– अनंत पावसकर

सकाळी ट्रेनमध्ये बसताच वर्तमानपत्रातल्या एका बातमीने चट्कन लक्ष वेधून घेतलं. स्वरसम्राज्ञी लतादीदींनी एका गाण्याबद्दल ‘ट्विट’ केल्याबद्दलची ती बातमी होती. लतादीदींनी ‘ट्विट’ केलेलं… ‘नमस्कार, इस वर्ष ‘लग जा गले के फिर ये हंसी रात…’’ इस गीत को पचास साल पूरे हो गये है. ऐसा मधुर गीत आज भी पुराना नहीं लगता… लतादीदींच्या या ‘ट्विट’वर लागलीच हजारो प्रतिक्रियांचा, लाखो ‘हिट्स’चा पाऊसच पडला. दुसर्‍या दिवशीच्या बर्‍याच वर्तमानपत्रात तीच बातमी ठळकपणे छापून आलेली. ‘लग जा गले…’ या गाण्याला पन्नास वर्षे झाली? बापऽऽरे! ‘वो कौन थी?’ या 1964 सालच्या सिनेमातल्या मदनमोहनच्या संगीताचं लेणं ल्यालेल्या या सर्वांगसुंदर गाण्याच्या नुसत्या उल्लेखामुळे माझ्याच नव्हे तर तुमच्याही मनात आठवणींचे मोहोळ न उठतं तर नवलच. (Memories of Radio and Hindi Film Songs)

हा चित्रपट 1964 सालचा म्हणता आजा पन्नाशी पार केलेले आम्ही खूपच लहान होतो; परंतु रेडिओमुळे बर्‍याच जुन्या गाण्यांशी आपण सगळ्यांचाच दोस्ताना झाला होता नाही का? ट्रेननं एव्हाना वसई सोडलं होतं. विंडोसीट मिळालेली. त्यामुळे मी थोडासा रिलॅक्स होतो. खिडकीतून बाहेर पाहत असताना मागे-मागे जाणार्‍या दृश्यांबरोबर मेमरी रिवाईन्ड होऊ लागली. आठवू लागले लहानपणीचे रम्यदिवस. रेडिओच्या आठवणी. रेडिओशी आपण सगळ्यांचाच दोस्ताना होता. ती ‘भुली-बिसरदी यादें’, ‘बेला का फूल’!… खरंच! तंत्रज्ञानानं आज आपल्याला अशा वळणावर आणून सोडलंय की, मागे वळून पाहताना तसं चटकन काहीच दृष्टिपथात येत नाहीय. उरल्यात केवळ काही आठवणी. काहीशा धुसर झालेल्या; पण आज मोबाईलवर कुणाला गाणी ऐकताना पाहताच भूतकाळ आण्ि वर्तमानकाळातली रेषा लागलीच पूसट होते. आठवणींचे मोहोठ उठतं. त्या आठवणी केवळ माझ्या एकट्याच्याच असायचं कारण नाही. आज पन्नाशी-साठीत असणार्‍या आम्हा सर्वांनाच नादावून सोडलं होतं ते रेडिओनेच… तेव्हा टीव्ही नव्हते. सिनेमा थिएटर्स, नाटकं, लाईव्ह कार्यक्रम, रेडिओ, ग्रामोफोनच्या तबकड्या, टर्न-टेबल, रेडिओग्राम, मंगलकार्यासाठी म्हणा किंवा सत्यनारायणाची पूजा वगैरे निमित्ताने भाड्याने आणले जाणारे लाऊडस्पीकर्स आणि इराण्याच्या हॉटेलमधला चवन्नी टाकताच गाणं ऐकवणारा ज्युक-बॉक्स. बस्स!! ही एवढीच ढोबळमानाने आमच्या मनोरंजनाची साधनं होतं.
मला आठवतं. रेडिओ हा माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होता.

सकाळी 7 वाजता विविध भारतीच्या सिग्नेचर ट्यूनच्या आवाजाने जाग यायची. सगळ्यांकडेच रेडिओ नव्हते. भिंतीवरची घड्याळंही नव्हती. चाळीतली दहा बाय बाराची खोली! जागेची अडचण। शेजारच्या घरात वाजणारा रेडिओ हेच आमचं घड्याळ, तोच आमचा सुख-दु:खाचा साथी. रेडिओ ही वस्तू श्रीमंतांकडेच असते, ती अतिशय महागडी चैन आहे, असा आम्हा मुलांचा ठाम समज होता, तर आल्या-गेल्या पाहुण्यांना ‘घरात जागेची अडचण आहे’ हा सांगण्यासारखा मस्त पर्याय होता. सकाळची आन्हिकं उरकता उरकता, साडेसातचं ‘संगीत-सरिता’ कानावर पडायचं. हा शास्त्रीय-संगीतावर आधारित छान कार्यक्रम असायचा. एखादा राग निवडून त्याची वैशिष्ट्ये, सौंदर्य-स्थळं, त्याचे आरोह-अवरोह दिग्गजांच्या तोंडून ऐकायला मिळत. त्या दिवशीचे सन्माननीय अतिथी असलेले शास्त्रीय गायक, वादक त्या रागावर आधारित आपली पेशकश करत असत. त्या काळात या कार्यक्रमातून अनेक दिग्गज प्रभृती पेश झालेत हे विशेष. त्यानंतर त्या रागावर आधारित अशी एखादी धून किंवा चित्रपट गीत ऐकवलं जाई. ‘संगीत-सरिता’ नको असेल तर त्याच वेळी लागणारा ‘रेडिओ सिलोन’वरचा ‘पुराने फिल्मों के गीत’ हा कार्यक्रम लोक आवर्जून ऐकत असत. ‘ग्रहांची साडेसाती?’ नकोशी! पण ही ‘रेडिओची साडेसाती’ने सुरू झाली की दिवस कसा मस्त जायचा. अकराची शाळा संध्याकाळी पाचला सुटली की घरी पोहोचताच नाश्ता करून तासभर खेळायला पळायचो. पुढचा तास अभ्यासाचा. अभ्यास करता करता रेडिओचे सूर कानावर मोहिनी घालायचे.

‘फौजी भाईयों की पसंद के फिल्मी गाने!’ जिवाचा कान करून ऐकायचो. या कार्यक्रमासोबत मदमस्त गाण्यांचा जो सिलसिला सुरू व्हायचा तो थेट रात्रीपर्यंत (काय हो? ते झुमरीतल्लैया नेमकं कुठल्या राज्यात आहे बरं!) शेजारचे काका संगीताचे शैकीन असल्याने या रतीबात कधीच खंड पडलेला नाही. लोक त्यांना प्रेमाने रेडिओकाका म्हणत असत. चाळीतल्या खोल्यांमधली कुणाचीच आई ‘लोरी’ गाऊन बाळाला झोपवण्याच्या भानगडीत कधीच पडलेली नाही. (देवाक काळजी!) सर्वचजण ‘बेला के फूल’ हा कार्यक्रम संपताच निद्रादेवीची आराधन करायचे. रेडिओ बंद व्हायचा. ऐकलेल्या गाण्यांचा कैफ मनावर ताजा असतानाच कधी झोपी जायचो ते कळायचंच नाही. सांजधारा, लोकधारा, प्रादेशिक संगीत, हवामहल, चित्रलोक, भुले बिसरे गीत, सँटोजन की महफिल, भावसरगम, आम्हा मुलांसाठी असलेला गंमत-जंमत, गीत-गंगा, इंद्रधनु, आपली आवड, टेकाडे भाऊजी-श्रुतिका, फिल्मसंगीत इ. अशा एकाहून एक सरस कार्यक्रमांची रेलचेल असायची. अभ्यासातल्या कविता चटकन पाठ होत नसत; पण रेडिओवरच्या जाहिराती, जिंगल्स आजही लक्षात आहेत. ‘ये ढेर से कपडे मैं कैसे धोऊं…’, ‘लंबा पैर, छोटा पैर – दुबला पैर, मोटा पैर…’ ‘रंग जमाता है कोकाकोला…’, ‘पापा पापा आए, हमारे लिए क्या लाए…’ ‘तंदुरुस्ती की रक्षा करता है…’ वगैरे वगैरे… रेडिओवरचा खास जिव्हाळ्याचा प्रोग्रॅम म्हणजे अमीन सायानीजींचा ‘बिनाका गीतमाला’. ‘रेडिओ-सिलोन! बुधवारच्या रात्री आठ वाजता अभ्यास, सगळी कामं बाजूला सारून आम्ही हा कार्यक्रम मन:पूर्वक ऐकायचो. हिन्दी चित्रपटसंगीतावर आधारित असा हा पहिला ‘काउंट-डाऊन’ शो. लोकप्रिय गाण्यांचा रंगारंग सिलसिला. गाण्यांचे हे रँकिंग त्या गाण्यांच्या रेकॉर्डस्ची विक्री आणि ‘श्रोतासंघ की राय’ यावर अवलंबून असे. 78 आरपीएम आणि ईपी रेकॉर्डस्वर केवळ दोनच गाणी असल्याने त्यांच्या विक्रीचा अंदाज घेणं सहज शक्य असे. ‘जीऽऽ हां… बहनो और भाईयों…’ असं आपलेपणाने अँकरिंग करणारे अमीन सायानीजी एकेक पायदान पेश करत बिनाका गीतमालाचा वार्षिक कार्यक्रम म्हणजे गाण्यांची मेजवानीच. लहान-थोरांची रेडिओकाकांकडे मैफल जमे. एकेक गाणं पेश होई. काका पैज लावत. टॉपचं गाणं जो अचूक सांगेल त्याला, त्याच्या मुठीत मावतील एवढी ‘रावळगाव चॉकलेटस्’ बक्षीस! ‘फिल्म-फेअर अ‍ॅवॉर्डस्’ जवळजवळ ‘बिनाका गीतमाला’च्याच काळात (1953-54) सुरू झाली होती; पण दोन्हींकडच्या फुटपट्ट्या वेगळ्या होत्या. का कोण जाणे, आमची पसंती ‘बिनाका गीतमाला’लाच असे. चित्रपटसंगीताचं सुवर्णयुग म्हणजे 1965 पर्यंत संपलं होतं; पण आमच्या काळातल्या गाण्यांशी आमचं भावविभोर विश्व निगडीत होतंच की! आम्ही कागद-पेन घेऊन ती यादी लिहून काढायचो. वषभरातल्या आपल्या आवडत्या गाण्यांशी ती ताडून पाहायचो. अमीनभाईंचा आश्वासक, आपलासा वाटणारा आवाज, ती गाणी! ते गायक! व्वा! असे दिग्गज कलाकार ज्या शतकात जन्मले, त्याच शतकात आपलाही जन्म झाला आहे, या सुखद जाणिवेनं आजही किती कृतकृत्य वाटतं.

रेडिओचं खरं महत्त्व लोकांना कधी कळलं ठाऊकेय? माझ्या मते तरी 1971 च्या पाक युद्धकाळात! मला ठळकपणे आठवतंय. दिवाळीच्या सुटीनंतरचा तो काळ. म्हणजे डिसेंबर महिना! (मी तेव्हा केवळ अकरा वर्षांचा होतो.) लढाईच्या काळात सर्व जाम टरकलेले असायचे. सकाळी दहाचा सायरनही नकोसा वाटायचा. अलर्ट – धोका – सब कुछ ठीक असे तीन सायरन सलग वाजायचे. ते आले!? येतील? अशी मूर्तीमंत भीती प्रत्येकाच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसे. शेजार्‍याशेजार्‍यांमध्ये कधी नसेल एवढा सलोखा निर्माण झाला होता. हे काम केलं ते या रेडिओनंच. गाणी ऐकण्याच्या तसं कुणीच मन:स्थितीत नव्हतं. फक्त बातम्या ऐकायला कान आतुर व्हायचे. थिएटर्स तर ओस पडलेली. विमानातून बॉम्ब-अ‍ॅटॅक होण्याची शक्यता असल्याने संध्याकाळ ते पहाटेपर्यंत ब्लॅक-आऊट! रात्र झाली की टेन्स वाढायचा. सगळीकडे अंधार! काहीबाही खाऊन माणसं मोकळ्या मैदानात एकत्र जमत. रेडिओभोवती जमा होत. सर्वजण घरातलं सोनं-नाणं, पैसा-अडका, महत्त्वाच्या चीज-वस्तू, किडुक-मिडुक एका पिशवी घालून चिंताक्रांत अवस्थेत तासन्तास चाळीचा तळमजला किंवा मैदानात बसून राहत. धोक्याचा भोंगा झाला तर नेमकं काय करायचं याचं होमगाड आणि आर. एस. एस. च्या शाखेमधल्या लोकांनी सगळ्यांना ट्रेनिंग दिलं होतं. रेडिओ ऐका, सावध रहा, अफवा पसरवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, अशा सूचना ते द्यायचे. प्रत्येकाची नजर लागलेली असायची ती आकाशाकडे आणि कान रेडिओच्या बातम्यांकडे. कुणाच्या घरात एखादा छोटासा दिवा जरी लुकलुकताना दिसला, तर त्याच्या नावानं शिमगा झालाच म्हणून समजा. खिडक्यांच्या काचांना काळे कागद लावणं कम्पलसरी होतं.

गाड्या त्या काळात तशा कमीच होत्या; पण ज्या होत्या त्यांच्या हेड-लाईटस्ना वरून अर्ध्यापर्यंत रंग लावणं सक्तीचं होतं. धोक्याचा भोंगा होताच गाड्या जागच्या जागी थांबवल्या जात. हेड-लाईटस् ऑफ! नुसता अंधार! ब्लॅ-आऊट!! विडी-काडी शिलगावत जर कुणी रस्त्यावरून जातना दिसलाच तर त्याची खैर नव्हती. कुणीही त्याच्या बिनदिक्कत मुस्कटात मारे भोंगा! मग ते ट्रायलचा असो की अटॅकचा, एरवी दादा म्हणून रोब झाडणारे, त्या काळात भिजलेल्या उंदरासारखे रेडिओजवळच येऊन बसत. नको ती रात्र असं वाटायचं. शाळेतही जेव्हा आम्हाला बॉम्ब अ‍ॅटॅक, प्रथमोपचार वगैरे ट्रेनिंग देऊ लागले तेव्हा आम्ही मुलं मात्र भयंकर घाबरलो. हे प्रकरण काहीतरी गंभीर आहे, याची बोचरी जाणीव होऊ लागली. आई शाळेत जाताता टाटा करायची त्यातही निरवानिरवीचा वास येऊ लागला होता. आम्ही इथे मुंबईत. दूर सीमेवर काय घडतंय, यासाठी रेडिओवरच्या बातम्या हा एकच एक दुवा होता. बस्स! त्या बातम्यात तथ्य असे. त्या खर्‍या असत. आजच्या चॅनलवाल्यांसारखं त्यात खमंग तिखटमीठ, अतिशयोक्ती नसे. रेडिओ हा जणू सरकारचा प्रवक्ताच. पुढे युद्ध संपलं; पण ‘वॉर’ या एका टेन्सनं लोकांना मनानं खूप जवळ आणलं आणि रेडिओने तर लोकांच्या मनात मानाचं स्थान पटकावलं, असं निदान मला तरी वाटतं. रेडिओच्या वापरासाठी त्याकाळी सरकारकडे फी भरावी लागे. ही लायसेन्स फी वर्षाकाठी पंधरा रुपये असल्याचं आठवतंय. ती पोस्टात भरावी लागे. दोन-चारशे पगार घेणार्‍यांसाठी ती जड जायची म्हणतात; पण संगीताच्या हौसेखातर लोक ती इमानदारीत भरत, हे विशेष. वर्षाच्या शेवटच्या पंधरवड्यात पोस्टात लांबलचक रांगा लागत. काय चक्र फिरली कुणास ठाऊक! मायबाप सरकारने दोन बँडच्या ट्रान्झिटर्स-रेडिओला लायसेन्स फी-माफी (1977) जाहीर केली. ती पळवाट मिळताच फिलिप्स कंपनीने दोन बँडचे ट्रान्झिटस्टर्स आणले. त्या दिवसांत इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धूम झाली होती. त्या दिवाळीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांपेक्षा अधि खरेदी-विक्री झाली ती ट्रान्झिस्टर्स, रेडिओचीच. सगळीकडे ते दिसू लागले. पानपट्टीच्या गादीवर मोठा आरसा, डोळा मारणार्‍या थ्री-डी फोटो आणि ट्रान्झिस्टर या जणू आवश्यक गोष्टी समजल्या जात. मुंबईतून गावाकडे जाणार्‍यांच्या खांद्यावर ट्रान्झिस्टर लटकलेला असणं हे स्टेटस-सिंबॉल होता. सलूनमध्ये ट्रान्झिस्टर्स, रेडिओ असायलाच हवेत असा दंडक होता. रेडिओ हे केवळ मनोरंजनाचंच साधन नव्हतं. या रेडिओचं कलेच्या क्षेत्रात मोठं योगदान आहे. कित्येक कलाकार या रेडिओने घडवलेत. रेडिओवर नेहमी काही ना काही कार्यक्रम होत असत. त्यात नव्या कलाकारांना संधी मिळताच त्या संधीचं सोनं करत असत. या कार्यक्रमाच्या अमृतमंथनातून अनेक रत्ने गवसलीत. ज्यांचे नाव उच्चारताच आज आले हात आदरानं कानाच्या पाळीकडे आपसुकच जातात, अशांपैकी अनेक दिग्गजांनी आपल्या करिअरची सुरुवात केलीय ती रेडिओवरून अरुण दाते नावाचा ‘शुक्रतारा’ याच रेडिओच्या क्षितिजावर उगवला.

‘केशवा माधवा’ गाणारी सुमनताई, ‘घननिळा लडिवाळा’ गाणारी माणिकताई याच रोडिओवर आम्हाला गवसली. लतादीदी, आशताईंनी याच रेडिओच्या माध्यमातून अनेकांचे धकाधकीचे जीवन सुसह्य केलं. बाबूजी, यशवंत देव, खळेकाका प्रभृतींशी याच रेडिओमुळे जानपहेचाल झाली. गदिमा – बाबूजीकृ ‘गीत-रामायण’ रेडिओनेच ऐकवलं. किती आठवण सांगू? या कुबेरधनाने जे दिलंय त्याची कधी मोजदाद करता येणारेय का? आणखी एक गंमत आठवतेय. त्या काळात आपल्या चाळीतल्या खोल्यांच्या दारावर ‘नावाची पार्टी’ लावण्याची फॅशन रुढ झाली होती. आपल्या नावापुढे आपलं क्वालिफिकेशन लिहिण्यात बर्‍याच जणांना धन्यता वाटे. श्री. निवृत्तीनाथ गलगले (बी. ए.) किंवा (एम. ए.) वगैरे वगैरे… याच चालीवर छोटे छोटे कलाकार रेडिओ कार्यक्रमात साधी ढोलकी, मंजिरा वाजवून जरी आले तरी आपल्या नावापुढे ‘रेडिओ-स्टार’ ही बिरुदावली हमखास मिरवायचे. ‘धूम! ऽऽ धूम्म-पटक!!…’ एवढाच ताल ठाऊक असलेल्या एका वादकानं आपल्या नावापुढे ‘मृदुंगमणि – रेडिओस्टार’ अशी पदवी लावल्याचे मी या डोळ्यांनी पाहिलंय.

ट्रान्झिस्टराईज्ड – रेडिओ येताच रेडिओ फिव्हर आणखी वाढला. रेडिओकाकांचा रेडिओ सतत बिघडू लागल्याने ते वैतागले होते. रेडिओवर अनेक मॅकेनिक्सने केलेले अत्याचार पाहून सर्वांनाच दु:ख होई. रिपेअरिंगमध्ये बक्कळ पैसा जाऊ लागताच, रेडिओकाकांनी आपल्या जुन्या रेडिओला रामराम करायचं ठरवलं. दिवाळी आली. मस्त मोठा ट्रान्झिस्टराईज्ड – रेडिओ आणायला म्हणून ते मार्केटला निघाले. हौस म्हणून माझ्या बाबांसह बरेच शेजारी त्यांच्यासोबत, त्यांच्या मदतीला म्हणला किंवा चॉईससाठी गेले होते. त्या दिवशी कोणतं नक्षत्र होतं कुणास ठाऊक. तो दिवस आमच्यासाठी तरी सोनियाचा दिन ठरला. रेडिओ-विव्रेता लालवाणीने या लोकांना कसं पटवलं, त्यांच्यावर काय जादू केली की पट्टी पढवली कुणास ठाऊक त्या एकाच दिवशी आमच्या मजल्यावरच सात खोल्यांमध्ये रेडिओचं आगमन झालं. जग जिंकल्याचा आनंद आमच्या चेहर्‍यावर होता. रेडिओ ऐकणं ही गोष्ट आता परवानाधारक गोष्ट झाली होती. ऑफिशियल! त्या दिवसापासून घरातला रेडिओ हा आमच्यासाठी सर्व सुखाचे आगर ठरला. रेडिओची एकंदर प्रगती थक्क करणारी होती. रेडिओ-मॅकेनिक्स तर आजच्या ‘एमबीए’वाल्यांपेक्षाही रुबाबात राहत. आपल्या छोकर्‍याला आपल्यासारखी नॉर्मल क्लार्कची नोकरी करायला लागू नये म्हणून कित्येकांनी आपल्या मुलांना रेडिओ-ट्रान्झिस्टर्स रिपेअरिंगच्या कोर्सला घातलं होतं. (मनोहर जोशीसाहेबांची ‘कोहिनूर’ इन्स्टिट्यूट!) जेव्हा ‘सोनी’ कंपनीने छोट्या डायरीच्या आकाराचे ट्रान्झिस्टर्स बाजारात आणले. (1976-77) तेव्हा मार्केटमध्ये हलचल झाली. ते हातोहात विकले जात. हॉट केक्स!! त्या सिझनमधल्या सगळ्या क्रिकेटच्या मॅचेस आम्ही या छोट्या ट्रान्झिस्टरवरच ऐकल्या. त्याला (मोनो) हेडफोन असल्याने आम्ही तो पुस्तकांमध्ये लपवून शाळेतही न्यायचो. रेडिओ ऐकणं हा मामला आता ‘व्हेरी-पर्सनल’ झाला होता. मजा वाटली; पण इथंच खरंतर रेडिओच्या अढळस्थानाला पहिला धक्का लागला. या लाल किंवा निळ्या रंगाच्या ट्रान्झिस्टरचं रुपडं मन मोहून टाकणारं होतं. याच टप्प्यावर आम्ही रेडिओपासून आमच्या नकळत दुरावत चाललो होता. 1972 ची गांधी-जयंती आठवतेय. याची दिवशी ‘टीव्ही’ने मुंबईत आगमन केलं. तेव्हा ‘टीव्ही’ मोजक्याच लोकांकडे होते. 1974 च्या आसपास कॅसेटस्चा जमाना आला. टू-इन-वन आले. रेडिओवरचे आपल्या आवडीचे कार्यक्रम टेप करून ठेवता येऊ लागले. कॅसेटस्ने हातपाय पसरले आणि रेडिओच्या अवमूल्यनाला सुरुवात झाली. इकडे टीव्हीने हळूहळू सगळ्यांनाच झपाटलं होतं. या टीव्हीमुळे काही ठिकाणी स्नेहभाव वाढीस लागला, तर काही ठिकाणी निष्कारण दुष्मनीही निर्माण झाली. कित्येक लग्ने जमलीत या टीव्हीमुळे. संध्याकाळच्या सहा वाजण्याची लोक चातकासारखी वाट पाहायचे. छायागीत-चित्रहार बघण्यासाठी लोक आतुरलेले असायचे.

रविवार दुपारची साप्ताहिकी लोक लिहून काढायचे. टीव्हीवर एखादा सुपरहिट चित्रपट असला की, मुंबई बंदसारखा माहौल. रविवारी सकाळी आलेले पाहुणे संध्याकाळचा पिक्चर पाहूनच परतायचे. या टीव्हीच्या दिवानगीमुळे रेडिओचं महत्त्व कमी कमी होत गेलं. रामायण, हमलोग, ये जो है जिंदगी, महाभारत अशा सिरियल्समुळे टीव्हीचं प्रस्थ वाढत गेलं. तो घराघरात आला आणि एक दिवस त्याने रेडिओच्या दिवाणखान्यातल्या जागेवर निर्दयपणे कब्जा केला. बिचार्‍या रेडिओचं सिंहासन हिरावून घेतलं गेलं. जणू त्याची कुणाला गरजच नव्हती. पुढे तो आतली खोली, स्वयंपाकघर असा रखडता प्रवास करत नगण्य कोटीत गणला जाऊ लागला. दात पडलेला सिंह! 1982 च्या ‘एशियाड’संगे कलर-टीव्ही आले. रेडिओ चक्क अडगळीत गेला! ‘व्हीसीआर’ येताच त्याला सुरुंग लागला आणि ‘केबल टीव्ही’ने तर त्याला नेस्तनाबूत केलं. कायमचं! रेडिओप्रेमींचं मन आव्रंदत होतं; पण इलाज नव्हता. लोक आता दिवसभर ‘टीव्ही’लाच चिकटून राहू लागले. ‘व्हीसीआर’ भाड्याने आणून एका रात्रीत तीन-चार पिक्चर्स पाहू लागले. नंतर सीडी-व्हीसीडी-डिव्हिडी एकामागोमाग आल्या, आयपॉड, एमपीथ्री आले. झालं! रेडिओ पूर्णत: विस्मृतीत गेला! लोक चाळीतून दूर उपनगरात मोठ्या ऐसपैस फलॅटस्मध्ये शिफट झाले खरे; पण दिवाणखान्यात रेडिओ दिसेना. तो शिफिटंगच्या वेळी किंवा इथल्या गृहप्रवेशाआधीच भंगारवाल्याला विकला गेला. कशाला ती अडगळ? नवं ते आपलंसे करत आपण त्याला विसरलो; पण रेडिओ संपला नव्हता. कुणीतरी शक्कल लढवली. त्यानं कात टाकली. हवा का रुख देखकर त्यानं आता नवं रुप धारण केलं. एफ. एम. रेडिओ!! एफ. एम. आले तेच वाजतगाजत. रेडिओला पुन्हा संजीवनी मिळाली. ‘बॅक विथ द बँग!!’ या एफ. एम. मुळे आज लोकांच्या गाणी ऐकण्याच्या आवडीला पुन्हा खतपाणी मिळालंय. त्यांना पुन्हा रेडिओ आपल्या जीवनाचा अविभाज्य हिस्सा झाल्याचं पाहून, त्यांचा आत्मा नक्कीच सुखावत असेल.

महिन्याची ‘पहिली तारीख’ आली की, आज पन्नाशी पार केलेल्या आम्हा सर्वांना किशोरकुमारने गायलेले ‘दिन है सुहाना आज पहली तारीख है…’ (पहली तारीख – 1954) हे बाबूजींनी (सुधीर फडकेजी) संगीतबद्ध केलेलं गाणं हमखास आठवतं. एक तारखेला सकाळी साडेसातच्या ठोक्याला ते रेडिओवर लागायचं. आज ‘बिनाका गीतमाला’ आणि या गाण्याने चक्क साठी पार केलीय. कुणी ‘ट्विट’ करेल का ‘ट्विट’?

Anant Pavaskar
Anant Pavaskar
+ posts

अनंत पावसकर

ज्येष्ठ पत्रकार आणि संगीत संयोजक

१९९२ साली "आज दिनांक" दैनिकातून "संगीत विषयक लेख" लिहिण्याला प्रारंभ. त्यानंतर साप्ताहिक श्री, वृत्तमानस आणि विविध दिवाळी अंकात लेखन.
१९९३ साली "दै. सामनाच्या" फुलोरा पुरवणीत ब-याच कव्हर स्टोरीज लिहिल्यानंतर "आठवणीतील गाणी" हे सदर सुरू झाले..जे सलग सात वर्षे सुरू होते. आपला व्यवसाय म्हणून व्हीनस म्युझिक कंपनी मध्ये ध्वनिमुद्रण अधिकारी या पदावर काम करत असताना संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती आणि थेट संवाद साधत केलेलं लिखाण वाचकप्रिय झालं. मराठीत पहिले "ई-बुक" बनविण्याचा मान त्यांच्याकडे जातो. आज त्यांची चार "ई-बुक्स" खूपच लोकप्रिय झालेली आहेत.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.