जन्मदिन विशेष-‘जिंदगी ख्वाब है’…मोतीलाल

– इसाक मुजावर

मोतीलाल त्या काळातलाच नावात लाल असलेला आपल्या चित्रपटातला एक नट होता. या उपर तुम्हाला त्याची अधिक ओळख हवी असेल तर नर्गिस ज्या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून राज कपूरला पाणी पाजताना दिसली होती तो 1956 चा आर.के.चा ‘जागते रहो’ हा चित्रपट आठवा. या चित्रपटातील मुकेशचे ‘जिंदगी ख्याब है’ हे गाणे गाणार्‍या नटाचा चेहरा डोळ्यांसमोर आणा. हा चेहरा मोतीलालचा होता. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा विशेष लेख. (नवरंग रुपेरी दीपोत्सव विशेषांक-२०१० च्या अंकात प्रकाशित )

राज कपूर आज आपल्यात नाही. नर्गिसही आपल्यात नाही. तरीही अधून-मधून अशी कधी तरी त्या दोघांची आठवण येते. या आठवणीत त्या दोघांपैकी कोणा एकाचाा आपण स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही. राज कपूरच नाव कोणी काढल तर नर्गिस आपल्याला आठवते आणि नर्गिसच नाव कोणी काढल तर राज कपूर आपल्याला आठवतोच. त्या दोघांची जोडीच तशी जमली होती हो. एकमेकांपासून अलग करून त्या दोघांचा कोणालाही स्वतंत्रपणे विचारसुद्धा करता येऊ नये अशी.
ते दोघेही त्या काळात एकमेकांशिवाय आपला विचार करायचे नाहीत. यामुळे राज कपूरच्या आर.के.च्या प्रत्येक चित्रपटात नर्गिस तेव्हा त्याची नायिका असायची. नर्गिसही तेव्हा कोणी निर्माता नायिकेची भूमिका करावी म्हणून तिच्याकडे गेला तर आपल्याबरोबर राज कपूरच नायक हवा असा आग्रह धरायची. कारण त्या दोघांची जोडी तेव्हा ‘मेड फॉर इच अदर’ होती. यामुळेच तर 1953 च्या एका चित्रपटात राज कपूर त्याच्या आधीच्या पिढीतील एका ज्येष्ठ नटावर मात करून तिचा नायक बनला होता.

कोण बरे हा नट?
आज तो आपल्यात नाही. असता तर आज आपण त्याची शंभरी साजरी केली असती… मोतीलाल.

 

हे नाव ऐकून आजच्या पिढीला कदाचित प्रश्‍न पडेल कोण हा मोतीलाल? बरोबरच आहे ते. आमचा जमाना आहे, कुमार, कपूर, खान मंडळीचा. या कुमार, कपूर, खान मंडळीच्या गर्दीत ‘लाल’ हे नाव आज चित्रपटात फारस ऐकू येत नाही; पण चित्रपट व्यवसायातील एक जमाना लाल मंडळीचा होता. ‘लाल’ हे नाव तेव्हा फक्त कलावंताच्या नावातच नसायच. चित्रपटाच्या नावातही असायच. मेरे लाल, ते ‘लाल बंगला’,  ‘लालबत्ती’, ‘लाल चिता’, ‘लाल चिठ्ठी’, ‘लाल दुपट्टा’, ‘लाल कोठी’, ‘लाल कुंवर’, ‘लाल निशान’, ‘लाल परी’, ‘लाल हवेली’, ‘लाल पत्थर’, ‘लाल पूंज’, ‘लाल किल्ला’, यासारख्या अनेक लालेलाल चित्रपटांच्या नावातून आणि त्याचबरोबर ईश्‍वरलाल, देवीलाल, कांतीलाल, टेपीलाल यासारख्या काही नटांच्या नावांतूनही.
मोतीलाल त्या काळातलाच नावात लाल असलेला आपल्या चित्रपटातला एक नट होता. या उपर तुम्हाला त्याची अधिक ओळख हवी असेल तर नर्गिस ज्या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून राज कपूरला पाणी पाजताना दिसली होती तो 1956 चा आर.के.चा ‘जागते रहो’ हा चित्रपट आठवा. या चित्रपटातील मुकेशचे ‘जिंदगी ख्याब है’ हे गाणे गाणार्‍या नटाचा चेहरा डोळ्यांसमोर आणा. हा चेहरा मोतीलालचा होता. ‘जागते रहो’ च्या वेळी तो नायकाचा चरित्र-अभिनेता बनला होता. त्याचा जन्म 4 डिसेंबर 1910 चा. आज तो आपल्यात असता तर 2010 ला शंभरीचा झाला असता; पण साठी पूर्ण करायचे भाग्यही त्याला लाभल नाही. 17 जून 1965 रोजी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षीच तो आपल्यातून गेला.

 

‘जागते रहो’ ही पडद्यावर येऊन आता चौपन्न वर्षांचा काळ लोटलाय. यामुळे आजच्या पिढीला ‘जागते रहो’ च्या काळातला मोतीलालचा चरित्र-अभिनेता माहीत असण्याची शक्यताही तशी फारशी नाही. मग त्याचा नायक कसा माहीत असणार? पण एक जमाना त्याच्याही नायकाचा होता. त्याच्या या नायकाच्या जमान्यात तो येथे कोणा कोणाचा नायक होता?
काजोल आजच्या चित्रपटातील आजची एक नायिका आहे. आजची असल्यामुळे ती सर्वांना माहीतच आहे. तिची आई तनुजा आता नायिका राहिलेली नाही. तरीही सर्वांना माहीत आहे. तिची मावशी नूतन आता या जगात राहिलेली नसली तरीही सर्वांना माहीतच आहे; पण नूतन व तनुजाच्या आई आणि काजोलची आजी शोभना समर्थ आज सर्वांना माहीत असलीतच अस नाही. काजोल नायिका बनली, तिची नायिकेची भूमिका असलेला ‘बेखुदी’ पहिला चित्रपट 1992 मध्ये पडद्यावर आला तेव्हा त्या आपल्यात होत्या; पण कधी काळी त्या आपल्या चित्रपटातील नायिका असल्या तरी तनुजा नायिका म्हणून पडद्यावर यायच्या आधीच त्यांच्या नायिकेचा आपल्या चित्रपटात शेवट झाला होता, 1959 च्या ‘कीचकवध’ या चित्रपटात. तनुजाची नायिकेची भूमिका असलेला ‘छबिली’ हा पहिला चित्रपट त्यानंतर एका वर्षाने 1960 मध्ये पडद्यावर आला होता. नूतन व तनुजाच्या नायिकेच्या काळात शोभना समर्थ अधून-मधून काहीतरी एखाद्या चित्रपटात चरित्र भूमिकेत दिसायच्या. 1985 मध्ये तनूजाची भूमिका असलेल्या ‘घरद्वार’मध्ये त्या शेवटच्या पडद्यावर दिसल्या होत्या. काजोलचा पहिला चित्रपट ‘बेखुदी’ 1992 मध्ये पडद्यावर आल्यावर आठ वर्षांनी त्या आपल्यातून गेल्या 9 फेब्रुवारी 2000 ला. मोतीलाल तर त्यांच्या आधी पस्तीस वर्षांपूर्वी आपल्यातून गेला होता; पण तो व शोभना समर्थ या दोघांची आपल्या चित्रपटात एक जोडी जमली होती. राज कपूर-नर्गिस यांच्या जोडीसारखीच. ती देखील कशी तर?

या जोडीची तुम्हाला कल्पना यावी यासाठी एक आठवण मला तुम्हाला सांगावी लागेल. शोभना समर्थ यांच्याकडून एकदा ऐकलेली; पण ती काही त्या दोघांची जोडी जमलेली होती. तेव्हा त्यांच्याकडून मला ऐकायला मिळालेली नव्हती. 1989 चा यश चोप्रांचा ‘चांदनी’ हा चित्रपट पडद्यावर आला तेव्हा ही आठवण मला त्यांच्याकडून ऐकायला मिळाली होती. हे ऐकून अनेकांचा कदाचित गोंधळ उडेल; कारण ‘चांदनी’ पडद्यावर आला तेव्हा मोतीलाल या जगात राहिलेला नव्हता. शोभना समर्थ यांच्या नायिकेचाच नव्हे तर चित्रपटांत त्यांनी चरित्र भूमिका केलेल्या असल्या तरी त्यांच्या चरित्र-अभिनेत्रीचा चेहरादेखील तेव्हा पार पुसला गेलेला होता. मोतीलालबरोबर जमलेली त्यांची जोडी तर तेव्हा इतिहासजमा झाली होती. ‘चांदनी’ तर तेव्हा वर्तमानकाळातला एक चित्रपट होता. या वर्तमानकाळाचा मोतीलाल व शोभना समर्थ यांच्या इतिहासजमा झालेल्या जोडीशी शोभनाबाईंच्या त्या काळातील आठवणीशी कसा काय संबंध असू शकेल?

 

‘चांदनी’ पडद्यावर आला तेव्हा शोभनाबाईंची मोतीलाल बरोबर जमलेल्या त्यांच्या जोडीची एक आठवण चाळवली गेली, ती त्यांनी मला सांगितली. आता तीच मला तुम्हाला सांगायचीच हे ऐकून तुमच्यासमोर हाच प्रश्‍न कदाचित निर्माण झाला असेल. या प्रश्‍नाच उत्तर तुम्हाला हव असेल तर ‘चांदनी’तला एक सीन जरा डोळ्यांसमोर आणा-नायक ऋषी कपूर विमानात घिरट्या घालत नायिकेच्या श्रीदेवीच्या घरावर चिठ्ठ्या टाकतो. त्या चिठ्ठ्यांवर लिहिलेला असत ‘आय लव्ह यू’.
‘चांदनी’तला हा सीन म्हणजे आपल्या चित्रपटाला हवाई प्रेमाचा एक मासला होता. मोतीलालबरोबर जमलेल्या शोभनाबाईंच्या जोडीतील प्रेमदेखील असं हवाई प्रेम होत. ‘चांदनी’ पाहत असताना या हवाई प्रेमाची त्यांची आठवण चाळवली गेली होती. ती त्यांनी मला सांगितली होती. मोतीलालबरोबर त्यांची जोडी जमली होती. तेव्हा अनेकदा त्या दोघांत खटका उडायचा. मग त्या करायच्या काय तर मुंबईहून लोणावळ्याला जाऊन तेथील आपल्या बंगल्यात काही दिवस राहायच्या. ‘चांदनी’तील ऋषी कपूरचा तेव्हा जन्मही झालेला नव्हता. तरीही तोच तेव्हा मोतीलालच्या अंगात संचारायचा. त्याच्याप्रमाणेच विमानातून उडत तो लोणावळ्याला यायचा आणि तेथील शोभना समर्थ यांच्या बंगल्याच्या वरून विमानातून घिरट्या घालत त्या बंगल्यावर चिठ्ठ्या फेकायचा ‘आय लव्ह यू’. ‘चांदनी’तल्या ऋषी कपूरबरोबरच ‘गुलाम’ मधील आमीर खानही तेव्हाा मोतीलालच्या अंगात संचारला असता तर कोणी सांगाव ‘चांदनी’तील ऋषी कपूरच्या स्टाईलने ‘आय लव्ह यू’ च्या चिठ्ठया शोभनाबाईच्या लोणावळ्यातील बंगल्यावर फेकत तो ‘गुलाम’मधील आमीर खानच्या ‘आती क्या खंडाला’ या गाण्याच्या स्टाईलीतच ‘आऊं क्या लोणावला’ हे गाणदेखील कदाचित गायला असता. यात त्याचा ऋषी कपूर व आमीर खान झाला असता आणि शोभना समर्थ यांची झाली असती श्रीदेवी व राणी मुखर्जी. ‘चांदनी’तील ऋषी कपूर व श्रीदेवी यांचे हवाई प्रेम शोभना समर्थ यांची मोतीलालच्या त्यांच्यावरील हवाई प्रेमाचीच एक आठवण होती. ते दोघेही आज आपल्यात राहिलेले नाहीत. तरीही त्यांच्या हवाई प्रेमाची ही आठवण मला आठवते. अभिनेते जयराज यांच्याकडून ऐकलेली माझी एक आठवण देखील तेव्हा चाळवली जाते. ते व पृथ्वीराज कपूर रॅली सायकल खरेदी करणारे चित्रपट व्यवसायातील पहिले नट. या रॅली सायकलवरूनच तेव्हा ते शुटिंगसाठी स्टुडिओत जायचे. अनेक जण तेव्हा त्यांच्या त्या सायकलकडे कौतुकाने पाहत. कौतुकोद्गार काढायचे, अरे, हे तर रॅली सायकलवरून रूबाबत चाललेत.’’ सायकलची श्रीमंतीच तेव्हा तशी होती; पण मोतीलाल मात्र सायकलच्या या श्रीमंतीच्या काळात विमानाची श्रीमंती मिरवत होता. स्वतःचे विमान बाळगून स्वतःच ते उडवत विमानातून उडत होता; पण शेवटच्या काळात तो स्वतःच्या मोटारीलादेखील महाग झाला होता. टॅक्सीतून फिरताना दिसत होता.

 

 

मोतीलाल त्या काळात ‘कोकिला’, ‘हम दीवाने’, विजयालक्ष्मी’ यासारख्या काही चित्रपटांत शोभना समर्थ यांच्याबरोबर नायकाच्या भूमिकेत चमकला. त्याच्याबरोबर नायिकेची भूमिका करत असताना शोभनाबाईनी ‘नल दमयंती’, ‘श्रीकृष्णार्जुन युद्ध’ या चित्रपटांत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबरदेखील नायिकेची भूमिका केली; पण त्याची म्हणजे मोतीलालची कमाल पाहा. पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर भूमिका करणार्‍या शोभमा समर्थ यांच्याबरोबर नायकाची भूमिका करत असताना तो पृथ्वीराज कपूर यांच्या नायिकांपुरताच मर्यादित राहिला नाही. वनमाला (सिकंदर), शांता आपटे (वाल्मिकी) यासारख्या त्यांच्या काही नायिकांबरोबरही तो नायकाच्या भूमिकेत चमकला. ‘बीते दिन’ मध्ये वनमाला यांच्याबरोबर ‘सावन’मध्ये शांता आपटे यांच्याबरोबर आणि त्यानंतर त्यांचा पुत्र राज कपूरच्या नायिकापर्यंतही तो आला.
1947 चा ‘नीलकमल’ राज कपूरने नायकाची भूमिका केलेलाा पहिला चित्रपट. त्याची नायकाची भूमिका असलेल्या हा पहिल्या चित्रपटातील त्याची पहिली नायिका होती मधुबाला. तिचा नायिकेची भूमिका असलेला हा पहिलाच चित्रपट. 1950 च्या ‘हंसते आंसू’ मध्ये मोतीलाल तिचा नायक बनला. 1942 च्या ‘वसंत’मध्ये मधुबाला बालतारका होती. त्याकाळातील आपल्या चित्रपटातील एक नायिका मुमताज शांती या चित्रपटात मधुबालाच्या आईच्या भुमिकेत चमकली होती. मोतीलालची कमाल पाहा. तो 1944 मध्ये ‘पगली दुनिया’ या चित्रपटात ‘वसंत’मधील मधुबालाची आई मुमताज शांती हिच्याबरोबर नायकाच्या भूमिकेत चमकला आणि त्यानंतर 1950 ला ‘वसंत’ मधील तिची मुलगी मधुबाला हिच्याबरोबर.

 


मुमताज शांती ते मधुबाला म्हणजे मोतीलालच्या वाढत्या वयात आलेलं एक तरूणपणच होतं. पण या तरूणपणात ‘हंसते आंसू’ मध्ये मात्र त्याला अकाली प्रौढत्व आले असे मुद्दामच मी म्हणतोय. कारण आपलं सेन्सॉर बोर्ड ‘ए’ चा म्हणजे फक्त प्रौढांसाठी असलेल्या चित्रपटांचा शिक्का आज अनेक चित्रपटांच्या सेन्सॉर प्रमाणपत्रावर मारत असलं तरी या ‘ए’ च्या शिक्क्याची सुरूवात आपल्या चित्रपटात सर्वात प्रथम केली ती मोतीलालने. मधुबालाबरोबर नायकाची भूमिका केलेल्या ‘हंसते आंसू’ या चित्रपटानेच. यामुळे तो आपल्या चित्रपटाला ‘ए’ वाल्या चित्रपटांच पहिला नायकदेखील ठरला.
मधुबालानंतर मोतीलालची नायिका बनलेली राज कपूरची आणखी एक नायिका म्हणजे सुरैय्या. 1950 च्या ‘दास्तान’ मध्ये ती राज कपूरची नायिका होती. त्यानंतर 1954 च्या ‘शमा परवाना’त शम्मी कपूरची. त्या आधी ती राज व शम्मी कपूर यांचे पितामह पृथ्वीराज कपूर यांची नायिकाही होती. 1943 च्या ‘इशारा’ या चित्रपटात. या चित्रपटात दोन नायिका होत्या. एक सुरैय्या, दुसरी स्वर्णलता. ती 1948 ला ‘प्रतिज्ञा’ या चित्रपटात मोतीलालची नायिका होती. स्वर्णलता बरोबरच्या त्याच्या ‘प्रतिज्ञा’त मीनाकुमारी बालतारका होती. पुढे ती नायिका बनली. मोतीलाल तिचा नायक कधी बनला नाही; पण तेव्हाच आपल्या चित्रपटात बालतारका असलेल्या मधुबालेचा नायक बनला. सुरैय्यादेखील तेव्हा आपल्या चित्रपटात एक बालतारका होती. ‘ताजमहल’, ‘तमन्ना’, ‘स्टेशन मास्टर’ या चित्रपटात. ‘इशारा’त ती पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सर्वात प्रथम नायिका बनली. आपली शेवटची नायिकेची भूमिकाही तिने त्यांच्याबरोबरच केली. 1963 च्या ‘रूस्तुम सोहराब’ या चित्रपटात राज व शम्मी कपूर यांचीही ती नायिका बनली. मोतीलाल आज की रात’, ‘गजरे’, ‘रूख’ या तीन चित्रपटांत तिचा नायक बनला आणि त्यानंतर राज कपूरच्या आणखी एका नायिकेचा… नर्गिसचा.

हे ऐकून तुम्ही एकदम उडाल. कारण राज कपूरच नायक हवा या आग्रहात 1951 मध्ये नर्गिसने एका चित्रपटात मोतीलालबरोबर नायिकेची भूमिका करायला नकार दिला. हे मी तुम्हाला सांगितलय ना; पण ती त्या आधी म्हणजे राज कपूरचा उदयदेखील आपल्या चित्रपटात झालेला नव्हता. त्या काळात मोतीलालची नायिका बनली होती. एका चित्रपटात नव्हे दोन चित्रपटांत, ‘तकदीर’ व ‘बीसवी सदी’. या चित्रपटातला तिचा पहिला चित्रपट ‘तकदीर’. मेहबूब खान या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक होते. 1943 मध्ये हा चित्रपट पडद्यावर आला होता. नर्गिसच वय होत तेव्हा अवघे तेरा वर्षाचे आणि मोतीलालच..?
मधुबाला, सुरैय्या या मोतीलालच्या नायिका आधी बालतारका होत्या. नर्गिसही आधी बालतारका होती. बेबी राणी या नावाने ती बाल भूमिका करायची. ‘तलाश-ए-हक्क’, ‘हृदयमंथन’, ‘तमन्ना’, ‘मॅडम फॅशन’, ‘मोती का हार’ हे तिने बाल भूमिका केलेले काही चित्रपट. या चित्रपटाच्या वेळी ती तिची आई जद्दनबाई हिच्याबरोबर शूटिंगसाठी सागर मुव्हिटोनच्या स्टुडिओत यायची. मोतीलाल तेव्हा तिला पाहायचा. तिला कडेवर घेऊन आपल्या अंगा-खांद्यावर खेळवायचा. त्याच्या अंगा-खांद्यावर खेळतच ती लहानाची मोठी झाली आणि ‘तकदीर’मध्ये त्याच्यासमोर एकदम नायिका म्हणून उभी राहिली. तिच्या नायिकेची यशस्वी कारकीर्द सुरू झाली. तिच्यासमोरच एक बालतारका आपल्या चित्रपटातला आली डेझी इराणी तिला पाहताच मोतीलालला त्याच्या अंगाखांद्यावर खेळत त्याची नायिका बनलेली नर्गिसच बहुधा आठवली असावी. तिच्याकडे पाहता गमतीने तो तिच्या आईला म्हणाला, ‘‘माझ्यासमोर पोरसवदा असलेल्या नर्गिसचा मी नायक बनलो. तुमच्या बेबीला लवकर मोठी करा. तिच्याबरोबरही मला नायकाची भूमिका करायचीच.’’
पण नाही. मोतीलाल त्याच्यासमोर पोरसवदा असलेल्या मधुबाला, सुरैय्या, नर्गिस या बालतारकांचा नायक बनला तरी त्या तिघींच्या नायिकापदाच्या काळातील डेझी इराणी या बालतारकेचा नायक काही बनू शकला नाही. 1960 च्या ‘जमीन के तारे’ या चित्रपटात ती व तिची बहीण हनी इराणी यांचा तो बाप बनला. हा चित्रपट सरदार चंदूलाल शहा यांचा होता. ते या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक होते. चित्रपट व्यवसायात एक जमाना त्यांचा होता. त्यांच्या रणजित मुव्हिटोनचा होता. मोतीलाल चाळीसच्या दशकात रणजीत मुव्हिटोनच्या चित्रपटांचा हुकमी नायक होता. ‘अछूत’, ‘शादी’, ‘होली’, ‘परदेसी’, ‘अरमान’, ‘इकरार’ या सारख्या त्याची भूमिका असलेल्या रणजित मुव्हिटोनच्या चित्रपटांची रांगच चाळीसच्या दशकात लागली होती. या चित्रपटापैकी ‘अछूत’ मधील त्याची भूमिका अस्पृश्य नायकाची होती. या चित्रपटाआधी 1939 मध्ये सरस्वती सिनेटोनच्या ‘सच है’ या चित्रपटात या भूमिकेच्या दुसर्‍या टोकाला जाऊन ब्राह्मण नायकाची भूमिका त्यांने केली होती. आपल्या या दोन भूमिकांवर बोलताना तो तेव्हा रेडिओवरील मुलाखतीत बोलून गेला होता. – ‘सच है’ मधील माझी भूमिका ब्राह्मण तरूणाची आहे. ‘अछूत’ मधील भूमिका हरिजन तरूणाची; पण या दोन्ही भूमिकांचा चेहरा मात्र एकच आहे. मानवतेचा, माणसाचा, माणुसकीचा.’’

