– © अजिंक्य उजळंबकर

“जब शिवाजीराजे की तलवार चलती है तब औरतों का घूंघट और ब्राम्हणों का जनेऊ सलामत रहता है” अरे हा संवाद जर मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनवर बघतांना अंगावर रोमांच उभे राहत असतील तर भव्य सिल्व्हर स्क्रीनवर बघतांना व डॉल्बी डिजीटल साउंड इफेक्ट्स मध्ये ऐकतांना काय जाम मजा येईल नाही? ही प्रतिक्रिया होती एका महाविद्यालयीन तरुणाची, त्याच्या मित्राशी बोलतांना, जो बाईकवर बसून मोबाईल वर आगामी ‘तानाजी’ चित्रपटाचे ट्रेलर बघत होता. मी आपला बाजूला उभे राहून त्यांचा संवाद ऐकत होतो.

सोशल मीडियाचे युग आहे आणि सध्या त्याच्याच भाषेत बोलायचे झाल्यास ऐतिहासिक ऍक्शन सिनेमा टॉप ट्रेन्डीन्ग आहेत. यु-ट्यूब वर आज १० जानेवारी रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘तानाजी’ चित्रपटाचे ट्रेलर तब्बल ४ कोटी ७६ लाख लोकांनी पहिले आहे व त्यातील १० लाख रसिकांनी त्यावरील लाईकचे बटन दाबून त्याला पसंती दिली आहे. ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत असलेला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ चे सुद्धा असेच. याच्या ट्रेलरने आज एका महिन्यात दर्शकांचा आकडा ४ कोटी पार केला आहे. हे झालं हिंदी सिनेमांचे.

आपल्या माय मराठी सिनेमांकडे बघितले तर इथेही ऐतिहासिक चित्रपटांचा व त्यातही खासकरून युद्धपट ज्याला म्हणता येईल असे ऍक्शन फिल्म्सचा ट्रेंड चांगलाच रुळला आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘फर्जंद’ व ‘फत्तेशिकस्त’ यांना मिळालेली रसिकांची पसंतीची पावती हेच दर्शवते. हिंदी चित्रपटसृष्टीच्या गेल्या दशकावर (खासकरून २००५ च्या नंतर) नजर टाकली तर रियलिस्टिक म्हणजे वास्तववादी चित्रपट निर्मितीकडे झुकलेला हा कालखंड होता व आजही आहे. करमणूक तर व्हावीच पण सोबतीला काहीतरी वेगळे व वास्तववादी बघायला मिळावे हि रसिकांची चव लक्षात घेऊन हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक त्याप्रकारचे चित्रपट आणू लागले. मराठीत खरंतर प्रायोगिक व वेगळ्या विषयांवर चित्रपटनिर्मितीची परंपरा पहिलेपासूनच होती व आहे. पण ८०-९० च्या दशकानंतर हिंदी सिनेमाचा प्रेक्षक जेंव्हा तद्दन गल्लाभरू व्यावसायिक निर्मितीला कंटाळला, नाकारू लागला व हळूहळू वास्तववादी व त्यातल्या त्यात काहीतरी नवीन आशय असलेल्या चित्रपटांना यश मिळू लागले त्यानंतर अशा प्रयोगांची संख्या वाढली. त्याचेच एक प्रतीक आजचा आघाडीचा अभिनेता आयुष्यमान खुराणा आहे असे मला वाटते ज्याचा प्रत्येक चित्रपट ऑफबीट आहे व आज त्याचा प्रचंड मोठा फॅनबेस आहे. मग जशीजशी वेगवेगळ्या वास्तववादी विषयांवर चित्रपट निर्मितीची भूक वाढली तेंव्हा ती मिटविण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक व लेखक मंडळींनी आपला मोर्चा ऐतिहासिक चित्रपटांकडे वळवला. हिंदी व मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीने. ऐतिहासिक चित्रपटांमध्येही सध्या शिवकालीन व पेशवेकालीन कालखंडाच्या अवतीभोवती फिरणाऱ्या व चित्रपटाच्या कथेचा/पात्रांचा महाराष्ट्राशी संबंध असणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढलेली आपणास दिसून येत आहे. ©

योगायोग बघा ना. २०१९ वर्षाची सुरुवात २६ जानेवारी रोजी प्रदर्शित ‘मणिकर्णिका-दि क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाने झाली आणि आता शेवटही नुकताच प्रदर्शित झालेल्या व याच विषयावरील निर्मिती असलेल्या ‘दि वॉरियर क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाने होतोय. झांशीची राणी लक्ष्मीबाईचा जीवनपट उलगडून दाखवणारे हे दोन्ही चित्रपट. माणिकर्णिकात कंगना राणावत राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत होती तर वॉरियर क्वीन मध्ये (आपलीच मराठमोळी पण अमेरिकन अभिनेत्री अशी जिची ओळख आहे अशी) देविका भिसे हिने हि भूमिका साकारली आहे. वॉरियर क्वीन हि तशी मूळ इंग्रजी भाषेतील कलाकृती जी आता हिंदी, मराठी भाषेत डब होऊन प्रदर्शित झाली आहे. ‘मणिकर्णिका’ ला मिळालेले यश खूप मोठे नसले तरी निर्मात्यांसाठी हे प्रॉफिटेबल प्रपोजल ठरले. ‘वॉरियर क्वीन’ ला मात्र फिल्म फेस्टिव्हल्समध्ये समीक्षकांच्या मिळालेल्या कौतुकावरच समाधान मानावे लागले. मुळात इतिहासात ज्या योद्धयांची, राजांची, राण्यांची ओळख हिंदुस्थानाला व हिंदू धर्माला वाचविण्यासाठी प्राणांची आहुती देणारे अशी आहे, स्वराज्य निर्मिती ज्यांनी केली व तो वारसा, तो यज्ञ पुढे अखंडपणे अगदी भारतावर ब्रिटिशांचे आक्रमण होवोस्तर ज्यांनी चालविला, तो यज्ञ सतत धगधगत ठेवला अशा पात्रांना केंद्रस्थानी घेऊन चित्रपट निर्मिती आता होऊ लागली आहे ही निश्चितच एका समाधानाची बाब आहे. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असोत, पेशवे असोत कि राणी लक्ष्मीबाई. ©

मराठी चित्रपटसृष्टी सुद्धा यात मागे नाही. छत्रपतींचा मावळा कोंडाजी फर्जंदाने इतर मावळ्यांच्या सहकार्याने व शौर्याने पन्हाळ्याचा किल्ला कसा काबीज केला याची वीरगाथा सांगणारा ‘फर्जंद’ हा मराठी चित्रपट गेल्या वर्षी खूप गाजला. विशेष म्हणजे अंकित मोहन या मूळच्या अमराठी कलाकाराने साकारलेली कोंडाजी फर्जंदची भूमिका प्रेक्षकांना मनापासून आवडली. चित्रपटाला मिळालेल्या पसंतीच्या पावतीने दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी त्वरित ‘फत्तेशिकस्त’ ची निर्मिती केली जो सध्या अजूनही प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचतोय. ‘फत्तेशिकस्त’ मध्ये पुण्यातील लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे कशी छाटली या प्रसंगावर आधारित कथानक गुंफण्यात आलं आहे. निर्माते दिग्दर्शक टीम तीच असल्याने कलाकार व त्यांनी रंगविलेली पात्रे फर्जंदमधीलच आहेत. पाच वर्षांपूर्वी २०१४ साली अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने दुसऱ्यांदा (प्रथम – प्रेम म्हणजे प्रेम असतं) दिग्दर्शनाची जबाबदारी अंगावर घेत ‘रमा माधव’ हा चित्रपट रसिकांसमोर आणला होता. माधवराव पेशवे व त्यांची बालविवाह होऊन शनिवार वाड्यात प्रवेश करणारी १२ वर्षांची रमा यांच्या प्रेमकथेला केंद्रस्थानी ठेवत त्या कालखंडात घडलेल्या घटनाक्रमांना चित्रित करण्यात आले होते. कथा पटकथा व संवाद लेखक म्हणून मृणालच होत्या. नितीन देसाई यांचे कलादिग्दर्शन होते. ऐतिहासिक चित्रपटांचे, मालिकांचे कला दिग्दर्शन (व दिग्दर्शन सुद्धा) करण्याचा सर्वात जास्त अनुभव व त्यात असणारी निपुणता यामुळे चित्रपट हिंदी असो वा मराठी कला दिग्दर्शन करण्याची जबाबदारी सहसा नितीन देसाईंकडेच असते. शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ यांच्या आयुष्यावर आधारित ‘राजमाता जिजाऊ’ हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला पण त्यास रसिकांचा फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. आजच्या गाजत असलेल्या संभाजी मालिकेतील अमोल कोल्हे या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत होते.

