बर्थडे स्पेशल-सिल्कचा जन्मदिन व दि डर्टी पिक्चरची ९ वर्षे

– अजिंक्य उजळंबकर 

 

सुसंस्कृत प्रेक्षकांनी कितीही नाके मुरडली तरी भारतीय सिनेमा उद्योगाला एक असाही हमखास प्रेक्षकवर्ग आहे ज्याला आंबटशौकीन असे म्हटले जाते. ए, बी व सी ग्रेड सिनेमा प्रमाणेच तो प्रेक्षकही विभागला गेलाय. सुरुवातीपासून. मग हा सिनेमा उद्योग हिंदीतला असो वा दक्षिणेतला. दक्षिणेत १९८० च्या दशकात जिच्या बोल्ड ऍक्ट ने धुमाकूळ घातला होता ती अभिनेत्री म्हणजे सिल्क स्मिता. सिल्क स्मिताच्या सिनेमांचा चाहतावर्ग आधी दक्षिणेत तयार झाला व नंतर ते सिनेमे हिंदीत डब झाल्यावर हिंदीतील प्रेक्षकही या नायिकेकडे आकर्षिले गेले. ८० च्या दशकातील सेक्स सिम्बॉल म्हणून ओळख निर्माण करणारी सिल्क स्मिता हिचा आज जन्मदिन व आजच्याच दिवशी ९ वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यावर आधारित सिनेमा दि डर्टी पिक्चर प्रदर्शित झाला होता. 

सिल्क स्मिताच्या भूमिकेचे प्रचंड अवघड असे आव्हान स्वीकारणारी अभिनेत्री विद्या बालन हिचं खरंतर कौतुक करावयास हवे. वैविध्यपूर्ण व चोखंदळ भूमिका सहजतेने साकारणारी अभिनेत्री अशी जरी विद्याची ओळख असली तरी कुठलीही ए-ग्रेड सिनेमाची नायिका एखाद्या बी अथवा सी ग्रेड सेक्स सिम्बॉल अभिनेत्रीचा रोल इतक्या सहजतेने स्वीकारत नाही. कंगना राणावत व बिपाशा बासू च्या नकारानंतर हा रोल विद्याला ऑफर झाला होता. उत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्कारासह एकूण ९ पुरस्कार या भूमिकेसाठी विद्याने पटकावले. २०१२ ला दिले गेलेले सर्व पुरस्कारांच्या यादीवर नजर टाकली तर दि डर्टी पिक्चर ला विविध श्रेणींमध्ये मिळून तब्बल ९० च्या वर नामांकन मिळाली व त्यातील अर्ध्याच्या वर पुरस्कार या सिनेमाने जिंकले सुद्धा. विद्यासह यात दिग्दर्शक मिलन लुथरिया, संगीतकार विशाल शेखर, अभिनेते नसिरुद्दीन शाह, इम्रान हाश्मी, निर्माती एकता कपूर, गायिका श्रेया घोषाल, कमाल खान, गीतकार रजत अरोरा, संगीतकार बप्पी लाहिरी, वेशभूषाकार निहारिका खान, मेक-अप आर्टिस्ट विक्रम गायकवाड आदींचा प्रामुख्याने समावेश होता. यातील विद्या, निहारिका व विक्रम गायकवाडने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली. 

१९९६ साली सिल्क स्मिताने राहत्या घरी आत्महत्या केली तेंव्हा तिचे वय अवघे ३५ वर्षांचे होते. १९७९ साली म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी सुरु झालेल्या चित्रपट प्रवासात तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, हिंदी भाषेतील असंख्य चित्रपटात सिल्कने काम केले. आज ज्या सहजतेने नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राईम व्हिडीओ, अल्ट बालाजी इत्यादी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सॉफ्ट पॉर्न उपलब्ध होते तसा तो काळ नव्हता. सुसंस्कृत घरातील प्रेक्षक इरॉटिक कॅटॅगिरी चे सिनेमे थिएटरमध्ये जाऊन पाहणे तर सोडाच, त्याकाळी मिळत असलेल्या व्हिडीओ कॅसेट्स वरही सहजतेने बघू शकत नव्हते. त्यामुळे सिल्क स्मिता म्हणजे त्याकाळातील इरॉटिक सिनेमा मध्ये झालेली एकप्रकारे क्रांती होती. 

 

सिल्कचे खरे नाव विजयालक्ष्मी वदलापटला. आंध्रप्रदेशातील एका छोट्याशा खेड्यातला जन्म. घरच्या आर्थिक अडचणींमुळे सिल्कचे चौथीनंतर शिक्षण होऊ शकले नाही. घरच्यांनी लवकर लग्न लावले परंतु सासरच्या जाचाला कंटाळून सिल्कने तिथून पळ काढला. विणू चक्रवर्ती या उद्योगपतीच्या छत्रछायेखाली वाढली. तिथेच डान्स व इंग्रजी भाषा शिकली. स्मिता हे नामकरण विणूनेच केले. आधी साईड आर्टिस्ट मग कॅब्रे डान्सर मग व्हॅम्प असे करत करत १९७९ साली ‘वंडीचक्करम’ या तामिळ सिनेमाद्वारे पहिला मोठा ब्रेक मिळाला ज्यात तिने साकारलेल्या पात्राचे नाव होते सिल्क. मग इथून पुढे सिल्क स्मिता हे नाव तिने स्वतःला लावून घेतले. मोठमोठ्या दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्रींच्या सिनेमांना जेवढी गर्दी होत नसेल तितकी गर्दी एकटी सिल्क स्मिता केवळ स्वतःच्या नावावर ओढत असे, एवढा तिचा दबदबा होता. भलेही तो तिच्या इमेजमुळे असेल व सिनेमातल्या बोल्ड कंटेन्ट मुळे पण सिल्क तेंव्हा रुपेरी पडद्यावर राज्य करायची हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. १९८९ साली मूळ मल्याळम भाषेत आलेल्या ‘लयनम’ (हिंदीत ‘रेशमा कि जवानी’) या सिनेमाने तर त्याकाळी आंबटशौकिनांच्या जगात धुमाकूळ घातला होता. आजही या सिनेमाला या कॅटॅगिरीतल्या सिनेमात कल्ट क्लासिक म्हणून पाहिले जाते. सिल्कला या सिनेमाने जगभरात दक्षिण भारतीय सिनेमाची सेक्स सिम्बॉल ही ओळख मिळवून दिली. 

आजच्या दिवशी म्हणजेच सिल्कच्या जन्मदिनी, २०११ साली आलेल्या ‘दि डर्टी पिक्चर’ सिनेमानेही सिल्क स्मिता च्या इतर सिनेमांप्रमाणे धुमाकूळ घातला. “ऊ लाल ऊ लाला” या बप्पीदांच्या आवाजातील गाणे देशभरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. संगीतकार विशाल शेखर यांना याचे श्रेय जाते. बॉक्स-ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट म्हणून याला घोषित करण्यात आले. सिल्कची कधीही ना सांगितली गेलेली पडद्यामागची कथा प्रेक्षकांना कळाली. 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment