© विवेक पुणतांबेकर 

चाळिस च्या दशकात अभिनेत्यांचे त्रिकूट सिनेसृष्टीत आले. या तिघांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. ते त्रिकूट होते दिलीप, राज आणि देव. यातला पहिले मोहरे गळले राजकपूर, दुसरे गळले देवानंद. आता फक्त उरले दिलीप कुमार. आज त्यांचा वाढदिवस. आज ते ९८ वर्षांचे झाले आहेत. या निमित्ताने त्यांचा जीवनपट उलगडायचा हा अल्पसा प्रयत्न.

    डिसेंबर १९२२ पेशावर मधल्या क्वासी खावानी बाजार भागात ले जमीनदार आणि फळ व्यापारी सरवर खान यांची पत्नी आयेशा गरोदर होती. कधीही प्रसूती होईल अशी अवस्था. ११ डिसेंबर ला बाजूच्या जव्हेरी बाजारात आग लागली. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरणात पठाण मंडळी आग विझवायला लागली आणि इकडे आयेशा बेगम ला कळा सुरु झाल्या. बाजूच्या सुईणीला ताबडतोप बोलावून घेतले. आग विझवल्यावर घरी परतलेल्या सरवर खाना ला बातमी समजली मुलगा जन्मला. अत्यंत आनंदात मुलाचे नाव ठेवले महमंद युसुफ खान ज्यांना आपण दिलिप कुमार नावाने ओळखतो. सरवर खानाचा मोठा परिवार होता. घरात मोठ्या बहिणीचे वर्चस्व होते. सरवर खानाची बायको आयेशा स्वभावाने सोशिक होती. नणदेचा जाच मुकाट्याने सोसत असे. लहानगा युसुफ सतत आईच्या मागे असे. मोठी बहिण आणि मोठा भाऊ शाळेत जात असे. यूसुफ ला पण शाळेत घातले. एकदा फकीर सरवनखानाच्या घरी आला. त्याने लहानग्या युसूफ कडे पाहून भविष्य सांगितले हा मुलगा भाग्यवान आहे. पण याला खूप जपावे लागेल. आत्याचा त्या फकीरावर खूप विश्वास. त्यामुळे युसुफ चा ताबा तिने घेतला. शाळेव्यतिरिक्त कुठेच पाठवत नसे. दृष्ट लागू नये म्हणून तीट लावणे डोळ्यात सुरमा घालणे असे प्रकार चालायचे. याचा युसुफला फार त्रास व्हायचा. शाळेत मुले टिंगल करायची. याचा परिणाम युसुफ एकलकोंडा बनला.

पेशावर मध्ये हिंदू मुस्लिम सख्य होते. सरवरखानाचे जिवलग मित्र दिवाण बसेश्वर नेहमी घरी येत असत. दिवाण बसेश्वर प्रांत न्यायाधिश होते. अनेकदा त्यांच्या बरोबर त्यांचा सुशिक्षीत देखणा मुलगा पृथ्वीराज पण सरवरखानांच्या घरी यायचा. कायद्याचे पदवीधर पृथ्वीराज ना अभिनयाचे वेड होते. वडिलांच्या मनाविरुध्द ते नाटकात भुमिका करत आणि एके दिवशी मुंबईला निधून गेले आणि सिनेमा विश्वात शिरले. पृथ्वीराज यांचा मुलगा रणबीर राज युसूफच्या वर्गात होता. इथून या दोघांची मैत्री सूरु झाली ती राज कपूरच्या मृत्युपर्यंत कायम राहीली.

सरवर खांना वाटले आता पेशावर सोडून मुंबईला जावे. तिथे आपला उत्कर्ष होईल. ते मुंबईला आले. क्राॅफर्ड मार्केट मध्ये गाळा घेऊन धंद्यात जम बसवला. नागदेवी स्ट्रीटवर अब्दुल्ला बिल्डिंग मध्ये जागा घेतली आणि आपली पत्नी आणि मुलांना मुंबईला आणले. मुलांना अंजूमान इस्लाम हायस्कूल मध्ये दाखल केले. युसूफ त्या वेळी दहा वर्षाचा होता. व्यवस्थित संसार सुरु झाला. कुटुंबात अनेकांची भर पडली. युसुफ चा मोठा भाऊ अयूब हुशार होता. लहान वयात श्वसन विकाराने आजारी पडला. डाॅक्टरांनी नाशिक जवळ देवळाली येथल्या उपचार केंद्रात नेण्याचा सल्ला दिला. सगळे कुटुंब देवळालीत रहायला गेले. सरवर खानाचा अपवाद सोडल्यास तिथे बर्न स्कूल मध्ये युसुफ जाऊ लागला. तिने इंग्रजी बोलायला शिकला. तिथले रम्य वातावरण त्याला खूप आवडले. तिथल्या माळ्याची पूरबी बोली त्याला खूप आवडायची. ( या मुळेच गंगा जमना सिनेमात ही बोली वापरली आणि गंगा जमना चे शूटींग ही देवळाली परिसरात झाले.) अयूब ची तब्येत सुधारल्यावर हे कुटुंब परत मुंबईला आले. शालेय शिक्षण संपवून युसुफ नी खालसा काॅलेज मध्ये प्रवेश घेतला. जवळच पृथ्वीराज कपूर रहायचे. राज आणि युसुफ खालसा काॅलेज मध्ये एकाच वर्गात होते. अनेकदा राज युसुफ ना घेऊन घरी जायचा. दोघांनाही साॅकर आणि क्रिकेटचे फार वेड होते. काॅलेजच्या टिम मधून खेळायचे. युसुफ स्वभावाने अतिशय लाजाळू होते तर राज नेहमी मैत्रिणींच्या गराड्यात असायचे. सरवर खानांचे स्वप्न होते युसुफला मोठा सन्मानीय सरकारी अधिकारी बनवायचे. दुसरे महायुध्द सुरु झाले आणि सरवरखानांच्या घंद्यावर परिणाम झाला. युसुफ वडिलांना मदत करायचा विचार करत होते. अशातच एकदा वडिलांशी झालेल्या वादावरुन रागात युसुफ नी घर सोडले. मिळेल ती गाडी पकडून पुण्याला पोहोचले. तिथे सेनाधिकार्‍यांसाठी असलेल्या क्लब मध्ये कॅन्टीन मॅनेजर ची नोकरी पकडली. लवकरच ते सेनाधिकार्‍यांच्यात लोकप्रिय झाले. एकदा क्लब मध्ये झालेल्या वादात सत्याग्रहींची बाजू घेतल्याने सेनाधिकार्‍याने रागात त्यांना पकडून येरवडा जेल टाकले. रात्र तुरुंगात काढल्यावर सकाळी त्यांची सुटका झाली. नंतर घरची आठवण खूप व्हायला लागली म्हणून युसुफ मुंबईला घरी आले. सर्वांनी प्रेमाने स्वागत केले. वडिलांचा राग पण ओसरला.

परत नोकरी शोधायला सुरुवात केली. चर्चगेट स्टेशन वर परिचित डाॅक्टर मसानी भेटले. ते युसुफ ना आपल्याबरोबर मालाड बाॅम्बे टाॅकीज मध्ये घेऊन गेले. इथेच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळायची होती. डाॅक्टर मसानी आणि देविकाराणी यांची मैत्री होती. देविका राणी च्या केबिन मध्ये दोघांचे स्वागत झाले. चहापाणी झाले. देविकाराणी आणि डाॅक्टर मसानी बोलत बसले. देविका राणींचे लक्ष्य सतत युसुफकडे जात होते. अचानक त्यांनी युसुफना इंग्रजीत विचारले सध्या काय करता?? युसुफनी आपली घडपड सांगितली. देविकाराणींनी विचारले सिनेमात येता का??  युसुफ गोंधळले. मला कसे जमणार?? देविकाराणी म्हणाल्या नक्की जमणार. मी १२५० रुपये पगार देईन. उद्या सकाळी नऊ वाजता स्टुडिओत या. युसुफ घरी आले आणि विचारात पडले. भावाला आयुबला युसुफनी देविकाराणी ची ऑफर सांगितली. आयुब म्हणाला हा वार्षिक पगार असेल. डाॅक्टर मसानींना युसुफ भेटले व सांगितले मला कॅन्टीन मॅनेजर म्हणून महिना १७० रुपये पगार होता. त्या हिशोबाने वार्षिक १२५० कमी होतात. डाॅक्टरांनी देविकाराणींना फोन केला. तिने खुलासा केला वार्षिक नाही दर महिन्याला १२५० . दुसरे दिवशी युसुफ स्टुडिओता पोहोचले तर समोर राजकपूर. ते दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती चे सहाय्यक म्हणून काम करत होते. जुना मित्र भेटल्याने युसुफ खूश झाले. समोरुन अशोककुमार येत होते. तिथे त्यांची ओळख झाली. मग देविकाराणी च्या केबिन मध्ये गेल्यावर स्वागत झाले. तिने सांगितले सर्व प्रथम तुमचे नाव बदलावे लागेल. दिलीप कुमार हे नाव तुम्हाला मी ठेवणार. विचार करुन युसुफनी होकार दिला. काही दिवस स्टुडिओतली सर्व डिपार्टमेंट पहाण्याचा सल्ला त्यांनी दिला. इथेच काम करणार्‍या शहानवाज खान, डेविड अब्राहम आणि जयराज या अभिनेत्यांची ओळख झाली. अशोककुमारांनी आपले मेहूणे शशधर मुखर्जीं बरोबर करुन दिली. त्यांनी दिग्दर्शनातले, लेखनातले बारकावे समजावले.

अशोक कुमार बाॅम्बे टाॅकीजच्या जवळ रहात होते. ते नेहमी राजकपूर आणि दिलीप कुमारना आपल्या घरी घेऊन जात. अशोक कुमारांची पत्नी शोभा गरमागरम भजी खायला घालत असे. मग हे सगळे बॅडमिंग्टन खेळत. अश्या मजेदार वातावरणात एके दिवशी देविकाराणीने स्वतः दिलीप कुमारांचा मेकअप केला आणि शूटिंग सुरु केले. हा सिनेमा होता ज्वार भाटा. यानंतर आणखी दोन सिनेमात भुमिका करुनही दिलीप कुमार फारसे प्रसिध्द झाले नाहीत. १९४७ साली नूरजहांबरोबर त्यांचा सिनेमा रिलिज झाला जुगनू. क्राॅफर्ड मार्केटजवळ लावलेली जुगनू ची होर्डिंग्ज राजकपूरचे आजोबा दिवाण बसेश्वर यांनी दिलीप कुमारांच्या वडिलांना सरवर खानांना दाखवली. त्यांना धक्का बसला. कारण तो पर्यंत त्यांना माहित नव्हते की युसूफ सिनेमात काम करतात आणि तेही दिलीप कुमार नावाने. त्यांची समजूत घालायचा दिवाण बसेश्वरांनी खूप प्रयत्न केला. घरी आल्यावर कित्येक दिवस बोलणे बंद केले सरवरखानांनी. ताण असह्य झाल्यामुळे दिलीप कुमारांनी राजकपूरना ही गोष्ट सांगितली. राजकपूरनी पृथ्वीराज ना दिलीप कुमारांच्या घरी पाठवल्यावर वातावरण बदलले. सरवरखानांच्या मित्रांनीं दिलिपकुमारांनी जुगनू मध्ये केलेल्या कामाची खूप तारिफ केली. नंतर सरवरखानांनी हा सिनेमा पाहिला. खूश झाले आणि घरी आल्यावर दिलीप कुमारांना शाबासकी दिली. थोड्याच दिवसात मोठा भाऊ अयुबखान निधन पावला.

 

बाॅम्बे टाॅकिज चा करार संपला. फिल्मिस्थान ने दिलीप कुमारना बोलावले. शहिद, शबनम, नदिया के पार यशस्वी सिनेमात दिलीप कुमारांनी नाव मिळवले. आर्थिक स्थिती भक्कम झाल्यावर गाडी घेतली. वांद्रे येथे बंगला विकत घेतला आणि सगळे कुटुंब वांद्रे येथे स्थायिक झाले. अस्थमाने सतत आजारी असणारी आई मोठ्या भावाच्या जाण्याने जास्त दुःखी झाली. २७ आगस्ट १९४८ ला तिचे निधन झाले. क्रिकेट मॅच पहायला दिलीप कुमार गेले असताना तिथे त्यांची ओळख मेहबूब खान आणि नौशाद यांच्याबरोबर झाली. मेहबूब खान नी मेला सिनेमात दिलीप कुमारांना रोल दिला. अंदाज, मेला, दीदार असे सिनेमे दिलीप कुमारांना मिळाले. लोकप्रियता वाढत चालली. १९५१ च्या तराना सिनेमा पासून दिलीप कुमार आणि मधुबाला एकत्र आले आणि एकमेकांकडे आकर्षित झाले. हे प्रेम प्रकरण तिच्या वडिलांना अताउल्लाखानाला पसंत नव्हते. कारण ही उत्पन्नाची सोन्याची कोंबडी त्याला हवी होती. त्याने जाहिरपणे सांगितले फळविक्रेत्याच्या मुलाला मी मुलगी देणार नाही. तरीही या दोघांचे प्रकरण सुरुच होते. के.असिफ ने जेव्हा मुगले आझम सिनेमा सुरु केला तेव्हा त्याने दिलीप कुमारना न घेता सप्रू ला घेतले कारण त्याला दिलीप कुमार सलिम च्या भुमिकेसाठी योग्य वाटले नव्हते. पण सिनेमा बंद पडला. शापूरजी पालनजी च्या अर्थसहाय्याने परत सुरु केला तेव्हा दिलीप कुमारना घेतले. त्यांच्या सांगण्यावरुन मधुबाला ला नायिकेचा रोल दिला गेला. नया दौर च्या वेळी मधुबालाच्या वडिलांनी आऊटडोअर शूटींग ला जायला मनाई केली. सिनेमा स्वीकारताना तशी अट घातली नव्हती. चोप्रा खवळले. करारभंग केला म्हणून माझगाव कोर्टात खटला दाखल केला. दिलीप कुमारांनी चोप्रांच्पा बाजूने साक्ष दिली. एके दिवशी दिलीप कुमार काझीला बरोबर घेऊन मधुबालाला भेटले. आत्ता लगेचच निकाह लावूया असे सांगितल्यावर मधुबाला ने नकार दिला. वडिलांना विचारल्या शिवाय मी तयार होणार नाही. दिलीप कुमारांनी खूप समजवायचा प्रयत्न केला. पण मधुबाला ऐकेना. नाईलाजाने त्यांनी तिच्याशी संबंध तोडले. मधुबाला ला नंतर पस्तावली पण वेळ निघून गेली. शेवटच्या कालखंडात तीने दिलीप कुमारांना बोलावले. सगळे विसरुन ते भेटायला गेले. मधुबाला ची अवस्था पाहून ते पण गहिवरले. मधुबालाच्या अंत्यसंस्काराला ते हजर नव्हते पण तिचा चौथ्या दिवसाचे विधी दिलीप कुमारांनी केले.

