आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
माणसाला जन्मतःच अनेक नाती लाभतात. ज्यांची आपण निवड करू शकत नाही. परंतु असे एक नाते आहे ज्याची निवड आपण स्वतः करतो आणि ते नाते म्हणजे मैत्रीचे. जगात एकही मित्र नसणारा माणूस सापडणे तसे दुर्मिळच. मैत्रीचे नाते प्रत्येकासाठी खास असते. अशा या सुंदर नात्यावर भाष्य करणारी फिल्मी आऊल स्टुडिओजच्या अंकित शिंदे, दिव्या घाग, तेजस नागवेकर निर्मित ‘तुझी माझी यारी’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Marathi Web Series ‘Tuzi Mazi Yari’ will be releasing soon on Planet Marathi OTT)
काही दिवसांपूर्वीच या वेबसीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले होते. त्यात बिग बॉस सिझन ३ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ आणि अभिनेत्री स्नेहल साळुंके दिसत होत्या. यावरून ही वेबसीरिज त्यांच्या निःस्वार्थी मैत्रीवर भाष्य करणारी आहे, याचा अंदाज आला होता. आता या वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात या दोघींची झालेली ओळख ते मैत्री आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात येणारे अडथळे, त्यावर मात करत निभावलेली मैत्री, असा मैत्रीचा सुरेख प्रवास ‘तुझी माझी यारी’ मध्ये उलगडण्यात आला आहे.
‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ७ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या वेबसीरिजचे दिग्दर्शन तुषार घाडीगावकर यांनी केले असून सुमेध किर्लोस्कर लिखित या चार भागांच्या वेबसीरिजमध्ये मैत्रीचे अनोखे रंग पाहायला मिळणार आहेत. साईनाथ राजाध्यक्ष या वेबसीरिजचे निर्माता आहेत.