चित्रपट, मालिका, वेबसिरीज अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमधून आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस करणारी  तेजस्विनी पंडित (Actress Tejaswini Pandit) आता आणखी एक नवीन जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘क्रिएटिव्ह वाईब’ च्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत असून या नवीन उपक्रमाचा शुभारंभ तिने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे. 

तेजस्विनीचा मित्र संतोष खेर याच्यासोबत भागीदारीत सुरु केलेले ‘क्रिएटिव्ह वाईब’ (Creative Vibe) मराठीसोबतच हिंदी मार्केटमध्येही लवकरच उतरणार आहे. संतोष खेर हे दुबईस्थित व्यावसायिक असून त्यांनाही कलेची प्रचंड आवड आहे. कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन आणि योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी ही भागीदारी केली आहे. ‘क्रिएटिव्ह वाईब’ अंतर्गत सिनेमा, सिरीज, शोज अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांची निर्मिती केली जाणार आहे. तत्पूर्वी ‘क्रिएटिव्ह वाईब’चा पहिलाच प्रोजेक्ट एक मराठी वेब शो असून तो ‘प्लॅनेट मराठी’सोबत (Planet Marathi) केला जाणार आहे. या शोबाबतच्या अनेक गोष्टी सध्या तरी गुलदस्त्यात असल्या तरी प्रेक्षकांसाठी हा शो म्हणजे पर्वणीच ठरणार आहे.

आपल्या या नवीन उपक्रमाबद्दल तेजस्विनी सांगते , ”यंदाचा वाढदिवस माझ्यासाठी सर्वार्थाने खास आहे. मी एका नवीन क्षेत्रात प्रवेश करत आहे आणि ही नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. केवळ आपल्या महाराष्ट्रापुरताच मर्यादित न राहता मला जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासही नक्कीच आवडेल. त्यामुळे साहजिकच मला सर्जनशील, उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण आशयावर काम करायचं आहे आणि यात मी नवोदितांना प्रामुख्याने संधी देणार आहे. मला साचेबद्ध किंवा एखाद्या चौकटीत अडकून न राहता नवनवीन विषय हाताळायचे आहेत. व्यावसायिक चित्रपट, सिरीज मी करणारच आहे याव्यतिरिक्त मला प्रायोगिक चित्रपट सिरीज, शोजही करायचे आहेत. अर्थात हे सगळं करताना प्रेक्षकांची आवडनिवड जपण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल. मला एका गोष्टीचा आनंद विशेष आहे, की माझा पहिला प्रोजेक्ट मी ‘प्लॅनेट मराठी’सोबत करणार आहे. काही गोष्टी खूप छान जुळून आल्या आहेत. अनेकांनी मला विचारलं, की आता अभिनय करणार का? तर निर्मितीची धुरा सांभाळत असतानाच माझा अभिनयाचा प्रवासही सुरु राहणार आहे. कारण मुळात अभिनय हे माझं पहिलं प्रेम आहे.”

Tejaswini Pandit with Akshay Bardapurkar
Tejaswini Pandit with Akshay Bardapurkar

या नवीन उपक्रमाबद्दल ‘क्रिएटिव्ह वाईब’चे संतोष खेर सांगतात, ‘’बऱ्याच वर्षांपासून मला कलाक्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा होती. कलेविषयी आदर असल्याने निर्मिती संस्था काढायचा विचार होता म्हणून मी माझी मैत्रीण तेजस्विनी हिला पार्टनरशिपची विचारणा केली. तिला माझी कल्पना आवडल्याने तिचा त्वरित होकार आला आणि ‘क्रिएटिव्ह व्हाइब’ चा जन्म झाला . आमच्या पहिल्याच प्रोजेक्टसाठी आम्हाला ‘प्लॅनेट मराठी’ची साथ लाभली आहे. ‘क्रिएटिव्ह व्हाइब’च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांचं उत्तमोत्तम मनोरंजन करू शकू अशी आशा आहे.’’

‘क्रिएटिव्ह वाईब’सोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात,”तेजस्विनी मुळात एक गुणी अभिनेत्री आहे. तिची सर्जनशीलता आपण तिच्या अभिनयातून, तिच्या फॅशन ब्रँडमधून अनेकदा पाहिली आहे. तिच्यातील या सर्जनशीलतेचा उपयोग तिला ‘क्रिएटिव्ह वाईब’साठीही नक्कीच होईल. आम्हालाही खूप आनंद होतोय, की तेजस्विनीचा पाहिला प्रोजेक्ट ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी नक्कीच काहीतरी मनोरंजनात्मक घेऊन येऊ.”

  • जादू ९० च्या दशकाची... साल १९९०
  • Attack | Official Trailer
  • दिलीप-राज-देव ते जितेंद्र-स्टार्स व त्यांच्या स्टाईल्स
  • जन्मदिन विशेष-सी रामचंद्र-अण्णांचा धमाका!
Website | + posts

Leave a comment