50 years of James Bond 007 Movies from Hollywood

 

– विद्यानंद कुऱ्हाडे

फार तर दहा दिवसांपूर्वीची ही घटना ! म्हणजे जुलै महिन्याअखेरीस सहज म्हणून ‘द स्पेक्टेटर’चा अंक चाळत होतो की अचानक जेम्स बाँडरूपी डॅनियल क्रेगच्या एका ‘टिपीकल’ शैलीदार छायाचित्राने माझे लक्ष वेधून घेतले. ‘द स्पेक्टेटर’सारख्या गंभीर वृत्तपत्रातील जगप्रसिद्ध अशा ‘साहित्य-समीक्षा’ शीर्षकाखाली ‘स्टाईलीशपणे’ हातात बंदूक घेऊन ऐटीत उभ्या सुटाबुटातील ‘जेम्स बाँड’ने दर्शन देणे म्हणजे थोडक्यात एखाद्या अभिजात पाककलाविषयक ग्रंथामध्ये चक्क ‘वडा-पाव’ची रेसिपी दिसावी. निदान वरवर पाहताना तर असेच भासते… बाँड परंतु येथे निमित्त होते त्याच महिन्यात जगभर सर्वत्र उत्सुकतेने चर्चिल्या जाणाऱ्या नव्या कोऱ्या ‘बाँड पुस्तकाचे’. नुकतेच संपन्न झालेले औपचारिक प्रकाशन! सुप्रसिद्ध अमेरिकन रहस्य-कथा लेखक ‘जेफ्री डीवर’ने लिहिलेल्या या लेटेस्ट जेम्स बाँड कादंबरीचे नाव आहे ‘कार्टे ब्लांके’… तिला मिळालेली प्रसिद्धी लक्षात घेतली की मग आपल्यालाही लक्षात येतो तो जेम्स बाँड या नावामागचा अद्भुत करिश्‍मा. संपूर्ण जगावर पडलेली सिकेट एजंट ००७  ऊर्फ डबल ओ सेवनची विलक्षण मोहिनी.

साधारणपणे १९५२-५३ च्या सुमारास इयन फ्लेमिंग नावाच्या एका रहस्यमय व्यक्ती नव्हे वल्लीने सहज म्हणून लिहिलेली ‘कसिनो रोयाल’ ही पहिलीवहिली कादंबरी. याच छोटेखानी ‘नॉव्हेला’मधून जगाला प्रथमच एका आगळ्यावेगळ्या नायकाची म्हणजेच या ब्रिटीश गुप्तहेर जेम्स बाँडची ओळख झाली. आणि अवघे जग जणूकाही या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमातच पडले. बरं जगाचे हे ‘प्रेमात पडणे’ इतके विकोपाला गेले की बाँडचा जनक इयन फ्लेमिंगच्या अकाली मृत्यूनंतर म्हणजे वर्ष १९६४ नंतरही या ‘लव्ह अफेअर’ची अवीट गोडी संपली की कमी झाली नाही; उलट ती कित्येक पटीने वाढलीच! म्हणूनच की काय एकापेक्षा एक दिग्गज लेखकांनी फ्लेमिंगच्या या लाडक्या मानसपुत्राला दत्तक तर घेतलेच; एवढेच नव्हे तर आजतागायत जवळपास दोन डझन नवीन पुस्तकं, कथा, कादंबऱ्यांच्या रूपातून बाँडला वेळोवेळी पुनर्जीवनही प्रदान केले! प्रख्यात ब्रिटिश लेखक ‘किंग्जले ॲमिस’, ‘जॉन गार्डनर’, ‘रेमंड बेन्सन’, ‘जॉन पियरसन’, ‘सेबास्टीयन फॉक्स’  ते थेट २०११ च्या ‘कार्टे ब्लांके’चा लेखक ‘जेफ्री डीवर’… या सर्व प्रतिष्ठित थोरा-मोठ्यांनी आपापल्या परीने इयन फ्लेमिंगचा एका अर्थाने वारसाच पुढे चालविला. आता खरं सांगायचं तर या सर्वांनी ‘तसा प्रयत्न करून पाहिला’ असे म्हणणेच योग्य ठरावे. कारण मूळ फ्लेमिंगची ही किमया यापैकी कुणालाच साधता आलेली नाही. तसं पाहायला गेले तर जेम्स बाँडची गाथा भलेही खुद्द इयान फ्लेमिंगने लिहिलेली असो. तिला ‘सर्वश्रेष्ठ’ अजरामर साहित्य रचना वगैरे म्हणता येणारच नाहीच! इयन फ्लेमिंगने एकूण बारा कादंबऱ्या तर दोन कथासंग्रह लिहून ठेवले आहेत. या साऱ्या कथानकांचा नायक जेम्स बाँड आहे तसाच, या तद्दन एकसुरी घाटाच्या कहाण्यांचा ‘फॉर्म्युला’ हा जवळपास एकच. तो सुद्धा अगदी सरळ, साधा-सोपा असाच आहे! वरकरणी तरी असेच वाटते!! भल्याभल्यांनाही नेमके असेच वाटलेले दिसते, म्हणूनच की काय आजवर या ००७ बाँडवर जवळपास दोन डझन पुस्तकं आणि तितकेच चित्रपटही येऊन गेलेत. नाहीतरी जेम्स बाँडवर एखादा गल्लाभरू हीट ‘बाँडपट’ काढण्यात फारसे अवघड वा कठीण आहे तरी काय? बाँडपटाची ‘रेसीपी’ तशी एकदम सोपी सुटसुटीत आहे! सर्वप्रथम एक ‘फर्मास’ स्टोरी लिहून काढा! ही स्टोरी त्यातल्यात्यात सुबक- छोट्या आकाराची ‘पुस्तिका’ (सर्वांना विकत घ्यायला परवडावी म्हणून!) असल्यास फारच उत्तम! त्यानंतरचे आणि अत्यंत महत्त्वाचे असे काम म्हणजे या बाँडपटाचे नाव…! हो! ‘जेम्स बाँड छाप’ चित्रपटाचे टायटल असे हवे की ते वाचणारा, ऐकणारा हमखास बुचकळ्यातच पडला पाहिजे! उदा. समजा – ‘टुमारो कॅन नेव्हर बी टुडे’ थोडक्यात काय तर असे भलतेच अतर्क्य, अगम्य नाव चित्रपटाला दिले म्हणजे अर्धा गड सर झालाच, असे खुशाल समजा! त्यानंतर येणारी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या बाँडची विशेष आवडती अशी एक ‘बाँडगर्ल’! ही ‘बाँडकन्या’ सुंदरपेक्षा मादकच असायला हवी. वयाने ती तरुण म्हणजे ‘बाँडकन्या’पेक्षा ‘बाँडची कन्या’ शोभेल अशीच असली की मग हे कामही फत्ते! पण थांबा. एवढ्यावरच भागत नाही म्हणूनच की काय या ‘बाँडगर्ल’चे नाव तिच्यासारखेच ठसकेबाज, उदा. मिस जिंगल बेल किंवा मिस पूसी कॅटर वा तत्सम असायलाच हवे! आता सर्वात शेवटचा, परंतु सर्वाधिक ‘क्रुशल’ असाच घटक म्हणजे आपल्या या बाँडपटातील खलनायक ऊर्फ व्हिलन! हा सुद्धा कुणी ‘डॉक्टर डेथ’ वा ‘प्रोफेसर डूम’ अशा छापाचा. याच्या कायम वास्तव्याचे ठिकाण दूर कोठेतरी थेट समुद्राच्या तळाशी किंवा अंटार्टिका टाईप सुदूर स्थानीच हवे! यथावकाश हा खलपुरुष अवघ्या जगाला वेठीला धरणार आणि साऱ्या पृथ्वीचा नाश अवघ्या काही मिनिटांच्या… सेकंदाच्या अंतरावर येऊन ठेपला असता आपला नायक ऊर्फ ‘डबल ओ सेवन’ ब्रिटिश एजंट जेम्स बाँड ऐन वेळेस हजर राहून साऱ्या दुनियेला संकटातून सुखरूपपणे बाहेर काढून जगाचा तारणहार वगैरे ठरणार!! मग ओघानेच डॉक्टर डेथचा नाश, जवळच्याच ‘बीच’ वर जेम्स बाँड नी मिस जिंगल बेल एकत्र येऊन… दी एंड! संपला आपला बाँडपट!!

