सिनेमाची पन्राशी ‘जाॅनी मेरा नाम’

— © विवेक पुणतांबेकर 

     १९७० साल हिंदी सिनेमासाठी महत्वपूर्ण वर्ष.सिनेमाचा ट्रेंड बदलू लागल्याची चाहूल लागली होती.रोमॅन्टीक सिनेमाकडून क्राईम थ्रिलर सिनेमांकडे प्रेक्षकांचा कल दिसायला लागला.याच वर्षी मेरा नाम जोकर रिलीज झाला आणि प्रचंड अपयशी झाला.पण २० नोव्हेंबर १९७० ला रिलिज झालेल्या जाॅनी मेरा नाम चे नेत्रदिपक यश पहिल्यांदाच चित्रनिर्मित उतरलेल्या वितरक गुलशन राय ला भलतेच सुखावून गेले.अनेक ठिकाणी रौप्य महोत्सव साजरा करण्याचे भाग्य या सिनेमाला लाभले. आज या सिनेमाच्या पन्नाशीत जागवलेल्या काही आठवणी.
  गुलशन राय देवानंद च्या सिनेमाचे वितरण करत असत. देवानंद आणि गुलशन राय यांची मैत्री होती.एका पार्टीमध्ये राजकपूर यांनी गुलशन राय ना हिणवले की वितरक फक्त धंदा बघत असतात. सिनेमा निर्मितीचे त्यांना कसलेच ज्ञान नसते. त्यांनी कधीही निर्मितीच्या फंदात पडूच नये. हे ऐकून गुलशन राय अस्वस्थ झाले.  त्यांनी देवानंद ना ही गोष्ट सांगितली. मैत्रीला जागून देवानंद नी ठरवले की गुलशन राय ना निर्माता बनण्यासाठी सगळे सहाय्य करायचे. या साठी नवकेतन ची टीम गुलशन रायसाठी कामाला लागली. यश जोहर नवकेतन चे प्राॅडक्शन कंट्रोलर होते. या ही सिनेमाच्या निर्मितीत त्यांनी ही जबाबदारी उचलली. आपला मोठा भाऊ इंद्रसेन जोहर ला तिहेरी भुमिकेसाठी देवानंद कडे शब्द टाकला.

     दिग्दर्शनासाठी विजय आनंद शिवाय पर्याय नव्हताच. कलात्मक सिनेमाबरोबर पण आपण क्राईम थ्रिलर सिनेमा उत्तम दिग्दर्शित करु शकतो हे तिसरी मंझिल आणि जुवेल थीफ च्या यशाने विजय आनंदनी दाखवून दिले होते. लेखक के.ए.नारायण यांची कथा निवडली. के.ए.नारायण नी जुवेल थीफ, दुनिया, महल या देवानंद अभिनित सिनेमांच्या कथा लिहिल्या होत्या.जाॅनी मेरा नाम ची पटकथा लिहायला विजय आनंद ना सहाय्य केले होते.

 

कथा वेगळी नव्हती. लहानपणी हरवलेले भाऊ कालांतराने परत भेटतात. एक भाऊ पोलिस अधिकारी बनतो दुसरा गुन्हेगार. पोलिस अधिकार्‍याच्या भुमिकेत देवानंद आणि गुन्हेगारांच्या भुमिकेत प्राण ही निवड निश्चित झाली. नायिकेच्या भुमिकेसाठी हेमामालिनी ला घेतले. खलनायकाच्या भुमिकेत प्रेमनाथ ची निवड अत्यंत अचूक ठरली. इंद्रसेन जोहर ची तिहेरी भुमिका त्या वर्षीचे विनोदवीराचे फिल्मफेअर मिळवून गेले. सपनो का सौदागर मध्ये राजकपूरची नायिका म्हणून करियर सुरु केलेल्या हेमामालिनीच्या दृष्टीने महत्वाचा ठरला.संगीतकार म्हणून कल्याणजी आनंदजी यांची केलेली निवड अचूक होती. इंदिवर कल्याणजी आनंदजीं या त्रिकुटांनी दिलेली सहा गाणी अति लोकप्रिय झाली.गोविंद बोलो हरी गोपाल बोलो,नफरत करने वालो के सीने ने प्यार भर लू, बाबुल प्यारे, ओ मेरे राजा, पल भर के लिये कोई हमे प्यार कर ले आणि पदमा खन्ना प्रेमनाथ वर चित्रीत झालेले हुस्नके लाखो रंग ही गाणी लोकप्रिय होण्यात गीतकार संगीतकार गायक यांचा वाटा आहे तितकाच ही गाणी पडद्यावर फुलवणार्‍या दिग्दर्शक विजय आनंद यांचा पण आहे. गाण्याचे टेकींग ही विजय आनंदची खासियत. त्यामुळे गाणी पॅचवर्क न वाटता कथानकाचाच एक भाग वाटत रहातात.सिनेमातली पात्रांची निवड, पटकथेतली सफाई, लोकेशन्स ची केलेली निवड आणि उत्कृष्ट दिग्दर्शन सिनेमाचे संकलन यामुळेच हा गतिमान सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. ज्यावेळी सिनेमा तिकीटांचे दर जास्तीत जास्त दिड ते दोन रुपये असायचे त्या वेळी प्रत्येक टेरेटरित पन्नास लाखाचा धंदा या सिनेमाने केला. दिग्दर्शक म्हणून विजय आनंदला सहा लाख रुपये मानधन मिळाले. हा पण त्या वेळचा उच्चांक होता.

अभिनेता प्राण ना भेटायला विजय आनंद गेले. जाॅनी मेरा नाम मध्ये मला तुम्ही हवे आहात असे सांगितले. प्राण नीं आपली डायरी दाखवली.सगळ्या तारखा भरलेल्या होत्या. यावर काही न बोलता विजय आनंद निघून गेले. ते गेल्यावर प्राणनीं विचार केला तारखा नाहीत म्हणल्यावर काहीच न बोलता निघून जाणारा हा माणूस भला दिसतो आहे. फालतू नखरे करणारा नाही. त्यांनी विजय आनंदना परत बोलावून तारखा ऍडजेस्ट करुन दिल्या.

 

प्रेमनाथ यांचे करियर संपल्यात जमा होते. भोपाळ मधल्या आपल्या सिनेमा थिएटरच्या व्यवसायात गुंतून पडले होते. सिनेमा व्यवसायात परताची त्यांची इच्छा नव्हती पण विजय आनंदनी त्यांची समजूत घालून या सिनेमात भुमिका करायला लावली. परत एकदा आपल्या अभिनयाचे दर्शन घडवत प्रेमनाथ यशस्वी खलनायकाच्या भुमिका करत राहिले.
  यातले ओ मेरे राजा गाणे राजेंद्रकृष्ण नी लिहिले आहे. त्या काळात ते खूप आजारी होते. कल्याणजी त्यांना भेटायला घरी गेले. त्याच वेळी रेसकोर्सवर जॅकपाॅट लागलेल्या राजेंद्रकृष्णनी खुशीत मुखडा ऐकवला खफा ना होना देरसे आयी. कल्याणजींना मुखडा खूप आवडला. त्याच क्षणी राजेंद्र कृष्ण यांनी भराभर अंतरे लिहिले आणि या गीताचा जन्म झाला. नालंदा परिसरात या गाण्याचे शूटींग झाले.त्यावेळी लोकनायक जयप्रकाश नारायण यांची देवानंद बरोबर झालेली ओळख अविस्मरणीय ठरली.हेमामालिनी कडून अभिनय करुन घेताना विजय आनंदना खूप मेहनत करावी लागल्याचा उल्लेख अनिता पाध्ये यांच्या एक होता गोल्डी पुस्तकात आहे. काठमांडून केबलकार वर शूटींग करताना वीजप्रवाह बंद पडला. जवळ जवळ तासभर देवानंद आणि हेमामालिनी अडकून पडले होते. हेमामालिनी ला ग्लॅमरस स्वरुपात आणायचे श्रेय विजय आनंदचे. यातले हेमामालिनी चे ड्रेसेस अलीकडेच दिवंगत झालेल्या भानु अथय्या यांनी तयार केले होते. सिनेमा रिलिज झाल्यावर अनेक ठिकाणी प्रेक्षक तिकीटासाठी रात्रभर उभे रहात असत. जमशेदपूर च्या नटराज थिएटर प्रेक्षकांची एव्हढी गर्दी झाली की पोलीसांना जमावाला आवरायला गोळीबार करावा लागला.

  आज या सिनेमाशी संबंधीत बहुतेक जण काळाच्या पडद्याआड गेले. असा हा बहुचर्चित जाॅनी पन्नास वर्षाचा होतो आहे. आजही या सिनेमाची जादू कायम आहे.
Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment