– हेमा अशोक उजळंबकर

चित्तरंजन कोल्हटकरांचा अभिनय पाहिलेली पिढी आज आपल्यात आहे परंतु त्यांचे वडील चिंतामणराव गणेश कोल्हटकरांचा काळ अनुभवलेली पिढी आज जवळपास अस्तित्वात नाही. आजच्या दिवशी १९५९ साली जेंव्हा चिंतामणरावांनी या जगातून एक्झिट घेतली तेंव्हा ते ६० वर्षांचे होते. आज त्यांना जाऊनही ६१ वर्षे झाली आहेत. १९११ ते १९५९ हा त्यांचा काळ. आधी रंगभूमी, नंतर सिनेमा व नंतर परत रंगभूमी असा प्रवास करणाऱ्या चिंतामणरावांना रंगभूमीच्या सेवेसाठी राष्ट्रपतींकडून सुवर्णपदक मिळाले होते. आज त्यांचा स्मृतिदिन.
१२ मार्च १८९९ साली जन्मलेले चिंतामणराव मुळचे रत्नागिरीच्या नेवरे या गावचे. चिंतामणराव ७ वर्षांचे असतांनाच त्यांचे वडील गणेश कोल्हटकरांचे निधन झाले. गणेश कोल्हटकर लेखक आणि वक्ते होते त्यामुळे भाषेचे संस्कार नकळतपणे लहानपणीच चिंतामण वर झालेले. १९११ साली नाट्याचार्य कृष्णाजी खाडिलकरांच्या प्रेरणेने महाराष्ट्र नाटक मंडळीत प्रवेश केला. पुढे १९१८ साली मा दीनानाथ मंगेशकर व कृष्णराव कोल्हापुरे यांच्यासमवेत बळवंत नाटक मंडळीची स्थापना केली. बळवंतची नाटके म्हणजे गद्य व पद्य याचा उत्कृष्ट मिलाफ असायचा. या दरम्यान त्यांनी भरत नाटक मंडळी व किर्लोस्कर नाटक मंडळीतही काम केले. पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, मानापमान, भाऊबंदकी, बेबंदशाही, नेकजात मराठा, संन्यस्त खड्ग, संशयकल्लोळ, माते तुला काय हवंय, हॅम्लेट, ब्रम्हकुमारी, भाग्यवान, मानाजीराव या काही गाजलेल्या नाटकांसह इतरही असंख्य नाटकांमधून त्यांनी बहुढंगी, बहुरूपी भूमिका केल्या. १९३० च्या दशकात बोलपटांचे युग सुरु झाल्याने नाटक मंडळींची परिस्थिती बिघडली. या कारणाने चिंतामणराव सुद्धा रुपेरी पडद्याकडे वळले. बळवंत नाटक मंडळींनी बळवंत पिक्चर्सची स्थापना केली.
Courtesy-Wikipedia
१९५७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार समयी मामा वरेकर व जयशंकर सुंदरी समवेत मध्यभागी चिंतामणराव कोल्हटकर (Image Courtesy- Wikipedia)
१९३६ साली भालजी पेंढारकरांच्या ‘कान्होपात्रा’ चित्रपटात चिंतामणरावांनी रंगविलेला खलनायक प्रेक्षकांना खूप आवडला. आचार्य अत्रेंच्या ‘वसंतसेना’ या चित्रपटातील विनोदी पद्धतीचा खलनायक शकारा तर धमाल जमून आला होता. ‘वसंतसेना राणी माझी सौंदर्याची गोणी’ या त्यांच्या गाण्या व संवादावर प्रेक्षक हास्याचा व टाळ्यांचा कडकडाट करीत. भालजींच्याच १९४२ सालच्या ‘सुनबाई’ चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली. मानाचे पण, माझा राम, मोठी माणसं, वासुदेव बळवंत, मी दारू सोडली, स्वराज्याचा शिलेदार हे चिंतामणरावांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांच्या बहुरूप भूमिका बघून पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना बहुरूपी म्हणून संबोधित. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्रालाही बहुरूपी हेच नाव दिले. या आत्मचरित्रास साहित्य अकादमीने १९५८ साली पारितोषिक देऊन गौरविले. चित्रपट निर्मितीच्या धंद्यात त्यांना प्रचंड नुकसान झाले, त्यामुळे कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या व त्यामुळे अखेरीस त्यांनी रंगभूमीवर परतावे लागले. राजाराम संगीत मंडळी व नाट्यनिकेतन मधून काम केल्यावर त्यांनी स्वतःची ललित कला कुंज नावाची नाटक मंडळी काढली. स्वातंत्र्यवीर सावरकर, राम गणेश गडकरी, वासुदेवशास्त्री खरे अशा अनेक नामवंतांकडून त्यांनी नाटके लिहून घेतली व ती रंगभूमीवर आणली. या सर्वांवर त्यांनी माझे नाटककार हे पुस्तकही लिहिले व प्रकाशित केले. मराठी सोबतच हिंदी आणि उर्दू नाटकातूनही त्यांनी अभिनय केला. विश्राम बेडेकर, पु.ल. देशपांडे, चंद्रकांत गोखले, वसंत शिंदे हे सर्व त्यांचे शिष्य. ‘पुण्यावतार’ हे त्यांनी लिहिलेले पाच अंकी नाटक त्यांच्या निधनानंतर १९६६ साली रंगमंचावर आले.
चिंतामणराव १९४६ व १९४९ साली झालेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांची नातं व चित्तरंजन कोल्हटकरांची मुलगी डॉ विनीता वसंत करमरकर यांनी बलवंत चिंतामणी नावाचे त्यांचे चरित्र लिहिले व प्रकाशित केले आहे.
अशा महान बहुरुप्याला आज त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
Hema Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment