अविस्मरणीय गब्बर….

– विजय न्यायाधीश

एखाद्या कलाकाराच्या वाट्याला अशी एखादी भूमिका येते की, ती भूमिका त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख बनून जाते. ज्या काही हाताच्या बोटावर मोजता येणार्या कलावंताच्या वाट्याला हे भाग्य लाभले त्यापैकी एक नाव म्हणजे अमजद खान. भारतीय चित्रपटाच्या वाटचालीतील मैलाचा दगड म्हणून ओळखल्या जाणार्या ‘ शोले ‘ या चित्रपटात अमजद खान या कलावंताने गब्बरसिंग ही भूमिका साकारली आणि अमजद खान या मुळ नावापेक्षा गब्बरसिंग या नावानेच तो अबालवृद्धांमध्ये लोकप्रिय झाला. शोलेमध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी , जया भादुरीसारखे दिग्गज कलाकार असताना खलनायकाच्या भूमिकेतील गब्बरसिंग साकारण्याचे मोठे आव्हान अमजद खानसमोर उभे होते. परंतु कुठेही कमी न पडता किंबहुना काही ठिकाणी वरचढ होत अमजद खानने अशा काही ताकदीने गब्बर साकारला की त्याची भारतीय चित्रपटाच्या इतिहासात नोंद झाली. अर्थात त्या भूमिकेसाठी त्याने घेतलेली मेहनतही तितकीच महत्वाची आहे. गब्बरची देहबोली, त्यातील रासवटपणा, संवादाचे सादरीकरण आणि मुख्य म्हणजे अभिनय या सर्वच बाबतीत चार चाँद लावत अमजद खानने शोले मध्ये बाजी मारली होती. खलनायकाच्या भूमिकेतील मापदंड म्हणून ओळखल्या जाणार्या या कलकाराचा आज स्मुतिदिन. त्यानिमित्ताने त्याच्या चित्रपट कारकिर्दीचा हा एक आढावा घेण्याचा प्रयत्न.
काही तुरळक भूमिकांचा अपवाद वगळता खलनायकी भूमिकेतच वावरलेल्या अमजद खानचा जन्म पाकिस्तानमधील पेशावर येथे 1940 साली झाला. आपल्या परिवारासोबत लहानपणीच तो मुंबईत आला. बांन्द्रा येथील एका इंग्रजी शाळेत त्याचे शिक्षण झाले. वडील जयंत हे उत्तम अभिनेते असल्याने अभिनय कलेचा वारसा त्याला वडीलांकडूनच मिळाला. घरी कलावंतांची उठबस आणि कलेविषयी चर्चा होत असल्याने अमजद खानवर नकळतपणे फिल्मी स्ंस्कार होत गेले, अभिनयाची आवड निर्माण होत गेली. पी.ए.अरोरा यांच्या नाजनीन या चित्रपटात अमजद खान याने बालकलावंत म्हणून पहिल्यांदा भूमिका साकारली. पण तिचा फारसा गवगवा झाला नाही. मात्र चित्रपटात कारकिर्द करण्याच्या हेतूने त्याने के. असिफ यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून उमेदवारी सुरु केली. के. असिफ यांच्या लव्ह अँड गॉड या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करीत असताना अमजद खानने त्यात एक छोटीशी भूमिकाही साकारली होती. त्यानंतर चेतन आनंद यांच्या हिंदूस्तान की कसम या चित्रपटातही त्याने काम केले. परंतु बात कुच बनी नही. त्यानंतर 1975 हे वर्ष अमजद खानचे नशिब उजळवून टाकणारे ठरले. शोले या चित्रपटाची तयारी सुरु असताना खलनायकाच्या भूमिकेसाठी संवाद लेखक सलीम-जावेद या जोडीतील सलीम यांनी अमजद खान याच्या नावाची शिफारस केली होती. त्याआधी त्या भूमिकेसाठी डँनी, शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे विचारणा केली असल्याचे सांगतात मात्र सलीमजींच्या शिफारसीनुसार गब्बरची भूमिका अमजद खानच्या वाट्याला आली. आणि आपल्या वाट्याला आलेल्या एखाद्या भूमिकेचे सोने कसे केले जाते याचा वास्तुपाठ अमजद खान याने घालून दिला. अभिनय, संवाद, लोकप्रियता या सर्वच बाबतीत नायक, नायिकांच्या बरोबरीने आपल्या समर्थ अभिनयाच्या जोरावर तो शोलेमध्ये प्रभावशाली ठरला.
भारतीय चित्रपटाच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर एखाद्या चित्रपटातील खलनायकाच्या तोंडी असलेले सर्वात लोकप्रिय ठरलेले संवाद अमजद खानचेच आहेत. शोलेतील गब्बरच्या तोंडी असलेले जो डर गया समझो मर गया…, अरे ओ सांबा, कितने आदमी थे…, होली कब है…कब है होली…, ये हाथ हमको दे दे ठाकूर…हे आणि इतर संवाद आजही पंचेचाळीस वर्षांपासून सर्वसामान्य रसिकांच्या लक्षात आहेत. पहिल्याच खलनायकी भूमिकेद्वारे सिनेशौकिनांच्या कायम स्मरणात राहणार्या अमजद खान याने शोले नंतर अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या. त्यापैकी लावारीस, याराना, लव्ह स्टोरी, द ग्रेट गँबलर, हम किसी से कम नही, मुक्कदर का सिकंदर, परवरीश, कुर्बानी, देस परदेस, सुहाग, चरस, कालिया, नसीब, रॉकी, बगावत, इन्कार, चमेली की शादी, कस्मे वादे, हिम्मतवाला या काही चित्रपटातील अमजद खानच्या भूमिका गाजलेल्या आहेत. शतरंज के खिलाडी या चित्रपटातील त्याची भूमिका हटके होती. एक-दोन चित्रपटांचे दिग्दर्शनही त्याने करुन पाहिले. पैकी चोर पोलिस या चित्रपटाची थोडीबहूत चर्चा झाली. परंतु दिग्दर्शन हा आपला प्रांत नाही हे लक्षात आल्याने त्याने त्याचा नाद सोडला होता. गब्बर की असली पसंद… म्हणून ब्रिटानिया बिस्किटांच्या जाहिरातीतही तो झळकला होता.
जवळपास सव्वाशे चित्रपटात भूमिका साकारुन भारतीय चित्रपटक्षेत्रात एका खलनायकी भूमिकेद्वारे आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात आणि सिनेशौकीनांच्या स्मरणात राहण्याचा त्याने एक प्रकारचा विक्रमच केला आहे.
Vijay Nyayadhish
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.