मराठी चित्रपटसृष्टीच्या बाबतीत एक बाब मात्र प्रकर्षाने खटकते. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी १९४० व ५० च्या दशकात शिवकालीन कालखंडांवर जी चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन केले, त्यानंतर मात्र अजूनही एकही नाव असे सांगता येत नाही की ज्या निर्मात्या दिग्दर्शकाने या सुवर्ण इतिहासाला प्रेक्षकांसमोर आणण्याचा इतका पोटतिडकीने प्रयत्न केला असेल. भालजींनी दिग्दर्शित केलेल्या ४२ चित्रपटांपैकी जास्तीत जास्त हे ऐतिहासिक तर होतेच पण त्यातल्या त्यात शिवाजी महाराजांचा अख्खा कालखंड प्रेक्षकांसमोर आणणारेच जास्त होते. ‘नेताजी पालकर’, ‘थोरातांची कमळा’, ‘बहिर्जी नाईक’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘महाराणी येसूबाई’, ‘पावनखिंड’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’ इत्यादी भालजींनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचा इथे विशेष उल्लेख करावा लागेल. २०१२ साली निर्माता संजय छाब्रिया व दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी हा शिवकालीन कालखंड एका वारकरी संतांच्या जीवनावर आधारित चित्रपटाने प्रेक्षकांसमोर आणला. ‘तुकाराम’ हे त्या चित्रपटाचे नाव ज्यात प्रमुख भूमिकेत होते जितेंद्र जोशी. थेट शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अथवा घटनांवर आधारित चित्रनिर्मिती न करता त्या काळातील इतर थोर संत अथवा घटनांवर आधारित चित्रपटानेसुद्धा प्रेक्षकांना त्याकाळात घेऊन जाता येते. नुकताच प्रदर्शित झालेला ‘हिरकणी’ पण असाच. कोजागिरीच्या रात्री चुकून रायगडावर अडकलेली गवळण घरी एकट्या असलेल्या आपल्या तान्ह्या लेकरासाठी कशी बहादुरीने गडाच्या जीवघेण्या पश्चिम कडा उतरत जाते याचे भावस्पर्शी चित्रण हिरकणी मध्ये प्रेक्षकांना बघावयास मिळाले. शिवाजी महाराजांनी या आईच्या शौर्याचा गौरव करीत पश्चिम कडांवर मग जो बुरुज बांधला त्याला हिरकणीचे नाव दिले जो आजही हिरकणीचा बुरुज म्हणूनच ओळखला जातो. सोनाली कुलकर्णीने ही भूमिका साकारली पण तितक्याच ताकदीने. दिग्दर्शन प्रसाद ओक यांचे होते.

आद्य क्रांतिवीर म्हणून ज्यांना इतिहासात मानाने संबोधले जाते, स्वराज्यासाठी इंग्रजांविरुध्द्व सशस्त्र क्रांतीचे बीज ज्यांनी रोवले, असे ‘वासुदेव बळवंत फडके’. २००७ साली गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शनाची धुरा स्वतः सांभाळत या क्रांतिवीरांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट रसिकांसमोर आणला. क्रांतीवीर वासुदेव फडकेंच्या शिर्षक भूमिकेत होते अजिंक्य देव. बॉक्स ऑफिसवर चित्रपटास फारसे यश मिळाले नाही हे मात्र दुर्दैव. वासुदेव फडकें प्रमाणेच, छत्रपतींच्याच प्रेरणेने व स्वराज्याच्या स्वप्नाने पछाडलेले अनेक स्वांतत्र्य सेनानी महाराष्ट्रात, या सह्याद्रीत निर्माण झाले ज्यांनी ब्रिटिशांना सळो कि पळो करून सोडले. स्वराज्यासाठी ज्यांनी आपली लेखणी हेच हत्यार मानले व वेळ प्रसंगी काहींनी शस्त्रेही उचलली अशा क्रांतिवीरांच्या आयुष्यांवर अशात आलेल्या चित्रपटांपैकी प्रामुख्याने : १. ओम राऊत दिग्दर्शित (आगामी हिंदी चित्रपट तानाजीचे दिग्दर्शन ओम राऊत चेच आहे) लोकमान्य टिळकांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा ‘लोकमान्य’ (२०१५), २. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वेद राही दिग्दर्शित ‘वीर सावरकर’ (२००१), ३. भगतसिंग, सुखदेव सोबत असणारे ‘क्रांतीवीर राजगुरू’ (२०१०) ज्यात प्रमुख भूमिकेत होते चिन्मय मांडलेकर यांचा उल्लेख करावाच लागेल. ©

बॉलिवूड अर्थातच हिंदी चित्रपसृष्टीत या कालखंडांवर अशात निर्माण झालेल्या चित्रपटांपैकी प्रमुख नावे आहे ‘बाजीराव मस्तानी’ (२०१५). पेशवे बाजीराव व नर्तिका मस्तानी यांच्या प्रेमकहाणीभोवती रचलेल्या कथानकाचे दिग्दर्शन केले होते संजय लीला भन्साळीने. भव्यदिव्य अशी हि निर्मिती होती. परंतु केवळ व्यावसायिक फायद्यासाठी म्हणून मूळ कथानकाशी केलेली छेडछाड उदा. नर्तिका मस्तानी व राणी काशीबाई यांचे सोबत नृत्य (पिंगा गं बाई पिंगा), यामुळे हा चित्रपट इतिहासकार, समीक्षक व प्रेक्षक यांच्या टीकेचे लक्ष्य ठरला. बॉक्स ऑफिसवर मात्र चित्रपटास दणदणीत यश मिळाले. संजय लीला भन्साळीने यांनतर २०१८ साली दिग्दर्शित केलेला, १३ व्य शतकातील मेवाडची राणी पद्मावती च्या आयुष्यावर आधारित, ‘पद्मावत’ यशस्वी झाला पण तोही असाच बऱ्याच कारणांनी वादात अडकला. आता प्रतीक्षा व प्रचंड उत्सुकता आहे आगामी ‘पानिपत’ व ‘तानाजी’ या दोन चित्रपटांची. ऐतिहासिक चित्रपटांवर मास्टरी असणारा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’, मराठ्यांच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या युद्धप्रसंगावर आधारित असा पहिलाच प्रयत्न असणार आहे. ट्रेलर्समधून दिसणारी भव्यता, छायाचित्रण, स्पेशल इफेक्ट्स, अजय-अतुल यांचे गाजत असलेले संगीत हे पानिपतचे प्लस पॉईंट्स आहेत. ‘तानाजी’ बद्दलची उत्सुकता तर शिगेला पोहचली आहे. याला प्रमुख कारण जसे अजय देवगण आहे तसे हा चित्रपट ३डी मध्ये येतोय हे पण आहे. प्रत्येक फ्रेममध्ये दिसणारी भव्यता, पात्रांच्या तोंडी असलेले कडक संवाद, पुन्हा अजय-अतुलचेच सुश्राव्य संगीत अशी सर्व जमून आलेली भट्टी आहे.©

एक विशेष नोंद यानिमित्ताने करावी वाटते. जवळपास दोन शतके (१७ वे व १८ वे ) म्हणजे आधी छत्रपती शिवरायांनी, नंतर त्यांच्याच पेशव्यांनी म्हणजे एका अर्थाने मराठा साम्राज्याने हिंदुस्थानच्या जास्तीत जास्त भूप्रदेशावर आपले अधिराज्य गाजवले, दिल्लीच्या मुघल तख्ताला छातीत धडकी भरवली, अशा सुवर्ण कालखंडाला अभिमानाने प्रेक्षकांसमोर नेणारी हिंदी अथवा मराठी चित्रपटसृष्टीत आजपर्यंत एकही नाव घ्यावी अशी कलाकृती निर्माण झालेली नाही. भालजी पेंढारकरांनी हातात प्रगत तंत्रज्ञान, मुबलक पैसा नसूनही तेंव्हा जे चित्रनिर्मितीचे कार्य केले तेवढेच. त्याला दिलसे सलाम. याच हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीची पाळेमुळे महाराष्ट्रातच आहेत हे विशेष. कित्येक थोर कलाकार, दिग्दर्शक, लेखक या महाराष्ट्राने या दोन्ही चित्रपटसृष्टीस दिले पण अजूनही हा कालखंड अभ्यासावा, त्यावर अभिमानाने लिहावे व रसिकांसमोर आणावे असे फारसे कोणाला वाटले नाही हे दुर्दैव.

कला क्षेत्रात पूर्वीपासून असलेले डाव्या विचारांचे प्राबल्य बहुधा यास कारणीभूत असावे असे वाटते. देशासाठी व धर्मासाठी लढणारी आमची ही थोर माणसे ना इतिहासाच्या पुस्तकात यथा योग्य जागा मिळवू शकली ना नंतर कलाकृती म्हणून. सेक्युलॅरिझमच्या नावाखाली भलत्याच मेणबत्ती छाप कलाकृती आमच्यावर जाणीवपूर्वक लादल्या गेल्यात व अजूनही लादत आहेत. म्हणून अशात आलेल्या व येणाऱ्या या काही कलाकृती आशेचा किरण घेऊन आल्या आहेत. त्यात निर्मात्यांकडून काही चुका होतील, काही पात्रे अतिशयोक्ती केल्यासारखी वाटतील, उगाच गाणी घुसडली आहेत असे वाटेल, उगाच भव्यदिव्यता आणली आहे असे वाटेल पण गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून काही लहानसहान ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ आपण या निर्मात्यांना दिली पाहिजे.

खुल्यादिलाने आपल्या सर्व कुटुंबाला, खासकरून बच्चे कंपनीस सोबत घेऊन हा इतिहास भव्य रुपेरी पडद्यावर बघणे हे सुद्धा एक प्रकारचे राष्ट्र कार्यच आहे असे मी म्हणेन. मराठा तितुका मेळवावा चित्रपटातील अजरामर गीत या निमित्ताने आठवते,

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
देव, देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती.

हर हर महादेव. जय महाराष्ट्र.

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.