गंमत म्हणजे वर दिलेली रेसिपी वापरून ज्या कुणी कथाबहाद्दरांनी ‘स्टोऱ्या’ लिहिलेल्या त्या साऱ्या प्रथितयश साहित्यिकांच्या ‘साहित्य-रचना’ पुस्तकरूपात गाजावाजा करून प्रकाशित झाल्या खऱ्या; परंतु आजतागायत एकाही बाँडपटाने मूळ कहाणी म्हणून या पुस्तकांचा आधार घेतलेला नाहीए! अत्यंत मानाचे स्थान असे  हे अवाढव्य शिवधनुष्य (म्हणजेच १००% अस्सल व अत्यंत लोकप्रिय अशा बाँडकथा लिहिण्याचे आव्हान) एकट्या इयन फ्लेमिंगलाच पेलता यावे हे जगाला आजही न उलगडलेले एकमेवाद्वितीय असे रहस्य – बाँडच्या भाषेत ‘टॉप सिक्रेट’ आहे.

लवकरच या ‘बाँडगिरी’ची पन्नास वर्षे पूर्ण होतील आणि त्याचेच निमित्त साधून येत्या काही महिन्यानंतर या चिरतरुण महानायकाचा नवा कोरा चित्रपट तमाम बाँडप्रेमीजनांच्या भेटीस येत आहे.

‘नवरंग’च्या या अभिजात्य, सर्वांगसुंदर विशेषांकाप्रमाणेच आगामी बाँडपटदेखील रौप्यमहोत्सवी म्हणजे पंचविसावा चित्रपट असणार आहे हा एक विलक्षण योगायोगच!

आजवरचे बाँडपट आणि बाँडनट

जेम्स बाँड, तसेच त्याचा जनक-इयन फ्लेमिंगविषयी आजवर पुष्कळ काही लिहिले व चर्चिले गेले आहे; पण प्रत्यक्षात आपला हा प्रचंड लोकप्रिय, रंगेल आणि रंगेल. एखाद्या ‘फँटसी’वजा परीकथेतील नायकामध्ये आढळून येणारे सारे गुण व दोष ही खच्चून भरलेला असा हा एक चलाख, महाबिलंदर गुप्तहेर मुळात अस्तित्वात आलाच कसा? आणि का? या प्रश्‍नांची उत्तरे तपासण्याकरिता आपल्यालाही याच बाँडची भेदक, धारदारदृष्टी आणि गहरी अभ्यासूवृत्ती व समज हवी; परंतु एवढ्यावरही आपले काम भागणार नाही म्हणून आपल्याकडे हवे एक खरे-खुरे ‘टाईम-मशीन’! मित्रांनो, क्षणभर कल्पना करा की, या क्षणी  आपण अशाच एका अद्ययावत, भविष्यातील खऱ्याखुऱ्या ‘टाईम मशीन’मध्ये बसलो असून, सद्यःस्थितीत तुम्ही-आम्ही अर्थातच वर्ष २०११ मध्ये असलो तरी आपले गंतव्यस्थान म्हणजे आपले ‘टारगेट’ आहे साधारणपणे वर्ष १९४० ते १९५० च्या दरम्यानचा कालखंड! थोडक्यात आपण आता किमान ६०-७० वर्षांपूर्वीच्या भूतकाळात प्रवेश करीत आहोत. चला तर!

फ्लॅशबॅक सुपरमॅन…. बॅटमॅन ते जेम्स बाँड

स्थलकाल ः १९४० ते १९५० चे जग

…तर याक्षणी आपण पोहोचलो आहोत जवळपास ४०-५० च्या दशकात. अवघ्या जगावर या क्षणी एका भयंकर विपत्तीचे अजस्त्र, काळेशार ढग जमा होताना दिसत आहेत. हे भयानक सावट आहे. आजवरच्या सर्वाधिक भीषण रक्तरंजित  अशा महायुद्धाचे… हेच ते इतिहासातील अत्यंत कुप्रसिद्ध असेच द्वितीय महायुद्ध ऊर्फ ‘वर्ल्ड वॉर-२’! सारे जगच आता ‘कुरुक्षेत्र’ असल्यामुळे या अवाढव्य रणांगणाच्या एका टोकाला उभी आहेत ती ‘मित्र राष्ट्रे’ अर्थात ग्रेट ब्रिटन, रशिया आणि अमेरिका. या एकत्रित सेनेचा सेनापती आहे इंग्लंडचा पंतप्रधान खुद्द विन्स्टन चर्चिल तर दुसऱ्या टोकाला जर्मनी, इटली, जपानसारखी अत्यंत बलाढ्य राष्ट्रे. खरेतर अवघ्या मित्रराष्ट्रांच्याच का? अवघ्या ‘मुक्तजगाच्या’ उरात धडकी भरावी असा एकच दिग्विजयी सेनापती सध्या तरी जवळजवळ साऱ्या आघाड्यांवर विजयी होताना दिसतोय. हाच तो क्रूरकर्मा म्हणजे बलाढ्य अशा जर्मनीचा शहंशाह नव्हे सर्वेसर्वा खुद्द ‘ॲडॉल्फ हिटलर’ या युद्धात लवकरच हिटलरचीच सरशी होणार. कारण अवघ्या महिनाभरात त्याच्या ‘लुफ्तवाले’ नावाच्या अत्याधुनिक वायुसेनेने अष्टौप्रहर सतत बाँबवर्षाव करून जगातील आजच्या सर्वाधिक महत्त्वाच्या शहराला अर्थात लंडनला अक्षरशः बेचिराख करून टाकलेय! कुठल्याही क्षणी ‘ग्रेट ब्रिटन’चा ‘ग्रेटनेस’ कायमस्वरूपी संपुष्टात येणार हे एक अटळ पण कटू सत्य आहे! परंतु जरा थांबा. आपल्या मित्रराष्ट्रांकडे चक्क सर्वशक्तिमान अमेरिका असताना देखील लंडन शहरावर अशी बिकट परिस्थिती यावी? ह्याचे कारण एकच. उद्याच्या ‘सुपरपॉवर’ अशा अमेरिकेला आपल्या भूमीवर युद्ध तर सोडाच साधी किरकोळ चकमकसुद्धा नकोय! अमेरिकन जनतेला आपल्या प्रिय मुलाबाळांच्या धमन्यात उसळणारे रक्त थेट जमिनीवर सांडताना पाहण्याची सवय तर नाहीच, त्यांची तशी इच्छा देखील नाही!

तमाम जनसामान्यांच्या अशा असुरक्षिततेच्या तीव्र भावनेपोटी बळावलेल्या द्विधा मनःस्थितीचा दृश्‍य परिणाम म्हणूनच की काय, सर्वसामान्य जनतेला अचानकच एका महानायकाची आवश्‍यकता व भावनिक निकड असावी हे साहजिकच आहे! लोकप्रिय साहित्य, काव्य, चित्रपट तसेच आबालवृद्धांची अत्यंत आवडती अशी चित्रमय ‘कॉमिक्स’ हा तर एकूण समाजाच्या संवेदनशील मनाचा आरसाच असतो आणि म्हणूनच १९४० च्या प्रारंभी अत्यंत लोकप्रिय अशा कॉमिक्स मालिकेच्या रूपाने प्रथमच एका अस्सल १००% अमेरिकन सुपर हीरो ऊर्फ महानायक धरतीवर अवतरला. हाच तो ‘मिस्टर क्लार्क’ केंट ऊर्फ सुपरमॅन! साऱ्या देशालाच युद्ध नको असल्यामुळे एका सच्च्या अमेरिकन सुपर हीरोप्रमाणेच सुपरमॅनलाही बाँब, रक्तपात, विमाने, हत्यारे नकोशीच वाटावी यात नवल कसले? मग साहजिकच या सुपरमॅनकडे तोफा, बंदुकांऐवजी चुटकीसरशी शत्रूंचा धुव्वा उडविणाऱ्या चमत्कारी शक्तींचाच भरणा होता! त्याला सैन्य, फौजफाटा नकोच होता, कारण हा स्वतः एकटाच ‘वन मॅन आर्मी’ होता; परंतु लवकरच अमेरिकाही नाइलाजाने द्वितीय महायुद्धात सामील झाली नव्हे तिला अक्षरशः या महाभीषण रक्तपातात खेचले गेले. थोड्याअधिक प्रमाणात का होईना, पण जनतेला बाँबवर्षाव, सैन्य चकमकी व त्या योगे होणारा अपरिहार्य रक्तपात सहन करून घ्यावा लागला. कधी नव्हे तो अचानक उभ्या अमेरिकेला त्यांचा तो चमत्कारी-महानायक म्हणजेच सुपरमॅन आता पार अतिशयोक्तीपूर्ण चक्क लटुपुटूचा, खरंतर खोटाच भासू लागला! आणि मग लवकरच एका नव्या १००% विश्‍वासार्ह असा, तुमच्या-आमच्यासारख्या परंतु असामान्य अशा नायकाचा जन्म झाला. याचे नाव होते ‘बॅटमॅन’!  सुपर हीरो असला तरी प्रत्यक्षात बॅटमॅन हा एका वास्तववादी ‘गॉथम सिटी’नामक शहरातील एक गर्भश्रीमंत कोट्यधीश- ब्रुस वेन होता. हा ब्रुस वेन ऊर्फ बॅटमॅन तसा सर्वसामान्यांसारखाचा म्हणजे बंदुकीची गोळी लागली असता रक्त वगैरे येऊन घायाळ होणारा. सुंदर स्त्रियांच्या प्रेमात पडणारा थोडक्यात सुपरमॅनप्रमाणे कुठल्यातरी परग्रहावरून आलेला जादुई महामानव नव्हताच. त्याच्याकडे एकमात्र; परंतु ‘अस्सल-अमेरिकन’ असे एकमेव अस्त्र होते. ते म्हणजे प्रचंड पैसा, संपत्ती व आधुनिकतम टेक्नॉलॉजी!

आपल्या शत्रूला नामोहरम करण्याकरिता अत्याधुनिक हत्यारं, नवनवीन यंत्रे (१९४३ साली या बॅटमॅनकडे चक्क एक मोबाईल फोन होता!) स्वयंचलित वेगवान वाहने थोडक्यात नव्या युगातील आजच्या अमेरिकेकडे उपलब्ध असणाऱ्या यंत्रणा बॅटमॅनकडेही होत्या. एका अर्थाने सुपरमॅननंतरच्या काळात हा बॅटमॅन आता १९५० च्या ‘पोष्टवॉर’ अमेरिकेचे प्रतीक ठरला! तोपर्यंत एकदाच तो दुष्टात्मा हिटलर, त्याच्यामुळे संपूर्ण जगावर ओढवलेला तो महाभयानक नरसंहार पर्यायाने कित्येक वर्षे चाललेले द्वितीय महायुद्ध संपुष्टात आले. त्याचबरोबर दशकानुदशके बहुतेक साऱ्या जगावर एकछत्री राज्य करणारे ‘महान ब्रिटिश साम्राज्य’ पार लयास गेले होते. म्हणजे या महायुद्धात विजय मिळवूनही इंग्रजांची अवस्था ‘मी जिंकलो मी हरलो’ अशीच व्हावी ही आधुनिक ‘ग्रेट ब्रिटन’ची खरीच शोकांतिका ठरली!  आजच्या नव्या जगाचा अनिभिषिक्त सम्राट होता अमेरिकेसारखा महासंपन्न देश, तर त्याला तोडीसतोड आव्हान देऊ शकणारा आणि प्रत्यक्षात तसे आव्हान देणारा ‘सोव्हिएत रशिया’ परंतु या नव्या युगाचे नवे युद्धं कुठल्या रणांगणावर खेळले जाणार नव्हतेच, ना त्याला कुणा भल्या मोठ्या सैन्याची की तोफा-बंदुकांची गरज होती. या विलक्षण अनोख्या ‘तृतीय-महायुद्धाच्या’ एकीकडे होती ‘अमेरिका आणि कंपनी’, तर दुसरीकडे दंड थोपटून उभे होते रशिया व इतर साम्यवादी राष्ट्रे! हे होते १९५० ते १९९० म्हणजे चार दशके चाललेले प्रसिद्ध; परंतु अत्यंत गुंतागुंतीचे असे ‘शीतयुद्ध’ वजा ‘कोल्ड वॉर’! नव्या युगातील या नव्या घडामोडींमध्ये बिचाऱ्या ‘ग्रेट ब्रिटन (!) ची मात्र फारच कुचंबणा झाली. एकेकाळचा हा बलाढ्य देश आता अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून उभा दिसत असला तरी इंग्लंडची गणना ‘…आणि कंपनी’ अशी व्हावी हे स्वाभिमानी, कट्टर इंग्रजी गोऱ्या साहेबाला कसं खपणार? अशा या विलक्षण, घालमेलीपूर्ण संक्रमण काळात (१९४०-५० च्या अमेरिकेप्रमाणेच) आता ब्रिटिश जनतेला गरज होती एका कट्टर इंग्रजी महानायकाची!

अत्यंत कडव्या; परंतु सभ्य, शिस्तप्रिय इंग्रजांना त्या सुपरमॅन किंवा बॅटमॅनसारखे ‘सवंग सुपर हीरो’ चक्क वरवरचा दिखावा करणारे, तडकभडक व बनावटी भासत असल्याने तो प्रश्‍नच नव्हता. तसेही अस्सल ब्रिटिश सभ्य गृहस्थाला हे रंगीबेरंगी, हास्यास्पद  पोशाख घालून चक्क सर्वांसमोर बिनदिक्कतपणे वावरणारे सुपरमॅन, बॅटमॅनरी नायक पटणार, रुचणार किंवा मानवणार तरी कसे? ज्या देशाने एकेकाळी जगाला ‘शेरलॉक होम्स’सारखा अजरामर ‘डिटेक्टिव्ह’ दिला नव्हे त्याच्या प्रेमात पाडले त्या खानदानी जनतेला आता हवा होता एक ‘ओरिजनल’ साहेबी थाटाचा, सभ्यवर्तनी, रुबाबदार, वागता बोलताना शिष्टाचार, एटीकेटस्‌ची जाण असणारा एक खराखुरा, हाडामांसाचा, १००% सच्च्या आणि तरीदेखील ‘सुपर हीरो’च्या रिक्त पदावर चपखलपणे बसणारा एक ‘सोळा आणे ब्रिटिश’ असाच महानायक! या महानायकाच्याच रूपगौरवातून, त्याच्या असामान्य कर्तृत्वातून कल्पनेतच का होईना; परंतु इंग्लंड या राष्ट्राला पुन्हा एकदा ‘ग्रेट ब्रिटन’ व्हायचे होते. त्याच्या पराक्रमाने या खचलेल्या देशाला आपले एकेकाळचे महान साम्राज्य, आपलं गतवैभव, पत, प्रतिष्ठा परत मिळवायची होती; परंतु तमाम गोऱ्या साहेबांच्या (आणि मॅडमांच्यासुद्धा!) सुखस्वप्नातील हा देखणा महानायक प्रत्यक्षात होता तरी कुठे?

जन्म जेम्स बाँडचा

स्थळ – जमैका (कॅरेबियन आयलँडस्‌)

काळ – वर्ष १९५२-१९५३

एका रमणीय संध्याकाळी इयन फ्लेमिंग नावाचा एक रुबाबदार माजी नेव्ही कमांडर वय साधारणपणे ४४-४५ वर्षाचे असेल, आपल्या आलिशान समुद्रकिनाऱ्यालगत उभारलेल्या ‘हॉलीडे हाऊस’च्या निवांत कोपऱ्यात आरामात पहुडला होता. त्याच्या या वनराईने नटलेल्या, सुंदर बंगला वजा ‘इस्टेट’चे नाव ‘गोल्डन आय’ हे खास त्यानेच ठेवलेले. या क्षणी फ्लेमिंगच्या डोक्यात एकाच विचाराने ठाण मांडले होते. कितीतरी वर्षांपासून इयन फ्लेमिंगच्या मनात त्याच्या अत्यंत आवडत्या, जिव्हाळ्याच्याच म्हणा हवं तर, विषयावर एक छानशी कादंबरी लिहावी, असे विचार घोळत होते.

त्याकरिताच तर तो नोकरीतून रिटायरमेंट पत्करून येथे एकांतवासात त्याला हवे तसे पुस्तक लिहिण्याकरिता खास आपली परमप्रिय मायभूमी-इंग्लंड सोडून येथे राहत होता. फ्लेमिंगच्या डोक्यात कादंबरीचा विषय. कथानक तसे पुरते तयार होते एवढेच नव्हे त्याकरिता साजेसे नाव देखील त्याने यापूर्वीच योजून ठेवले होते. आता उरले होते त्या फक्त कथानायकाच्या नायकाचे नाव. ते मात्र फ्लेमिंगला काही केल्या सुचत नव्हते. सुचले ते पटले नव्हते. अर्थात या नावाविषयी काही ठळक रूपरेषा त्याच्या मनात ह्या आधीपासूनच पक्क्या बसलेल्या होत्या.

म्हणजे फ्लेमिंगच्या मते – त्याच्या नायकाचे नाव ‘शेरलॉक होम्स टाईप’ क्लिष्ट वळणाचे नसणार होते तसेच ते ‘टिपीकल’ म्हणजे ‘जॉन स्मिथ’ किंवा ‘रॉबर्ट रायडर’छाप अळणी व बेचवसुद्धा असायला नकोच होते. शेवटी वैतागून इयन फ्लेमिंगने हा नाद सोडून दिला व आपल्यासमोरील काचेच्या ग्लासात आपल्या आवडत्या अशा ‘मार्टिनी’चा एक छोटासा ‘शॉट’ बनवून घेतला.

परंतु हा इयन फ्लेमिंग मुळात होता तरी कोण? इंग्रजी भाषेमध्ये ज्याला ‘स्नॉब’ किंवा अमेरिकन्स ज्याला ‘वॉस्प’ म्हणतात. हुबेहुब तसाच हा एक ‘स्कॉटिश वंशाचा कट्टर इंग्रज होता. म्हणजे थोडासा अहंकारी, खानदानी गर्भश्रीमंतीमुळे स्वभावात, वागण्या बोलण्यात डोकावणारा नवाबी थाटाचा आढ्यतापूर्ण बनावटीपणा, अस्सल इंग्लिश शब्दोच्चार, सुंदर व तरुण स्त्रियांविषयी ‘पुळका’  वजा ‘सॉफ्ट कॉर्नर’ हे इयन फ्लेमिंगचे काही ठळक गुण विशेष; पण त्याचा सर्वात खास गुण – हवं तर दोष म्हणा – म्हणजे रहस्य रोमांचपूर्ण कारनाम्यांची त्याला अत्यंत प्रिय वाटणारी प्रवृत्ती. मुळात त्याच्या ‘रिस्क’ घेण्याच्या याच खुमखुमीवजा हव्यासापायी त्याने ‘रॉयल नेव्ही’ जॉईन केलेली! अशातच जगाला द्वितीय विश्‍वयुद्धाची कुणकुण लागली तसा इयनचा आनंद गगनात मावेनासा झाला! त्याला या युद्धापाठोपाठ येणाऱ्या विध्वंसाची चिंता नव्हती की स्वतःच्या जीवाचे भय नव्हते; परंतु गंमत म्हणजे जसे विश्‍वयुद्ध पुरेसे पेटले, हिटलरच्या कुख्यात ‘यु बोटी’ ब्रिटिश नेव्हीच्या युद्धनौकांवर एकामागोमाग एक असे जीवघेणे हल्ले चढवू लागल्या आणि कमांडर फ्लेमिंगची बदली एका दुसऱ्याच विभागात झाली! अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘नेव्हल इंटेलिजन्स’मध्ये नव्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी इयन फ्लेमिंग कमालीचा निराश झाला होता. इतका की या विभागात रूजू होण्याऐवजी तो चक्क आजारी पडला – अर्थात मुद्दाम होऊनच. त्याचे एकमात्र कारण म्हणजे गुप्तहेराचे काम ऐकणाऱ्याला तसे रोमांचक वा जोशपूर्ण वगैरे वाटले तरी प्रत्यक्षात मात्र त्या सतत १६-१६ तास एकाच खुर्चीत बसून चक्क टाईपरायटर बडवण्याचे काम करावे लागत असे. त्यातच कहर म्हणजे येथे एका ठिकाणी बसल्याबसल्याच त्याला पृथ्वीच्या पाठीवर पेटलेल्या युद्धातील ब्रिटिश सेनेच्या मर्दुमकी गाजवणाऱ्या घटनांचे सविस्तर वर्णन-अत्यंत टॉप सिक्रेट स्वरूपाचे वाचायला मिळत होते. त्याने तर फ्लेमिंग अधिकच उदास झाला. असेच शौर्य त्याला स्वतःला गाजविण्याची संधी मिळावी म्हणून त्याने जंगजंग पछाडले. आपल्या एकूण एक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चक्क विनंती, वशिला वगैरे लावून पाहिले, पण व्यर्थ! त्यानंतरही बरीचशी वर्षे फ्लेमिंगने मिलिटरी इंटेलिजन्स खात्यात बोरूबहाद्दराची भूमिका पार पाडून वयाच्या ४४-४५ व्या वर्षी त्याने सरळ सरळ निवृत्ती पत्करली; परंतु गेल्या दशकभरात त्याने ज्या घमासान युद्धाचे दुरूनच दर्शन घेतले होते. त्यात खऱ्या अर्थाने सक्रिय भाग घेऊन विलक्षण  पराक्रम गाजविणाऱ्या एका अत्यंत शूर व तितक्याच चाणाक्ष अशा एका महान गुप्तहेराच्या कामगिरीने इयन फ्लेमिंग अत्यंत प्रभावित झाला होता. सदानकदा जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष शत्रूच्या गोटात जाऊन हेरगिरीसारखे जोखमीचे काम यशस्वी रीतीने पार पाडणाऱ्या या महान गुप्तहेराचे नाव होते – ‘बिली ऊर्फ विल्यम डंडरडेल! रिटायरमेंटनंतर इयन फ्लेमिंगने अनेक धंदे जोपासले. वेळ जावा म्हणून नाना उद्योग करून पाहिले. पैशाची चिंता त्याला याआधी कधी नव्हतीच. असेच कधीतरी त्याला चक्क ‘बर्ड वॉचिंग’ म्हणजे पक्षी निरीक्षणाचा छंद जडला. काही काळ फ्लेमिंगने प्रामाणिकपणे पक्षी निरखलेही! त्या विषयावरील प्रसिद्ध पुस्तकेही वाचून हातावेगळी केली; मात्र त्यापैकी एकाच पुस्तकाचे नव्हे, तर त्या लेखकाचे नाव त्याच्या लक्षात राहिले. अर्थात मुळात तो त्या पुस्तकाच्या अथवा त्या लेखकाच्या लेखन प्रतिभेमुळे प्रभावित झाला होता, अशातला हा भाग नव्हताच. त्या मागचे एकमात्र कारण इयन फ्लेमिंगच्याच शब्दांत “त्या पक्षी निरीक्षकाचे नाव मुळात इतके साधे सोपे होते की ते मला प्रयत्न करूनही विसरता आले नसते!” असो; पण १९५३ साल उजाडले तोपर्यंत फ्लेमिंगची भटकंती आता थांबली होती. लवकरच एक रहस्यकथा लेखक या नात्याने आपल्या आयुष्यातील दुसरे व सर्वात महत्त्वाचे कार्य वजा ‘करिअर’ करण्याकरिता त्याने आपली आवडती अशी ‘गोल्डन आय’ इस्टेट निवडली. येेथे राहून तो आपल्या पहिल्यावहिल्या कादंबरीला मूर्त स्वरूप देणार होता.

आपल्या हातातील ‘मार्टिनी’चा शेवटचा घोट घेऊन इयन फ्लेमिंगने ग्लास खाली ठेवला की अचानक त्याच्या डोळ्यांसमोर आपल्या गत आयुष्यातील ‘हीरो’ अत्यंत साहसी अशा बिली डंडरडेल उभा राहिला. वास्तविक आयुष्यात ही जोखीम स्वीकारण्याच्या बिली व स्वतः फ्लेमिंगच्याही एकंदरीत ‘जुगारी’ प्रवृत्ती नव्हे बाण्यामुळेच त्याला कादंबरीचा विषय व तिचे शीर्षकही सुचले असावे आणि साहजिकच पुस्तकाचे नाव ठरले ‘कासिनो रोयाल!’ बिली या कथानकाचा नायक म्हणून साजेसाच असला तरी त्याचे ‘डंडरडेल’ हे नाव मात्र एखाद्या विनोदी चित्रपटातील हास्य कलाकाराला शोभण्यासारखेच होते. त्याक्षणी फ्लेमिंगला ‘त्या’ प्रसिद्ध पक्षी निरीक्षकाचे नाव आठवले. हे नाव अगदी परफेक्ट कुणालाही लक्षात राहील असेच होते. प्रोफेसर जेम्स बाँड हेच ते मूळ नाव!

‘कासिनो रोयाल’चा नायक जेम्स बाँड हा साधारणपणे पस्तिशीतला परीपक्व, देखणा असा रॉयल नेव्ही कमांडर जन्माने (फ्लेमिंगप्रमाणेच) ‘स्कॉटिश’ होता. या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या मागे दडला होता एक अत्यंत थंड डोक्याने काम करणारा एक कट्टर देशभक्त व पेशाने ब्रिटिश गुप्तहेर. हा आंतरराष्ट्रीय हेर देशाच्या अत्यंत गोपनीय अशा ‘मिलिटरी इंटेलिजन्स’च्या डिव्हिजन क्र. सहामध्ये (एमआय-६)काम करीत असतो. त्याचे ‘कोडनेम’ असते ‘एजंट ००७’ ऊर्फ ‘डबल ओ सेवन’% बाँडला एमआय-६ व सरकारतर्फे चक्क हत्या करण्याचे प्रशिक्षण व तशी खास सवलत मिळालेली असते. (एजंट ००७ मधील ‘डबल ओ’ म्हणजे ‘००’ चा खरा अर्थ हाच!) बाँडला विदेशी सिगारेटस्‌ व ‘मार्टिनी’ हे मद्य विशेष आवडणारे (खुद्द फ्लेमिंगचीच आवड!) त्याची प्रिय कार ‘ॲस्टन मार्टीन’ एका अर्थाने ‘जेम्स बाँड’मध्ये खुद्द लेखक फ्लेमिंग स्वतःचेच स्वप्न पाहत व जगतही होता.

१९५३ साली ‘कासिनो रोयाल’ कादंबरी सर्वप्रथम जगापुढे आली आणि ‘जेम्स बाँड’च्या रूपाने मरगळलेल्या ब्रिटिश जनतेला प्रथम सुपरमॅन, बॅटमॅनच्या तोडीस तोड (पुष्कळांच्या मते त्याहून ही श्रेष्ठ!) असा एक १००% खणखणीत, ब्रिटिश सुपरहीरो मिळाला होता!

आजवरचा बेस्ट बाँड

१९५३ साली इयन फ्लेमिंगने ‘कासिनो रोयाल’ कादंबरीतून जेम्स बाँडला सर्वप्रथम जगापुढे आणले खरे, त्यानंतरही त्याने आणखीन अकरा (एकूण १२) कादंबऱ्या व दोन ॲथॉलॉजी म्हणजे कथासंग्रह प्रसिद्ध केले होते हेही तितकेच खरे असले तरी ‘एजंट ००७’ मध्ये खऱ्या अर्थाने प्राण फुंकून त्याला जनमानसात अजरामर केले ते मात्र आजतागायत जगभर झळकलेल्या २२ अधिकृत स्वरूपाच्या व २ अनाधिकृत बाँडपटांनीच! मूळ कादंबरी ते रूपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास पार पाडण्याकरिता बिचाऱ्या बांॅडला एक-दोन नव्हे तर तब्बल एका दशकापर्यंत वाट पाहावी लागली हे आज कुणाला खरे वाटेल?

१९६२ साली ‘डॉक्टर नो’ हा पहिला बाँडपट झळकला याचे खरे श्रेय जाते ‘हॅरी सॉझमन’ नावाच्या एका उपेक्षित बाँडभक्तालाच! खऱ्या अर्थाने यानेच स्वतःबरोबर इयन फ्लेमिंगलाही चित्रपट बनवण्याच्या प्रेरणेने अक्षरशः झपाटून टाकले. त्याकरिता त्याने ‘एऑन प्रॉडक्शन’ नावाची एक चित्रपट निर्मितीसंस्था वजा कंपनी काढण्याचा घाट घातला पण पैशासाठी गाडे अडले तसे त्याने ‘अल्बर्ट ब्रॉकोली’ याला आपला पार्टनर बनवले. आजही बाँडपट म्हटले की ‘अल्बर्ट ब्रॉकोली’चेच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर येते. दुर्दैवाने काळाच्या ओघात ‘हॅरी सॉझमन’ कधीच हरवून गेलाय. ते काहीही असो. साठच्या दशकाच्या आरंभी फ्लेमिंग, हॅरी व अल एकत्र आले. सर्वप्रथम त्यांनी बाँडपटाच्या नायकाची निवड करण्यासाठी एका मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले. पीटर अँथनी नावाचा एक २८ वर्षीय तरुण सर्वांना पसंतही पडला; परंतु काही ना काही कारणामुळे हा ‘बाँडपट प्रोजेक्ट’ २-३ वर्षे रखडला नि शेवटी बंद पडला. या बाँडपटाचे काम पुन्हा सुरू होईपर्यंत वर्ष १९६२ उजाडले. का कुणास ठाऊक; परंतु अचानक सर्वांनाच मूळ हीरो ‘पीटर अँथनी’ नावडू लागला. ह्याचे मुख्य कारण होते ‘शॉन कॉनरी’ नावाचा एक दिग्गज अभिनेता! (प्रत्यक्ष नावाचे स्पेलिंग  ‘सीन कॉनेरी’ असे दिसत असले तरी त्याचा उच्चार ‘शॉन कॉनरी’ होतो.) ‘द नेम इज बाँड! जेम्स बाँड!!’ हे जगप्रसिद्ध बाँड वाक्य रूपेरी पडद्यावर तोच सर्वप्रथम म्हणणार हे जणू विधिलिखितच असावे! इयन फ्लेमिंगला तर हा नवा बाँड पाहताक्षणी आवडला. तशातच तो स्वतः व ओघानेच जेम्स बाँड तसेच शॉन कॉनरी स्कॉटिश वंशाचाच होता; परंतु शॉनसारख्या उंचपुऱ्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या अभिनेत्यामध्ये तसं पाहायला गेले तर अनेक दोषही होते. गेल्या ५० वर्षांच्या काळात एकूण एक बाँडप्रेमी, सिने-रसिक, चित्रपट समीक्षक, तसेच तमाम हॉलीवूडने एकमताने ‘बाँड म्हणजे शॉन आणि शॉन म्हणजेच बाँड!’ असे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे येथे वाचायला जरा विचित्रच वाटेल; परंतु सर्वप्रथम ‘शॉन’ला झिडकारले ते प्रत्यक्ष चित्रपटाच्या जान्यामान्या दिग्दर्शकाने, म्हणजे टेरेन्स यंग यानेच! फ्लेमिंग, हॅरी व अल ब्रॉकोलीचा विरोध डावलून त्याने शॉन कॉनरीची जेम्स बाँडच्या जाम्यानिम्यात चक्क एक ‘स्क्रीन टेस्ट’ घेतली. त्यानंतर ती ‘चित्रफीत’ त्याने लेखक इयन फ्लेमिंग व निर्माते हॅरी सॉझमन व अल ब्रॉकोलीला दाखवली. पडद्यावरचे शॉनचे ते बाँडरूप पाहून ते तिघे चक्क हिरमुसलेच! एकतर अभिनेता शॉन तेव्हा म्हणजे १९६२ साली चाळीस वर्षांचा – त्या मानाने बऱ्यापैकी वयस्करच होता. त्यातच त्याला भले मोठे टक्कल पडलेले! दिसायलाही तो काहीसा रांगडा. तसा रासवटच होता. जेम्स बाँड या पात्राकडून अपेक्षित असणारी वागण्या-बोलण्यातील सफाईदार देहबोली, हजरजवाबीपणा, मॅनर्स, एटीकेटस्‌ या साऱ्या गोष्टी शॉन कॉनेरीमध्ये जवळपास नव्हत्याच! प्रत्यक्ष शॉन कॉनरीनुसार ‘मी आणि बाँड प्रत्यक्षात ‘चॉक’ आणि ‘चीन’प्रमाणे अक्षरशः विरुद्ध टोकाची व्यक्तिमत्त्वे होतो!’ दिग्दर्शक टेरेन्स यंगच्या विरोधाकडे सरळ सरळ दुर्लक्ष करून निर्माते हॅरी अल यांनी ‘शॉन’ला अत्यंत महागड्या अशा चक्क डझनभर शिकवण्या ऊर्फ ट्यूशन्स लावल्या व सहाएक महिन्यात खरखरीत शॉन कॉनरीचे रूपांतर चकचकीत जेम्स बाँडमध्ये एकदाचे झाले! ‘डॉ. नो’ चित्रपटावर त्याकाळी तब्बल बारा लाख डॉलर्स इतका खर्च आला. हा ‘बाँडपट’ पहिला प्रथमच असल्याने तसा दणकून चालला नसला तरी जगभरातील प्रेक्षकांनी या नव्या नायकाला अर्थात जेम्स बाँड व पर्यायाने शॉन कॉनेरी यांना मनापासून स्वीकारले होते. बॉक्स ऑफिसवर ‘डॉ. नो’ने जवळपास सहा कोटी डॉलर्सची ठीकठाक कमाई केली. मग निर्मात्यांनाही हुरूप आला. लवकरच वर्षाला एक या प्रमाणे एकापाठोपाठ एक ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’ (१९६३), ‘गोल्डफिंगर’ (१९६४), ‘थंडरबॉल’ (१९६५) व ‘यु लिव्ह ओन्ली ट्वाईस’ (१९६६-६७) अशा एकूण पाच एकाहून एक सरस बाँडपटांनी जगभरात अक्षरशः धमाल उडवून दिली! ‘शॉन कॉनरी’च्या बाँडने बॉक्स ऑफिसवर त्याकाळी थोडीथोडकी नव्हे, ६०-७० कोटी डॉलर्सची माया गोळा केली. याचा अर्थ साफ होता. इयन फ्लेमिंगचे हे लाडके अपत्य ऊर्फ जेम्स बाँड ऊर्फ एजंट ००७ जगासमोर निव्वळ रुबाबात आले नव्हते तर ते यापुढे तमाम दुनियेतील सिने-प्रेमींच्या हृदयावर कायमची सत्ता गाजविणार होते!

पण… १९६९ साल आले नि अल्पावधीतच कुणालाही हेवा वाटावा असे उत्तुंग, देदिप्यमान यश मिळविणाऱ्या महानायक ‘जेम्स बाँड’ला अचानक कुणाची तरी दृष्ट लागली!

जेम्स बाँडच्या तब्बल पाच दशकांच्या दिमाखदार प्रवासामध्ये १९६९ साली कधी नव्हे तो एक दुर्दैवी अपघात घडला. निमित्त झाले एका नव्या कोऱ्या बाँडपटाचे! म्हणजे हॅरी-अल, तसेच एम. जी. एम. स्टुडिओने मिळून काढलेल्या बाँड मालिकेतील सहाव्या चित्रपटाचे!!

‘ऑन हर मॅजेस्टीज्‌ सिक्रेट सर्विस’ हे नव्या महत्त्वाकांक्षी बाँडपटाचे नाव होते. हा चित्रपट अत्यंत दिमाखात सादर करण्याची कामगिरी एका नव्या ताज्या दमाच्या दिग्दर्शकाकडे सोपवण्यात आली. हाच तो पीटर हंट! या पठ्ठ्याने आल्याआल्याच प्रथम काय करावे? त्याने तोपर्यंत  ‘सुपरस्टार’ पदाला पोहोचलेल्या शॉन कॉनेरीला सरळ एम. जी. एम. स्टुडिओबाहेरचा रस्ता दाखवला! का तर म्हणे शॉन आताशा रूपेरी पडद्यावर ‘जेम्स बाँड’पेक्षा ‘ग्रँडफादर बाँड’ वाटू लागला होता! सर्वांत आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द शॉन कॉनेरीने पडत्या फळाची आज्ञा घ्यावी त्याप्रमाणे तडकाफडकी स्वतःहून माघार घेतली! (‘खरंच सांगायचे तर नाहीतरी हा बाँड नावाचा निव्वळ बनावटही हीरो एक ‘माणूस’ म्हणून मला पहिल्यापासूनच आवडत नव्हता’ ‘इति शॉन कॉनेरी) त्यानंतर मात्र दिग्दर्शक पीटर हंटने बाँड इतिहासातील सर्वाधिक भयंकर अशी एक अक्षम्य घोडचूक केली. जेम्स बाँडच्या भूमिकेसाठी त्याने एका ‘जॉर्ज लॅझन्बी’ नावाच्या ३२ वर्षीय ऑस्ट्रेलियन मॉडेलची निवड केली. बाँडप्रेमींचे दुर्भाग्य असे की, एम. जी. एम.  तसेच निर्माते मंडळींनी त्याबाबत फारशी कुरबूर केली नाही. दुर्दैवाने जेम्स बाँडचा केवळ जन्मदाताच नव्हे तर त्याचा अस्सल चाहता असा लेखक इयन फ्लेमिंग हा दुर्दिन पाहण्याच्या पाच वर्षे आधी १९६४ साली- हे जग सोडून गेला होता. परंतु या नव्या बाँड जॉर्ज लॅझन्बीला पाहून इयनचा आत्मा जेथे असेल तेथे, नक्कीच तळतळला असावा याची मला १००% खात्री आहे! ‘हर मॅजेस्टी’ जगभर झळकला. प्रेक्षकांनी या बाँडला मुळात सहनच कसे केले? बाँडरूपातील ‘लॅझन्बी’कडे पाहून त्यांना काय वाटले असावे त्यांचे त्यांनाच ठाऊक! मित्रांनो, हा चित्रपट नव्हे हा विषयच आपण येथेच सोडून द्यावा हेच बरे!

या चक्क फसलेल्या बाँड वजा जॉर्जला एम. जी. एम.ने पुढच्या सलग सात बाँडपटात काम करण्याची (ते सुद्धा ‘बाँड’च्या भूमिकेत) ‘ऑफर’ देऊ केली; पण त्याने स्वतःच ही ‘ऑफर’ नाकारून आपल्यावरच नव्हे, तर जगभरातील एकूण एक बाँडपट रसिकांवर अनंत उपकार करून ठेवलेत! जॉर्ज लॅझन्बीच्या या एकमात्र महान त्याग कार्यामुळे आपणही मोठ्या मानाने त्याला माफ करून ‘बाइज्जत’ सोडून देऊ या! चुकभूल देणे-घेणे!! त्यानंतरच्या बाँडपटाकरिता १९७१ सालच्या ‘डायमंडस्‌ आर फॉर एव्हर’ अचानक सर्वांनाच आता ‘म्हताऱ्या’ शॉन कॉनरीची आठवण झाली. एवढंच नव्हे-चित्रपटाचे नाव ठरण्याआधी एम. जी. एम. ने पन्नास वर्षांच्या शॉनला त्याकाळी साडेबारा लाख डॉलर्सची पेशकश केली. तसेच चित्रपटाच्या नफ्यातील १२.५% उत्पन्न देखील देऊ केले. उत्तरादाखल शॉन कॉनेरीने थेट बाँड स्टाईलने फक्त आपली एकच भुवई उंचावली. घाईघाईने निर्माते मंडळींनी त्याला अतिरिक्त पावने दोन लाख डॉलर्स प्रति सप्ताह देण्याची तयारी दाखवली. नंतर शॉन कॉनरी एका मुलाखतीत म्हणतो, ‘त्या सर्वांनी, मी बाँडपट स्वीकारावा म्हणून दिलेली ‘फी’ वगैरे कसली, ही खरंतर चक्क ‘लाच’ होती’ ‘डायमंडस्‌’ हा शॉनचा सातवा – अधिकृतरीत्या शेवटचा बाँडपट!

शॉन कॉनरीपाठोपाठ लवकरच रॉजर मूरने ‘लिव्ह अँड लेट डाय’ (१९७३), ‘द मॅन विथ द गोल्डन गन’ (१९७४), ‘द स्पाय हू लव्ह मी’ (१९७७), ‘मुनेरकर’ (१९७९), ‘फॉर युवर आईज ओन्ली’ (१९८१), ‘ऑक्टोपसी’ (१९८३) व सरतेशेवटी ‘अ व्ह्यूू टू अ किल’ (१९८३) असे सलग आठ म्हणजे सर्वाधिक बाँडपट केले. शॉनच्या बाँडची सर त्याला नाहीच!

१९८७ साली ‘लिव्हींग डे लाईटस्‌’ व त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९८९ चा ‘लायसेन्स टू किल’ हे नवी बाँड टिमोथी डॉल्टनचे चित्रपट कधी आले न कधी गेले हे कुणाला साधे कळले ही नाही. परंतु १९९५ साली झळकलेल्या ‘गोल्डन आय’ (हे लेखक इयन फ्लेमिंगच्याच ‘हॉलिडे-होम’चे नाव!) च्या निमित्ताने पिअर्स ब्रॉसनन हा आधुनिक बाँडही फारसा प्रभाव पाडू शकला नाही.

मग २००६ साली आजच्या जेम्स बाँड ऊर्फ डॅनियल क्रेग या जगावेगळ्या अभिनेत्याचे आगमन झाले. प्रेक्षकांना त्याचा ‘कासिनो रोयाल’ आवडला खरा; परंतु एकूण एक सिने-समीक्षकांना हा भावनाप्रधान बाँड, इंग्रजीत ‘ब्लँड’ म्हणजे प्रभावहीन व गुळमुळीत वाटला. गंमत म्हणजे जगप्रसिद्ध ‘डेली मिरर’ वृत्तपत्रामध्ये तर डॅनियल क्रेगच्या २००८ मधील ‘क्वांटम ऑफ सोलॅस’ या बाँडपटाविषयी एक समीक्षणपर लेख प्रसिद्ध झाला. या लेखाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात केवळ एकच वाक्य होते. जाड टाईपात अत्यंत ठळकपणे झळकलेल्या या सर्व सुचक टिपणीत लिहिले होते, ‘द नेम ईज ब्लँड, जेम्स ब्लँड’.

माझ्या मते, एकटा शॉन कॉनरीचा अपवाद सोडून दिला तर आजतागायत येऊन गेलेल्या साऱ्या ‘बाँडनटांविषयी’ याहून अधिक लिहिण्यासारखे काही उरतच नाही!!!

 

 

Vidyanand Kurhade
+ posts

Leave a comment