– अजिंक्य उजळंबकर 

चित्रपट क्षेत्रातील करिअरचे आयुष्य अवघे ३ वर्षांचे, स्वतःचे आयुष्य केवळ ३३ वर्षांचे आणि या माणसाचे दिल्लीच्या ५६ व्या राष्ट्रीय पुरस्कार समारंभात व्यासपीठावर तीनदा नाव पुकारले जाते. पहिल्यांदा उत्कृष्ट पटकथेसाठी, दुसऱ्यांदा उत्कृष्ट अभिनेत्यासाठी व तिसऱ्यांदा उत्कृष्ट चित्रपटासाठी. वर्ष २०११. चित्रपट देऊळ. माणूस गिरीश पांडुरंग कुलकर्णी. या समारंभानंतर मराठी चित्रपटसृष्टीने तर सोडाच देशभरात या माणसाकडे लोकं अत्यंत आदराने पाहू लागले. आपल्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत हे गिरीशच्याही लक्षात आले व त्यामुळे गेल्या ९ वर्षात त्याने कधीही आपल्या फॅन्सला नाराज केले नाही. मग तो अभिनेता म्हणून असो कि पटकथाकार, निर्माता वा दिग्दर्शक. आज गिरीशचा ४३ वा वाढदिवस.

गिरीशचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा गावचा. लातुरात अभियांत्रिकीचा डिप्लोमा पूर्ण करीत असतांना रंगभूमीवर काम करण्याची जबरदस्त आवड निर्माण झाली. शिक्षण पूर्ण झाल्यावर एका आयटी कंपनीत कामही केले पण अभिनय क्षेत्रातील व खासकरून लिखाणाची नुसतीच आवड नाहीतर पॅशन काही केल्या स्वस्थ बसू देईना. मग रेडिओ मिर्चीत प्रोग्रामिंग हेड म्हणून नौकरी धरली. दरम्यान लिखाण चालूच होते. संस्कार भारतीच्या नाट्य विभागात गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी व श्रीकांत यादव या तिघांनी वेगवेगळे प्रयोग केले. उमेश कुलकर्णी एफटीआय साठी शॉर्ट फिल्म्स बनवायचे. त्यात गिरीशही त्याला मदत करीत असे. हे सर्व करत करत २००७ साली एका मराठी चित्रपटावर दोघांनी काम सुरु केले. दोघांनी मिळून लिहिलेल्या कथेवर स्वतःच चित्रनिर्मिती करायचे ठरवले. दिग्दर्शनाची जबाबदारी उमेशने घेतली व गिरीशने कथेतील जीवन हे प्रमुख पात्र रंगविण्याचे ठरले. २००८ साली चित्रपट प्रदर्शित झाला. तो होता ‘वळू’. सिनेमा रसिकांना प्रचंड आवडला… सुपरहिट झाला… आणि या सिनेमाने पहिल्यांदा या दोन कुलकर्ण्यांच्या जोडीची ओळख महाराष्ट्राला झाली. ‘वळू’ला असंख्य पुरस्कार मिळाले.

दुसऱ्याच वर्षी म्हणजे २००९ साली आलेल्या व गिरीशची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गाभ्रीचा पाऊस’ ने परत एकदा गिरीश मधील प्रतिभाशाली अभिनेत्याला रसिकांसमोर आणले. यात विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची भूमिका गिरीशने प्रचंड ताकदीने रंगविली होती. याच वर्षी गिरीश आणि उमेशचा दुसरा चित्रपट ‘विहीर’ सुद्धा प्रदर्शित झाला. दोघांच्या जोडीची प्रतिभा बघून अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन ने ‘विहिर’ची निर्मिती केली. ‘विहिर’ची कथा-पटकथा गिरीशनेच लिहिली होती. ‘विहिर’ला व्यावसायिक यश जरी मर्यादित मिळाले असले तरी आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक चित्रपट महोत्सवात चित्रपटाचे कौतुक झाले, सिलेक्शन झाले व नामांकनही मिळाले. यानंतर दोन वर्ष या जोडीने ज्या कथेवर प्रचंड मेहनत घेतली तो म्हणजे ‘देऊळ’ जो प्रदर्शित झाला २०११ साली. कथेपेक्षाही यातील पात्रांचे लिखाण इतके सुरेख झाले होते की प्रत्येक पात्र मराठी रसिकाला अतिशय जवळचे वाटले, आपलेसे वाटले ज्याचा परिणाम असा झाला कि या देवळावर राष्ट्रीय पुरस्कारांचा सोनेरी कळस चढविला गेला. उमेश व गिरीश ही नावे एव्हाना आंतराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचली.

२०१२ सालच्या मसाला चित्रपटातील गिरीशच्या प्रमुख भूमिकेचे व त्याने लिहिलेल्या कथेचे खूप कौतुक झाले व गिरीशला यानंतर हिंदीमधून ऑफर्स येऊ लागल्या. अनुराग कश्यप चा ‘अग्ली’, आमिर खानचा दंगल व ह्रितिक रोशनचा ‘काबील’ या तीन सिनेमात गिरीशने रंगविलेल्या भूमिका हिंदी प्रेक्षकांनांही खूप आवडल्या. २०१५ सालच्या गिरीश-उमेश जोडीच्या ‘हायवे’ सिनेमानेही रसिकांची पसंती मिळविली. प्रमुख अभिनेत्यासोबतच ‘हायवे’ची कथा-पटकथा व संवाद गिरीशचे होते. २०१६ साली उमेशच्या ऐवजी गिरीशने पहिल्यांदा दिग्दर्शनाची जबाबदारी स्वतःवर घेतली  व स्वतःच बाळासाहेब या प्रमुख भूमिकेत त्याने ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ हा धम्माल सिनेमा आणला. ग्रामीण ढंगात रंगलेला व स्वतःच्या शोधात निघालेला गिरीशने रंगविलेला बाळासाहेब मराठी रसिकांना जाम आवडला. २०१६ च्या बाळासाहेब नंतर २०१७ साली गिरीशच्या अप्पाने रसिकांना वेड लावले. ‘ए… फेणे’ या वाक्यातील त्याची खलनायकी स्टाईल लोकांना खूप आवडली व ‘फास्टर फेणे’ या मराठीतील सुपरहिरोसारख्या पात्रापेक्षा गिरीशचा ‘अप्पा’ हा सुपर व्हिलनच लोकांना लक्षात राहिला. मराठी व हिंदी सिनेमांप्रमाणेच ओटीटी या करमणुकीच्या नव्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा गिरीशने दमदार पदार्पण केले. ‘सॅक्रेड गेम्स’ या प्रचंड गाजलेल्या वेब सिरीज मध्ये गिरीशचा बिपीन भोसले हा राजकारणी नव्या पिढीला जाम आवडला. २०१८ साली गिरीशने लिहिलेला व निर्मिती केला, लहान शाळकरी मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारा, ‘धप्पा’ सुद्धा रसिकांना भावला.

येत्या ४ डिसेंबरला ‘भाग बिनी भाग’ या नेटफ्लिक्स वेब सिरीज मध्ये गिरीश नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारतांना दिसणार आहे. शिवाय आगामी मराठी चित्रपटांच्या लेखनावर त्याचे काम चालू आहे. त्याच्या आगामी सर्व प्रोजेक्टला आमच्या शुभेच्छा.

हॅप्पी बर्थडे गिरीश!

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment