राजा हिंदुस्तानी ..संगीतमय प्रेमकथेची २५ वर्षे

– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

25 Years of Superhit Hindi film Raja Hindustani; रफी साहेबांच्या आवाजातील ‘हमको… तुमपे… प्यार आया’ म्हणत अखेरीस येणाऱ्या ‘अफ्फु खुदा…’ या जोरदार गगनभेदी आरोळीने १९६५ साली रसिकांना अक्षरशः वेड लावले. प्रेक्षक थेटरात वेड्यासारखे नाचत. ५६ वर्षे उलटली तरी गाण्याची जादू आजही कायम आहे. म्हणूनच की काय २०१८ साली शाहरुखने जेंव्हा आपल्या सुपरफ्लॉप ठरलेल्या ‘झीरो’ सिनेमाचे पहिले टिझर आणले तेंव्हा त्याला या गाण्याची मदत घ्यावी लागली. ‘अफ्फु खुदा’ गाण्यात जो वेडेपणा शशी कपूरने केलाय तसाच काहीसा वेडेपणा चित्रविचित्र रंगीत कपडे घालून आमिर खानने ‘साला मैं तो साब बन गया’ या गाण्यावर नाचून केला होता. “ये सब बेवकूफी क्यों की राजा?” असे करिश्माने विचारल्यावर भोळ्या मनाचा टॅक्सी ड्रायव्हर राजा म्हणजेच आमिर उत्तरतो “ये सब लोगो ने आपका नाम लिया, मुझसे कहा ये सब आपको पसंद आएगा इसलिए! इस दुनिया में सच्चे दिलवालों का कोई मोल नहीं होता मेमसाब” हे ऐकून त्याची मेमसाब त्याला म्हणते की, “सच्चे दिलवालों का तो कोई मोल हो ही नहीं सकता.. वो तो अनमोल होते हैं!” तिच्यावर मनोमन फ़िदा असलेला राजा तिच्या या उत्तरावर खुश होऊन तिलाच २०० रु ‘बक्शीस’ देतो आणि तिने थँक्यू म्हटल्यावर वेलकमच्या ऐवजी हा अशिक्षित वेडा तिला म्हणतो  “यु कम कम मेमसाब..  यु कम कम” २५ वर्षांपूर्वी या व अशा इतर अनेक सीन वर थेटरात प्रेक्षक धम्माल हसायचे.  हो! आज ‘राजा हिंदुस्तानी’ ला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतभर विविध ठिकाणी २५ नव्हे तर तब्बल ५० आठवडे सलग चालण्याचा म्हणजेच ‘गोल्डन ज्युबिली’ यश मिळविण्याचा विक्रम त्याने केला होता. ‘अफ्फु खुदा’ वाल्या शशी कपूर अभिनीत ‘जब जब फुल खिले’ चा रिमेक असलेल्या ‘राजा हिंदुस्तानी’ने १९९६ हे वर्ष गाजवून सोडले होते. त्यावर्षीचा सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट तर होताच पण ९० च्या दशकात ज्या तीन सिनेमांच्या नावावर सर्वात जास्त कमाईचे रेकॉर्ड आहेत त्या ‘हम आपके है कौन’, ‘डीडीएलजे’ आणि ‘कुछ कुछ होता है’ नंतर ‘राजा हिंदुस्तानी’ चा नंबर लागला होता. 

आमीर खान नावाची जादू प्रेक्षकांना थेटरमध्ये ओढण्यात यशस्वी ठरली असली तरी ‘राजा हिंदुस्तानी’ च्या यशाचे खरे दावेदार होते संगीतकार नदीम-श्रवण हे कोणी नाकारू शकत नाही.  एकाहून एक अफलातून मेलडीयस गाण्यांचा नजराणा या जोडीने रसिकांना दिला होता. त्यांच्या काही बेस्ट अल्बम्स पैकी हा एक. त्यावर्षीचा उत्कृष्ट संगीतासाठीचा त्यांना मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार ही त्याचीच पावती. ‘परदेसियों से ना अखियां मिलाना’ या १९६५ च्या सुश्राव्य गीताचे ९६ चे व्हर्जन म्हणजे ‘परदेसी परदेसी जाना नहीं’ हे इतके काही मोठे हिट झाले होते की बस्स! फिलिप्स टॉप-१० नावाच्या तेंव्हाच्या झी टीव्ही च्या आठवडी गाण्यांच्या रँकिंग कार्यक्रमात हे गाणे कितीतरी आठवडे एक नंबरवरून हलण्यास तयारच नव्हते. उदित नारायण यांना बेस्ट प्लेबॅक चे फिल्मफेअर मिळवून देणारे हे गीत म्हणजे ९० च्या दशकातील तरुणाईची दिल की धडकन होते. गीतकार समीर व गायिका अलका याग्निक यांनाही या गीतासाठी फिल्मफेअर नामांकन मिळालं होतं. ‘एक था गुल और एक थी बुलबुल’ या रफी साहेबांनी गायलेल्या ‘जब जब फुल खिले’ च्या गाण्याच्या सिच्युएशन वर ‘राजा हिंदुस्तानी’ मधील गाणे म्हणजे उदित नारायण यांचे ‘आये हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके’. अतिशय सुंदर गीत. ९६-९७ या दोन वर्षात बहुतांश लग्नसमारंभात या गाण्याची हमखास हजेरी असायची. उदित नारायण यांना या गीताने त्यावर्षीचे स्क्रीन अवॉर्ड मिळवून दिले होते. ‘ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे’ या गीताचे राजा हिंदुस्तानी व्हर्जन म्हणजे ‘कितना प्यारा तुझे रबने बनाया, जी करे देखता रहूँ’. नुसरत फ़तेह अली खान यांच्या लोकप्रिय ‘किन्ना सोना तेनु रबने बनाया’ या गाण्यावरून नदीम-श्रवण यांनी हे गीत संगीतबद्ध केले होते. ‘यहाँ मैं अजनबी हूँ, मैं जो हूँ बस वही हूँ’ हे रफी साहेबांचे जब जब मधील आणखी एक श्रवणीय गीत ज्याला राजा हिंदुस्तानी मध्ये रिप्लेस केले गेले ‘तेरे इश्क में नाचेंगे’ या गीताने. ‘पूछो जरा पूछो मुझे क्या हुवा है’ हे एकमेव असे गीत आहे जे की राजा हिंदुस्तानी च्या थोड्याफार बदल केलेल्या पटकथेच्या मागणीनुसार घेण्यात आले होते जी सिच्युएशन मूळ ‘जब जब फुल खिले’ मध्ये नव्हती. अलका याग्निक यांनी एका मुलाखतीत या ‘पूछो जरा पूछो’ गाण्याचा उल्लेख त्यांच्या करिअरमधील उत्कृष्ट गीतांपैकी एक असा केलेला आहे. नंदा यांच्यावर चित्रित जब जब मधील ‘ये समां समां है ये प्यार का’ या गाण्याच्या सिच्युएशन ला मात्र राजा मधून वगळण्यात आले होते. 

