हिंग पुस्तक तलवार.. होय तुम्ही योग्यच वाचलंत, हेच नाव आहे प्लॅनेट मराठीच्या येऊ घातलेल्या वेब सीरीजचं. या वेबसीरीजच्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच झाला, ही वेबसीरीज लवकरच प्लॅनेट मराठी या पहिल्या नव्या कोऱ्या मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. निपुण धर्माधिकारी हा या वेबसीरीजचा ‘सुपरव्हिजन’ दिग्दर्शक असेल तर त्याच्या दिमतीला मकरंद शिंदे, नितीश पाटणकर, अनुपम बर्वे हे देखील दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत आणि हेच या वेबसिरीजचे वैशिष्ट्य आहे. तर यात आलोक राजवाडे, नील साळेकर, सुशांत घाटगे, मानसी भवाळकर, शौनक चांदोरकर, क्षीतिज दाते, केतकी कुलकर्णी, मुग्धा हसमनीस आदी दमदार कलाकार पाहायला मिळतील. केयूर गोडसे, नीरज बिनीवाले, निपुण धर्माधिकारी, अमृत आठवले यांच्या ‘सिक्सटीन बाय सिक्सटी फोर प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’ अंतर्गत ‘हिंग, पुस्तक, तलवार’ या वेबसिरीजची निर्मिती करण्यात येणार आहे.
नावावरूनच काहीतरी हटके असणाऱ्या या वेबसिरीजची कथा सहा व्यक्तींच्या अवतीभवती फिरणारी असून ही धमाल, विनोदी वेबसिरीज प्रेक्षकांना आठ भागात पाहायला मिळणार आहे. या सीरीजबद्दल दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतो, “प्रेक्षकांना पहिल्यांदाच जरा वेगळ्या आणि रंजक कॉमेडी पाहायला मिळणार आहे. या वेबसिरीजमधील प्रत्येक व्यक्तिरेखा ही आपल्या जवळपास वावरणारी असून एखादे पात्र आपल्यातही कुठेतरी दडल्याचे भासवणारी आहे. मुळात यातील कथा दैनंदिन आयुष्याशी जवळीक साधणाऱ्या असल्याने त्या सर्वच वयोगातील प्रेक्षकांना आवडतील. ‘हिंग, पुस्तक, तलवार’च्या माध्यमातून काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा मी प्रयत्न केला आहे, मला खात्री आहे हा प्रयत्न प्रेक्षकांनाही आवडेल.” तर निर्माता केयूर गोडसे म्हणतात, ” या सिरीजचे दिग्दर्शन चार जणांनी केले आहे. निपुण मुख्य दिग्दर्शक असून त्याच्यासोबत मकरंद शिंदे, नितीश पाटणकर, अनुपम बर्वेही दिग्दर्शन करणार आहेत. चार दिग्दर्शक एकत्र आल्याने या चौघांची हुशारी आणि त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना आपण एकाच वेबसेरीजमध्ये पाहू शकणार आहोत. विनोदात निपुणचा हातखंडा आहे. त्यामुळे या सिरीजतून दिसणारा, घडणारा विनोद नक्कीच वेगळा असणार. ही सिरीज सर्वांनी नक्कीच पाहावी, अशी आहे.”
———————————–
हेही वाचा-’प्लॅनेट मराठी’चा भव्य शुभारंभ – http://navrgdhu.us.tempcloudsite.com/film-news/planetmarathi-3/
———————————–
प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, “प्रेक्षकांना काहीतरी चौकटीबाहेरचे आणि दर्जेदार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. तेच तेच विषय हाताळण्यापेक्षा काहीतरी नवीन देण्याच्या उद्देशानेच आम्ही ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. याआधी आम्ही एक लव्हस्टोरीची घोषणा केली होती. आता ही विनोदी सिरीज घेऊन येत आहोत. ओंकार रेगे आणि तन्मय कानिटकर यांच्या लेखणीतून ही वेबसेरीज तयार झाली असून, ही वेबसिरीज मे २०२१ मध्ये प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.”