सतत उदासवाण्या भुमिका घेत राहिल्याने दिलीप कुमारांना काही काळ नैराश्य आले. डाॅक्टरांनी हलके फुलके सिनेमे स्वीकारायचा सल्ला दिला. कोहिनूर, आझाद इत्यादी सिनेमात भुभिका करुन त्यांनी आपली इमेज बदलली. आझाद चे निमार्ते होते एस.एम.एस. नायडू. आझादच्या वेळी दिलीप कुमार मद्रास ला गेले होते. तिथे त्यांची ओळख निर्माते एस.एस.वासन यांच्याबरोबर झाली. वासन चेहरा पाहून भविष्प सांगत. त्यांनी दिलीप कुमारांना सांगितले काही वर्षानी तुमचा विवाह होईल. पत्नी तुमच्या निम्म्या वयाची असेल. ती पण अभिनेत्री असेल. दिलीप कुमार नुसते हसले पण काही वर्षाने तसेच घडले. बिमल राॅय च्या देवदास मधली त्यांची भुमिका अविस्मरणीय होती. खूप अभ्यास करुन त्यांनी ती स्वीकारली. देवदास च्या वेळीच बिमल राॅय नी मधुमति सिनेमाचा विचार केला होता आणि नायकाची भुमिका दिलीप कुमारना दिली. दिलीप कुमारांनी वैजयंतीमाला चे नाव सुचवले. मधुमति चे चित्रण सुरु असतानाच दिलीप कुमार गंगा जमना सिनेमा निर्माण करायचा विचार करत होते. नायिकेच्या रोल साठी वैजयंतीमाला ची त्यांनी केलेली निवड अत्यंत समर्पक ठरली. गंगा जमना च्या टेक्निकलर प्रिंटस लंडन मध्ये काढायला दिलीप कुमार गेले असताना तिथल्या लोकांनी सल्ला दिला हा सिनेमा तुम्ही ऑस्करला पाठवायला हवा होता. कार्लेव्ही व्हॅली फिल्म फेस्टीवल ला हा सिनेमा दाखवला गेला तेव्हा तिथे सर्वांना फार आवडला .  ५० च्या दशकात जोगन, बाबूल, हलचल, दीदार, दाग, शिकस्त, अमर, उडन खटोला, इन्सानियत, नयादौर, देवदास, मधुमति, पैगाम अश्या सिनेमातून दमदार अभिनयाचे दर्शन दिलिपकुमारांनी घडवले. आपला भाऊ नासीर याच्यासाठी गंगा जमना सिनेमाची निर्मिती त्यांनी केली. गंगा जमना खूप लोकप्रिय झाला. 

नसिमबानू ची मुलगी सायरा बानू लंडन ला शिकायली होती. लहानपणापासून ती दिलीप कुमार ची फॅन होती. नसिम बानू ची आई शमशाद क्लासिकल सिंगर होती. तिच्या घरी एकदा गाण्याची मैफिल होती. दिलीप कुमार आपल्या मोठ्या बहिणीबरोबर गाण्याच्या मेफिलीला गेले होते. तिथे सायरा आलेली होती. तिला पाहताक्षणीच दिलीप कुमार तिच्या प्रेमात पडले. त्यांनी मागणी घातली. तिने होकार दिला. या दोघांचे लग्न झाले. सगळी फिल्म इंडस्ट्री आली. पृथ्वीराज कपूर वरात घेऊन आले. अपवाद होता फक्त नौशाद यांचा. ते मात्र हजर नव्हते असा उल्लेख दिलीप कुमारांच्या आत्मचरित्रात आहे. लग्ना नंतर राम और श्याम आणि आदमी या सिनेमांचे उरलेले काम पूर्ण करायला दिलीप कुमार गेले आणि झुक गया आसमान च्या शूटिंगसाठी सायरा मनाली ला निघून गेली. ६० च्या दशकात हाॅलिवूड मधून लाॅरेन्स ऑफ अरेबिया सिनेमात आलेली भुमिका त्यांनी नाकारली. मग ती भुभिका ओमर शेरिफ ला मिळाली. लिडर, दिल दिया दर्द लिया, राम और शाम, संघर्ष या सिनेमात अभिनय कराणार्‍या दिलीप कुमारांनी ७० च्या दशकात दास्तान, गोपी, सगीना, बैराग सिनेमात अभिनय केला पण फारसे यश या सिनेमांना लाभले नाही. ८० च्या दशकात त्यांनी क्रांती सिनेमा पासून चरित्र भुमिका स्वीकारल्या. विधाता, शक्ती, मशाल, दुनिया, धरम अधिकारी, कर्मा,  कानून अपना अपना या सिनेमात आपल्या अभिनयाचे सामर्थ्य परत एकदा दाखवले. १९९८ साली त्यांनी भुमिका केलेला शेवटचा सिनेमा रिलिज झाला किला. 

 

आठ फिल्मफेअर अवाॅर्ड, दादासाहेब फाळके अवार्ड, लाईफ जीवन गौरव पुरस्कार मिळवणारे दिलीप कुमार यांना वाढदिवसाच्या सदिच्छा.

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.