 गीतकार आनंद बक्षी यांच्या करिअरला ज्या सिनेमाने खऱ्या अर्थाने ब्रेक दिला असा सिनेमा म्हणजे ‘जब जब फुल खिले’ होता. गीतकार समीर यांचे करिअर ‘राजा हिंदुस्तानी’ च्या आधीच फॉर्मात आले होते पण राजाने त्याला परत मोठा बूस्ट मिळाला. नदीम श्रवण व उदित नारायण सोबत आमीर खान-उत्कृष्ट अभिनेता, करिष्मा कपूर-उत्कृष्ट अभिनेत्री व बेस्ट फिल्म असे एकूण त्यावर्षीचे ५ फिल्मफेअर राजा हिंदुस्तानी ने पटकावले होते. करिश्माने अतिशय सहज व सुंदर अभिनय यात केला होता. जुही चावला, ऐश्वर्या राय आणि पूजा भट्ट या नावांचा विचार झाल्यानंतर अखेरीस हा रोल करिश्माला मिळाला होता जो की तिच्या करिअरमधील वन ऑफ दि बेस्ट ठरला. तिचे आमीरसोबतचे यामधील इंटेन्स चुंबन दृश्य सुद्धा चर्चेचा विषय ठरले होते.  १९९३ च्या लुटेरे नंतर दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांचा हा दुसरा चित्रपट होता. चित्रपटाचे टायटल्स तुम्ही जर आज पुन्हा पाहिले (य-ट्यूब वर आहे) तर त्यात ‘तुम दिल की धडकन में रहते हो’ ची ट्यून ऐकू येते जी याच म्हणजे दिग्दर्शक धर्मेश दर्शन व संगीतकार नदीम श्रवण त्रिकुटाने ४ वर्षानंतर त्यांच्याच ‘धडकन’ मध्ये वापरली. हिंदी सिनेमाच्या गोल्डन इरा काळात असे प्रयोग करण्यात दिग्दर्शक राज कपूर व शंकर जयकिशन आघाडीवर असायचे. जब जब फुल खिले चे संगीतकार होते कल्याणजी आनंदजी पण हे फार कमी लोकांना माहीत आहे की लक्ष्मीकांत प्यारेलाल हे त्यांचे या सिनेमासाठी सहाय्यक संगीतकार होते. 

‘जब जब फुल खिले’ च्या गोल्डन ज्युबिली सोहळ्यात सिनेमाचे दिग्दर्शक सुरज प्रकाश यांनी सिनेमाचे पटकथाकार ब्रिज कट्याल यांना एक प्रश्न विचारला होता. “कथेचा नायक राजा जो की श्रीनगर मध्ये बोट चालविणारा आहे तो धर्माने कोण आहे?” सिनेमात कुठेही याचा उल्लेख नव्हता. अपेक्षित असे आहे की इतर अनेक बोट चालविणाऱ्यांप्रमाणे हाही मुसलमान असेल …पण तसेही दाखविलेले नाही. या प्रश्नावर पटकथाकार ब्रिज यांनी मौन साधले. ‘राजा हिंदुस्तानी’ मध्ये पहिल्यांदा टॅक्सी ड्रायव्हर ‘राजा हिंदुस्तानी’ च्या गाडीत बसलेली नायिका आरती म्हणजेच करिष्मा कपूर त्याला त्याच्या या अशा विचित्र नावाबद्दल विचारते. तेंव्हा राजा उत्तर देतो ” हम हमारे मन के राजा है मेमसाब, हमपर कोई राज नहीं कर सकता। इसलिए राजा. और इस देश में कोई हिन्दू है, मुसलमान है, सिख है, ईसाई है पर कोई हिन्दुस्तानी नहीं है ना मेमसाब. इसलिए हिन्दुस्तानी. जब हम छोटे थे ना तब हमारे माँ-बाप मर गए तबसे हम हमारे देश की संतान है. राजा हिन्दुस्तानी” 

जब जब च्या पटकथाकारला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी अखेरीस ३० वर्षांनी दिले होते. 

हेही वाचा – यश चोप्रांच्या सिलसिला ची चाळीशी

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment