आपल्याला द्राक्षाचे दोन रंग आणि दोनच प्रकार माहित असतात. काळे आणि हिरवे. गोड आणि आंबट. पण ती पिकवण्यासाठी कोणत्या रसायनांचा वापर झालाय का ? रंग गडद आणि चव गोड होण्यासाठी विशिष्ट औषधी तर वापरली नाहीत ना ? ती द्राक्षं आपल्या आरोग्यासाठी पौष्टीक आहेत का ? याचा आपण कधी विचार करतो का ? आपल्या इकडच्या द्राक्षांचं युरोपात वारेमाप कौतुक होत असतं. आपल्या नाशिकच्या द्राक्षांनी परदेशी बाजारपेठा फुललेल्या असतात पण त्या दर्जाची द्राक्ष मात्र आपल्यापर्यंत पोहचतच नाहीत. हे असं का होतं निर्यातीच्या दर्जाची द्राक्षं काही वेगळ्या प्रकारची असतात का ती आपल्या बाजारपेठेत उपलब्ध होतात का त्याची निर्मिती आणि विक्री प्रक्रिया कशी असते या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी पोहोचली नाशिकच्या द्राक्षांच्या मळ्यात. तिथे तिने उमेश राठी, महेश भुतडा आणि कृषीतज्ज्ञ अमोल गो-हे यांच्याशी संवाद साधला. या मुलाखतीचा व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडिया पेजवर आणि युट्युब चॅनलवर पोस्ट केल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी स्पृहाने नाशिकचे कृषीतज्ज्ञ अमोल गो-हे यांच्या कामाविषयीचा आणि सेंद्रिय भाजीपाल्याचे महत्त्व सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर हे काम कसं चालतं हे बघण्यासाठी ती थेट नाशिक जिल्यातील बोराळे या खेडेगावातील एका शेतात पोहचली होती. तिथे तिने प्रगतीशिल शेतकरी संजय पवार आणि अमोल गो-हे यांच्याशी गप्पा मारत सेंद्रिय भाजीपाला पिकवण्याची प्रक्रिया, विक्रीची पद्धत याबद्दल माहिती जाणून घेतली होती. तिच्या या व्हिडियोला जवळपास दोन लाख व्ह्युव्ज मिळाले. तिच्या या उपक्रमाचं अनेकांनी कौतुकही केलं. याच विषयात अधिक जनजागृती व्हावी या हेतुने आणि आपल्याकडील शेतीतील विविध प्रयोगांची माहिती समजून घेण्यासाठी तिने नाशिकमधील द्राक्षांच्या मळ्याला भेट दिली होती.

या मुलाखतीदरम्यान बोलताना अमोल गो-हे म्हणाले की, “आपल्याकडे भाजीपाला आणि फळे यासंबधी अजूनही सर्वसामान्यांमध्ये जागरुकता नाही. आपण आजही चप्पल एसी शोरुममधून आणि भाजीपाला रस्त्यावरुन खरेदी करतो. सेंद्रिय भाजीपाला असो किंवा रसायन विरहीत फळे असो याबद्दलची गरज आणि महत्त्व समजून घेणं खूप गरजेचं आहे. ऑरगॅनिक लेबल असलेले महागडे प्रॉडक्ट्स आपण विकत घेतो परंतू हीच तत्परता भाजीपाला, फळांच्या बाबतीत दाखवत नाहीत.” हा सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला नेमका बनतो कसा, ही परदेशात निर्यात होणारी द्राक्षं कशी असतात हे सर्व जाणून घेण्यासाठी स्पृहाने हा नाशिकचा खास दौरा केला. याबद्दलचे व्हिडियोज तिने तिच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्युब पेजवर टाकले आहेत.

Website | + posts

Leave a comment