स्मृतिदिन विशेष- ‘घुंगरू की तरह बजता ही रहा हूं मै’… शशी कपूर 

-विवेक पुणतांबेकर

कपूर बंधू मधला अखेरचा दुवा निखळून आज तीन वर्षे पूर्ण झाली. प्रदिर्घ आजारानंतर कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये शशी कपूर यांनी आजच्या दिवशी २०१७ साली अखेरचा श्वास घेतला. तसे त्यांचे शेवटचे जाहीर दर्शन शम्मीकपूर यांच्या अंतिम यात्रेत झाले. सिनेमाच्या मोहमयी दुनियेत  अभिनयाचा वारसा लाभलेल्या कपूर खानदानात आपला वेगळा ठसा उमटविणारे शशीकपूर पडद्यावर पहिल्यांदा दिसले राज कपूर यांच्या ‘आग’ सिनेमात. तेव्हा ते शाळकरी मुलगा होते. यानंतर ‘आवारा’तले त्यांचे काम पण लक्षात रहाण्यासारखे होते.

 

पापाजींची नाटक कंपनी असल्याने पडेल ते काम करण्याची रंगमंचाची शिस्त त्यांना  पुढील आयुष्यात अभिनेता बनायला उपयोगी पडली. शालेय शिक्षण पुर्ण करतानाच ते नाट्य अभिनेते बनले. याच कालखंडात ब्रिटिश अभिनेते केंडल आपली नाटक कंपनी घेऊन मुंबईत आले. शशी कपूर त्यांच्या नाटक कंपनीत अभिनय करता करता केंडल यांची कन्या जेनिफर च्या प्रेमात पडले आणि कालांतराने जेनिफर त्यांची जीवनसाथी बनली. सिनेविश्वात शशी-जेनिफर हे आदर्श जोडपे होते. सिनेमात नायक म्हणून त्यांना संधी दिली बी.आर.चोप्रा यांनी ‘धरमपुत्र’ सिनेमात. इथून शशी कपूर यांचा सिनेप्रवास सुरु झाला. बिमल रॉय यांच्या ‘प्रेमपत्र’ मधली अंध व्यक्ती रेखा शशी कपूर नी सुरेख रंगवली. पण त्या कालखंडात यश लाभले नाही. अपयशी नायक म्हणून निर्माते शशी कपूर ना टाळत असत. निर्माते/दिग्दर्शक हिरेन खेरा (राज कपूर यांचे सचिव आणि सहाय्यक) यांचा ‘जब जब फुल खिले’ यशस्वी झाला आणि शशी कपूर यांचे भाग्य उजळले. अपयशी शिक्का पुसला गेला.

 

आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीच्या कालखंडात शशी कपूर भुमिका निवडताना अतिशय चोखंदळ होते. निर्माते दिग्दर्शक नासिर हुसेन यांच्या ‘प्यार का मौसम’ चा रोल त्यांनी आधी नाकारला. नासिर हुसेन नी राज कपूर ना मध्यस्थी करायला सांगितले. राज कपूर नी शशीकपूर ना बोलावून कारण विचारले. शशी कपूर नी सांगितले हा व्यावसायिक सिनेमा आहे मला पटत नाही. राज कपूर नी शशी कपूर ना ‘जागते रहो’ चे बक्षीस दाखवून सांगितले “जागते रहो ने मी त्या वर्षी सर्वोत्तम निर्माता बनलो पण सिनेमा चालला नाही. काय उपयोग अश्या बक्षीसाचा??? तू आपले काम मनापासून करत जा व्यावसायिक किंवा कलात्मक असा विचार करू नकोस.”  शशी कपूर नी ‘प्यार का मौसम’ स्वीकारलाच पण राज कपूर नी दिलेला सल्ला आयुष्यभर मानला. ‘वक्त’ सारख्या मल्टिस्टार सिनेमात आपला ठसा उमटवणारे शशी कपूर यानंतर अनेक मल्टिस्टार सिनेमात चमकले.

 

सिनेजगतात शशी कपूर यांचे नाव अतिशय आदराने घेतले जात असे. विनम्रता, कसलाही त्रास न देता निर्मात्याला ते सहकार्य देत. प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे त्यांची पत्नी असते ही गोष्ट शशी कपूर यांच्याबाबतीत अक्षरशः खरी होती. जेनिफर शशी कपूर यांच्या पोशाखापासून ते आहारापर्यंत सगळ्यात लक्ष घालायची. याचा परिणाम इतर कपूर बंधू प्रमाणे स्थूलत्व न येता कित्येक वर्ष शशी कपूर सडसडीत राहीले. कलात्मक सिनेमे काढायची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देईना. फिल्मवालाज या आपल्या संस्थेतर्फे, जूनून, कलयुग, ३६ चौरंगी लेन, विजेता, उत्सव, आणि अजुबा हे  सिनेमे काढले खरे पण बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळू शकले नाही. मिळवलेला बहुसंख्य पैसा यात गेला. ‘जूनून’ च्या वेळी पनवेल येथे घेतलेली जमीन विकावी लागली.

 

रंगभूमीवर अतिशय प्रेम असलेले शशी कपूर शिवाजी मंदिर ला मराठी नाटकाला नियमित येत इतकेच नाही तर छबिलदास मधल्या प्रायोगिक नाटकाला पण हजेरी लावत. त्यांचा मुलगा कुणाल जाहिरातपटात काम करायचा. करण सिनेमात नायक म्हणून अपयशी ठरला. मुलगी संजना अभिनेत्री आहे. शशी कपूर नी पापाजींची नाट्यसंस्था परत सुरु केली. तो वारसा संजना पुढे चालवते आहे. जेनिफर कॅन्सरने गेली. यानंतर शशी कपूर काही काळ खचले. त्यातून सावरले पण मग सगळीच बंधने संपली आणि उत्तर आयुष्यात देखणे शिडशिडीत शशीकपूर प्रचंढ स्थूल झाले. अभिनेत्यांची एकेक पिढी संपत गेली. या महान अभिनेत्याला त्याच्या स्मृतिदिनी माझी आदरांजली.

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment