॅशन, नजरेतील भेदकता व ओठांवरील स्मित हास्य मला त्याच्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी पुरेसे होते. फोटोमागची कहाणी सांगताना आदिवी म्हणाले , “मला नंतर संदीपच्या आई-वडिलांकडून कळाले की पासपोर्ट फोटो काढताना त्याला हसू आवरत नव्हते, परंतु फोटोग्राफरने रागवल्यामुळे तो त्याचे हसणे कंट्रोल करीत होता.”

 

 

मेजरच्या आई-वडिलांची सहमती मिळविण्यासाठी कराव्या लागलेल्या धडपडीची  आठवण करून देताना आदिवी म्हणाले, “मी पहिल्यांदा मेजर संदीपच्या वडिलांशी बोललो तेव्हा त्यांचा यावर विश्वास बसला नाही की कोणी संदीपच्या आयुष्याचा दहा वर्षांपासून अभ्यास करत आहे आणि त्यांना चित्रपट काढायचा आहे.  आमची  टीम आणि मी सतत काका-काकूंना भेटत राहिलो, मला वाटतं चौथ्या किंवा पाचव्या भेटी नंतर त्यांनी माझ्यावर थोडासा विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. चौथ्या भेटीनंतर काकांनी माझ्याकडे अगदी मनापासून पाहिले, व म्हणाले की आता मला तुमच्यावर १०% विश्वास बसला आहे की खरंच तुम्हाला चित्रपट बनवायचा आहे’

संदीप उन्नीकृष्णनच्या आईसोबतच्या भावनिक अनुभवाबद्दल आदिवी शेष म्हणाले, “आम्ही काका-काकूंना बाय म्हणून दूर लिफ्टजवळ उभे होतो तेंव्हा दुरून काकू माझ्याकडे बघत होत्या व त्यांनी मला परत त्यांच्याजवळ बोलावले आणि त्या म्हणाल्या, “तु दुरून मला माझ्या मुलासारखाच दिसत होतास.” असे म्हटल्यावर आम्हा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू आले. ही एकप्रकारे मला मिळालेली परवानगी होती. “

अखेरीस आदिवी शेष म्हणाले की, “मला आशा आहे की माझ्यात असलेल्या मेजर संदीपचा आत्मा शोधण्याचा माझा हा नम्र प्रयत्न तुम्हाला आवडेल.” शशी किरण टिक्का दिग्दर्शित, आदिभा शेषा, शोभिता धुलीपाला आणि सई मांजरेकर अभिनीत हा द्वैभाषिक चित्रपट हिंदी आणि तेलगू या दोन्ही भाषेत २०२१ साली प्रदर्शित होईल.

 

Website | + posts

Leave a comment