श्रीदेवी- हिन्दी चित्रपटसृष्टीची पहिली महानायिका

— विद्या धारप 
श्रीदेवी – एक सौंदर्याचं वरदान असलेली अभिनेत्री. या सौंदर्यामुळे ती हिंदी चित्रपट सृष्टीत आली आणि इथली राणी झाली. आपल्या सौंदर्याच्या जोरावर तिने हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आणि नंतर सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तब्बल पंचवीस ते तीस वर्ष आपलं अधिराज्य गाजवलं. 13 ऑगस्ट १९६० मध्ये तमिळनाडू मधल्या शिवकाशी मध्ये नायडू परिवारात श्रीदेवी चा जन्म झाला. तिचे वडिल व्यवसायाने वकील होते. तिची आई राजेश्वरी आणि बहीण श्रीलता. तिला दोन सावत्र भाऊ आहेत, त्यांची नावे आनंद आणि सतीश. श्रीदेवीचे बालपण इतर मुलांसारखं नव्हतं. तिच्या आईला चित्रपटांमध्ये काम करण्याची भयंकर हौस होती, पण ती तिला पुरी करता आली नाही. म्हणून तिची ही हौस तिला श्रीदेवी कडून पूर्ण करवायची होती.
त्यामुळे तिने श्रीदेवीला चित्रपटांमध्ये अभिनयासाठी जाण्यास प्रवृत्त केलं. श्रीदेवीला इतके चित्रपट मिळायला लागले की त्यामुळे लहानपणापासूनच तिला बारा बारा तास काम करणे भाग पडले. तिचे सगळे निर्णय तिची आईच घेत असे. उदाहरणार्थ तिने कुठल्या चित्रपटात काम करायचं, त्याची बिदागी किती घ्यायची आणि त्यासाठी दिवसभरात किती वेळ काम करायचं, हे सगळं श्रीदेवीची आईच ठरवत असे. श्रीदेवीला याव्यतिरिक्त दुसरं आयुष्यच नव्हतं. हिंदी चित्रपट सृष्टीत दक्षिणेकडून येणारी ही काही पहिलीच अभिनेत्री नव्हती. खूप वर्षांपूर्वी दक्षिणेकडून या चित्रपट सृष्टीत वैजयंतीमाला आली आणि नृत्य कौशल्य आणि अभिनयाच्या जोरावर ती इथली राणी झाली. नंतर आलेली हेमामालिनी, ही सुद्धा ड्रीम गर्ल – स्वप्नसुंदरी बनली आणि तिनेही आपले सौंदर्य, नृत्य कौशल्य आणि अभिनयाच्या जोरावर आपला एक काळ गाजवला. त्याच सुमारास आलेल्या रेखाने, जी सुरुवातीस बेढब दिसत असे, तिनेही या वळणावर सौंदर्याची नवीन वाट शोधून काढली आणि आपलं नृत्य आणि अभिनय कौशल्य यांच्या जोरावर आपलं एक नवीनस्थान निर्माण केलं. रेखाचं राज्य चालू असतानाच श्रीदेवी नावाची एक सौंदर्यवती दक्षिणेकडूनच या विश्वात आली.
अतिशय बोलके डोळे, गोड असं हास्य आणि कमनीय बांधा अशा आपल्या गुणांनी तिने बऱ्याच मोठ्या प्रेक्षकवृंदाला मोहित केलं. १९७९ मध्ये, सोलवा सावन या चित्रपटामध्ये श्रीदेवीने काम करण्यास सुरुवात केली. हेच तिचं बॉलीवूड मधील नायिका म्हणून पदार्पण समजलं जाते. पण तिला बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली ही मात्र हिम्मतवाला या चित्रपटामुळे. या चित्रपटात जेष्ठ अभिनेते जितेंद्र हे हिरो होते. त्यांच्या बरोबर तिने अनेक चित्रपटात काम केले. जितेंद्र बरोबरच्या तोहफा या चित्रपटांनी त्या दिवसातील कमाईचे सारे रेकॉर्ड ब्रेक केले होते. श्रीदेवीने आपल्या करिअरची सुरुवात चार वर्षाची असताना दक्षिणेच्या चित्रपटातून केली. १९७१ मधे, वयाच्या केवळ नवव्या वर्षी, तिला मल्याळम चित्रपट “पुमपत्ता” साठी केरळ राज्याच्या राज्यपुरस्काराने सन्मानित केलं गेलं. १९८३ मध्ये तिचा “सदमा” चित्रपट प्रदर्शित झाला, दक्षिणेकडील सुप्रसिद्ध अभिनेते, कमल हसन, यांच्याबरोबर. या चित्रपटातील तिचा अभिनय खरोखरच वाखाणण्यासारखा होता. या चित्रपटासाठी श्रीदेवीला फिल्मफेअर अवॉर्ड साठी पहिलं नामांकन मिळालं. यानंतर १९८६ मध्ये आलेल्या “नगीना” चित्रपटाने तिला खूप प्रसिद्धी मिळाली. पाठोपाठच ‘कर्मा’ आणि ‘जांबाज’ हे दोन चित्रपट देखील प्रदर्शित झाले. १९८७ साली प्रदर्शित झालेल्या “मिस्टर इंडिया” मधली तिची भूमिका ही प्रतिकात्मक समजली गेली. यामध्ये तिने अनिल कपूर यांच्याबरोबर काम केलं होते. यातील हवाहवाई या गाण्यामुळे लोकांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतलं. “काटे नही कटते” हे गाणं ही खूप प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या “चालबाज” या चित्रपटासाठी तिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर “चाँदनी” आणि “लम्हे” हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. यातील “लम्हे” चित्रपटासाठी तिला पुन्हा एकदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर खुदागवाह, जुदाई आणि लाडला असे चित्रपट प्रदर्शित झाले.
याच काळात चित्रपट रसिकांनी तसेच समिक्षकांनी ही तिला, “हिन्दी चित्रपटसृष्टीची पहिली महानायिका” अशी उपाधी बहाल केली. सदमा– १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला सदमा हा श्रीदेवीचा उत्कृष्ट चित्रपट. या चित्रपटाची कथा चाकोरीबाहेरची होती. श्रीदेवीचं दिसणं इथे दुय्यम होतं. कमल हसन सारख्या कसदार अभिनेत्याने खाऊन टाकलेल्या चित्रपटात, श्रीदेवीने लक्षणीय भूमिका केली. तिच्या अभिनयाचे पुरेपूर कौतुक झाले. वयाचंभान न राहिलेली, कमल हसन कडून वेणी घालून घेणारी लहान बालिका, तिने परकर पोलक्यात, फारच सुंदर साकारली होती. क्षणोक्षणी या कथेमध्ये तिच्या अभिनयाची कसोटी लागली आणि तिने ते सहजपणे पेलली. शूटिंगच्या दिवसातही रात्री झोपायला उशीर झाला तरी ती सकाळी सहाच्या ठोक्याला उठत असे. सगळी कामे वेळेवर करणं हे तिनी अमिताभ बच्चन यांच्या कडून शिकले होते. शूटिंगला ती नेहेमीच वेळेवर पोहोचत असे. त्याकाळी तिने बारा-बारा तासकाम केले. सुरुवातीला हिंदी भाषा येतनसल्यामुळे रेखाने तिला उसना आवाजही दिला होता. पण त्यानंतर तिने हिंदी शिकून घेतले. श्रीदेवी भूमिका करताना किती सुंदर दिसते किंवा किती छान अभिनय करते, यापेक्षाही ती स्वतःच स्त्रीत्व जपून असते हेच तिचं वैशिष्ट्य होतं. तिच्या काळात रेखा, माधुरी दीक्षित, जुही चावला अशा नामांकित अभिनेत्रीही काम करत होत्या. त्यांच्या बरोबरीने आपले स्थान निर्माण करणे हे तसं अवघड होतं. पण तिने ते शिवधनुष्य लीलया पेललं. तिच्याबद्दल कुठल्याही अफवा उठल्या नाहीत. तिने कुणाचाही अपमान कधी केला नाही किंवा कोणाशी भांडणे ही केली नाहीत. वेगवेगळ्या भाषातून काम करताना, इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी तिला बऱ्याच गोष्टी झेलाव्या लागल्या. पण आपलं काम टिकवण्यासाठी तिने कधी सौंदर्याचा बाजार मांडला नाही. तिच्या अभिनयात कधीही उत्श्रुंखलपणा दिसला नाही किंवा तिनी कधी उत्तान कामे पण केली नाहीत.
जितेंद्र हा तिचा लकी चार्म होता. त्याच्या बरोबर सुरुवात करून तिने त्याच्याचबरोबर एकंदर १९ चित्रपटकेले आहेत. त्यातले १३ चित्रपट तर खूपच गाजले. अनिल कपूर बरोबर सुद्धा तिचीजोडी चांगली जमली होती. त्याच्या बरोबरसुद्धा तिने तेरा चित्रपट केले आहेत. “रूपकी रानी चोरो का राजा” हा बोनी कपूर यांनी प्रचंड खर्च करून तयार केलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यांनाह्या चित्रपटच्या अपयशामुळे खूप कर्ज झालं होतं. असे म्हणतात की ते फेडण्यासाठीच, जरी ते विवाहित होते तरी, त्यांनी व श्रीदेवी ने लग्न करायचा निर्णय घेतला. १९९६ मधे श्रीदेवीने बोनी कपूर यांच्या बरोबर लग्न करायचं ठरवल्यावर, त्यांच्या परिवारातील बहुतेक जण खूप दुःखी झाले. त्यांच्या वडिलांनी त्यांना घरातून निघून जा असं सांगितलं होते. त्यांच्या सासूने तर त्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली. अर्जुन कपूर आणि अंशुला ही त्यांची दोन्ही मुलंही नाराज होती. पण त्यांची प्रथम पत्नी, मोनाकपूर ने मात्र घटस्फोटाच्या कागदावर सह्या करायचं ठरवलं, कारण श्रीदेवी त्यावेळी गरोदर होती. थोड्याचमहिन्यात तिने मुलीला जन्म दिला आणि त्याच वेळी तिने चित्रपट सृष्टी मधून संन्यास ही घेतला. चित्रपट सृष्टी सोडल्यानंतर सहा- सात वर्षांनीतिनी टीव्हीच्या छोट्या पडद्यावर “मालिनी अय्यर” म्हणून मालिका केली. ही मालिका स्त्री वर्गाची फारच आवडती मालिका ठरली. मालिनी साड्या त्यावेळेस उच्चभ्रू वर्गात फारच आवडी च्या ठरल्या होत्या. कुठल्याही अभिनेत्रींला दृष्टीने, आपलं चित्रपट सृष्टीत होणारं पुनर्पदार्पण, हेफारच कठीण आणि जोखमीचे काम होतं. माधुरी दीक्षित, जुही चावला, करिष्मा कपूर, ऐश्वर्या राय अशा सगळ्या अभिनेत्रींनी चित्रपट सृष्टीत पुनर्पदार्पण केलं त्यावेळी त्यांना बराच संघर्ष करावा लागला होता. अशा परिस्थितीत श्रीदेवीला सुद्धा परत येणे हे तितकंच कठीण होतं. स्टार म्हणून आता तिला प्रेक्षकवर्ग सहज पणे स्वीकार करणार नव्हता. म्हणूनच अभिनयाच्या जोरावरचरित्र अभिनेत्री म्हणून पुनर्पदार्पण करणे योग्य होतं.
२०१२ साली गौरी शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली “इंग्लिश-विंग्लिश” या चित्रपटाद्वारे श्रीदेवी ने चित्रपट सृष्टीत पुनर्पदार्पण केलं. हा तिचा निर्णय अगदी योग्य ठरला. स्वतःच्या वयाच्या स्त्रीचा रोल तिने केला होता. थोड्या मोठ्या वयाच्या स्त्रीचा रोल करतानाही ती खूप सुंदर दिसली. चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली आणि प्रेक्षक वर्गाने देखील या चित्रपटाची खूप प्रशंसा केली. अकादमी अवार्ड साठी सर्वश्रेष्ठ विदेशी फिल्म या श्रेणीत तिचं नामांकन झालं. ३९ वर्षाच्या अभिनेत्रीसाठी या पेक्षा आणखीन मोठी गोष्ट ती काय असू शकेल? यानंतर २०१७ मध्ये तिचा “मॉम” हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात तिच्याबरोबर अक्षय खन्ना आणि नवाजुद्दीन सिद्दिकी हे सहकालकर होते. मॉम मधील तिची भूमिका ही इंग्लिश विंग्लिश च्या भूमिकेच्या अगदी विरोधी होती. इंग्लिश-विंग्लिश मधील आई ही मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेली आई, जीघरातील सगळ्या लोकांच्या पुढे सगळ्याच बाबतीत कमी पडत होती,आणि ती आपली प्रतिमा बदलवून पुढे कसे जाता येईल असा शोध घेत होती. तर मॉम मधील आईची भूमिका अत्यंत कणखर आणि आपल्या कुटुंबासाठी धडाडीने काम करणारी होती. या चित्रपटात, ती आपल्या मुलीवर झालेल्या भयंकर अन्यायाचा बदला कसा घेता येईल, याचा विचार करून योग्य ती योजना बनवून ती अमलात आणणारी, अशी खंबीर आई असते. श्रीदेवीने अशी आव्हानात्मक भूमिका सहज पणे निभावली आहे. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि खूप वर्षांनी काम करत असून सुद्धा श्रीदेवी ने आपल्या अभिनयात बाजी मारली.
श्रीदेवीला तिच्या कारकिर्दीत बरेच पुरस्कार मिळाले. तिला तिच्या दक्षिण भारतीय भाषेतील चित्रपटां साठी मिळालेल्या अनेक पुरस्कारां व्यतिरिक्त आणि तिला मिळालेल्या पाच फिल्म फेअरपुरस्कारां व्यतिरिक्त, २००३ साली MAMI पुरस्कार, त्याचवर्षी लच्छू महाराज पुरस्कार. १९९० साली स्व. स्मिता पाटील मेमोरियल अवॉर्ड आणि २०१३ साली पद्मश्री पुरस्कार मिळाला. मॉम या चित्रपटासाठी तिला बेस्ट एक्ट्रेस चाराष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला. तिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचे एकंदरीत पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. त्यापैकि तीन फिल्मफेअर पुरस्कार दक्षिणेकडील चित्रपटांना (तेलगू आणि तामिळ) मिळाले होते आणि दोन पुरस्कार हिंदी चित्रपटांना (चालबाज आणि लम्हे) मिळाले होते. फिल्मफेअर पुरस्कारा साठी तिला एकंदर ११ नामांकनं मिळाली. मिस्टर इंडिया आणि नगीना या दोन चित्रपटांनातिला स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाले. आणि २०१९ मध्ये तिला “लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड” ही मिळालं. अभिनय हे तिचं सगळ्यात आवडीचं काम होतं. एकदा बोलता बोलता तिने हेही सांगितलं होतं की “ही वाट काटेरी होती, कष्टांची होती, पण माझ्या आवडीची होती. अभिनय माझ्या रक्तातच होता. माझा जन्म हा अभिनयासाठीच आहे.”
मै ख्वाबोंकी कि शहजादी / मै हू हर दिल पे छायी
बादल है मेरी जुल्फे, बिजली मेरी अंगडाई
बिजली गिराने मै हू आई,
कहते है मुझको हवा हवाई //
मिस्टर इंडिया चित्रपटा मधील गाण्याच्या या ओळी तिला अगदी खर्या अर्थाने लागू होतात. फेब्रुवारी २०१८ मध्ये बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह, याच्या लग्नासाठी, श्रीदेवी दुबईला गेली होती. २४ फेब्रुवारी चा तो दिवस होता. श्रीदेवी आंघोळी साठी बाथरूम मधे गेली होती. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही म्हणून बोनी कपूर दरवाजा तोडून आत गेले, तर आतमधे, बाथरूमच्या टबबाथ मधे ती बेशुद्ध पडलेली होती. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तिथे पोहोचण्या आधीच तिचे निधन झालेले होते. फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे अभिनेत्री श्रीदेवी चे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे दुबईच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्यात काहीही संशयास्पद नाही असे ही स्पष्ट करण्यात आले.
अभिनय सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या श्रीदेवीचे 55 व्या वर्षी अकाली निधन झाले. श्रीदेवीला आपल्या आयुष्यात कुठल्याही अफवांना तोंड द्यावे लागले नाही, मात्र मरणानंतर तिच्या बाबतीत बऱ्याच अफवा उठल्या. तिचे संशयास्पद मरण, तिचं वजन, तिने केलेली कॉस्मेटिक सर्जरी ई. सगळ्या गोष्टींवर बराच उहापोह झाला. पण नंतर ही केस बंद करण्यात आली अखेर पद्मश्री श्रीदेवीचा अंत्यसंस्कार राजकीय सन्मानाने करण्यातआला.
ये लम्हे ये पल हम बरसो याद करेंगे
ये मौसम चले गये तो हम फरीयाद करेंगे
श्रीदेवीच्याच लम्हे चित्रपटातील हे गीत आपल्याला नेहमीच तिची आठवण देत राहिल.
Vidya Dharap
+ posts

Leave a comment