बंगाली सिनेमाचे दिग्गज अभिनेते ‘सौमित्र चटर्जी’ यांचे निधन

कोलकाता – प्रसिद्ध व ज्येष्ठ बंगाली चित्रपट व रंगभूमीचे अभिनेते, कवी सौमित्र चटर्जी यांचे विविध आजारांमुळे एका महिन्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आज रविवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. ज्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांनी निवेदन जारी करुन ही माहिती दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. कोविड -१९ पासून त्रस्त आढळल्यानंतर चॅटर्जी यांना ६ ऑक्टोबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा संसर्ग बरा झाला पण तब्येत सुधारली नाही कारण त्यांना अनेक आजारांनीही ग्रासले होते.
सौमित्र चॅटर्जी म्हणजे जणू बंगाली सिनेमाचे दिलीप कुमारच. १९५९ ते गेल्या वर्षी २०१९ पर्यंत सौमित्र यांनी असंख्य चित्रपटांमधून एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या चित्रपटातील भूमिकांसाठी ते विशेषकरून ओळखले जात. सत्यजित रेंसोबत त्यांनी चौदा चित्रपटांमध्ये काम केले होते. तीन कन्या, अभिजन, बघिनी, अशनी संकेत, अंतर्धान, देखा, संसार सीमांथे, कोनी, अग्निसंकेत, क्रांतिकाल, पोडोखेप ही काही सौमित्र यांच्या अतिशय गाजलेल्या चित्रपटांची नावे.
सौमित्र चट्टोपाध्याय यांना फ्रान्सचा कलाकारांचा सर्वोच्च पुरस्कार, ‘ऑर्ड्रे देस आर्ट्स एट देस लेट्रेस’ मिळविणारे ते पहिले भारतीय अभिनेते होते. भारतीय सिनेमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे ते विजेते होते. सौमित्र चॅटर्जी यांना अभिनेता म्हणून दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि बंगाली नाट्यगृहातील अभिनेता म्हणून त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, ७ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. २००४ साली त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
सौमित्र चॅटर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– टीम नवरंग रुपेरी
Website | + posts

Leave a comment