 

आज हा विचार कोणीही उघडपणे बोलून दाखवावा, असा सर्वमान्य झालाय; पण चाळीसच्या दशकाचा काळ हरिजनांचा मंदिर प्रवेशही कोणाला सहन होऊ नये असा बुरसटलेला होता. या बुरसटलेल्या काळात ‘सच है’ व ‘अछूत’ या काळाच्या पुढे असलेल्या चित्रपटात भूमिका करताना मोतीलालने काळाच्या पुढे असलेला हा विचार बोलून दाखवला होता. कारण एक नट आणि एक माणूस म्हणूनही तो तेव्हा काळाच्या पुढे होता. आणि त्याचबरोबर नको त्या अनेक गोष्टीतही. तो काळ मोतीलाल, सरदार चंदूलाल शहा आणि रणजित मुव्हिटोन यांच्या वैभवाचा होता. रेसचा, जुगाराचा त्या दोघांना जबरदस्त नाद होता. या नादात ते दोघेही इतके नादवलेले होते की रेसच्या मैदानावर व जुगारात अनेकदा ते नको इतके पैसे उधळायचे. मोतीलाल तर अनेकदा एका रात्रीत सत्तर-सत्तर हजार रूपये उडवायचा आणि चंदूलाल शाहही या उधळपट्टीसाठी त्याला एवढे पैसे उपलब्ध करून द्यायचे. एका रात्रीत सत्तर, सत्तर हजारांची उधळपट्टी आणि तीही चाळीसच्या दशकात. बाप रे बाप!

 

सरदार चंदूलाल शहा यांची तर रेसच्या मैदानावर तेव्हा स्वतःची घोडी होती. त्यांच्या एका घोड्याच नाव त्यांच्या चित्रसंस्थेचच नाव होतं रणजित आणि दुसर्‍या घोड्याच नाव होतं त्यांच्या रणजीतची नायिका व त्यांची स्फूर्तिदेवता गौहर हिचं. मोतीलालचदेखील तेव्हा रेसच्या मैदानावर एक घोड होतं. त्याच नाव होतं ट्रेटर. म्हणजे विश्‍वासघातकी. त्याच्या या घोड्याच्या नावाची एक गमतीदार कहाणी आहे. रेसच्या मैदानावर धावायला सुरवात केली की त्याचा घोडा सुरवातीला एकदम पुढे असायचा. आता विनमध्ये येणारच अस कोणालाही वाटाव इतकं पुढे; पण विन म्हणजे विजय जवळ आला की त्या काय व्हायच कोण जाणे. धावता, धावता तो मागे आपल्या मालकाकडे-मोतीलालकडे पाहायचा. एकदम मागे पडायचा. रेसच्या मैदानात हरायचा यामुळेच त्याने त्याच नाव ठेवल होत ट्रेटर. विनमध्ये येता, येता शेपूट घालून तो एकदम मागे व्हायचा म्हणून मोतोलालची सारी जीवन कहाणी शेवटी विनमध्ये येऊन मागे पडणार्‍या, हरणार्‍या त्याच्या त्या घोड्यासारखीच झाली होती. यामुळे अशोककुमार त्याच्यासमोर कोणी नव्हता तेव्हाच तो त्याच्यासमोर हरल्यासारखा झाला होता. बॉम्बे टॉकीज व रणजितच्या जमान्यातील एक हकीकत अशी सांगतात की एकदा मोतीलाल देविकाराणीला भेटायला रणजितमधून बॉम्बे टॉकीजमध्ये आला होता. देविकाराणीने त्याच्याशी भेट घडवून द्यावी म्हणून अशोककुमारला बोलावलं; पण त्याच्या समोर येताना तेव्हा तो एकदम संकोचला होता. बुजल्यासारखा झाला होता कारण एक अभिनेता म्हणून त्याचा तेव्हाा अधिक बोलबाला झाला होता. अशोककुमार कितीही लोकप्रिय असला तरी एक बायकी नटच म्हणूनच त्याच्याकडे तेव्हा पाहिले जात होत; पण ते दोघेही नायकाचे चरित्र-अभिनेते बनले तेव्हा त्या दोघांच्या रूपेरी जीवनाच हे चित्र एकदम बदलून गेल होत. ‘यह रास्ते है प्यार के’, ‘यह जिंदगी कितनी हसीन है’ या सारख्या काही चित्रपटांत अशोककुमारच्या चरित्र-भूमिकासमोर दुय्यम चरित्र-भूमिका करायची पाळी त्यांच्यावर आली होती. तो अशोककुमारहून चित्रपट व्यवसायात ज्येष्ठ असला तरी चित्रपटाच्या श्रेय फलकात त्याच्या नव्हे तर अशोककुमारच्या नावाला टॉप बिलिंग मिळत होत. याचा अर्थ असा नव्हे की नायकाचा त्याचा चेहरा पुसला गेल्यावर तो चित्रपट व्यवसायात कोणीच राहिला नव्हता.

 

1952 ला ‘मि संपत’ मधील आपल्या शीर्षक चरित्र भूमिकेत त्याने अभिनयाची वेगळीच हाईट गाठली होती. बिमल रॉय यांच्या ‘देवदास’ (1957) व ‘परख’ (1961) या दोन चित्रपटांतील भूमिकांसाठी तर त्याला ‘फिल्म-फेअर’च सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याच पारितोषकही मिळाल होत. तरीही? नर्गिसने 1943 ला ‘तकदीर’ मध्ये मोतीलालचा हात धरून आपल्या रूपेरी जीवनाची सुरूवात केली असली तरी 1953 ला राज कपूरच नायक हवा असा आग्रह धरून एका चित्रपटात त्याच्याबरोबर भूमिका करायला नकार दिला हे मी तुम्हाला सांगितलयच. हा चित्रपट म्हणजे ‘धून’. ‘मोगल-ए-आजम’ या चित्रपटात ‘ऐ मोहब्बत झिंदाबाद’ हे गाण पडद्यावर गाणारा नट तुम्हाला आठवत असेलच. त्याच नाव एम. कुमार तो व त्याची अभिनेत्री पत्नी प्रमिला ‘धून’चे निर्माते होते. आणि दिग्दर्शक स्वतः कुमारच. मोतीलाल त्याचा चांंगला मित्र होता. यामुळे त्यालाच नायकाच्या भूमिकेत घेऊन हा चित्रपट निर्माण करायचा विचार त्याने चालवला होता; पण नर्गिस व सुरैय्या या दोघी तेव्हा या सेलेबल नायिका होत्या की कोणताही चित्रपट त्या दोघींच्या नावावर तेव्हा विकला जायचा. ही गोष्ट लक्षात घेऊनच कुमारने या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी नर्गिसच नाव नक्की केल होत. तिच्या नावावरच वितरकाशी या चित्रपटाच डील करून पण ती नायक म्हणून आपल्याला मोतीलाल नको, राज कपूरच हवा म्हणून अडून बसली. कुमारचा यामुळे नाइलाज झाला. त्याने मोतीलालऐवजी राज कपूरला ‘धून’मध्ये नायकाच्या भूमिकेत घेतला. तरीही मोतीलाल कुमारबरोबरच्या आपल्या मैत्रीला जागला. त्याच्याऐवजी राज कपूर ‘धून’चा नायक झाल्यावरही कुमार बरोबरच्या मैत्रीसाठी ‘धून’मध्ये राज कपूर व नर्गिस यांच्या बरोबर त्याने एक दुय्यम भूमिका केली.

 

‘धून’ च्या वेळी नर्गिस मोतीलाल नकोसा वाटला असेलही; पण त्याच्याऐवजी ‘धून’ मध्ये नायक बनलेल्या राज कपूरला तेव्हाही तो हवाहवासा वाटायचा. यामुळे त्याने 1956 ला आपल्या आर.के.च्या ‘जागते रहो’ या चित्रपटात त्याला घेतल आणि त्यानंतर 1957 ला त्यालाच शीर्षक भूमिकेत घेऊन आर.के.च्या ‘अब दिल्ली दूर नहीं’ हा चित्रपट निर्माण केला. त्याच्यातील नटाच हे सर्वात मोठ यश मानाव लागेल. तरीही अशोककुमारसमोर चरित्र-भूमिकांत तो येथे तसा दुय्यम स्थानावरच होता आणि बलराज साहनी त्याच्यासमोर ज्युनिअर असला तरी त्याच स्टेटसही त्याला येथे नव्हत.
रेस व जुगाराच्या नादात मोतीलालच्या आयुष्याची सारी गणितच तेव्हा येथे एकदम चुकली होती, याचाच हा परिणाम होता. या चुकलेल्या गणितांच्यामुळेच घरची माणसही त्याच्याकडे संशयाने पाहायची आणि त्याच्याकडे येणार्‍या मित्र परिवाराकडेही. तो व त्याची पत्नी यांच्यात यामुळेच एक तणाव निर्माण झाला होता. या तणावामुळेच वाळकेश्‍वरला एका घरात राहतानाही ते एकत्र राहायचे नाहीत. वेगवेगळे राहायचे. तो खाली तर पत्नी वर. ती गरोदर होती. मोतीलालकडे येणारे मित्र तिला आवडायचे नाहीत. त्यांना पाहून तिच्या कपाळला एकदम आठ्या पडायच्या. मोतीलालच्या काळातील अभिनेते के.एन. सिंग यांनी मला हे सांगितले होत आणि ‘छोटी छोटी बातें’ या त्याच्या शेवटच्या चित्रपटाची नायिका नादिराने मला सांगितल होत, ‘‘मोतीलालला त्याच्याकडे येणार्‍या मंडळींनी त्याच्या पत्नीस भेटायला जाण आवडायच नाही.’’
तरीही नादिरा अनेकदा मोतीलालच्या घरी गेल्यावर त्याच्या पत्नीस भेटायला जायची. त्याला हो आवडायचं नाही. यामुळे तो नंतर काही दिवस तिच्याशी अबोला धरायचा. के.एन.सिंग यांच्याच काळातला मोतीलालचा आणखी एक अभिनेता मित्र म्हणजे चंद्रमोहन. ते दोघे चित्रपटात भूमिका स्वीकारताना अनेकदा एकेमकांसाठी अडून बसायचे. आपल्याबरोबर चंद्रमोहन हवा असा मोतीलालचा आग्रह असायचा तर आपल्याबरोबर मोतीलाल हवा असा चंद्रमोहनचा आग्रह. ‘तकदीर’, ‘रौनक’ या सारख्या काही चित्रपटांत ते यामुळेच एकत्र आले. त्यानंतरही ते एकत्र आले असते; पण 1948 चा चंद्रमोहन आपल्यातून गेला. तेव्हा तो रेस व जुगारात आपले सर्वस्व गमावून बसला होता. त्याच्या आयुष्याची ही सर्वात मोठी शोकांतिका होती.
मोतीलालला चंद्रमोहनच्या आयुष्यातील या शोकांतिकेवर एक चित्रपट निर्माण करायचा होता ‘जुआरी’; पण तो त्याला निर्माण करता आला नाही. कारण चंद्रमोहन डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेली ‘जुआरी’ची कहाणीच पुढे त्याच्या आयुष्याची कहानी बनून गेली. या कहाणीत जगण्यासाठी नको त्या चित्रपटातील लहानसहान भूमिकाही त्याला शेवटी, शेवटी कराव्या लागल्या. ‘लीडर’, ‘पैगाम…!

 

 

नगण्य भूमिकात मोतीलाल शेवटी, शेवटी चित्रपटात आपल अस्तित्व हरवून बसला होता; पण एका जमान्यात तो आपल्या चित्रपटातला सैगलबरोबरचा एक नायक होता. या जमान्यात सैगल गायक अभिनेता असला तरी त्याला न लाभलेल एक भाग्य त्याला लाभत होत – गायिका अभिनेत्रींच्या नायकाच. नूरजहाँ, खुशींद, शांता आपटे, सुरैय्या त्या काळातील आपल्या चित्रपटातील चार टॉपच्या गायिका-नायिका होत्या. गायक-गायक असूनही सैगल काही त्या सार्‍यांचा नायक बनू शकला नाही. ‘तानसेन’, ‘भक्त सूरदास’ मध्ये तो खुशींदचा नायक बनला. ‘तदबीर’, उमर, खय्याम’, ‘परवाना’ मध्ये सुरैय्याचा; पण नूरजहाँ व शांती आपटे यांचा नायक तो कधीच बनला नाही. मोतीलाल मात्र या चारही गायिका-नायिकांच्या नायक बनला. ‘दोस्त’ मध्ये नूरजहाँ, ‘सावन’ मध्ये शांता आपटेचा ‘परदेशी’ ‘मूर्ति’त खुर्शीदचा, ‘आज की रात्र’, ‘गजरे’ मध्ये सुरैय्याचा.
चार गायिका-नायिकांचा नायक ही मोतीलालची एक कमालच मानावी लागेल. त्याची आणखी एक कमाल पाहा. 1934 ला सागर मुव्हिटोनच्या ‘शहर का जादू’ या चित्रपटातून तो चित्रपटात आला तेव्हा ज्यांना गाता येत नाही असे कलावंतही आपल्या चित्रपटात गायचे. तोही तेव्हा गायचा. सुरूवातीला आपली भूमिका असलेल्या काही चित्रपटांत तो गायलाही; पण गायक म्हणून आपली ओळख त्याला येथे कधीच निर्माण करता आली नाही. त्याच गाण यामुळे नंतर थांबलं आणि प्लेबॅकचा जमाना आल्यावर एका गायकाच्या गाण्याला त्याने सूर मिळवून दिला. मुकेश तो त्याच्या नात्यातला. सैगलप्रमाणेच गायक नट बनायला तो चित्रपटात आला होता. सुरवातीला ‘निर्दोष’ ‘आदाब अर्ज’ या चित्रपटांत स्वतःची गाणी स्वतःच गात सैगल स्टाईलीत त्याने गायकाची भूमिका केली; पण नायक म्हणून काही त्याची डाळ येथे शिजली नाही. मग तो नायकाचा पार्श्‍वगायक झाला, 1944 च्या रूख्सार या चित्रपटात; पण त्याच्या गाण्याचा सूर त्याला खर्‍या अर्थाने सापडला तो 1945 च्या ‘पहली नजर’ या चित्रपटात. अनिल-विश्‍वास यांच्या संगीतात या चित्रपटात त्याने गायिलेल्या ‘दिल जलता है तो जलने दे’ या गाण्यात. हे गाण गायची संधी मोतीलालनेच त्याला मिळवून दिली. तो ‘पहली नजर’ चा नायक होता. नटगिरी चालत नाही पाहून पार्श्‍वगायक बनण्याची धडपड मुकेशने चालवली होती. ती पाहून ‘पहली नजर’ मध्ये मुकेशचा आवाज आपल्यासाठी हवा असा आग्रह त्याने धरला. त्या काळातील एक चरित्र-अभिनेते मजहर खान ‘पहली नजर’चे निर्माते, दिग्दर्शक होते. ते मुकेशचा आवाज आपल्या चित्रपटात घ्यायला फारसे उत्सुक नव्हते. मोतीलालने त्यांना स्पष्टपणे सांगितलं ‘‘मुकेशचा आवाज असेल, तरच मी तुमच्या चित्रपटाचा हिरो’’.
मजहर खान यांचा नाइलाज झाला. मोतीलालसाठी त्यांना मुकेशचा आवाज घ्यावा लागला. या चित्रपटात मुकेशच ‘दिल जलता है तो जलने दे’ गाणं चांगलच लोकप्रिय ठरल. मोतीलाल मग आपल्यासाठी त्याचाच आवाजाचा आग्रह धरायला लागला. त्याच्या ‘मूर्तित’ तो पुन्हा त्याच्यासाठी गायिला. बुलो.सी.रानी यांच्या संगीतात खुर्शीद व हमीदाबरोबर ‘बदरिया बरस गई उस पार’ हे गाणं चांगलच लोकप्रिय ठरल. तो एक लोकप्रिय पार्श्‍वगायक बनला. मोतीलाल नायकाचा चरित्र अभिनेता मुकेश तेव्हाही त्याच्यासाठी गायिला. ‘जागते रहो’ मधील ‘जिंदगी ख्याब है’ हे गाणे; पण त्यानंतर त्याचा पडता काळ सुरू झाला. त्याच्या या पडत्या काळातही मुकेश एक गोष्ट विसरला नाही. गायक म्हणून जे यश त्याला मिळालय ते त्याच्या मुळेच शेवटच्या काळात निर्माता-दिग्दर्शक बनून ‘छोटी-छोटी बाते’ हा चित्रपट त्याने निर्माण केला तेव्हा तो यामुळेच त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहिला; पण तो पडद्यावर आल्याच पाहणे त्याच्या नशिबी नसावे. त्या आधीच तो आपल्यातून निघून गेला.

‘छोटी छोटी बातें’ पूर्ण करताना मोतीलालला अनेक अडचणींना तोंड द्यायला लागले. यामुळे शेवटी तो खचला होता. शारीरिक व मानसिकदृष्ट्याही या खचण्यातच त्याचा अंत झाला. त्याच्या पश्‍चात मुकेशने त्याचा हा चित्रपट कसाबसा पडद्यावर आणला; पण तो चालला नाही. कधी आला, कधी गेला हेदेखील कोणाला कळल नाही. अनिल विश्‍वास या चित्रपटाचे संगीतकार होते. त्यांचा हा शेवटचा चित्रपट, मोतीलालचाही शेवटचा चित्रपट. मुकेशने या चित्रपटात अनिल विश्‍वास यांच्या संगीतात एक गाण गायलं होतं, ‘जिंदगी ख्याब है’. याच मुखड्याच एक गाण मुकेश 1956 ला राज कूपरच्या ‘जागते रहो’त गायल होता. सलील चौधरींच्या संगीतात पडद्यावर ते मोतीलालच्या तोंडी होतं. ‘छोटी छोटी बाते’ तील गाणही त्यायाच तोंडी होत. दोन्ही गाणी शैलेंद्रनी लिहिली होती. ती लिहिताना ही गाणी आपल्या आयुष्यातील एक सत्य बनून जातील अस त्याला स्वप्नातही वाटल नसेल. मोतीलाललाही वाटल नसेल; पण जिंदगी ख्याब है’ त्या दोघांच्या आयुष्यातील एक कटू सत्य बनून गेलं. मोतीलाल चित्रपटांत भूमिका करत असताना निर्माता-दिग्दर्शक बनायच स्वप्न पाहत होता. शैलेंद्र चित्रपटांची गाणी लिहिता-लिहिता हे स्वप्न साकार व्हाव यासाठी दोघेही निर्मितीच्या क्षेत्रात उतरले. मोतीलालने ‘छोटी छोटी बाते’ निर्माण केला. शैलेंद्रने ‘तिसरी कसम’. दोघांनीही अनंत अडचणींना तोंड देत आपापले चित्रपट पूर्ण केले. फलश्रुती फ्लॉप. तिसरी कसम तर राष्ट्रपती सुवर्णपदकाचा सन्मान मिळवूनही फ्लॉप. शैलेंद्र या फ्लॉपच्या आधीच आपल्यातून गेला होता, 14 डिसेंबर 1966 ला. मोतीलाल त्याआधी 17 जून 1965 ला.

सैगलने 1946 मध्ये ‘शाहजहाँ’ मध्ये एक गाण गायल होतं-जब दिल ही टूट गया हम जी के क्या करेंगे’ तेव्हा ते त्याच्या आयुष्यातील एक कटू सत्य बनून गेल होत. ‘जिंदगी ख्याब है’ हे गाण असंच पडद्यावर हे गाण गाणारा मोतीलाल व ते लिहिणारा शैलेंंद्र यांच्या आयुष्यातील एक सत्य बनून गेल. दोन्ही गाणी गाणार्‍या मुकेशचाच शेवटी त्यांना आधार मिळाला. मुकेशने मोतीलालच्या मृत्यूनंतर त्याचा ‘छोटी छोटी बाते’ कसाबसा का होईना पडद्यावर आणला आणि शैलेंद्रच्या मृत्यूनंतर त्याच्या ‘तिसरी कसम’ ला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी तो त्याच्या पत्नीला, मुलाला शैली शैलेंद्र ला दिल्लीला घेऊन गेला.

Isaak Mujavar
+ posts

Leave a comment